श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । सद्‍गुरु श्रीतुकाराम ।

उपदेशिती भक्तपरम । अनंत पावती विश्राम । तुकाईपाशीं ॥१॥
शाहाण्यासी अंत न देत । भाविकांसी सफल होत । अनन्यासी तारित । भवसिंधूपासोनि ॥२॥
विकल्पी विकल्प करिती । मूर्ख लोक वेडया भजती । मत्सर निंदा आपुले मतीं । करिती कितीएक ॥३॥
एकदा एक चमत्कार । झाला तो करूं विस्तार । गोचरस्वामी उंबरखेडकर । गुरुबंधू तुकाईचे ॥४॥
गोचर म्हणाया कारण । धेनूपरी अन्नग्रहण । हस्त स्पर्श न करिती जाण । मुखांनें आहार करिती ते ॥५॥
परम विरक्त संन्यासी । परी सगुणोपासना आनंदेसी । मठीं राहती-सुखेसी । मुमुक्षु जन बोधाया ॥६॥
एके समयीं ऐसें झालें । मठीं ब्राह्मण भोजना बैसले । कर्मठपणें भरी भरलें । अंतरी स्थिती नेणती ॥७॥
गोचरस्वामी भक्त परम । प्रसाद देवादिकां दुर्गम । तंव पावले तुकाराम । अकस्मातं त्या ठायीं ॥८॥
स्वामीस झाला आनंद । धावोनि धरिलें पद । विनविती सेवावा प्रसाद । परमानंदे ॥९॥
उभयतांही गुरुभक्त । विवेकी ज्ञानी विरक्त । भेटीचा आनंद एथ । वर्णितांही पुरेना ॥१०॥
एखादा विदेशी नर । पाहे भिन्न आचार । देशबंधू मिळतां निर्धार । औदासिन्य मावळें ॥११॥
तैसें जगीं संत वर्तरी । परी अंतर कोणी नोळखती । ओळखी ऐसी भेटता जाती । सहज प्रेम उफाळे ॥१२॥
बैसविले अत्यागृहीं । वाढायाची चालली घाई । विप्र म्हणती हे काई । स्वामीं आरंभिलें ॥१३॥
एर एरांकडे पाहती । हळूच नेत्रें खुणाविती । भ्रष्ट तुका आला म्हणती । नाकें मोडूं लागले ॥१४॥
स्वामींचे भिडें बोलवेना । आणि धीरही धरवेना । तामसी संतप्त जाणा । जाहले मनीं ॥१५॥
म्हणती हा वेडा तुका । आचारभ्रष्ट असे निका । भटकतो रानीं वनीं देखा । कर्महीन ॥१६॥
केवळ जातीचा ब्राह्मण । न करीं संध्या वंदन । स्वामी जाणते ज्ञानधन । परी आजि वेडावले ॥१७॥
ऐसा मनीं विकल्प आला । नोळखिती ब्रह्मपदाला । श्रीनीं भाव जाणिला । उठोनी गेले ॥१८॥
तुका गेला बरें झालें । औषधाविना नायटे गेले । आतां सुग्रास अन्न वहिलें । जेऊं आकंठ पर्यंत ॥१९॥
आनंद मनीं मानिती । स्वामी सकळही जाणती । अनुभव येहल तयाप्रती । साधु निंदेचा ॥२०॥
तवं झाला चमत्कार । पक्वान्नासी सुटले नीर । किडे बुजबुजले फार । पात्रांमाजीं ॥२१॥
आश्चर्य करिती सारे । आजि आमुचे दैव न बरें । स्वामीसी कथिती ते त्वरें । अशुभवार्ता ॥२२॥
स्वामी वदती तयांप्रती । तुम्ही विकल्प आणिला चित्तीं । तोचि फळा आला निश्चिती । करावें तैसें भरावें ॥२३॥
तुकाराम साधु भला । परमहंस पद पावला । त्याचा तुम्हां वीट आला । म्हणोनि ऐसे जाहलें ॥२४॥
ज्यानें स्वधर्म आणला । जाणोनी स्वस्वरुपाला । तदाकार होवोनि ठेला । त्यासी म्हणतां अपवित्र ॥२५॥
ब्रह्म जाणे तो ब्राह्मण । ऐसें वेद श्रुतिचें वचन । तुम्हीं सांगा कांही खूण । अल्प स्वल्प ॥२६॥
जो ब्रह्मानंदीं निमग्न भूतीं भाव नसे भिन्न । तयासी लावितां दुषण । विरक्त नि:संदेही ॥२७॥
जे अगोचर वेदांसी । तोचि गोचर जयासी । कर्म बंधन नसे त्यासी । सत्यसत्य ॥२८॥
जो ब्रह्मानंदी तल्लिन । त्याचीं कर्मे कराया लागोन । ऋषी ठेविले स्थापोन भगवंतांनी ॥२९॥
जो श्रेष्ठ समबुध्दी । आपपर भाव नसे कधीं । देह चाले सहज समाधी । मध्यें जयांचा ॥३०॥
ऐसा जो का भगवद्‍भक्त । परमहंस परम विरक्त । तुमचे मनीं विकल्प प्राप्त । अज्ञानें जाहला ॥३१॥
जया अज्ञेय नसें कांहीं । अंतर भाव जाणोनि जिहीं । चमत्कृती दावाया पाहीं । उठोनि गेलें ॥३२॥
तुम्हीं जावोनि सत्वरी । विनवोनि आणा पात्रावरी । मग सुखें भोजनें बरी । सुग्रासेसी करावीं ॥३३॥
विकल्प आणिला मनांत । म्हणोनि मानूं नका किंत । साधू क्षमा मूर्तिमंत । जगाची माय ॥३४॥
स्वामींचें वचन प्रमाण । मानोनिया विप्रगण । धुंडिती सकळही वन । सत्वरेसी ॥३५॥
तंव पाहिले अकस्मात । धांवोनि चरण धरित । अन्याय झाला बहुत । क्षमा करी महाराजा ॥३६॥
अल्प बुध्दि जन आम्हीं । विकल्प आला जी स्वामी । क्षमा करोनी चला धामीं । भोजन आम्हां घालावें ॥३७॥
उठते झाले हास्य वदनीं । तुकाराम सिध्द ज्ञानी । बैसले मठीं जाऊनी । आनंदी आनंद बहु केला ॥३८॥
गोचरस्वामी शेवाळकर । दोघे गुरू बंधू साचार । भक्त अनेक किंकर । लागती श्री चरणीं ॥३९॥
दत्त उपास्य दैवत । सांप्रदाय श्री एकनाथ । ऐक्यरुप होवोनि वर्तत । असती जगामाजीं ॥४०॥
आशंका घेतील कोणी । नाथ सांप्रदाय म्हणोनी । तरी परीसावी कहाणी । झाली कैसी ॥४१॥
चिंतामणीबुवा संत । होते पूर्वी दत्त भक्त । विठठल चैतन्य तया वदत । होते पूर्वी गृहस्थाश्रमीं ॥४२॥
संन्यास ग्रहणाचे वेळीं । भेटली बाळकृष्ण माउली । राम उपासना तेव्हां दिली चिंतामणी गुरुनाम ॥४३॥
तैं पासोनी उपासना । दोनी चाळविल्या जाणा । तुकारामें दत्त उपासना । बहुतांस दिली ॥४४॥
सद‍गुरु कारणे केवळ । ठेव होती जी जवळ । रामभक्त जाणुनि निश्वळ । हाती दिली ॥४५॥
तिघे गुरुबंधू जे का । वडील मानिती त्यांतील तुका । गोचरस्वामी दुजे देखा ।तिजे रावसाहेब शेवाळकर ॥४६॥
तिघांसी मानिती देवांश । ब्रह्मा विष्णु महेश । तुकाराम वैराग्यें उदास । स्मशानवासी म्हणती तया ॥४७॥
तुकाराम परमहंस विरक्त । गोचारस्वामी संन्यास व्रत । रावसाहेच शेवाळकरपंत । गृहस्थाश्रमीं ॥४८॥
तयांची साधन पध्दती । विप्रगृहीं पाणी भरिती । भगवद्रप मानोनि अतिथी । भोजन देती अत्यादरें ॥४९॥
गोचरस्वामी संन्यासी । मठीं राहती नेंमेसी । तुकाराम अरण्यवासी । परमहंस म्हणती तया ॥५०॥
ऐसें तुकाराम संत । गणपती पदीं लागत । रात्रंदिन सेवा करित । देहासक्ती सांडिनी ॥५१॥
जे देतील तें खावें । सांगतील ते ऐकावें । सदा सन्निध असावें । अनन्यरुप ॥५२॥
गुरुसेवेचा महिमा । वर्णू न शकेचि ब्रह्मा । आड येती आणिमा गरीमा । अष्टमहासिध्दी ॥५३॥
कामना वासना कल्पना । लोभ मोह लोकेपणा । चंचलमन कामेषणा । वित्तेपणा आडवी ॥५४॥
कुलाहंता ज्ञान अहंता । साधकां नाडिता क्षण न लागतां । इतुकीयांसी मारोनि लाथा । गुरुपदीं रमतसे ॥५५॥
सालंकार बालकासी । तस्कर देती खावयासी । भुलोनि जातां तया । सरसी । सर्वस्व हरतील ॥५६॥
पारधी अमिषा दाखवित । फसतां पाशीं गोवित । सतशिष्य गुरुपदांकित । आन नेणें ॥५७॥
इंद्रराज्य आलें हातां । अथवा हरी हो प्रार्थिता । तरी सद्‍गुरु वाचोनि तत्वतां । आवड नसे लोकत्रयीं ॥५८॥
हीनाहून हीन व्हावें । तै गुरुभक्ती दुणावे । मग चितसुख त्यागावें । सर्वकाळ  ॥५९॥
नीच सेवांगुरु गृहीं । निरहंकार करितां पाही । जगीं दुर्लभ नसे कांही । जगद्वंद्य ॥६०॥
पूर्वपुण्याची असे ग्रंथी । तरीच घडे गुरुभक्ती । महाभक्तिचा महती वर्णिली न वचे ॥६१॥
गुरुवचन तो वेदांत । गुरुसेवा हा धादांत । गुरुकृपा तोची सिध्दांत । गुरुपुत्रासी ॥६२॥
प्रस्तुर गुरु शिष्यांचे बंड । वाढलें बहूत पाखांड । ज्ञान नीति श्रध्दा जाड । एक उणे एक पुरें ॥६३॥
संदेहरहित सद्‍गुरु । निरहंकारी शिष्यवरू । वेदप्रणित साधनाचारु । त्रिवेणी संगम अपूर्व हा ॥६४॥
ससमुद्रामाजीं लवणोदक । धात्रीफळ पर्वतीं देख । चतुरें करित एक । गोडी होती अपूर्व ॥६५॥
परी सदगुरु भेटे विरळा  मिळता शिष्य गोंवळा । मग सर्वही घोटाळा । अनेक जन भांबावती ॥६६॥
अर्ध हळकुंडे पिवळे झाले । साधन सांडून गुरु बनले । मग आल्या संचितासी मुकले । महंतीमुळें ॥६७॥
अज्ञानी जीव स्तुति करिती । साधका त्वरें नाडिती । जोंवरी नसे आत्मप्रचीती । तोवरी महंती न धरावी ॥६८॥
महंतीनें सुख वाटे । वर्म काढितां दुख मोठें । अंतरी असमाधान कांटे । अहंतेचे टोचती ॥६९॥
ऐसी महंतांची दशा  । पाहतां येतसे हंशा । प्रेमतंतूचा वळसा । तुटोनी गेला ॥७०॥
या कारणें नि:संदेह स्थिति । जोवरी नये आत्मप्रचीती । तो न धरावी महंती । वाटमारु ॥७१॥
सिध्दि महंती अहंता । साधका नाडिती जातां येतां । अधोगतीस तत्वता ।  नेऊनि घालिती ॥७२॥
याकारणे अंतरी । सावध असावें चतुरीं  । स्वयें चुकवावी फेरी । जन्ममृत्युची ॥७३॥
अज्ञजनें स्तोत्र केलें । तेथें काय हातां आलें । तोचि निंदतील भले । सावध असावें ॥७४॥
असो गणपती अति दक्ष । गुरुपदीं सदा लक्ष । गुरुकृपेवाचून पक्ष । दुजा नाहीं ॥७५॥
इति श्रीसद‍ गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासीयांचा लळा । कृपा कटाक्षें ॥७६॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते चतुर्थो्ध्याय । ओंवीसंख्या ॥२९७॥
॥ श्रीसद‍गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति चतुर्थ अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP