चंपाषष्ठी - ईशचरित सुधा
श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.
सोमवार ता. ९-१२-१९२९
चरित्र तुझे गोड सुधेहुनी थोर । माधुर्याचे सार अनुपम ॥१॥
किती प्राशितां हे पुरेसे होईना । वटि तो येईना कधीं त्याचा ॥२॥
अधिकाधिक गोडी उपजे सेवितां । गोडीस दृष्टांता थार नाही ॥३॥
सकळ इंद्रियांसी उल्हास होय फ़ार । उत्साहाचा भर मना आणी ॥४॥
अपूर्व हे आहे दिव्य रसायण । प्रेमे अंत:करण सुखावत ॥५॥
उमज पडत अज्ञान नासत । शहाणपण येत जीवालागी ॥६॥
संशय ते सारे फ़िटोनियां जाती । प्रकाशे ज्ञानज्योती ह्रदयांत ॥७॥
वैराग्याचा अग्नि प्रदीप्त होतसे । भक्ति दुणावतसे सेवनाने ॥८॥
मन आनंदत चित्त विकासत । अंतर खुलत रंगोनियां ॥९॥
पान अमृताचे स्नान ते गंगेचे । काय वर्णू वाचे अनुपम ॥१०॥
तेच नाथा निज चरित्र गाववी । आम्हांसी रंगवी रसभरे ॥११॥
विनायक म्हणे यशामृत धारा । आम्हांसी उदारा पाजवी की ॥१२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 04, 2020
TOP