छंदोमंजरी - उपोद्‍घात

वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.


वेदांतवेद्य हरिच्या नमितों पदातें ।
इच्छूनियां सरसभारतिसंपदातें ॥
व्याजें कशाहि जरि नाम तदीय घेती ।
अज्ञानता सकल तध्दृदिंची निघे ती ॥१॥
अत्र प्राकृतेऽ प्युच्चारणे लघूपायो यस्य ( स गुरुरपि) अथ ( वा) संयोगे पुर: स्थिते प्राग्गुरुरपि लघुतां कचिद्याति । अथवा अर्थवशाल्लघुरपि गुरुतामित्यादि न दोषाय भवति । तथाचोक्तं । अथवा वृत्तद्युमणौ । ‘क्रमसंज्ञ: पादादौ यो वर्णस्येह भवति संयोग: । तस्मिन्पुर: स्थिते प्राग्गुरुरपि लघुतां कचित्‍ कचिद्याति ॥१॥
सव्यंजनरहपूर्वोवर्णोलघुतां प्रयाति संस्कृतके । इंहिंकारौ बिंदुयुतौ प्राकृतके कुत्रचिल्लघू भवत : ॥२॥
दीदीर्घमपि च वर्ण लघु जिव्हा पठति चेत्‍ सचापि लघु: । सत्वरपठितौ व्दौवा त्रीन्‍ वर्णानेकमत्न जानीयात्‍ ’ । इति
==
छंद हे चरण वेदनराचे । स्तंभ जेंवि लघु थोर घराचे ।
त्याविणें सदन सिध्द न होतें । काव्य याविण तसेंचि अहो तें ॥२॥
त्यामुळें गणहि नाम कळाया । दावि पद्यरचनेंत कळा या ।
पाहुनी मजवरी चतुरांनी । तोषिजे सकल आत्मपरांनी ॥३॥
गण मूळींचें अक्षर पहिलें तें ठेविलेंचि योजुनिया ।
अंतिम चरणीं नामहीं तें या कवनीं नसेचि हें जुनिया ॥४॥
गणाच्या नामाचेंऽ क्षरगणमुळीं पूर्व चरणी ।
चतुर्थीं वृत्ताचें अभिधही असे या प्रकरणीं ।
हरीची सल्लीला बहुत समवृत्ती लिहिलि हो ।
अशी हे छंदाची सुकृति बरवी मंजरि लिहों ॥५॥
समवृत्त लक्षणम्‍: -
चारी चरण वृत्ताचे लक्षणें सारखे जरीं ।
समवृत्त लयालागीं म्हणती शास्त्र जाणते ॥६॥
छंदोमंजरि अशि हे बहू उपायीं ।
अर्पाया सजलघनाभकृष्णपायीं ।
रामज्योतिषि करुनी रसज्ञ लोकां ।
प्रार्थीतो तुमिच परी बरी विलोका ॥७॥
जो अर्थपूर्णहि अलंकृति तो कधीही
घालीन रिक्त वदणें तरि तोकधी ही ॥
जी योग्य सुंदरगुणानिं अशा सतीला ।
वेश्यांसमान नग फार कशास तीला ॥८॥
येथें बहुगंथमतानुसारें ।
नामें गण स्वल्प वदेन सारें ॥
जाणावया प्राकृत पद्यमाला ।
निर्मोनि अर्पी पुरुषोत्तमाला ॥९॥
===========


छंदोमंजरीकार आपला हा ग्रंथ विघ्न न येतां शेवटास जावा व ग्रंथ वाचणारांचे कल्याण व्हावें या हेतूनें ग्रंथाच्या प्रारंभी आराध्य देवतेस वंदन करतात. वेदान्त म्हणजे उपनिषदें त्यांनी वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य. ईश्वराचें यथार्थ ज्ञान करुन देणारे ग्रंथ उपनिषदें असल्यामुळें ईश्वरास वेदांतवेद्य असें म्हणतात.
==
त्याच्या अंत: करणांतील ( नामोच्चार करणार्‍या व्यक्तीच्या मनातील.)
संस्कृतांतील उपोद्‍घातांत ( हा उपोद्‍घात शेवटी परिशिष्टरुपाने जोडिला आहे. ) ‘सविसर्गश्च युक्ताद्य:’ या श्लोकानें लघुगुरुंचें परिगणन केलें आहे. परंतु त्याला संस्कृतीत व प्राकृतांत कांहीं अपवाद आहेत.  तें येथें सांगून मराठींत या संबंधानें काय व्यवस्था आहे या संबंधानें थोडासा विचार कर्तव्य आहे. प्रथम आपण येथील संस्कृताचें मराठी भाषांतर करुं व मग त्याचा ऊहापोह करुं. छंदोमंजरीचें शुध्द पुस्तक न मिळाल्यामुळें आम्हांस जागोजाग फार त्रास होत आहे व आम्ही जो अर्थ करतों तो मूळ कवीच्या मताप्रमाणेंच आहेना ? अशी आम्हांस वारंवार शंका उद्भवून केलेल्या विधानांविषयीं मनाची निश्चितवृत्ति राहात नाहीं. तथापि जोशीबुवांचा हा ग्रंथ प्रसिध्द करावयाचा, यांत कांहीं दोष राहिले तर विव्दान्‍ लोक व ज्यांच्याजवळ शुध्द प्रत असेल ते लोक त्यांचें शुध्दीकरण करतील अशा भरवंधानें हा उद्योग आम्हीं आरंभिला आहे. असो. आतां आपण प्रस्तुत विषयाकडे वळूं: -
‘या प्राकृतभाषेंतही उचारण्यांत ज्या स्वरास लघु - स्वल्प - उपाय करावा लागतो, ( स्वल्प उपाय दोन प्रकारानें होऊं शकतो. तो असा कीं वर्णोचारास जो काळ साधारणत: ठरलेला असतो त्यापेक्षां कमी काळांत त्याचा उच्चार केला म्हणजे तो वर्णोच्चार ‘लघूपाय’ झाला. अथवा कांहीं ठिकाणी आघातयुक्त जे वर्णोच्चार असतात ‘लघूपाय’ आहेत. ) तो वर्ण, किंवा दीर्घ वर्ण, किंवा संयोग पुढें आला असतां पूर्वीचा गुरुवर्ण, हे कोठें कोठें लघु होतात. तसेंच कोठें प्रसंगवशात्‍ लघूलाही गुरु मानतात. आणि ह्या गोष्टी छंद: शास्त्रकार सदोष मानीत नाहींत. वृत्तद्युमणी ग्रंथांत सांगितलें आहे कीं ‘ चरणाच्या प्रारंभीं क्रमसंज्ञक जो वर्णाचा संयोग असतो, तो पुढें आला असतां पूर्वीचा गुरुवर्ण कोठें कोठें लघु होतो. रेफ व हकार यांनीं युक्त जीं संयुक्त व्यजनें तीं पुढें आली असतां मागील गुरुस्वर संस्कृतांत लघु समजतात, व प्राकृत भाषेमध्यें ‘ इ, हिं हीं जीं सानुनासिक अक्षरें तींहीं कोठें कोठें लघु होतात. दीर्घस्वराचा जर शीघ्र ( द्रुत ) उच्चार केला तर तोही लघु समजावा. व त्याचप्रमाणें दोनतीन अक्षरें जर शीघ्र उच्चारलीं तर तीं सर्व मिळून एक अक्षर समजावें.’ इ. इ. आतां या वरील नियमांस आपण एकेक संस्कृतांतील व मराठींतील उदाहरण देऊं. दीर्घ स्वराचे र्‍हस्वोच्चार करुन ते लघु समजले आहेत अशीं संस्कृतांत उदाहरणें फार कमी तथापि कचित्‍ येतात. जसें ‘अरेरे कथय वांर्ता दूति तस्यातिचित्राम्‍ । मम संविध पुपेष्यत्येष कृष्ण: कदा नु । इति चटु कथयन्त्यां राधिकायां तदानीम्‍ । अती डगडगमग देह: केशवोऽ प्याविरासीत्‍ । हें मालिनी वृत्त आहे. यांत प्रथम नगण असावा लागतो. तेव्हां अर्थात्‍ ‘ रे रे’ हीं दोन्ही अक्षरें द्रुतोच्चार करुन जेव्य्हां लघु समजावींत तेव्हां तो नगण होणार. संस्कृतांत ‘ ए ओ’ हे लघु स्वर नाहींत. परंतु येथें ते मानावे लागतात व यांस छंद: शास्त्रकारांनी विशेष सदोष मानूं नये अशी सवलत दिली आहे. मराठींत वाक्यामध्यें ज्या स्वरांचे उच्चार दीर्घ होतात त्यांपैकी पुष्कळ स्वरांचे उच्चार कवितेंत र्‍हस्व करावे लागतात. जसें मिळतील मिळतिल, घरी घरि, म्हणती म्हणति इत्यादि इ. तेव्हां हे वरच्याप्रमाणेंच समजावे. आतां संयुक्त अक्षर पुढें आलें असतां पूर्वींच्या अक्षरास गुरुत्व येत नाहीं याचें उदाहरण. ‘ झटिति प्रविश गेहं मा बहिस्तिष्ठ कान्ते ’ । इ. या ठिकाणीं ‘ प्र’ या संयुक्त अक्षरामुळें पूर्वीचा जो ‘ ति’ त्यास गुरुत्व यावयास पाहिजे होतें परंतु तें मानिलें नाहीं. कारण हा मालिनीवृत्ताचा चरण आहे, व यांत प्रथम नगण यावा लागतो तेव्हां ‘ति’ लघु असल्याशिवाय नगण होणार नाहीं. मराठींत तर या जातीच्या उदवहरणासंबंधानें सांगावयालाच नको. शुध्द मराठीशब्दांत असणार्‍या संयुक्त व्यंजनानें मागील स्वरास जें गुरुत्व येतें तें प्राय: वैकल्पिक असतें असें म्हटलें तरी हरकत नाहीं. च्य, ज्य, क्य यांसारखें म्हणजे ज्यांचा अंतिम वर्ण ‘य’ आहे अशी संयुक्त अक्षरें व ‘ म्ह’ वगैरे संयुक्त व्यजनें पुढें आलीं असतां मागील स्वरास गुरुत्व मराठींत कचितच येत असेल. फार काय पण हीं संयुक्त व्यंजनें आलों असतां मागील स्वरावर आघात देऊन उच्चार केले तर ते चमत्कारिक वाटतात. जसें तुमच्यांत, मुसक्या, ‘ हरि म्हणे जरि येशि तूं’ ;इ.इ. आतां कोठें कोठें लघु स्वराला गुरुत्व येतें, याचें उदाहरण देऊं, सामान्यत: चरणाच्या शेवटीं जर र्‍हस्व स्वर येईल तर तो गुरु समजतात. उ. ‘ जगन्निवासो वसुदेव समनि’  या ठिकाणीं वंशस्थवृत्त आहे व याचा शेवटचा गण ‘र’ आहे. अर्थात्‍ ‘र’ गणांतील शेवटचा स्वर गुरु असावा लागतो तेव्हां येथें ‘नि’ हा गुरु आहे. असें म्हणावें लागतें. मराठींत चरणाच्या शेवटच्या अक्षरांची संस्कृताप्रमाणेंच व्यवस्था आहे. ‘ घरांत सासु येकली । तिशीं करुन ये कली’ हे प्रमाणिकेचें उदाहरण आहे. प्रमाणीकेंत अत्याक्षर नेहमीं गुरु असतें. तेव्हा येथें कलि शब्द दीर्घ करावा लागला. अशीं पुष्कळ उदाहरणें देतां येतील. संस्कृतांत क्रमसंज्ञक एक संयोग आहे. चरणाच्या आरंभी जो संयोग येतो त्यास क्रमसंज्ञक संयोग म्हणतात. हा पुढें आला असतां पूर्वीच्या स्वरास गुरुत्व मानीत नाहीत. उदाहरण ‘ स्वल्पव्ययेन सुंदरि ग्राम्यजनो मधुरमश्राति’ येथें ‘ ग्रा’ ह्या संयुक्त अक्षरानें ‘रि’ या अक्षरास गुरुत्व येत नाहीं. तो गुरु मानला तर तेरा मात्रा होऊन आर्यावृत्ताची अनुपपत्ति येते. ‘ सव्यंजनरहपूर्वो’ याची उदाहरणें वर थोडींशीं आलीच आहेत. इं हि काराची प्राकृत गाथेंत माणिणिं माणेहि कांई इ. इ. उदाहरणें आहेत. परंतु प्राकृताची सर्व साधारण लोकांस माहिती कमी असल्यामुळें त्याचा विस्तार कंटाळवाणा होईल म्हणून तो सोडून देतों. दीर्घस्वरास र्‍हस्व मानल्याचें वएर ‘अरेरे’ हे उदाहरण दिलेंच आहे. दोन तीन वर्णाचा शीघ्र उचार केला असतां ते सर्व मिळून एकवर्ण समजले जातात. याचें उदाहरण, वर जें अरेरे कथय हें उदाहरण दिलें आहे त्यांतील चवथा चरण होय. यांत डग ही दोन अक्षरें अधिक आहेत. परंतु द्रुतोच्चारानें तेथें छंदोभंग होत नाहीं असें मानतात. याचें मराठींत उत्तम कवीच्या ग्रंथांत जरी विशेषसें उदाहरण दृष्टीस पडत नाहीं ( वामनाच्या काव्यांत मात्र अशीं उदाहरणें सांपडतील) तथापि विनोदाकरितां म्हणून मुद्दाम रचना केलेली जीं पद्यें आहेत त्यांत कांहीं अशीं उदाहरणें सांपडतात. उ० ‘ इंडीचा देव साचा त्याचे - पडकेशे देउळ - त्यापुढें नंदि बुच्चा ! देवळाच्या औति भौति - कांहीं बोरि कांहीं बाभळि - त्यापुढें दाट चिंचा । देवळाच्या पाठिमागें - एक पडकी विहीर - तीमधे खूप पाणी । ऐशा काव्या कराया - इकडुन तिकडुन आणुनी - बुध्दि दे चक्रपाणी’ । ‘ वर्षें तीन पुण्यांत जो मिरविला तो रामजोशी पहा । यात्रोद्देश धरुनियां तनुमुळें घेतो निरोपाशि हा । या मागें न कधी पुढेंहि न कधीं मागावयाचा गुणी । ऐसें - समजुनि - घ्या यशासह तुम्ही ही याद ही लेखणी ॥
==
१ ला श्लोक स्रग्‍ धरेच व दुसरा शार्दूलविक्रीडिताचा आहे. ही गणवृत्ते आहेत. मात्रावृत्तें नव्हत. तेव्हां यांतील अक्षर - संख्या नियमित असते. ती येथें क्रमानें एकवीस व एकोणीस आहे. परंतु पहिल्या श्लोकांतील सर्व चरणांत व दुसर्‍याच्या चतुर्थ चरणांत ती जास्त भरते. ‘समजुनी’ या शब्दांतील ‘स’ वृत्ताच्या नियमानें गुरु पाहिजे, परंतु तो लघु आहे. तेव्हा त्याच्या भरतीकरितां एक लघु अक्षर आलें आहे. परंतु ही पध्दत गणावृत्तांत चालत नाहीं. मात्रावृत्तांत चालते. तेव्हां ‘म’ चा अर्धोच्चार करुन पाठीमागील ‘ स’ स गुरुत्व आणावें लागतें. तेव्हां हीं द्रुतोच्चाराचीं उदाहरणें होत.
याप्रमाणें लघुगुरुंसंबंधानें थोडसें विवेचन केलें आहे. जोशीबोवांनी जेवढी माहिती संस्कृतांत दिली आहे तेवढयाचा उलगडा होण्यास जेवढें अपेक्षित तेवढें येथें सांगितलें आहे. संस्कृतांत याचा विस्तार विशेष आहे. परंतु प्रकृत स्थलीं तो सर्व मजकूर लिहावयाचा तो विस्तार फार होईल म्हणून तो सोडून देतो.
==
वेदाला पुरुषाची कल्पना करुन शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, आणि ज्योतिष हे त्याचे सहा अवयव मानिले आहेत. त्याचा व्यवस्था अशी आहे: - ‘ छंद: पादौ तु वेदस्य हस्तौ कल्पोऽ थ पठयते । ज्योतिषाभयनं चक्षुनिरुक्तं श्रोत्रमुच्यते । शिक्षा घ्राणं तु वेदस्य मुखं व्याकरणं स्मृतम्‍ ’ । या वरुन छंद :- शास्त्र हे वेदपुरुषाचे पाय होत. हें रुपक एका अर्थानें बरोबर आहे. कारण छंदज्ञान नसेल तर वेदपठन करताच यावयाचे नाहींत. तेव्हां वेदसंचाराला छंदज्ञान पाहिजे.
==
जसें लहान थोर खांबांनीं घर तयार झालेले आहे; त्याप्रमाणें लहान मोठया वृत्तांनीं छंदशास्त्र सिध्द झालेलें आहे. स्तभावाचून जशी घराची उभारणीं करतां यावयाची नाही, त्याप्रमाणें छंदांवाचून काव्याची उभारणी करतां यावयाची नाहीं.
==
म, य, र, स, त, ज, भ, न हे आठ गण यांचीं लक्षणें पूर्वी उपोद्‍घातांत सांगितली आहेत,
==
वृत्ताच नांव ६ गणाच्या आरंभीचे अक्षर म्हणजे पहिलें चौथें सातवें अशा रीतीनें जें येतें तें होय. हें अक्षर जो गण तेथ इष्ट असेल त्याच्या संज्ञेचेंच घातलें आहे. उदाहरणार्थ स्रग्विणीला चार रगण योजावे लागतात. तर तिचें उदाहरण कवीनें ‘राधिका रात्रि दारीं राहिली’ अशी योजना प्रथम चरणाची करुन ठेविली आहे. अशी सर्व वृत्तांतील प्रथम चरणाची योजना केली आहे.
==
शेवटल्या चरणांत वृत्ताचें नांव सांगितलें आहे. जसें ‘पौर्णमासीव मुक्ताफल - स्रग्‍ विणी’ असें चतुर्थ चरणांत वृत्ताचें नांव दिलें आहे. याप्रमाणें सर्व वृत्तांची रचना केली आहे.
==
वरच्या आयेंत जें सांगितलें आहे तेंच या श्लोकांत विशेष स्पष्ट सांगितलें आहे. नामाचेंऽक्षर हा संधि संस्कृत नियमार्पमाणें केला आहे. प्रस्तुत कवी संस्कृतप्राकृत शब्दांचे संधि संस्कृत नियमाप्रमाणें पुष्कळ ठिकाणीं करतो.
==
अभिधा असा मूळ संस्कृतशब्द आहे. त्याचें मराठींत अभिध असें विकृत रुप झालें आहे. अभिध म्हणजे नांव
==
सम, अर्धसम आणि विषम असे वृत्तांचे तीन प्रकार आहेत. त्यांत समवृत्ताचाच भरणा या ग्रंथांत विशेष आहे. म्हणून समवृत्ती बहुत असें म्हटलें आहे.
==
पाद ( चौथाभाग ) १ लक्षणानें २ सजल घन म्हणजे मेघ त्याच्या अभिप्रमाणे म्हणजे कांतीप्रमाणें आहे कांति ज्याची असा कृष्ण त्याचे पायीं पायावर.

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP