संत तुकडोजी सुविचार

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते .


८९. ज्या कुळात काही पिढ्यांपासून तरी सत्य-नैतिकता-अर्थात सदाचाराने वागण्याची दीक्षा चालू असते व दुसऱ्यांच्या सुखदुःखात मदत करण्याकरिता आपल्याप्रमाणेच लक्ष दिले जाते, त्या घराण्यास कुलवंत म्हणतात.
९०. आपल्या दुर्बळ स्वभावाचे कुणाच्याही धाडसी मनावर दडपण घालून आघात करु नका.
९१. सिंहाच्या छाव्यात हत्तीवर छापा घालण्याची उपजतच बुद्धी होत असते, तसेच कुलवान लोकांना शत्रूशी (दुर्जनाशी) झुंड खेळण्याची बुद्धी अगदी स्वाभाविक असते.
९२. भीतीने काळे तोंड घेऊन अंधारात लपून बसणारापेक्षा उजेडात लोकहिताकरिता मरणारा तरुणच खरा अमर होत नाही का ?
९३. ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या मातापित्याची सत्ता असते त्याप्रमाणेच त्यापेक्षाही लाखोपटीने अधिक त्याच्या देशाची सत्ता त्याच्यावर असते.
९४. देश हा नागरिकांच्या संख्येवर मोठा गणला जात नसून, त्यातील थोर व नीतिज्ञ लोकांवर मौल्यवान ठरला जात असतो.
९५. जेथील धर्मज्ञ (धर्मगुरु) व सत्ताधीश लोक मार्ग सोडून वागतात. तेथील प्रजेच्या सर्वस्वाचा न्हास अगदी जवळ आलेला असतो.
९६. अगोदर तर्काचे डोंगर उठवीत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाचा विचार करुन पुढे चालणारे लोकच खंबीर असतात.
९७. देशातील कृषीत धान्याची निपज अत्यंत कमी होणे हे त्यातील लोकांच्या आलस्यादि पापाचेच द्योतक होय, असे मला वाटते.
९८. लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इज्जतदार आयतोबापेक्षा मालकाचा दरवाजा ईमानदारीने राखणारा कुत्रा अधिक प्रिय वाटतो.
९९. दहा कुपुत्र असण्यापेक्षा एकटाच सुपुत्र असलेला अधिक बरा.
१००. नीच विचाराने जगण्यापेक्षा सुशीलतेने मरणेही अधिक मौल्यवान् असते.
१०१. आपले अंत:करण सर्वाकरिताच मोकळे ठेवण्याइतका मोठेपणा फारच थोड्या लोकांत मिळत असतो.
१०२. मित्रांनो ! श्रेष्ठ पुरुषांच्या आश्रयास राहून कितीही विद्वत्ता संपादन केली असली, तरी जो स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही, त्याची ती विद्या कुचकामाचीच समजावी.
१०३. स्वत:च्या पायावर उभा राहुन आपल्या बुद्धिशक्तीने समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टिने कमी वाटत असला, तरी त्याचे ज्ञान अनुभविक असल्यामुळे थोर व बहुमोल आहे, असे मी समजतो.
१०४. मिळालेल्या धनावर मनसोक्त चैन भोगून दुसऱ्यारकडे लक्षच न देण्याइतका नीचपणा पशुपक्षी व कीटकां (कोल्हे, कावळे, मुंग्या इ.) मध्येही नाही.
१०५. धर्म हा धंदा म्हणून आचरण्याचा विषय नव्हे, तर तो व्यष्टिसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो; आणि म्हणूनच त्याची मूलतत्त्वे अबाधित असतात.
१०६. आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासमोर समाजाचा नाश इच्छिणारे लोक लांडग्याइतकेच विद्वान (!) समजले पाहिजेत.
१०७. या जगातील प्रत्येक वस्तू कोणाच्या ना कोणाच्यातरी  उपकाराकरिताच आपले जीवन वाहणारी आहे. मनुष्य जर त्या सर्वात श्रेष्ठ आहे तर त्याने याचे महत्व समजून स्वतःही
दुसऱ्यावर उपकार करण्याची बुद्धी आपल्यात बाळगणे हेच त्यास भूषणावह आहे.
१०८. सृष्टीतील प्रत्येक वस्तूत, प्रत्येक कणात, सतत कार्यप्रवृत्ती खेळत आहे. जो निष्क्रीय (कार्यहीन) होऊन फिरेल देवाचा आणि समाजाचा गुन्हेगार ठरला जाईल, असा सृष्टीचा कायदा आहे.
१०९. अनुभवाच्या उच्च शिखरावर गेलेले पुरुष, जगालाच प्रभुचे रुपक-किंबहुना प्रत्यक्ष स्वरुप-समजून प्रत्येक जीवाशी समरस होऊन वागण्यात गर्क झालेले असतात.
११०. मित्रांनो ! जगात असा कोण साधू आहे की जो आपले कर्तव्यसोडून देवाच्या मागे लागल्यानेच देवाला मिळाला आहे ?
कुणीही नाही, जे भक्त झाले, त्यांचे कार्य पाहूनच देव
त्यांच्याकडे धावून आला आहे. मग लोक आपले सत्य
कार्य करुनच भक्त का बनत नाहीत ?
१११. आपली स्वसत्कर्तव्यरतता अंतर्बाह्य एकरुप दाखवणे, या भक्तिमार्गासमोर जगातील कोणत्याही सन्मानाची मजल पोचली नाही.
११२. आपले स्वत:चे सदाचारयुक्त नियुक्त कार्य सोडून केवळ भक्तीच्या मागे लागणे म्हणजे नाव सोडून नदी आवरण्याचा प्रयत्न करणेच आहे.
११३. अंगाने पोटाकरिता कष्ट करुन भक्ती करण्याऐवजी लोकांवर आपले ओझे घालून भारती करीत राहणे म्हणजे उपकाराऐवजी देवावर अपकारच करणे आहे असे मला वाटते.
११४. संसार ही परमार्थाची शाळा असून परमार्थ हा संसाराचा उद्दिष्ट हेतू आहे.
११५. आपल्या पूजेकरिता मंदिराची आवश्यकता असताना एखाद्या कारागीरास (शिल्पकारास) विनंती करण्यापेक्षा आधी स्वतःच कारागीर होऊन दुसऱ्यास उपकार दृष्टीने मकान बांधून देण्यातच देवाची पूजा अधिक होत असते, असे मला वाटते.
११६. कष्टाळूपणे मजूरी करुन जे पद सद् भक्तांनी प्राप्त करुन घेतले, ते लक्षावधी रुपये घरी असता दान करुनही कुणी मिळविले असे क्वचितच आढळेल.
११७.मित्रांनो ! या जगात अत्यंत गरम किंवा कोमल वस्तू जर कोणती असेल तर ती सज्जनाचे अंत:करण ! तसेच अत्यंत कठीण-कशानेही न          दुरभंगणारे-असे जर काही असेल तर तेही एक सज्जनांचे अंत:करणच !!
११८. सज्जन दयेच्या दृष्टीने अत्यंत कोमल,  निश्चयासाठी कठोर असतात.
११९. आपल्यासमोर स्पष्ट वाईट दिसणाऱ्या कार्यास अत्यंत उत्तम बनविण्याकरिता झटणे म्हणजे आपल्यापरीने राष्ट्रसेवा करणेच समजावे.
१२०. आपल्या राष्ट्राचा स्तुत्य, न्याय्य व सक्रीय अभिमान असणे म्हणजे देवासमोर कर्तव्याने चमकणेच होय.
१२१. जो दुसऱ्याची करुण हाक ऐकू शकतो त्यालाच ईश्वराचा आवाज ओळखता येतो.
१२२. मित्रांनो ! ईश्वरभक्तांना मोक्ष जसा हातचा मळ वाटतो तसाच उद्योगशील पुरुषांना संसार हा केवळ चेंडू प्रमाणे  क्रीडासाधन वाटत असतो.
१२३. जो पुरुष उद्योगाला केवळ आपल्या उदरभरणाचे स्वरुप देतो तो बंधनात पडतो आणि जो आपल्या उद्योगाला राष्ट्राच्या संपत्तीचे स्वरुप           देतो तो उद्योगानेही मोक्षगामी होत असतो.
१२४. ज्याची प्रेम-मुद्रा आपत्तीने मलीन होत नाही. तोच पुरुष मरणालाही लाजवीत असतो.
१२५. जगाच्या सुखासाठी कारागृहात अडकलेल्या
तुटक्या कैद्यासमोर लक्षावधी रुपये कमावणाऱ्या नोकरांचे तेज़ पडू शकत नाही.
१२६. सत्याच्या बाणेदारपणाला भरजरी पोषाख आणि सोन्याची आभूषणेही दाबू शकत नाहीत.
१२७. गुलाम होऊन सुवर्णाच्या रत्नजडित पिंजऱ्यात पडण्यापेक्षा मोकळ्या वातावरणात स्वतंत्रतेच्या हिरव्या चिल्हाटीकर राघू अधिक आनंदात दिसत असतात.
१२८. जी गुलामी पशू, पक्षी नि वृक्षही सहन करुन शकत नाहीत, ती मनुष्याने भिऊन स्वीकारावी; यापेक्षा अधिक पतन ते कोणते असते ?
१२९. पक्ष्यांच्या पंखांच्या भरारीपेक्षा मनुष्याच्या मानसिक भरारीत अधिक सामर्थ्य असते पण तपहीन मनुष्याच्या काल्पनिकभरारी पक्ष्यापेक्षाही निपट्टर (हीन) असते.
१३०. मित्रांनो ! हा सर्व संसार वीर्यवान लोकांचा दास आहे. जे लोक वीर्यहीन, हतबल असतील त्यांनां जगात  कोल्हा कुत्राही तान मारू देणार  नाही.

N/A

References : N/A
Last Updated : August 24, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP