आदिमाया गीता - अध्याय पहिला

आदिमाया गीता

अध्याय पहिला
कूर्म म्हणाले,
अशा प्रकारे मरीच्यादि नऊ प्रजापतींची निर्मिती करुन पितामह ब्रह्मदेवाने आपल्या मानसपुत्रांसह घोर तप केलें. ॥१॥
तप करतांना त्याच्या मुखातून प्रलयाग्रीतून उत्पन्न झालेला, त्रिशूलधारी, त्रिनेत्र असा ईशान-रुद्र प्रकटला. ॥२॥
त्याचे अर्धेशरीर पुरुष व अर्धे स्त्री असे असून तो अत्यंत भीतिप्रद होता. त्याच्याकडे पाहाणे कठिण होते. ‘स्वत:चे भाग कर’ असे म्हणून ब्रह्मा घाबरुन लुप्त झाला. ॥३॥
ब्रह्मदेवाने असे म्हणतात त्याने आपले पुरुष व स्त्री असे दोन भाग केले आणि पुन: त्या पुरुषाचे दहा+ एक असे भाग केले. ॥४॥
(हेच पुढे एकादश रुद्र म्हटले गेले.) त्रिभुवनांचे ईश्वर असलेल्या या अकरा रुद्रांना कपालीश इत्यादी म्हणतात. हे ब्रह्मणांनो, त्यांची देवाच्या कामासाठी नेमणूक झाली. ॥५॥
या प्रभूने स्त्रीरुपाचे मृदू-भयंकर, शांत-अशांत, पांढरा-काळा अशा (परस्पर विरोधी) रीतीने अनेक विभाग केले. ॥६॥
हे ब्राह्मणांनो, या विभूतींनाच लोक लक्ष्मी इत्यादी शक्ती म्हणतात. ईश्वराच्या या लक्ष्मी इत्यादी देहांव्दारे ही शांकरी विश्व व्यापते. ॥७॥
हे ब्राह्मणानो ! आपल्या अंशाचे विभाग केल्यानंतर शंकराच्या आज्ञेने ईशानी ब्रह्मदेवाजवळ उभी राहिली. ॥८॥
‘दक्षाची कन्या हो’ असा ब्रह्मदेवाने तिला आदेश दिला. त्याप्रमाणे ती नंतर दक्ष प्रजापतीपासून उत्पन्न झाली. ॥९॥
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने दक्ष प्रजापतीने आपली कन्या सती हिला शंकरास अर्पन  केले. शूलधारी शंकराने दक्षकन्येचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. ॥१०॥
प्रजापतीच्या आज्ञेने देवी ईशानी (सती) हिने कांहीं कालानंतर आपणास शंकरापासून विभक्त केले. ॥११॥
हिमालय आणि मेना या पतिपत्नीपासून ती सती पुन: कन्यारुपाने जन्मली. त्या नागाधिराजाने कन्या पार्वतीस शिवाला अर्पण केले. ॥१२॥
हे विप्रांनो ! स्वत:च्या, त्रिभुवनाच्या आणि सर्व देवांच्या हितासाठी हि देवी शिवाची अर्धांगी झाली. ॥१३॥
देवासुरांनी वंदन केलेली, पूर्वजन्मीची सती आणि आताची पार्वती अशी आहे.
तिचा महिमा अतुलनीय आहे असे आहे इंद्रादिदेवांसह मुनिजन  तसेच शंकर किंवा स्वत: विष्णूही  जाणतात. अशा प्रकारे हे ब्राह्मणांनो, परमेष्ठीचे पुत्रत्व सांगितले आहे. ॥१४-१५॥
आदिमायागीतेचा पहिला अध्याय समाप्त.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-03-12T20:24:03.3870000