श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: श्रीसदगुरवेनम: । श्रीरामसमर्थ । श्रीविश्वंभरायनम: । श्रीगणाधीशा तुज नमोन ।
करितों श्रीगुरुंचे जन्म कथन । मज दीनावरी कृपा करुन । अवधान दीजे ॥१॥
हळूं हळूं दिवस भरले । नवमास पूर्ण झाले । सोहळे सर्वही केले । शास्त्ररुढी ॥२॥
प्रसूतीसाहित्य जमा केलें । कुशल सुईणी निमंत्रिलें । प्रसूतीगृह रंगविलें । शोभायमान ॥३॥
जन्म समय प्राप्त झाला । कोणी करूं नका गलबला । मुखानें रामराम बोला । सुटका होईल त्वरित ॥४॥
शके सतराशी साहसष्टांत । माध शुध्द द्वादशी प्रत । बुर्धे पंचवटी प्रभात । मीन लग्नीं रवी आला ॥५॥
शुभदिन शुभमुहुर्त । उच्च ग्रह असती जेथ । तया लग्नीं बाल जन्मत । आनंदा सुकाळ जाहला ॥६॥
इकडे भजनाचा गजर । रावजी करितसे मनोहर । पुत्रवार्ता सांगाया चतुर । नारी टपोनि बैसल्या ॥७॥
उदरीं प्रसूत वेदना आली । गीताबाई प्रसूत जाहली । पूर्व पुण्यें सुपुत्र लाधली । सिध्द पुरुष ॥८॥
चतुर नारी धांवत गेली । पुत्र वार्ता निवेदिली । द्रव्य देऊनी सुखी केली । लिंगोपंत रावजीनें ॥९॥
पुत्र होय रावजी प्रती । घरोघरीं शर्करा वांटिती । नरनारी पाहों येती । बालकासी कौतुकें ॥१०॥
ज्योतिष्यासी बोलविलें । सूक्ष्म वेळेसी कथिलें । भविष्य पाहिजे वर्तविलें । गणित करोनी ॥११॥
वेदमूर्ती पाचारिल्या । दक्षिणा देऊनि सुखी केल्या । याचकामांदी धाविन्नल्या । रावजी गृहीं ॥१२॥
कोणा वस्त्र कोणा भूषण । कोणा धान्य कोणा अन्न । देऊन तोषविती मन । सकळिकांचे ॥१३॥
अंधळया पांगळया व्यंगांसी । भोजन घालिती हर्षेसीं । तृप्त होवोनी सुखेसीं । आशिर्वचनें बोलती ॥१४॥
खण नारळ सुवासिनी । हळद कुंकू लेववोनी । ओटया भरती धान्यांनी । बहुतां परींच्या ॥१५॥
गांवोगांवी धाडिलें पत्र । ईश कृपें लाधलों पुत्र । सुखी असती सर्वत्र । चिंता चित्ती नसावी ॥१६॥
तुझें कृपें जाहला पुत्र । म्हणोनि करिती स्तोत्र । पांडुरंगा तूंचि मित्र । पाठीराखा आमुचा ॥१७॥
मातुल गृहा पाठविती । शर्करा दुता हाती । पत्र देवोनि कथिती । आनंद वार्ता ॥१८॥
वेदोक्त कर्मे शांत्यादिक । यथाविधी करिती कौतुक । पुत्रस्नेह उन्नत देख । दिवसेंदिवस होतसे ॥१९॥
न्हाणी पूजन पांचवी पूजन । नाना ग्रहांचे पूजन । लोकाचारें करिती जाण । अंतरी ध्यान पांडुरंग ॥२०॥
दशदीन समाप्त झाले । सूतिका गृह शुध्द केलें । घरोघरी वाटले । विडे आणि सुंठवडे ॥२१॥
त्रयोदशदिन प्राप्त झाला समारंभ आरंभिला । करूं म्हणती नामकरणाला । अतिप्रीती ॥२२॥
पाहुणे मंडळी जमली । गृहीं अत्यंत दाटी झाली । बालकांची गटटी जमली । करिती सारा गोंगाट ॥२३॥
पक्वानें केलीं षड्‍रस । विप्र सुवासिनी विशेष । कुमार कुमारी आणि दास । जेऊं घालती अनेकां ॥२४॥
बाळ आणि बाळंतिणीं । सुगंधिक तैलें उटणीं । न्हाऊं घालिती मर्दोनी । शिघ्रत्वेसी ॥२५॥
दृष्ट होईल म्हणती । मीठ मोहर्‍या ओवाळिती । मिरच्या पावकीं घालिती । किती एक ॥२६॥
नेत्री घालिती कांजळां । तीट लाविती कपाळां । वारा लागो न देती बाळां । शीत होईल म्हणोनि ॥२७॥
अन्न वाटिती गरिबासी । लुगडें चोळी सुईणीसी । देती अती हर्षेसीं । कार्यभाग चालिला ॥२८॥
रावजी मनीं विचारी । स्वप्नीं बोलिले श्रीहरी । सिध्द पुरुष हा निर्धारी । धन्य भाग्य आमुचें ॥२९॥
अनंत जन्मीचीं सुकृतें । फळलीं आजि आम्हातें । उध्दार करील कुळांते निश्चयेसी ॥३०॥
सत्कर्मी पुत्र होय जरी । पितरा नरकापासोनि तारी । आत्मज्ञानी झालियावरी । सुकृतांतें नगणवे ॥३१॥
कुकर्मी झालिया पुत्र । नरकी घालील सर्वत्र । म्हण्कोनि सूज्ञ सुपूत्र । वांछिती सद्गतीसी ॥३२॥
कोणी घेतील अशंका । कर्म एकावे एका । फळतें कैसें सांगाना कां । आह्मांप्रती ॥३३॥
वाटसरू वृक्षछायेसी । क्षण एक आले वस्तीसी । सवेंचि चालिले दशदेशीं । एरएरां काय प्राप्त ॥३४॥
येचि दृष्टांतीं विवेचन । करू व्हावें समाधान । एकावें कर्म एका लागून । भोवतें की नाहीं ॥३५॥
एके धर्मशाळें । पांथिक समुदाय जमले । संगती परिणाम लाधले । कैसें पहा ॥३६॥
कोणाचा कर्ण फुटला । दुर्गंध वायू कोंदला । कोणी करई वनमाला । चिळस आली ॥३७॥
कोणी ढेंकूण आणिती । वस्त्रांतून उवा निघती । ढांस ढांसोनी जागविती । समस्तांसी कितीएक ॥३८॥
पीडिती ऐसे अधम । आतां पाहूं ते उत्तम । ज्यांची संगती आराम । इतरांस देई ॥३९॥
कोणी हरिभजन करिती । श्रवणी पियुष सिंचिती । कोणी मधुर गायन करिती । आनंदविती सकळांसी ॥४०॥
अत्तरें माखिती कोणी । दीप ठेविती लावोनी । देशोदेशीचे ज्ञान कथुनी । चित्तरंजन करिताती ॥४१॥
असो ऐसें बहुत जन । गुंतले पहोनी आश्रयस्थान । सुखदु:ख भोगिती जाण । संगती सारिखे ॥४२॥
तैसे कुळाभिमानी गुंतले । पुत्र स्नेहें जे भ्रमले । त्यासि पाहिजे भोगिलें । पुत्रकर्म ॥४३॥
पुत्रावाचोनि नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती । स्वर्गद्वारीं न घेती । निपुत्रिकासी ॥४४॥
आणि पितृऋणांतुनी । सुत होतां मुक्त प्राणी । पितरोद्देशें देई पाणी । आत्मा मूर्तिमंत दुसरा ॥४५॥
करोनि बहु विचार । रावजी आनंदले थोर । आठविती देवाचे उपकार । स्तविती पुन्हां पुन्हां ॥४६॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते द्वितियाध्यायांतर्गत । द्वितियसमास समाप्त: ओंवीसंख्या ४६
॥ श्रीसद‍गुरुनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP