सखयाचा लागला छंद चैन पडेना । प्राणसखया तुजवांचुन निद्रा येईना ॥धृ०॥
लइ दिवस पाहाते गवसेना जिवलग गडी । सखयापाई झाले माडीं पडलें उघडी ॥
मज भवतीं फिरत होता फिरुनी पगडी । याचे पाइंग मोडले बाई सोन्याचे लगडी ॥
चाल ॥
चवघांचे वचन मानुन शोधास निघालें । सप्त पाताळापासून मार्गी लागलें ॥
मूळद्वारी गणपति लिंगी ब्रह्म चांगलें । नाभीकमळ विष्णूचक्रकथा माघली ॥
हृदयी अनुहत चक्र शंभू रंगेले । कंठी वीसुत चक्र तीर्थ गेले सोईन ॥
जीव तुर्या मात्रा सांगितले मायीन । सखया० ॥१॥
गेले कारणदेही वतीसी करती मंथन । ते वर सत्रावी करी जीवन जनन ॥
त्रिकूट त्रिवेणीचे करोनी मम जात कथन । तिथें अपकीर्ती फसली पावली पतन ॥
चाल ॥
श्रीहाटचक्री विष्णु लक्ष्मी दिसली यजुर्वेद ओंकार मात्रा ठसली । तिथें चौघे पुरुष भेटले त्यासी पुसली ॥
देखिले की साजन मनें मजवर रुसली । जा वर उलट मार्गाने गोष्ट मनी ठसली ॥
ज्ञानचक्षुचें गायन आनंद माईना । हातीं धरुन नेले म्हावाके बाईन ॥२॥
गोलहाट चक्राचा कठीण घाट चढला । साम वेद शंभु गायनी सोमनाद भिडला ।
ओंसोहंमचीत अंती किताब पढला । ओंकारबीज दिसतां कल्प जडला ॥
चाल ॥
उन्मनीनें दावला पति मसी पटला । षडदळ दोदळ सदळ सहस्त्रदळ गटला ।
अथर्वण आरधी मात्रेचा मिटला खटला । वेदवानी इथुन झारली पसारा आटला ॥
तिथें मनाचा कांई चालेना दशदेही लुटका । सहस्त्रदळ चक्रटाळुवर येकच लयीन ॥
ज्ञान मारग कचेरी तीर्थे येकलइन  ॥३॥
ब्रह्म रंध्रांतुन वर शिरले संगे जीव घेऊन । सद्गुरु महाराजा देती दावून ।
महाबीज शून्यावरी दृष्टी लावून । ज्ञानाचें ज्ञान सागरी गेलें पोहून ॥
चाल ॥
कोटि सूर्याचा प्रकाश पाहांता दुरुन । जुनी ओळख यासी पटली नामेंकरुन ॥
मी जुने गांवाला मागें आलें ध्यान धरुन । झाली ओळख सर्वांठाई चरणीं गेलें भुरुन ॥
शरण जा गुरुला घे हीत अर्थ करुन । दत्त सवतळ प्रसन्न वडगांव कवीचा माईना ॥
आत्मज्ञानी गणपति म्हणे हरिगुण गाईन ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP