बुधाची विवाहकथा

कुंडलीतील बुध ग्रहाचा कोप शांत करण्यासाठी हे व्रत करतात. जीवनातील सर्व प्रकारचे वैभव आणि सुख-संपत्ती प्राप्त करण्यासाठी या व्रताची कथा ऐकून  विधिवत व्रत करावे.

बुधाची विवाहकथा

मेरूचा पायथ्याशी सिंधूच्या काठी फार फार प्राचीनकाळी कुमार नावाचे अरण्य निरनिराळ्या बारमहा फुलणार्‍या फुलांनी आणि बारमहा लहडलेल्या फळांनी अत्यंत शोभायमान आणि रमणीय असे होते. केळी, नारळी, फणस, आंबे, जांभळी, पेरू, अंजीर, उंबर, अननस इत्यादी फळझाडांनी आणि रंगीबेरंगी पण सुगंधी फुलझाडांनी गजबजलेले असल्याने ते मोठे नयनरम्य होते. ठिकठिकाणी जिवंत पाण्याचे झरे त्या वनात झुळूझुळू वाहत राहून मन कसे आनंदित करीत होते. फळांनी भूक भागून संतोष होत होता. आशा त्या कुमारवनात शुक, सारिका, कोकिळ, भारद्वाज इत्यादी पक्षी आणि हरिण, मृग, अस्वले, चित्ते, गेंडे इत्यादी वन्य प्राणी कोणाचा द्वेष अगर राग न करता सुखाने राहात होते.

अशा या वनात एक राजा शिकारीसाठी आला असता दमून-भागून तलावाच्या काठी बसला. त्या तलावातील पाणी प्राशन करताच त्याला आपले शूरत्व जाऊन मार्दवत्व आले आहे, पुरुषत्व जाऊन स्त्रीत्व आले आहे अशी जाणीव झाली.

इतकेच नव्हे तर तेथील पाणी प्याल्याने त्याचा प्रधान, रथाचा घोडा यांनाही स्त्रीत्व प्राप्त झाले आणि ते सगळे लाजेने चूर झाले.

आता राजाला आणि प्रधानाला राजधानीत तोंड दाखवायला जागाच उरली नाही?

हे असे का झाले?

याचे कारण असे होते की, भगवान शंकर आपल्या प्रिय पत्‍नीसह याच वनात क्रीडा करीत होते. अर्थात क्रीडा अवस्थेत आपणाला कोणी पाहू नये, पुरुषाने पाहू नये, अशी देवीची इच्छा होती. ऋषिमुनी शंकर-पार्वतीच्या दर्शनास येण्याचे थांबत नव्हते व शंकर-पार्वतीला एकान्त मिळत नव्हता.

पार्वती या लोकांच्या दर्शनाने अगदी कंटाळून गेली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, "येथून पुढे जो कोणी पुरुष या वनात शिरेल तो स्त्री होईल."

अजाणतेपणाने राजा व प्रधान वनात शिरले आणि स्त्री बनले. या राजाचे नाव होते सुद्युम्न.

प्रजेला व राणीला तोंड दाखवायला नको म्हणून सुद्युम्न त्या कुमारवनात भटकू लागला. अगोदरच तो राजबिंडा, त्याला स्त्रीदेह लाभल्यावर तो अतिशय देखणा दिसू लागला. काही दिवसांनी या राजाचे रूपान्तर स्त्रीत झालेल्या या देहाला 'इला' असे म्हणू लागले. इला त्या कुमारवनात हिंडत असता योगायोगाने बुध तेथे आला.

बुध हा देखील चंद्रापासून झालेला सुस्वरूप असा देखणा पुरुष.

इला आणि बुध परस्परांवर प्रेम करू लागले आणि बुधवारी अष्टमीला त्यांनी गांधर्व विवाह केला. त्यांना पुरुरवा नावाचा पुत्र झाला.

पुत्र झाला तरी इला दुःखीच होती. ती मनात कुढत होती. तिने आपले दुःख बुधाला सांगितले नाही.

परंतु तिने वसिष्ठ ऋषींचे स्मरण केले. वसिष्ठ शंकराला शरण गेले. शंकर म्हणाले, "मुनी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे राजाला पुनः त्याचे रूप व पुरुषत्व द्यायला हरकत नाही; पण मी पार्वतीला आश्‍वासन दिल्याप्रमाणे माझ्या वराला कमीपणा यायला नको, म्हणून मी 'हा राजा एक महिना पुरुष व एक महिना स्त्री होईल.' असा आशीर्वाद देतो.

ही हकीकत कळल्यावर बुधाने शंकराची तपश्‍चर्या केली. शंकर प्रसन्न होऊन त्याने बुधाला वर दिला की, "तुझ्या सेवेने मूर्ख देखील विद्वान व भाग्यवान होतील." असा आहे बुध. म्हणून आपण बुधाची उपासना करावी.

पुढे इलेने भगवतीची प्रार्थना करून मुक्ती मिळविली.

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP