पुनर्मुद्रणाची पूर्वपीठिका

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीक्षेत्र पांवस (जि.रत्नागिरी) येथील आत्मानुभवी संत, श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या गुरुपरंपरेंतील सिद्ध पुरुषांचीं चरित्रें व सांप्रदायिक तत्त्वबोधाचें विवेचन - अशा स्वरुपाची `श्रीसिद्धचरित्र' नामक महाप्रासादिक पोथी, एक्क्याऐंशी वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, विस्तृत टीपा देऊन, `स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळा' तर्फे प्रकाशित करुन आज वाचकांचे हातीं सुपूर्द करतांना आम्हाला अत्यंत समाधान होत आहे. `श्रीसिद्धचरित्र' हा ओवीबद्ध ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्यें लिहिला गेला व शके १८१० (इ.स.१८८८) मध्यें श्रीक्षेत्र कोल्हापूर येथें, त्या वेळीं असलेल्या `ज्ञानसागर' नांवाच्या मुद्रणालयांत तो ग्रंथ `शिळा छाप' पद्धतीनें छापला गेला. त्यानंतर या पोथीचें पुनर्मुद्रण झालें नाहीं.
वर नमूद केल्याप्रमाणे, शके १८१० ते १८९१ एवढा मोठा काळ गेल्यानंतर हा ग्रंथ पुन्हां छापण्याचा जो महान्‍ सुयोग आला आहे, तो कसा आला त्याची पूर्वपीठिका कांहींशा विस्तारानें येथें सांगणें आवश्यक वाटतें. श्रीआदिनाथ शंकरांपासून प्राप्त झालेली सोऽहं राजयोगाची दीक्षा श्रीसिद्ध मच्छेन्द्रनाथांनीं श्रीगोरक्षनाथांना दिली; व ही दीक्षा-परंपरा पुढें श्रीज्ञाननाथ म्हणजेच ज्ञानोबा माउलीपर्यंत आली; हें सर्वश्रुत आहे. नवनाथचरित्रांत वर्णिलेल्या इतरही सिद्धनाथांकदडून गुरु्शिष्यपरंपरेनें ह्या बोधाचा अनेक शाखांनीं भारतवर्षात विस्तार झाला. ज्ञानेश्वरमहाराजांनीं शके १२१८ मध्यें अलंकापुरीं `संजीवन समाधि' घेतली. संजीवन समाधि याचा अर्थ, ज्ञानेश्वर महाराज अद्यापीही देहाचा त्याग न करतां, जगदुद्धारासाठीं निरंतर समाधिसुखांत डोलत राहिले आहेत. लक्षावधि लोकांच्या श्रद्धेचा आणि कित्येक महात्म्यांचा, हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय असतांना, संजीवन समाधीचें आवर्जून स्पष्टीकरण देण्याचा हेतु असा आहे कीं समाधिस्थ झाल्यानंतर सुमारे तीनशें वर्षांनीं ज्याप्रमाणें श्रीएकनाथ महाराजांस माउलींनीं प्रत्यक्ष दर्शन दिले त्याप्रमाणें, त्या नंतरच्या काळांतही कांहीं थोर पुरुषांना ज्ञानेश्वरमहाराजांनीं प्रत्यक्ष दर्शन दिले. कांहींची केवळ दर्शनाची इच्छा पूर्ण केली. कांहीना समाजांत ज्ञानदेवीची उपासना वाढविण्याचा आदेश दिला; तर कांहीं सत्पुरुषांना, सांप्रदायिक सोऽहं राजयोग दीक्षा देऊन शिष्य परंपरा चालविण्याची आज्ञा केली. श्रीसिद्धचरित्र पोथींतील श्रीदेव-चूडामणि हे ज्ञानदेवांच्या अशाच कृपेला पात्र झालेले सत्पुरुष होते. श्रीदेवचूडामणि महाराजांपासून सोऽहं भाव उपासनेची परंपरा जी सुरु झाली ती अव्याहत अशी श्रीगुंडामहाराज (पंढरपूर, देगलूर) रामचंद्र बुटी महाराज (नागपूर) महादेवनाथ महाराज (चिंचणी) या परंपरेनें विजापूर तिकोटें येथील श्रीरामचंद्रयोगी महाराजांकडे आली. सद्गुरुंच्या आज्ञेनें सुमारे तीन चार हजार श्रद्धाळुजीवांना श्रीतिकोटेकर महाराजांनीं परंपरागत सोऽहं उपासना दिली. तसेंच अधिकार पाहून, अनेक शिष्यांना परंपरा चालविण्यासही त्यांनीं सांगितलें. श्रीरामचंद्रमहाराजांपासून, या कारणानें, या `बोधवृक्षाला अनेक शाखा फुटल्या. संप्रदाय चालविण्याचा अधिकार मिळालेले श्रीविश्वनाथ महाराज नांवाचे सत्पुरुष कोल्हापूरजवळ रुकडी येथें सुमारे ४०/५० वर्षे राहिले. प्रकृतिस्वभावामुळें त्यांनीं लोकोद्धारार्थ दूरवर संचार केला नाहीं; तरी त्यांच्या सहवासांत आलेल्या पुष्कळ भावुकांना उपदेश दिला. या शिष्यवर्गात, जे थोडे शिष्य, पुढे परंपरा चालविण्यास योग्य ठरले त्यापैकीं श्री. गणेश नारायण वैद्य उर्फ बाबामहाराज हे होते. श्रीगणेशनाथ उर्फ बाबामहाराज वैद्य यांनींही परमार्थाची विशेष आस्था असणारर्‍या कांहीं स्त्रीपुरुषांना अनुग्रह दिला. तथापि त्यांचा शिष्यवर्ग मर्यादित राहिला. संप्रदाय चालविण्याचा अधिकार बाबामहाराजांनीं, अचूक परीक्षा करुन, एका शिष्याकडे सोपविला व ते शिष्य म्हणजेच पांवस येथें गेली ३०/३५ वर्षे वास्तव्य करुन असलेले, या परंपरेंतील `सद्गुरु' पद-स्थ स्वामी स्वरुपानंद हे होत. सद्गुरु बाबा महाराज ज्याला अभ्यास किंवा `भजन' म्हणत असत तो अभ्यास, तें भजन-म्हणजेच `सोऽहं' रुपी आत्मचिंतन स्वामी स्वरुपानंद यांनीं इतके निष्ठेनें, इतके उत्साहानें, इतकें दीर्घकाल केलें कीं स्वामींची ही साधना, सिद्धावस्था व समाजाला आदर्शभूत असलेले एकूण जीवन, जगाला ज्ञात झालें पाहिजे अशी ईश्वरी योजना ठरली. श्रीस्वामींकडून या ज्ञानपरंपरेचा पुन्हां फार मोठया प्रमाणांत विस्तार व्हावा अशी प्रभुइच्छा झाल्याचें फलित असें कीं श्रीस्वामींचा सहवास झालेले, रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संजीवनी चिकित्सक, संत वाड्मयाचे अभ्यासक व `शेटफळें' येथील गु्रुशिष्य परंपरेचें विद्यमान्‍ अधिकारी डाँ. रा. य. परांजपे यांनीं श्रीस्वामीचें एक विस्तृत असें उत्कृष्ट चरित्र लिहिलें. सुमारे सहाशे (डेमी साईज) पृष्ठांचें हें रसाळ व उद्‍बोधक चरित्र `स्वामी स्वरुपानंद जीवन' चरित्र आणि तत्त्वज्ञान - या नांवानें, मार्गशीर्ष वद्य १२ शके १८८६ (इ.स.१९६४) या तिथीस म्हणजे स्वामींच्या जन्मदिवशीं, पांवस येथें स्वामींच्या चाहत्यांनीं प्रकाशित केलें. (त्यावेळीं सेवा मंडळाची स्थापना झाली नव्हती). सदर चरित्रांतील अकराव्या प्रकरणांत `स्वामी संप्रदाय' या शीर्षकाखालीं, आदिनाथ ते स्वामी स्वरुपानंद यांचेपर्यंत आलेल्या गुरुपंपरेंतील प्रत्येक सिद्धपुरुषांचें त्रोटक चरित्र दिलें आहे. श्रीतिकोटेकर महाराजांच्या चरित्र भागांत पृष्ठ ३३४ वर `श्रीसिद्धचरित्राचा' उल्लेख लेखकांनीं केला आहे. हा उल्लेख म्हणजे प्रस्तुत पुनर्मुद्रित पोथीच्या रुपानें, अनेकांच्या दारीं जाणार्‍या ज्ञानगंगेची गंगोत्री होय ! स्वामी स्वरुपानंदांचें चरित्र, प्रसिद्धीनंतर गेल्या पांच वर्षांत शेकडों वाचकांच्या हातीं गेले. त्यामुळे, या संप्रदायाशीं निगडित अशा मागील पिढींतील बहु चाल पिढींतील असंख्य मंडळींना `सिद्धचरित्र' ही परंपरेची दुर्मिळ पोथी पुन: प्रकाशित व्हावी अशी उत्कट इच्छा निर्माण झाली. त्यांतही कोल्हापूर येथील सांप्रदायिकांनीं विशेष उत्कंठा दर्शविली. एका दृष्टीनें तें योग्यच होते; कारण सिद्धचरित्रांत जवळजवळ निम्मा भाग ज्यांच्या लीलाचरित्राचा आहे ते तिकोटेकर महाराज करवीरला अनेकदां येत असत. चातुर्मास जगदंबेच्या मंदिरांतील ओवर्‍यांत राहात. इतकेंच नव्हे तर महाराजांच्या फार अधिकारी शिष्या महायोगिनी गोदामाई कीर्तने या कोल्हापूरच्याच ! या गोदामाईंच्याच तिकोटेकर महाराजांनीं आज्ञा केली होती.
पोथीचे कांही अध्याय कोल्हापूरच्या परिसरांतील `प्रयाग' तीर्थाजवळ लिहिले गेले आणि ग्रंथाचें एकच मुद्रण झालें तेंही करवीरच्या शिळा छाप मुद्रणालयांत ! या सर्व कारनांनीं कोल्हापूरच्या भक्तमंडळींनी पोथीच्या पुनर्मुद्रणासाठीं फारच तळमळ व्यक्त केली. हें साहजिकच होतें. इ.स. १९६८ च्या गणेश चतुर्थीचे सुमारास मंडळाचे कार्यवाह हे कोल्हापूरला गेले असतां, उपरोक्त उत्साही सांप्रदायिक मंडळींनीं त्यांचेशीं ग्रंथ छपाईच्या संदर्भात खुलासेवार चर्चा केली. त्या चर्चेतून कार्यवाहांना या सांप्रदायिकांची एतद्‍विषयक आस्था तीव्रतेनें जाणवली व `सेवामंडळा' तर्फे `श्रीसिद्धचरित्र'  प्रकाशित करण्यासाठीं सभा, ठराव, इ. योजना कार्यवाहींत आणण्यासाठीं कार्यवाहांनीं पाऊल टाकलें. दरम्यान सहज योगानें आणखी एक सिद्धचरित्रविषयक कार्य चालूं होतें. श्रीस्वामींनीं गुरुसेवा म्हणून श्रीबाबा महाराजांना जशी हस्तलिखित ज्ञानेश्वरी अर्पण केली त्याप्रमाणें आपणही त्याच भावनेनें श्रीस्वामींना सिद्धचरित्राची प्रत लिहून समर्पण करावी अशी प्रस्तुत संपादकास इच्छा होऊन, शिळा छाप पोथीवरुन अशी हस्तलिखित प्रत तयार करण्याचें काम सुरुं होतें. सदर नक्कल पूर्ण होऊन विजयादशमी शके १८९० (इ.स. १९६८ आँक्टोबर) या दिवशीं पांवस येथें सद्गुरुंना ही पोथी अर्पण करण्यांत आली. दि. ९ नोव्हेंबर (६८) रोजीं मंडळाची वार्षिक साधारण सभा रत्नागिरीस झाली. कोल्हापूर येथील चर्चेचें सूत्र धरुन, रत्नागिरीस झाली. कोल्हापूर येथील चर्चेचें सूत्र धरुन, कार्यवाहांनीं या सभेंत ``प्रकाशन कार्यात `सिद्धचरित्र' या पोथीचा समावेश करावा लागेल असें वाटत असून त्यासाठीं कोल्हापूर भागांतून मोठया प्रमाणावर देणग्या मिळणें शक्य आहे'' अशी माहिती दिली. सदस्यांपैकीं एका व्यक्तीनें ताबडतोब पांचशे एक रुपयाची देणगी जाहीर करुन छपाईसाठीं उत्तम `श्रीगणेशा' केला ! यानंतर श्रीसद्गुरु स्वामींच्या जन्मोत्सव सोहळ्यांत पांवस येथें १६ डिसेंबर १९६८ रोजीं रात्रौ नऊ वाजतां एक `अनौपचारिक साधारण सभा' भरली होती. या सभेस सांप्रदायिक मंडळी बहुसंख्येनें उपस्थित होती; व त्यांतही पुणें, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी येथील या कार्यात विशेष जबाबदारी उचलणारे अनेकजण हजर होते. `श्रीसिद्धचरित्र मंडळातर्फे प्रकाशित करावे' असा ठराव या सभेंत एकमतानें मंजूर झाला. सदर सभेंतील कामकाजाचा अधिक तपशील संस्थेच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेंत (१९६९) पाहावयास मिळेल.
एवढया पूर्वतयारीनंतर प्रत्यक्ष पुनमुद्रणाचे दृष्टीनें दोन गोष्टींची नितांत आवश्यकता होती. एक म्हणजे छपाईच्या फार मोठया खर्चासाठी देणग्या मिळविणें व दुसरें म्हणजे पोथीची मुद्रण प्रत तयार करणें. पहिल्या कार्यासाठीं सेवा मंडळानें एक जाहीर विनंति पत्रक छापून त्याद्वारें समाजाला देणगीसाठीं आवाहन केलें. कोल्हापूर येथील सांप्रदायिकांनींही हौसेनें एक आकर्षक नमुना तयार करुन त्याप्रमाणें, पोथीसारखें आडवे व रंगीत छपाईचें विनंति पत्रक तयार केलें. दुसरें कार्य मुद्रण प्रतीचें ! ही मुद्रणप्रत करतांना, प्रति आहेत ? छापील किती व हस्तलिखित किती ? ओवीसंख्येंत फरक कां पडला ? उपलब्ध प्रतींतून पाठभेद आढळतात का ? जास्तींत जास्त जुनें हस्तलिखित कोणतें व तें कोठें आहे ? शिळा छाप पोथीचें मूळ कोठें आहे ? - अशा स्वरुपाच्या प्रश्नचिन्हांची समाधानकारक सोडवणूक होण्यासाठीं `संशोधन क्षेत्रांत' उतरणें भागच होते. सांप्रदायिकांना अत्यंत उपयुक्त अशी ही पोथी, फार मोठया खर्चाची जबाबदारी शिरावर घेऊन, पाऊणशेंऐंशी वर्षानंतर पुनर्मुद्रित करतांना, ती जास्तीत जास्त जुन्या म्हणजे अस्सल प्रतीवरुन छापणें हें सेवामंडळाचें कर्तव्य ठरलें व त्यामुळें पूर्ण श्रद्धेनेंच, सिद्धचरित्राची अस्सल पोथी मिळविण्यासाठीं आवश्यक तें शोधन सुरुं झालें. श्रीसिद्धचरित्राची, शिळा छाप आवृत्ति, ज्या पोथीवरुन छापली गेली ती मूळ प्रत मिळविण्याची आम्हीं बरीच खटपट केली परंतु शिळा छापेचें मूळ हस्तलिखित मिळूं शकलें नाहीं. तें मिळाले असतें म्हणजे छापील प्रतींत कमी असलेल्या सुमारे अडीचशे ओव्या, छापतांना गळल्या कीं त्या मूळ हस्तलिखितांतच नाहींत ? एवढें तरी निश्चित झालें असते. अर्थात्‍ शिळा छापेच्या मूळाचा अस्सलपणा ठरविण्यासाठीं अडीचशे ओव्या जास्त असलेल्या नकला, त्या नकलांचें मूळहस्तलिखित मिळविणें वगैरे काम करावेच लागले असते.कोल्हापूरहून, `अधिक ओवीसंख्या असलेली पोथीची नक्कल आपल्या संग्रहीं आहे, असें कलविणारे सज्जन, श्रीतिकोटेकर महाराजांच्याच एका शिष्यशाखेंतील अनुग्रहीत आहेत. त्यांच्या पत्रावरुन, मुद्रणप्रत लेखकांनीं कोल्हापूरला त्यांची समक्ष भेट घेतली. त्यांनाही पण पोथी प्रसिद्ध व्हावी अशी तीव्र इच्छा असल्यानें मुद्रण प्रतीसाठीं ही नक्कल त्यांनीं लगेच आमचे हवालीं केली. ही कोल्हापूरांतली पोथी म्हणजेही, नक्कल प्रत असल्यानें सिद्धचरित्राची मूळ संहिता मिळविण्याची जरुरी कायमच राहिली. अशा संधींत मुंबई येथील `श्रीदीपलक्ष्मी' नांवाच्या मासिकानें मे १९६९ चा अंक श्रीस्वामी स्वरुपानंद विशेषांक म्हणून प्रसिद्ध केला. डाँ. परांजपे यांनीं चरित्रांत उल्लेखिलेल्या श्रीसिद्धचरित्रासंबंधीं अधिक माहिती वाचकांना व्हावी, ती वाचून जुन्या पीढींतील वाचकांपैकीम कोणकडून व्हावी, ती वाचून जुन्या पिढींतील वाचकांपैकीं कोणाकडून सिद्धचरित्राच्या अस्सल किंवा आणखी कांहीं हस्तलिखित पोथ्यांची माहिती सेवा मंडळाकडे यावी, ग्राहकांनीं या मुद्रणकार्यास देणगी देण्यास उद्युक्त व्हावे अशा अनेक सद्‍हेतूंनीं प्रेरित होऊन `श्रीसिद्धचरित्राची ओळख' हा लेख व जाहिरात यांचा आम्हीं या विशेषांकांत समावेश केला. आमच्या मंडळाच्या सभांपासून सदर विशेषांक प्रसिद्धीपर्यंत मध्यंतरींच्या काळांत, कमी जास्त ओव्या दाखविणार्‍या, वर लिहिल्याप्रमाणें दोन पोथ्या मिळाल्यामुळें आणि त्यांतील शिळा छाप ही एकच मुद्रित आवृत्ति असल्याने आम्ही आणखी हस्तलिखितें मिळविण्याचा प्रयत्न केला. श्रीसिद्धचरित्राचीं चार पांच हस्तलिखितें उपलब्ध आहेत असें समजलें. त्यापैकीं दोन पाहावयास मिळालीं. यापैकीं एकही पोथी अस्सल नव्हती. एक प्रत ही शिळा छापेची नक्कल असून ती अवलोकन केली. इतर हस्तलिखितांतून शिळा छाप पोथीपेक्षां ओवीसंख्या अधिक आहे असें कळले. ह्या सर्व प्रतीही मुळाची नक्कल, त्या नकलेवरुन पुन: नक्कल अशा स्वरुपाच्या आहेत. श्रीसिद्धचरित्राची अस्सल पोथी मिळणें तर आवश्यक होते आणि उपलब्ध होत होत्या त्या सर्व नकला ....... पोथीचें पुनर्मुद्रण शक्यतो लवकर व्हावे अशी सर्वांचीच इच्छा ! पहिल्या आणि दुसर्‍या संकल्पित छापील आवृत्तींत एक्क्याऐंशी वर्षांचें प्रदीर्घ अंतर पडलेलें आहेच; आतां आणखी कांहीं वर्षे, अस्सल प्रत धुंडणें, उपलब्ध सर्व प्रतींचा चिकित्सक अभ्यास करणें, प्रत्येकांतील पाठभेद नोंदवणें, मूळ पाठ कोणता हें तर्काने ठरवून पाठनिश्चिती करणें - इत्यादि संशोधन कार्यात घालविणें हें अनेक निष्ठावंत भक्तांच्या उत्साहावर विरजण घातल्यासारखें होणार होते, सिद्धचरित्र पोथी शक्यतों लवकर प्रसिद्ध व्हावी अशी सेवा मंडळाचीही इच्छा असल्यानें, मिळालेल्या पोथ्यापैकीं त्यांतल्या त्यांत प्राचीन हस्तलिखितावरुन तूर्त नवीन आवृत्ति एकदां छापावी हा विचार बळावला व त्याप्रमाणें मुद्रणप्रतीसाठीं हालचाल सुरुं झाली. अस्सल पोथी मिळत नाहीं हें शल्य बोचत असतांनाच, श्रीगुरुपरंपरेच्या प्रसन्नतेमुळें व सद्गुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या आशीर्वादाच्या प्रभावानें एक योगायोग आला व आम्हांस मूळ पोथीचा पत्ता मिळाला. श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्गुरु श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराज यांचे पौत्र व हल्लीं विजापूर येथील श्रीमहाराजांच्या मठाचे अधिकारी पू. रघुनाथमहाराज पागे (तिकोटेकर) हे एप्रिल मे महिन्याचे सुमारास १९६९ सालीं खूप कालावधीनंतर सपत्नीक कोल्हापूरला आले होते. श्रीरघुनाथमहाराजांचे नेमके यावेळीं कोल्हापूरला झालेलें आगमन हें मोठेंच प्रसादचिह्न होते. कोल्हापुरांतील सांप्रदायिक मंडळींनीं ही सुवर्णसंधि साधून त्यांची भेट घेतली व सिद्धचरित्र छपाईसंबंधीं सर्व तपशील सांगितला त्यावर त्यांना अत्यंत समाधान वाटलें. `मूळ पोथीचा अद्यापि शोध लागत नाहीं, ती अस्सल प्रत कोठें असेल याची आपणांस कांहीं माहिती आहे काय ? अगर ही प्रत विजापूर मठांत आहे का ?' अशी पृच्छा करतां श्रीरघुनाथमहाराज व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जानकीबाई या उभयतांकडून निश्चयात्मक शब्दांत ``श्रीसिद्धचरित्र पोथीचें मूल हस्तलिखित सध्यां विजापुरांत नसून गुरुसंप्रदाय चालविणार्‍या अशा, तिकोटेकर महाराजांच्या कन्या प्रात: स्मरणीय साध्वी तीर्थरुप गुंडाक्का यांचेकडून अमुक सांप्रदायिक व्यक्तीकडे गेली आहे. ते सध्यां अमुक शहरीं राहात आहेत आणि त्यांचेकडून छपाईच्या कामासाठीं ही अस्सल पोथी नक्की मिळूं शकेल. शिवाय आम्ही त्यांना पत्र लिहितों'' अशी माहिती व आश्वासन मिळालें. मूळ पोथीचा शोध लागला हें समजल्यानें झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणें शक्य नाहीं ! सदर अस्सल प्रतीबद्दल अधिक तपशील, हल्लीं ज्यांचेकडे ही पोथी आहे ती त्यांचेकडे कशी आली वगैरे हकीकत, त्यांचें नांव, गांव हें सर्व आम्ही यापुढें योग्य ठिकाणीं नमूद करणार आहोंतच. येथें तूर्त एवढेंच लिहायचे कीं पूज्य गुंडाक्कांकडून दीक्षा मिळालेल्या या सज्जनांनीं आपल्याजवळची अस्सल प्रत, मुद्रणप्रत करण्यासाठीं आनंदानें सेवा मंडळाचे स्वाधीन केली.
प्रस्तुत अस्सल पोथी अत्यंत जीर्ण झाली असून कांहीं पृष्ठें फाटूं लागली आहेत. अक्षरांच्या लपेटी, शब्दांचीं जुनी रुपें वगैरे वैशिष्टयांमुळें, संप्रदायाशी संबंधित नसलेला पण जुन्या पोथ्यांशी दृढ परिचित असलेला कोणीही मनुष्य ह्या पोथीचें आयुष्य ८०/९० वर्षापेक्षां निश्चित कमी नाहीं हें सहज सांगूं शकेल. सद्गुरु स्वामींना पूर्वायुष्यांत अशा जुन्या पोथ्यांचीं हस्तलिखितें हाताळण्याचा बराच प्रसंग असल्यानें, पांवस येथें सदर हस्तलिखित पोथीच्या मजकुराचें पहिलें पृष्ठ पाहतांच श्रीस्वामींनीं ``हेंच तत्कालीन हस्तलिखित'' असे उद्गार काढले व ``याच पोथींतील पाठ घेऊन, सेवा मंडळातर्फे योजलेल्या पुनरावृत्तीसाठीं मुद्रण प्रत तयार करावी'' असें सुचविलें. मूळ प्रत मिळवून तिच्या अस्सलपणाची खात्री होण्यास, आम्हांस एवढे, सदुगुर स्वामींचें, सिद्धवचन पुरेसे होते ! हा मजकूर लिहून झाल्यानंतर `दैवी चमत्कार' म्हणतां येईल अशी एक घटना घडली. प्रस्तुत पोथीचें एक पान सहज सूर्यप्रकाशांत धरले असतां त्यावर `वाँटर मार्क' आढळला. कुतूहल जागृत झाल्यानें अशी अनेक पृष्ठें पाहिली. आणि अडतिसाव्या अध्यायाचें शेवटच्या पानावर १८८३ अशा स्वच्छ मोठया आंकडयाचा वाँटरमार्क पाहण्यांत आला. ह्या सनाप्रमाणें शालीवाहन शक १८०५ येतो. पोथीच्या अस्सलपणाचा यापेक्षां प्रबलतम पुरावा आणखी कोणता हवा ? अशा रीतीनें श्रीसिद्धचरित्राची अस्सल प्रत हातीं आल्यानंतर ११ जुलै ते २४ आँगस्ट १९६९ या कालावधींत मुद्रणप्रत तयार झाली. टीपा तयार होऊन त्यांचें वाचन, चर्चा वगैरे पांवस, व कोल्हापूर येथें झालें होते. त्या सर्व टीपा पांवस येथे मंडळाचे कार्यवाह यांनीं पुन: एकदां सूक्ष्मपणें वाचल्या. अशी सदर मुद्रण प्रतीची तयारी होत असतां एप्रिलचे १९६९ चे मध्यास कोल्हापूरचे एका वृद्ध सांप्रदायिक सज्जन व्यक्तींनीं ``शिळा छाप पोथीवरुनच सेवा मंडळानें नवी आवृत्ति छापावी. प्रात:स्मरणीय साध्वी गोदामाई कीर्तने यांच्या आशीर्वादाने ही शिळा पोथी छापली गेल्यानें व अनेक वर्षे अनेक सांप्रदायिकांनीं त्याच पोथीवरुन पठण केलें असल्यानें, कमी जास्त ओव्यांचा विचार न करतां शिळा छापेचें पुनर्मुद्रण करावे; परंतु जास्त ओव्या असलेली पोथीच ग्राह्य मानून छपाई करायची झाल्यास सध्यां चाललेली घाई न करतां, आणखी एखादे वर्ष लागले तरी मिळविणे शक्य होईल तितक्या जुन्या पोथ्या मिळवून, पाठभेद पाहून, त्यांतील अस्सल प्रतीची पोथ्या मिळवून, पाठभेद पाहून, त्यांतील अस्सल प्रतीची खात्री करुन घेऊन, टीपा प्रस्तावना वगैरे न घालतां सिद्धचरित्र छापावे'' अशा आशयाचें पत्र पांवसला पाठविले व ते स्वत:ही श्रीस्वामींना भेटले.
सदर वयोवृद्ध सांप्रदायिक सद् गृहस्थांच्या भूमिकेमागील तळमळ ध्यानीं घेऊन सेवा मंडळानें कोल्हापूर येथील `पुढारी' या दैनिकांत दि. १७ आँगस्ट ६९ रोजीं `तिकोटेकर महाराजांच्या शिष्यशाखांच्या परंपरेंतील पारमार्थिक विचारवंतांना' उद्देशून एक जाहीर `विनंति' पत्र प्रसिद्ध केले. ८१ वर्षांचा काल निघून गेल्यावर सिद्धचरित्राच्या पुनर्मुद्रणाचा योग स्वामी स्वरुपानंदांच्या कारकीर्दीत यावा याला एक कारण असावे व हृदयाच्या कुपींतील गुरुभक्तीच्या लाल रंगांतून लडिवाळपणाच्या लेखणीनें तें कारण नमूद करायचें म्हणजे, स्वत: तिकोटेकर महाराजांचें नांव रामचंद्र होते, त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचे नांव `अप्पा' होते. आणि सद्गुरु महादेवनाथांना त्यांच्या गुरुंनीं उपदेश केला त्यांत `स्वरुपानंद' हा शब्द आला आहे ---
- तेव्हां, रामचंद्र, अप्पा आणि स्वरुपानंद ह्या तिन्ही नांवांचा संगम झालेला, आपल्या शिष्यपरंपरेंतील सिद्ध पुरुष श्रीतिकोटेकर महाराजांनीं पांवसला स्थिरावलेला पाहिला आणि ---- सेवा मंडळातर्फे, स्वामी स्वरुपानंदांच्या आशीर्वादानें प्रकाशित होणार्‍या सिद्धचरित्र पोथीच्या पुनर्मुद्रित आवृत्तीची पार्श्वभूमि ही अशी आहे !

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP