श्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीसिद्धचरित्र हा ग्रंथ नाथपंथांतील `सोऽहं राजयोगाचें', नाथसिद्धांच्या लीलाचरित्राद्वारें, उत्कृष्ट विवरण करणारा असा असल्यामुळें नाथ पंथासंबंधीं सविस्तर माहिती सदर प्रस्तावनेंत द्यावी असा आमचा मनोदय होता परंतु हा विषय फारच व्यापक असल्यानें व वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर यांनीं, त्यांच्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेंत पू. ४७ वर म्हटल्याप्रमाणें `आपल्याकडे नाथसंप्रदायाला श्रीनिवृत्तिनाथ, ज्ञानेश्वरमहाराज यांनीं भक्तिमार्गाची जोड देऊन त्याचा प्रसार केला. आपल्याकडे नाथसंप्रदायाची जी शाखा निवृत्तिनाथांच्या द्वारीं रोवली गेली तिचा, उत्तर हिंदुस्थानांतील इतिहासाशीं मेळ घालून तयार केलेला, अधिकृत असा इतिहास अजून तयार होणें आहे' ....... ही वस्तुस्थिति असल्यानें, या विषयावर स्वतंत्र संशोधन, ग्रंथ लेखन होणें आवश्यक आहे व तें येथील कक्षेच्या पलीकडचें असल्यानें येथें फक्त श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या विद्यावंशांतील कांहीं शाखांची त्रोटक माहिती देत आहोंत. येथे सर्वच्या सर्व शाखांचा उल्लेख आला आहे असें नव्हे. तसेंच बहुतेक तपशील कोठेना कोठें लेखी स्वरुपांत मिळालेला असला तरी कांहीं ऐकीव माहितीही नोंदविली आहे. पुढील क्रमांतील सर्वच शिष्यांपासून परंपरा चालूं राहिली असें नाहीं.
(१) योगयोगेश्वर गहिनीनाथांनीं श्रीनिवृत्तिनाथमहाराजांना नाथपंथाची दीक्षा दिली व `बंधूकडून या शुद्ध ज्ञानाचा प्रसार कर'  अशी आज्ञा दिलीं. त्याप्रमाणें निवृत्तिदेवांनीं ज्ञानेश्वरमहाराजांस शिष्य केलें. मुक्ताबाई व सोपान यांनाही निवृत्तिनाथांनींच अनुग्रह दिला असें कांहीं ठिकाणीं लिहिलेलें आढळते. परंतु अनेक शिष्यपरंपरेत ज्ञानदेव-मुक्ताबाई-चांगदेव अशीं नांवें असल्यानें सोपानदेव व मुक्ताबाई हे ज्ञानदेवांचे शिष्य होत हेंच अधिक बरोबर वाटते.
(२) ज्ञानेश्वरमहाराजांचा भावंडांनंतरचा पहिला शिष्य म्हणजे पैठण येथें महिषरुपानें असलेला शापित गंधर्व हा होय. आळंदीकडे परत येतांना या महिषास माउलींनीं बरोबर वागविले होते. तो वाटेतच जुन्नरनजीक अळें येथें शांत झाला. तेथें स्वहस्तें माउलींनीं त्याला समाधि दिली. त्या समाधीचे आजही दर्शन पूजन होते. कोणी सांगावे ? कदाचित्‍ त्याचे द्वारांदेखील महाराजांनीं कांहींना दृष्टान्त, अनुग्रह दिला असेल. `करील तें काय नोहे महाराज ?
(३) या चारी भावंडांचा आळंदीत अनन्वित छळ होत असतां त्यांचेवर पुत्रवत्‍ माया ममता करणारे `भोजनलिंगकाका' या नांवाचे एक सुतार होते. ही चारी भावंडे `अवतारी विभूति' आहेत अशी काकांची श्रद्धा होती. पुढें माउलींचे परमदिव्य चरित्र जगाच्या दृष्टोत्पत्तीस आले. शेवटीं महाराज समाधीला बसतेवेळीं भोजलिंग काकांच्या इच्छेप्रमाणें त्यांनाही महाराजांनीं आपल्या समाधिस्थानाच्या जवळ (हल्लीच्या देवळाच्या प्राकारांत शेजारीं पूर्व बाजूस) निजानंदीं बसविलें. भोजलिंगकाका हे ज्ञानदेवांचे शिष्य होत हें काय वेगळें लिहावयास हवे ? यांची शिष्यपरंपरा मात्र उजेडांत आलेली नाहीं.
(४) `आळंदींतीलच विसोबा खेचर ही आणखी एक व्यक्ति पश्चात्तापदग्ध होऊन श्रीज्ञानदेवांना शरण गेली. महाराजांनीं दिलेला सोऽहं बोध विसोबांचे ठिकाणीं तात्काळ ठसावला. हेच नामदेवरायांचें सद्गुरु ही गोष्ट जगप्रसिद्ध आहे. नामदेव महाराज पंजाबांत गेले होते. उत्तर भारतांत नाथपंथाचा बराच अनुयायी वर्ग असल्यानें नामदेवांनीं कांहीं शरणागतांना हा परमगुरु ज्ञाननाथांचा सांप्रदायिक सोऽहं उपदेश केला असणें संभवनीय आहे.
(५) श्रीज्ञानोबा माउलींच्या शिष्यवर्गात ज्यांची अवश्य गणना केली पाहिजे व भाग्यवंत पुरुष म्हणजे नेवासें येथील सच्चिदानंदबाबा हे होत. यांचें उपनांव थावरे असे होते. अद्यापिही थावरे घराणें नेवाश्याला आहे असें समजते. यांचेवर श्रीकृपा कशी झाली हें सर्वविश्रुत आहे. ज्ञानेश्वरी लिहून घेणार्‍या या सच्चिदानंद बाबांचा शिष्यसंप्रदाय आहे की नाहीं हें तूर्त अज्ञात आहे.
(६) एकवीस वर्षाचें आपलें `निष्कंलक' चरित्र आटोपून श्रीज्ञानेश्वरमहाराज समाधिगृहेंत प्रवेश करतां करतां ज्या एका व्यक्तीस सांप्रदायिक सोऽहं अद्वय राजयोग दीक्षा मिळाली इतकेंच नव्हे तर किमान अकरा पिढ्यापर्यंत जी गुरुशिष्यपरंपरा चालत आली त्या व्यक्तीसंबंधीं व शिष्यशाखेसंबंधीं येथें थोडया विस्तारानेंही माहिती नोंदविणें अत्यंत अगत्याचे वाटते. श्रीज्ञानदेवादि भावंडांचे आजोबा म्हणजे रुक्मिणीमातु:श्रींचे वडील सिद्धेश्वरबाबा ऊर्फ सिधोपंत यांचेकडे आळंदी, खेरीज आणखी चोवीस गांवचे `कुळकर्ण' होते. सिद्धोपंतांना पुत्र नव्हता. विठ्ठलपंतांना घरजावई करुन घेतलें तेव्हांच आपलीं चोवीस गांवची दप्तरें त्यांनीं जावईबापूंच्या नांवें करुन ठेवली होती. पुढील इतिहास मराठी वाचकांना चांगला माहीत आहे. स्वत: सिधोपंतांना एवढा प्रचंड व्याप एकटयानें पाहणें केव्हांच शक्य नव्हते. प्रत्येक गांवीं त्यांनीं आपला एक प्रतिनिधि म्हणजे `गुमास्ता' नेमला होता. खुद्द आळंदींत अंताजीपंत कुलकर्णी नामक एक विश्वासू ब्राह्मण त्यांचा गुमास्ता होता. विठ्ठलपंतांची `सज्ञान' मुलें म्हणून निवृत्ति ज्ञानदेवांकडे ही चोवीस गांवची `जहागीर' आली होती. पण तीं दप्तरें पाह्यला त्यांना वेळ होता कुठे? अंताजीपंत मात्र अत्यंत प्रामाणिक मनुष्य. कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस ! शके १२१८ ! गुरुवार, दुपारीं सूर्य माथ्यावर आलेला. `आत्मतृप्त' ज्ञानदेव आतां समाधि गुहेंत उतरुन कायमचे दृष्टीआड होणार हें ओळखतांच अंताजीपंत पुढें झाले. `सिद्धोपंतांतर्फे मी चोवीस गांवचें कुलकर्णपण केलें. हीं सर्व दप्तरें, महाराज, आपणासमोर ठेवतों. आपली आज्ञा व्हावी.' ``अहोजीपंत, आज्ञा दुसरी काय असणार ? चोवीस गांवची वृत्ति आम्हीं तुम्हालाच वंशपरंपरा बहाल केली आहे.'' माउलींचे मृदुमधुर शब्द ! तें ऐकतांच अंताजीपंतांना गंहिवर दाटला. आनंदानें नव्हे, पश्चात्तापानें ! श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानसूर्य. अशा या ज्ञानसूर्याचा प्रकाश इतका सन्निध असतां इतकें आयुष्य आपण प्रपंचचिंतेच्या काळोखांत चाचपडत घालविलें. आतां हा क्षण हुकला तर आपल्या दुर्दैवाला पारावरच नाहीं म्हणून झटकन्‍ अंताजींनीं माउलींच्या चरणावर मस्तक ठेवलें आणि ``मजवर पारमार्थिक कृपा करा'' अशी कळकळून प्रार्थना केली. पुढें काय झालें ? कवि म्हणतात : `मग कृपादृष्टीं पाहिलें त्यास । ठेविला हस्त मस्तकीं ॥ बीजमंत्र सांगोनि कानीं । सर्व गुरुगुह्य कथिलें तत्क्षणीं ॥' हें ओवीचरण वाचून लक्षांत येईल कीं वर नमूद केलेली हकीकत कोणत्यातरी ओवीबद्ध ग्रंथांतली आहे. अंताजीपंत कुलकर्णी या ज्ञानदेवांच्या शिष्याकडून प्रसृत झालेल्या परंपरेंतील अकरावे पुरुष कोणी सदाशिव नामक होते. त्या सदाशिवांच्या कृपाकिंतानें `सदाशिवदास' या टोपण नांवानें सुमारे तीन हजार ओव्यांचा `ज्ञानलीलामृत' ऊर्फ आळंदी माहात्म्य या नांवाचा अठरा अध्यायांचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत पहिल्या ५/६ अध्यायांत पद्म पुराणांतर्गत `सह्याद्रि खंडांतील' संस्कृत श्लोकांच्या आधारें आळंदी क्षेत्राचा महिमा वर्णन करुन, उरलेल्या भागांत निवृत्ति ज्ञानदेवादि भावंडांचे साद्यन्त चर्रित्र वर्णिलें आहे. इतर अध्यायांतही बरेच संस्कृत श्लोक आहेत. ग्रंथ प्रासादिक आहे पण सिद्धचरित्रासारखाच प्रकाशनाची वाट पाहात आहे. वरील अनुग्रहाचा प्रसंग १८ व्या अध्यायाचे शेवटीं गुरुपरंपरा सांगतांना वर्णिला आहे. नांवें अशी : श्रीज्ञानदेव, अंताजीपंत, देवराव, दत्तात्रेय, रघुनाथ, लक्ष्मण, तानदेव, गिरिराव, नारायण, पुन: लक्ष्मण, सदाशिव व त्यांचे शिष्य म्हणजे पोथीकर्ते `सदाशिवदास' या परंपरेंत कांहीं नांवें पितापुत्रांचीही आहेत. सांप्रदायिक वाचकांना विस्मय वाटेल तो असा कीं या ओव्यांपूर्वी, आदिनाथ च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा । निवृत्ति ज्ञानदेवाय देवचूडामणे नम: ॥ असा श्लोक व पुढे अखंडानंदरुपाय संविज्ज्ञानप्रदायिने । अनंतादिप्ररोहाय सदाशिव गुरवे नम: ॥' हा श्लोक लिहिलेला आढळतो. सदर पोथीसंबंधीं अधिक तपशील देण्यास येथें अवसर नाहीं; परंतु प्रत्यक्ष ज्ञानेश्वरमहाराजांच्या काळांतच महाराजांचे जे शिष्य झाले त्यांत सदर अंताजीपंतांचे नांव देणें नुसते योग्य नाहीं तर आमचें कर्तव्य आहे.
(७) श्रीज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांचें संगतींत तीर्थयात्रेला गेले असतां, उज्जयनीचा राजज्योतिषी, कांहीं संकटांतून मुक्त झाल्यानें, महाराजांची बार वर्षे प्रतिक्षा करीत होता. या वीर मंगल नांवाच्या व्यक्तीस माउलींनीं गुरुपदेश दिला. त्याचे इच्छेप्रमाणें स्वहस्तें समाधि दिली. मंगलेश्वर नांवाचे शिवलिंग वर स्थापन केलें. तें क्षिप्राकांठीं अद्यापिही आहे असें म्हणतात. वीर मंगल पांडे नामक एका सैनिकाची समाधि (स्मारक) आहे. परंतु येथें वर्णिलेले वीर मंगल हे ज्ञानदेवांचे समकालीन असल्यानें प्रस्तुतची समाधि वेगळी आहे हें उघड होय.
(८) ज्यांचेपासून, मुक्ताबाईचे द्वारां अनेक शिष्य शाखा पसरल्या ते ज्ञानदेवांचे प्रसिद्ध कृपांकित म्हणजे चांगदेवमहाराज होत. पासष्टीरुपानें स्वत: ज्ञानेश्वर महाराजांनीं उपदेश केला व त्या उपदेशाचा आनंद भोगण्याची गुरुगम्य खूण म्हणजेच सोऽहं बोध त्यांना मुक्ताईनें केला.
(९) अनुभवामृतावर अनुपमेय टीका लिहिणारे सुप्रसिद्ध शिवकल्याण यांची गुरुपरंपरा वटेश्वर (चांगदेव) यांचेपासून विस्तारली आहे. ``नित्यानंदैक्यदीपिका'' या सदर टीकाग्रंथाचें शेवटीं शिवकल्याणांनीं जी गुरुपरंपरा लिहिली आहे तींत, आदिनाथ ते ज्ञानदेव येथपर्यंत ज्ञानदेवांचीच मालिका देऊन पुढें मुक्ताबाई, वटेश्वर, चक्रपाणि, विमलानंद, चांगा केशवदास, जनकराज, नृसिंह, श्रीहृदयानंद, विश्वेश्वर, श्रीकेशवराज, हरिहरदासस्वामी, परमानंद, नित्यानंद व शिवकल्याण इतकीं नांवें नमूद केली आहेत. (अ १०/३/४५ ते ७५ ओव्या).
(१०) निळोबा महाराजांचे सद्गुरु देहूकर तुकाराम महाराज यांची गुरुपरंपरादेखील ज्ञानदेवांकडून प्रसृत झाल्याचा क्वचित्‍ उल्लेख सापडतो.
(११) ब्रह्मचैतन्य श्रीगोंवलेंकर महाराज यांचे सद्गुरु श्रीतुकामाई येहळेगांवकर यांच्या एका जुन्या ओवीबद्ध चरित्रांत, तुकामाईंची गुरुपरंपरा चांगा वटेश्वरापर्यंत पोहोंचल्याचें नमूद केले आहे.
(१२) सकलसंतचूडामणि श्रीज्ञानेश्वर महाराज लौकिक दृष्ट्या समाधिस्थ झाले असले तरी गेल्या पावणेसातशे वर्षांत श्रीमाउलींनीं अनेकांना दर्शन देऊन, सोऽहं अद्वय राजयोग परंपरा चालविण्याची अगर श्रीज्ञानेश्वरीचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. श्रीएकनाथमहाराजांना असा आदेश झाला होताच. श्रीएकनाथांनंतर, ज्यांचें नांव या संदर्भात लिहिलेच पाहिजे ते महापुरुष म्हणजे सत्यामलनाथ हे होत. श्रीसत्यामलनाथ व त्यांचे शिष्य श्रीगुप्तनाथ यांचेपासून अनेक शाखा फुटल्याचा इतिहास मिळतो. श्रीसत्यामलनाथांची एक शिष्य शाखा पुढीलप्रमाणें मिळते : सत्यामलनाथ, दीननाथ, अनंतराज, अमळनाथ, भुमानंद, गोपाळ, विश्वनाथ ऊर्फ भय्याकाका आणि अण्णाबोवा हुपरीकर. भैय्याकाकांचा ज्ञानेश्वरीचा फारच सखोल व्यासंग होता. गीतेंतील श्लोकांच्या पदच्छेदाला अनुसरुन ज्यांनीं ज्ञानेश्वरीची छापील प्रत प्रसिद्ध केली ते कुंटे नांवाचे गृहस्थ भैय्याकाकांच्या संगतीनेंच ज्ञानेश्वरीचे भक्त झाले होते. कुंटयांच्या प्रतींतील पाठ गुलाबराव महाराजांसारखे सत्पुरुषही प्रमाण मानीत.
(१३) दुसर्‍या शाखेंत सत्यामलनाथ-गुप्तनाथ-उद्बोधनाथ-केसरीनाथ-शिवदिन केसरी अशी परंपरा आहे. शिवदिन केसरींचा मठ पैठणांत असून त्यांनीं बरेच वाड्मय लिहिले आहे. गुरुभक्तिपर, वेदान्तपर अशी त्यांचीं कांहीं प्रासादिक पदें जुन्या पिढींतील नामांकित कीर्तनकार पूर्वरंगांत घेत असत. श्रीलक्ष्मीनाथ व केसरीनाथ अशी दोन समाधिस्थानें सध्यांही आळंदी येथें श्रीमाउलींच्या मंदिराचे प्राकारांत आहेत. पूर्वी उल्लेखिलेल्या भोजलिंगकाकाचे समाधीला लागून आहेत. ही परंपरा पुढेंही चालूं राहून तींत महीपतिनाथ नामक एक मोठे अनुभवी संत होऊन गेले. यांची समाधि व मठ उत्तरेंत ग्वालेर येथें असून `ढोलीबुवाचा मठ' म्हणून प्रसिद्ध आहे. महीपतींच्या योगपर पदांतून नाद, प्रकाश, ज्योतिदर्शन, शेषदर्शन - इ. अनेक उल्लेख आढळतात. निंबाळचे संत गुरुदेव रानडे यांना या पदांची फार आवड होती. भक्तिविजय लिहिणारे महीपति हे नव्हेत. सध्यां या मठांत श्रीज्ञानदेवांची नाथपरंपरा व भागवतधर्माचरण हे दोन्ही चालूं असून हल्लीं वासुदेवनाथ नामक मठाचे अधिकारी आहेत. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याचा उत्सव कार्तिकांत मोठया प्रमाणांत होतो. एर्‍हवी ज्ञानेश्वरीपठण, शिवदिनकेसरी, महीपति यांच्या पदांचें भजन वगैरें चालूं असतेच.
(१४) महायोगी सत्यामलनाथांची तिसरी परंपरा गुप्तनाथांकडून परमहंस, ब्रह्मानंद, परमानंद, काशीनाथ, विठ्ठलनाथ, विश्वनाथ, माधवनाथ, मंगलनाथ अशी असून सांप्रतही ही परंपरा चालूं आहे. यांत एक वैशिष्टय असें कीं चित्रकूट करवी येथें गुप्तनाथांची जी समाधि आहे त्या ठिकाणीं, या गादीवर विराजमान होणार्‍या पुरुषास शैली, शृंगी वगैरे नाथपंथाची भूषणें देऊन कांहीं काल गुप्तनाथांच्या समाधीजवळ बसवायचे. एवढयाच काळांत त्या पुरुषास मूल बीज मिळून तो पूर्ण योगेश्वर बनतो अशी प्रख्याति आहे. श्रीमत्‍ प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे समकालीन असे या परंपरेतील श्रीमाधवनाथ हे नि:संशय अवतारी पुरुष होते. वरील समाधिजवळ वयाच्या दहाव्या वर्षी बसविले असतां त्याच वयांत गुप्तनाथ कृपेनें ते पूर्ण ज्ञानी झाले; तरी देखील मठांत न राहतां पुढें जवळ जवळ अठ्ठावीस वर्षे माधवनाथांनीं हिमालयांत योगाभ्यास व तीर्थाटन केलें. नाथांचा जास्त संबंध पुणें, नागपूर व इंदूर या शहरी आला. समाधि इंदूरला आहे. यांचें एक विस्तृत लीलाचरित्र खूप वर्षापूर्वी प्रसिद्ध झालें होतें. त्यांचे चरित्र म्हणजे गोरक्षनाथादि सिद्धपुरुषांच्या चरित्राचीच पुनरावृत्ति होय. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १७७९ ते फाल्गुन वद्य (नाथ) षष्ठी शके १८५८ असा त्यांचा अवतारकाळ आहे. `श्रीनाथ जय नाथ जय जय नाथ, या महामंत्रानें भक्तमंडळी त्यांना आळवीत असतात.
(१५) श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं समाधींतून ज्यांचेवर कृपा केली असे आणखी एक सत्पुरुष म्हणजे अच्युतमहाराज केसकर हे होत. यांच्या ज्ञानेश्वरी निरुपणांत व कीर्तनांत ज्ञानदेवांचा कृपाप्रसाद ओतप्रोत असे. वै. नानामहाराज साखरे यांच्या मूळ पूर्वजांवर श्रीकेसकर महाराजांचा अनुग्रह झाला व साखरे घराण्यांत श्रीज्ञानेश्वरी पठण प्रवचनाची परंपरा सुरुं राहिली. श्रीअच्युतमहाराज यांसी ज्ञानदेवांनीं सोहं अद्वय राजयोगाची दीक्षा कदाचित्‍ दिली असेलही परंतु ज्ञानेश्वरीच्या प्रसाराची परंपरा मात्र केसकरांकडून चालूं राहिली हें नि:संशय ! हल्लीं ज्ञानदेवीच्या अर्थाच्या निरनिराळ्या प्रती सहज मिळूं शकतात; परंतु सर्व ओव्यांचा प्रासादिक अर्थ प्रथम वै. नानामहाराज साखरे यांनींच तयार केला. साखरे महाराजांच्या सार्थ ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही आवृत्तींत प्रस्तुत अच्युतमहाराजांची व मूळ साखरेबोवांची हकीकत वाचावयास मिळेल.
(१६) पूज्य हैबतरावबाबा हे गेल्या शेदीडशें वर्षांतील असेच एक माउलीचे शिष्य होत. यांचें चरित्र रोमांचकारी आहे. हैबतरावबाबांनीं माउलींच्या पालखीचा सोहळा राजैश्वर्यानें सुरुं केला. पंढरीला जशी नामदेव पायरी तशी आळंदीला बाबांची समाधि माउलीच्या महाद्वारींच आहे. हैबतरावबाबांची सोऽहं दीक्षा परंपरा वर्‍हाडांत आर्वी या गांवीं चालूं आहे असा स्पष्ट धागा मिळाला आहे. अर्थात्‍ त्यांत पंढरीची वारी वगैरे आहेच. हैबतराव बाबांच्या मायबाई म्हणून एक अधिकारी शिष्या होत्या. त्या सोऽहं भाव पारंगत होत्या. तुकडोजीबोवांचे श्रद्धास्थान अडकोजी महाराज हे या योगिनीचे शिष्य होते अशी ऐकीव माहिती मिळते. आर्वी येथें मायबाईचा मठ अजून आहे असें समजते.
(१७) अगदीं अलीकडे म्हणजे गेल्या ५०/६० वर्षांपूर्वी श्रीगुलाबमहाराज महाराज यांना प्रत्यक्ष समाधींत नेऊन मांडीवर बसवून माउलींनीं अनुग्रह दिल्याचा इतिहास व गुलाबराव महाराजांचें दैवी चरित्र प्रसिद्ध आहे. श्री गुलाबराव महाराजांचे दैवी चरित्र प्रसिद्ध आहे. श्रीगुलाबराव महाराज आपलें सांप्रदायिक नांव `पांडुरंगनाथ' असे सांगत असत व आपले पट्टशिष्य बाबाजीमहाराज पंडित यांनाही त्यांनीं `स्कंदनाथ' हें नांव दिलें होते यावरुन गुलाबराव महाराजांस नाथपंथाचा उपदेश झाला असावा हें स्पष्ट दिसतें.
(१८) वारकरी पंथांतील आणखीही एका सत्पुरुषांचें नांव येथें नमूद केले पाहिजे. वै. सोनोपंत दांडेकरांचे गुरुजी वै. विष्णुबोवा जोग महाराज यांना ज्ञानदेवांनीं दर्शन देऊन `कीर्तनप्रवचनद्वारां ज्ञानेश्वरी गाथ्याचा प्रसार करण्याची आज्ञा दिली होती' असा इतिहास आहे. जोगमहाराज पन्नास वर्षापूर्वी समाधिस्थ झाले. त्या पूर्वीचा काळ त्यांनीं नुसता कीर्तन प्रवचनांत व्यतीत केला असें नसून चांगला गाजवला. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ ही त्यांची समाजाला फार मोठी देणगी आहे. जोगमहाराजांनीं सोहं राजयोगाची परंपरा चालविली नाहीं. कदाचित्‍ त्यांना स्वत:ला श्रीमाउलींनीं हाच बोध केला असेल कारण कै. दांडेकरांनीं जोग महाराजांचे जें चरित्र लिहिलें आहे त्यांत महाराजांच्या साधकदशेबद्दल सांगतांना `ज्ञानेश्वरींत जिला सोहंसिद्धि म्हणतात त्या मार्गाचे जोगमहाराज साधक होते' अशा अर्थाचें एक सूचक वाक्य मामांनीं लिहिले आहे. त्यांनीं बंकटस्वामी, दांडेकर वगैरे जे १५/२० शिष्य तयार केले ते मात्र ज्ञानेश्वरी गाथा यांच्या अध्ययनांत आणि कीर्तन प्रवचनरुपानें त्यांचा प्रसार करण्यांत ! वै. सोनोपंत दांडेकर हे नाथपंथी गुरुपरंपरा सांगून सोहं दीक्षा देत नसत, पोथीवर माळ ठेवून रामकृष्ण हरी म्हणावयास सांगत. हाच त्यांचा अनुग्रह हें प्रसिद्ध आहे. असो. श्रीज्ञानेश्वर महाराज हे जगद्गुरु आणि जन्ममाउलीही आहेत. शिवाय अजूनही ते अनेकांवर कृपा करीत आहेतच. तेव्हां माउलींच्या विद्यावंशाचा विस्तार संपूर्ण संग्रहीत कोण करुं शकेल ? म्हणून येथेंच थांबतो.


References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP