अध्याय दुसरा - समास दुसरा
श्रीसद्गुरुलीलामृत
श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्येनम: श्रीगुरुभ्योनम: । श्रीरामसमर्थ ।
संसारगाडा चालिला नीट । लिंगोपंत जाहले जरठ । वारी करितां बहु कष्ट । हौऊं लागले ॥१॥
परी एकनिष्ठ वैष्णव । विठठलचरणीम दृढभाव क्क। देहाची ज्या नसे कीव । वारी पुढें ॥२॥
ऐसा काळ बहूत गेला कळवळा विठठला आला । भक्तिप्रेमें पाझरला । धांव घेई ॥३॥
देव भक्तांची माउली । भक्त चिंता त्यास लागली । वृत्ति पाहिजे विश्वासली । तेंचि कठिण ॥४॥
स्वप्नी येवोनि सांगत । तुझी भक्ति जी बहुत । देखोनि प्रसन्न पंढरीनाथ । झालो आजीं ॥५॥
तव देह जीर्ण झाला । परी भक्ति -भाव वाढला । वारी करितां भागला । बहु दिससी ॥६॥
तरी आतां ऐसें न सोसावें । तूं कष्टतां मी दुखवें । आज्ञापितों तें ऐकावें । एक चित्तें ॥७॥
तुझिये भक्ति भुलोनीं । आलों असे तव सदनीं । विठठल रखुमाई मूर्ति दोन्ही । विहिरी माजीं असती ॥८॥
काढोनियां मूर्तिप्रती । स्थापन कराव्या वेदोक्तीं । नित्य पूजा पंचारती । अति आदरें करावी ॥९॥
तयांचे घेतां दर्शन । वारी होईल परिपूर्ण । ये विषयीं संशयी मन । करो नये ॥१०॥
ऐसा दृष्टांत होतां पाही । मूर्ति काढल्या लवलाही । यथा विधी स्थापिल्या गृहीं । अत्यानंदें ॥११॥
नित्य पूजा नैवेद्यासी । जमीन दिधली देवासी । सेवा करिती अहर्निशीं । निरालस्यें ॥१२॥
कुळी जयांच्या भगवंत । प्रत्यक्ष असे नांदत । तयांची थोरवी वर्णू येथ । किती म्हणोनि ॥१३॥
सुकृतें जयांची आगळीं । ते नर जन्मती या कुळीं । उत्तरोत्तर भक्ति जिव्हाळीं । वाढों लागली ॥१४॥
नदि उगमीं सूक्ष्म वाहत । पुढत पुढती प्रवाह वाढत । समुद्र मिळणीं न लागे अंत । पार जियेचा ॥१५॥
संगमीं समरस होये । वेगळेपणा काढितां नये । सागर होवोनि राहे । भेदरहित ॥१६॥
सूक्ष्म प्रवाह ओहोळ नाले । सरळी सरोवर निघाले । मिळणी मिळतां एकचि झाले । संगतीं तारिले असंख्य ॥१७॥
तैसी ही कुलनदी । ब्रह्मरसीं मीनली अनादी । तारिली असंख्य शिष्यमांदी । बोधामृत पाजुनियां ॥१८॥
लिंगोपंतांची भक्ती ऐसी । रावजी स्यये उदासी । परि पित्राझा मानोनि आदरेसी । प्रपंचगाडा चालवी ॥१९॥
घेतला प्रपंच भार माथां । चालवीतसे कार्यापुरतां । येरवी प्रिय ज्याचे चित्तां । एकांत वास ॥२०॥
सदा विठठल चिंता । परपीडेचें दु:ख जाण । शेती कष्टोनि आपण । धान्य मेळवी ॥२१॥
स्वयें पाणी आणावें । तैसें स्वत: शिजवावें । खावोनि सुखीं असावें । कष्ट न देई कोणासी ॥२२॥
जरी गृहीं अर्धांगी । वचनसीमा नुल्लंघी । तरी नियमा न त्यागी । आदरिलें ज्या ॥२३॥
येतां नदी स्नान करोनि । स्पर्श करिती उपहासोनी । पुनरपी जाई स्नाना लागोनी । परी क्रोध शिवेना ॥२४॥
अप्पा पाटील ग्रामस्थ । यांनी केला बंदोबस्त । परी रावजी भरी न भरित । सात्विक धर्ममूर्ती ॥२५॥
ऐसी ठेवोनि वृत्ती । स्वधर्म कर्मी रत होती । प्रपंची न जडे आसक्ती । कार्याकारण ॥२६॥
गृहीं दुर्लभ झालें । वैभवीं मन उडालें । निर्वाहापुरतें राहिलें । स्वल्प काहीं ॥२७॥
जितुका करावा व्याप । तितुका होतसे संताप । साधनीं येई विक्षेप । क्षणोक्षणी ॥२८॥
विषय लोभ नाहीं मनीं । वैराग्य वरिले जयानीं । ऐसे रावजी अंतर्ज्ञानी । लोकीं दिसती साधारण ॥२९॥
विषयीं मानिला वीट । परमार्थी लागली चट । उपासना एकनिष्ठ । निरालस्यें चालवी ॥३०॥
गीताबाई सगुण खाणी । पतिव्रता शिरोमणी । सदा तत्पर पति-वचनीं । अत्यादरें ॥३१॥
गृहकाजीं दक्ष सदां । वृध्दासि देई आनंदा । सेवेसि नसे मर्यादा । हास्य मुखीं ॥३२॥
अरुणोदयापूर्वी । उठोनि गृह सारवी । रांगोळी घाली बरवी । चित्रविचित्र ॥३३॥
वेणीफनी सुंदर । कुंकुमादि अलंकार । लक्ष्मीपरी साचार । दर्शनें आनंदवीं ॥३४॥
देव काजी अति सादर । उपकरणी निर्मळ सुंदर । रंगवल्यादि मनोहर । देवगृहा सुशोभवी ॥३५॥
पुष्पमाळा तुळशी माळा । गुंफोनि देई वेल्हाळा । कामाचा नसे कंटाळा । जियेलागी ॥३६॥
गरजे आधीं साहित्य पुरवी । मधुर वचनीं तोपवी । सतकार्यालागीं झिजवी । देह आपुला ॥३७॥
नव्हें अंगचोर खादाडा । झोपाळू कुटिल आणि द्वाड । ओंगळ तोंडाळ तुसड । कुतर्की हटवादी ॥३८॥
नव्हे भाड आणि धीट । गृहकार्ये चालवी नीट । सासूनणंदांसी बोभाट । कराया ठाव नाहीं ॥३९॥
पती सासू आणि स्वशुर । तुळशी विठठल रखुमाईवर । इतुकी यांची सेवा चतुर । नेमस्तपणे चालावीं ॥४०॥
वाटें दुजी अनुसूया । अथवा सती जनक तनया । पावली भाव पाहुनियां । जगन्माता जगदंबा ॥४१॥
देवभक्तांचे दर्शन । घ्यावया उल्हासित मन । उभयतां धरिती चरण । सद्भक्तांचे ॥४२॥
संभाजी साधू दर्यांत । तेथें उभयतां दर्शना जात । चरणीं मस्तक ठेवीत । कर द्वय जोडोनि ॥४३॥
साधूंची ऐशी स्थिती । कोणासी स्पर्श करूम न देती । लोकीं केली विनंती । यासी स्पर्श किंनिमित्त ॥४४॥
साधू बोलती तयासी । धन्य असे यांची कुशी । उदरी अवतार देवासी । येणें असे ॥४५॥
यांवे भाग्य असे थोर । पूर्वसंचित अपरंपार । उदरी होईल अवतार । सगुण ब्रह्म ॥४६॥
परिसोनी विस्मय करिती । धन्यवाद मुखी गाती । तैसाच रावजीं प्रती । दृष्टांत होय एकदिनी ॥४७॥
स्वप्नी येत पंढरीनाथ । कौस्तुभ श्री वत्सांकित । कंठी वनमाला शोभत । शंख चक्रधारी ॥४८॥
कासे पितांबर कशिला । मयुरपिच्छें मुगुट शोभला । रावजी सन्मुख उभा ठाकला । हास्यमुखें बोलतसे ॥४९॥
तुझी भक्ति फळली । सुकृतें असंख्य जोडलीं भार्या पतिव्रता लाभली । धन्य कुशी तियेची ॥५०॥
तुम्हांसि होईल सुत । महावैष्णव भगवद्भभक्त । कीर्ति करील दिगंत । सिध्द पुरुष ॥५१॥
असंख्य तारील नर । होईल कारणीक अवतार । तुमचें भाग्य असे थोर । सद्गतील पावाल ॥५२॥
ऐसा दृष्टांत झाला । भार्येसी निवेदन केला । उभयतां आनंद झाला । पोटी न समाये ॥५३॥
भाग्य आमुचें उदेलें । अहा देवा धन्य केलें । दीनासी हातीं धरियेलें । काय भक्ती पाहिली ॥५४॥
भक्त काज कल्प द्रुम ॥ म्हणती तुज आत्माराम । भक्तांचे हरिसी श्रम । नमन असो आमुचें ॥५५॥
बहुतां परीनें स्तुती । केली उभयतांनीं चित्तीं । वर्तमानी गर्भाप्रती । धारण करी गीताई ॥५६॥
एकमास होता पूर्ण । पाळी चुकली बाणली खूण । आनंदी आनंदलें मन । सर्वत्रांचें ॥५७॥
तिजे मासाचे अंवसरीं । शिंक्याखालीं बसविती नारी । चोर ओटी भरोनि सत्वरी । वायनें देवविती ॥५८॥
हळूहळू डोहाळे लागती । शांती आदरिली । चित्तीं । प्राकृता ऐसे नव्हती वा कष्टमय ॥५९॥
जैसे लागती डोहाळे । तैसे निपजतीं बाळें । माता करिती चाळें । त्या त्या परी ॥६०॥
गीताबाईची स्थिती । पहा झाली कैशा रिती । जेणें श्रवण तृप्त होती । कथन करूं ॥६१॥
एकांती जावोनि बैसे । रामनाम घेई हर्षे । सात्विक आहार करितसे । आवडीनें ॥६२॥
पतिनें एकांती पुसिलें । काय इच्छा असे बोले । सती वदे इच्छें भ्रमले । थोर थोर ॥६३॥
निरहेतुक रामभक्ती । करावी वाटते चित्ती । सहजानंदी वृत्ती । लय करावी ॥६४॥
सद्गुरू चरण सेवावे । ऐसे वाटतें जिवेंभावें । भविष्य जाणोनि बरवें । रावजी राहे तटस्थ ॥६५॥
समवयी मैत्रिणी मिळाल्या । कौतुकें भेटों आल्य्या । उपदेशामृतें बोधिल्या । नाना परी ॥६६॥
कैचा पुत्र कैचें घर । कैसे डोहाळे संसार । हे सर्वही असार । सार तें वेगळेंचि ॥६७॥
भगवद्भजन हेंचि सर । नामाचा करा हो गजर । परिसोनि विस्मय थोर । वाटे उदरीं सिध्दपुरुष ॥६८॥
वैभव मानाल सत्य । तरी अंती होईल घात । मीन गळाते गिळित । अमिषांते भुलोनि ॥६९॥
तरी ऐसें न करावें । सन्मार्ग ह्र्दयीं धरावे । सदगुरूसी शरण जावें । अहंभाव सांडोनि ॥७०॥
पतिसेवा निरंतर । करावी निर्मत्सर । जन्मा आलियाचे कीर । सार्थक करावें ॥७१॥
मैत्रीणीसी उपदेशी । रामनाम अहर्निशी । गाई अत्यानंदेसी । पतिव्रता माउली ॥७२॥
ओटी नारळ घालिती । समारंभ बहु करिती । मनीची हौस पुरविती । अति कौतुकें ॥७३॥
कोवळें ऊन चांदणें । काळोखे रात्रीं जेवणें । नानापरीची पक्वान्नें । मधुर आणि घमघमित ॥७४॥
वनभोजन आवळी भोजन । तुळशी भोजन केळी भोजन । सुवासिनी कुमारिका जमवून । ओटिभरण करताती ॥७५॥
याचकांसी दिधलें धन । सुवासिनीसी वायन । महाफळें आणि खण । धान्यें देऊन बोळविती ॥७६॥
उत्तरोत्तर वाढे गर्भ । तेज फाकलें स्वयंभ । होईल म्हणती पुत्रलाभ । कुलदीप चालविल ॥७७॥
इति श्रीसद गुरुलीलामृते द्वितियाध्यायांतर्गत । द्वितियसमास ओवीसंख्या ७७
॥ श्रीसदगुरुचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीरामसमर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 18, 2019
TOP