बुधाची थोरवी
बुध ग्रह आहे ज्यास नीट ।
त्यासी सर्व मार्गही सुचती सुभट ॥
कोणत्या कार्यासही तूट ।
तो न करी कल्पान्ती ॥ १ ॥
आपल्या प्रासादिक श्रीशनिमाहात्म्यात 'तात्याजी महिपतींनी' ही सुंदर आणि चपखल अशी ओवी घालून यात बुधाची थोरवी वर्णन केली आहे.
ज्यांच्या कुंडलीत बुध शुभ असेल त्यांचे आयुष्य चांगले जाते यात शंकाच नाही.
बुध हा सूर्यापासून अगदी जवळ आहे. याचा व्यास पृथ्वीच्या निम्म्याने आहे. म्हणजे सुमारे ३१०० मैल आहे.
बुधाला आसाभोवती फिरण्यास ८८ दिवस लागतात. पृथ्वीपासून बुध पाच कोटी मैलांच्या अलीकडे कधी येत नाही.
बुध केव्हा दिसतो? - सूर्योदयापूर्वी सव्वा तास, पूर्व दिशेला खालच्या बाजूला बुधग्रह दृष्टीस पडतो; तसेच सूर्यास्तानंतर सव्वा तास, पश्चिमेकडे खालच्या बाजूला तो दिसतो.
बुधाला आणखी असणारी नावे-
१. सौम्य
२. विट
३. रौहिण्येय
४. ज्ञ
५. हेम्न
६. बोधन
७. चंद्रपुत्र
बुध याचा अर्थ शहाणा. ह्याला राजपुत्र मानतात. बुधाला कालपुरुषाची वाचा (वाणी-बोलणे) समजतात, ज्योतिषशास्त्र काय म्हणते? बुधाचा वर्ण दूर्वासारखा आहे. हा उत्तर दिशेचा स्वामी आहे. हा मुळात शुभ्रग्रह आहे; पण दुष्ट ग्रहांच्या संगतीत असला की दुष्ट बनतो. याची जात वैश्य असून हा रजोगुणी, हसतमुख, स्पष्ट बोलणारा, हडकुळा, विद्वान, बुद्धिमान, ऐश्वर्यवान, वात, पित्त, कफ यांमुळे मिश्रित प्रकृतीचा आणि नपुंसक आहे.
बुधापासून होणारे लाभ-मित्र, मामा व भाऊ यांच्या पासूनचे सुख देणारा हा ग्रह आहे. तसेच वक्तृत्व, गणित, लेखन, वेदान्त, ज्योतिष, शांति, बुद्धी या गोष्टींची देणगी बुधापासून मिळते.
पण हा बुध ग्रह दुसर्यावर अवलंबून असणारा आहे. लग्नकुंडलीतला तिसर्या म्हणजे मिथुन राशीत असलेला आणि सहाव्या म्हणजे कन्या राशीत असलेला बुध बलवान असतो.
तसेच दुसर्या म्हणजे वृषभेतला, पाचव्या म्हणजे सिंहेतला, दशम म्हणजे मकरेतला, एकादश म्हणजे कुंभेतला बुध आयुष्यात प्रगती घडवून आणतो.
तिसरे स्थान मिथुन आणि सहावे स्थान कन्या. या स्थानांचा आणि राशींचा मालक बुध आहे.
बुध हा शुभ्र ग्रह आहे.
शनि, शुक्र व बुध हे मित्र ग्रह आहेत.
दुसर्याच्या भरवशावर डोळे झाकून विश्वास ठेवणार्या आणि कामे करवून घेणार्यांच्या कुंडलीतला बुध हा ग्रह फार बलवान असतो.