कन्या विक्रय - ६२३६ ते ६२४०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६२३६॥
साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥
परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोगे पुढां ॥२॥
आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥३॥
सत्या देव साहे । ऐसें करुनियां पाहे ॥४॥
अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥५॥
तुका म्हणे सोस । दु:ख आतां पुढें नास ॥६॥
॥६२३७॥
दिवटया वाद्यें लावुनि खाणें । करुनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥२॥
गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥३॥
करुं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥४॥
वर्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥५॥
तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥६॥
॥६२३८॥
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥२॥
नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥३॥
अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥४॥
उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥५॥
तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥६॥
॥६२३९॥
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठीं पावे दु:खाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥२॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥३॥
तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपानासमान ॥४॥
॥६२४०॥
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती नर्कपाता ॥१॥
नाम गाउनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गती कैशी होय ॥२॥
कैसें होईल त्यांचें तेच हो जाणती । आम्हासी संगती नलगे त्यांची ॥३॥
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरी । नलगे दुराचारी तुका म्हणे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP