जोगवा १
गोंधळ घालू या ग गोंधळ मांडू या ग ।
महिषासूर मर्दिनेचा गोंधळ घालू या ग, गोंधळ घालू या ग ॥
त्रैलोक्याची जी स्वामीनी । आदिशक्ती श्री भवानी
चंडीका ही महालक्ष्मी चला पाहू या ॥१॥
तेजोमय अतःस्फूर्ती । अंतरीची दिव्य ज्योती
पाजळोनी स्वातंत्र्याची दिवटी लावू या ॥२॥
मंगल लेणे सौभाग्याचे । काजळ कुंकू रिपू रक्ताचे
या ग त्याने जगदंबेचे मळवट भरु या ॥३॥
स्वातंत्र्याच्या दुष्मातांची । मस्तक तोडुनी चांडाळांची
या ग त्याने जगदंबेची ओटी भरु या ॥४॥
गोंधळात दंग होऊ । उदोकार गर्जत राहू
शुभदा वरदा जगन्माता तृप्त करु या ॥५॥
जोगवा २
आईचा गोंधळ, गोंधळ, घालिते
आईचा जोगवा, जोगवा मागते ॥धृ॥
काम, क्रोध हे, क्रोध हे महिषासूर
आईने मर्दूनी, मर्दूनी, मर्दूनी, केले चुर
सत्त्व गुणाची, गुणाची, हाती तलवार ॥१॥
बोध संबळ, संबळ, संबळ घेऊनी हाती
ज्ञान दिवटया, दिवटया, पाजळल्या ज्योती
तेथे रमले मी, रमले मी, दमले दीनरात्री ॥२॥
सूक्ष्म स्थळी या, स्थळी या आईचेही घेण
अंबा भवानी, भवानी, तेथे तूझ ठाण
चैतन्य स्वरुपी, स्वरुपी,स्वरुपी नित्य राहण ॥३॥
या बा गोंधळा, गोंधळा, गोंधळाच्यासाठी
भक्त पडियेले, पडीले आटाआटी
विष्णू दासाची, दासाची, दासाची कृपा दृष्टी ॥४॥