भीष्म सांगतात,
युधिष्ठिरा, उत्कृष्ट प्रकारचा ब्रह्मवेत्ता अंगिरस कुलोत्पन्न उतथ्य ह्याने युवनाश्वपुत्र मांधाता ह्यास प्रीतिपूर्वक जे क्षात्रधर्म सांगितले होते, ते व त्या ब्रह्मज्ञश्रेष्ठ उतथ्याने त्याला जे काही शिक्षण दिले होते ते सर्व मी तुला पूर्णपणे सांगतो. ॥१-२॥
उतथ्य म्हणाला,
राजा धर्मासाठीच आहे; आपल्या इच्छा तृप्त करुन घेण्यासाठी नाही. हे मांधात्या, जो लोकांचे संरक्षण करितो तोच राजा होय हे तू जाण. ॥३॥
राजाने जर धर्माचे आचरण केले, तर त्याला देवत्वाची प्राप्ती होते; आणि जर तो अधर्माचे आचरण करु लागला, तर नरकालाच जातो. ॥४॥
धर्म हा सर्व प्राण्यांचा आधार असून राजा हा धर्माला आधारभूत आहे. म्हणूनच, जो उत्कृष्ट प्रकारे त्या धर्माचे पालन करील तोच खरा पृथवीपती होय. ॥५॥
राजा हा उत्कृष्ट प्रकारचे धर्माचे स्वरुपच होय व धर्म हा लक्ष्मीचे वसतिस्थान होय असे सांगितले आहे. पापिष्ठ लोकांचे निवारण केले नाही; तर देवतांची निंदा होऊ लागते; धर्माचे अस्तित्वच नाही, असे लोक बोलू लागतात; ॥६॥
अधर्माने वागणार्‍यांची अर्थसिध्दी होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. मग तेच उत्तम आहे, मंगल आहे (असे मानून) लोक त्याप्रमाणे अधर्माने वागू लागतात. ॥७॥
(त्यामुळे) धर्माचरण उखडले जाते. आणि अधर्म फोफावतो. पापाचा प्रतिबन्ध झाला नाही तर रात्रीच काय पण दिवसाढवळ्यासुध्दा भय राहते. ॥८॥
जेव्हा पापाचे निवारण होत नाही तेव्हा व्रताचारी ब्राह्मणदेखील वेदांना प्रमाण मानून वागणार नाहीत. विप्र यज्ञाचे अनुष्ठान करणार नाहीत. ॥९॥
हे महाराजा, जेव्हा पापाचे निराकरण होत नाही, तेव्हा वृध्द झालेल्या प्राण्याप्रमाणे सर्वही मनुष्यांचे अंत:करण विह्वल होते. ॥१०॥
इहलोक आणि परलोक ह्यांचा विचार करुन स्वत: ऋषींनी ‘हा मूर्तिमंत धर्मच होईल’ अशा इच्छेने राजा म्हणून एक अत्यंत श्रेष्ठ प्राणी निर्माण केला. ॥११॥
म्हणूनच, ज्याच्या ठिकाणी धर्म विराजमान असेल त्याला राजा असे म्हणतात; व ज्यांच्या योगाने धर्माचा लय होऊन जातो तो वृषल (शूद्र) होय असे देव समजत असतात. ॥१२॥
वृष ह्या शब्दाचा अर्थ भगवान्‍ धर्म असा आहे; व म्हणनूच जो त्याचे अलम्‍ म्हणजे छेदन करितो त्याला देव वृषल असे समजतात. ह्यास्तव, धर्माचा उच्छेद न करिता  त्याची अभिवृध्दीच करीत असावे. ॥१३॥
धर्माची अभिवृध्दी होऊ लागली तरच सदैव सर्व प्राण्यांचा उत्कर्ष होतो; व त्याचा र्‍हास होऊ लागला म्हणजे त्यांचीही हानी होते. ह्यास्तव धर्म वाढवावा. ॥१४॥
आपल्या अनुरोधाने वागणार्‍याविषयी कृपाळू होऊन द्रव्य अर्पण करितो म्हणून धर्माला धर्म असे म्हणतात; अथवा तो दुष्कर्मापासून आवरुन धरितो म्हणून त्याला धर्म हा दुष्कर्माची मर्यादा ठरविणारा आहे. ॥१५॥
परमेश्वराने प्राण्यांच्या अभ्युदयासाठी धर्म निर्माण केला आहे. ह्यास्तव, प्रजेवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने धर्मप्रसार करावा. ॥१६॥
सारांश, हे नृपश्रेष्ठ, धर्म हा अत्यंत श्रेष्ठ होय असे सांगितले आहे. हे पुरुषश्रेष्ठा, उत्कृष्ट प्रकारचे कर्म करुन जो प्रजापालन करितो तोच राजा होय. ॥१७॥
हे राजा, तू काम आणि क्रोध ह्यांना महत्त्व न देता केवळ धर्माचेच पालन कर. कारण, हे भरत कुलश्रेष्ठा, धर्म हाच राजांना अत्यंत श्रेयस्कर आहे. ॥१८॥
हे मांधात्या, ब्राह्मण हे धर्माचे उत्पत्तिस्थान आहे. ह्यास्तव, त्यांचा सदैव बहुमान करावा, व निर्मत्सरपणे त्यांचे मनोरथ पूर्ण करावे. ॥१९॥
त्यांचे मनोरथ पूर्ण न केल्यास राजाला भीती उत्पन्न होते; त्याचे मित्र वृध्दिंगत होत नाहीत; इतकेच नव्हे, तर ते शत्रूही बनतात. ॥२०॥
पूर्वी विरोचनपुत्र बलि हा अज्ञानामुळे सदैव ब्राह्मणांशी मत्सर करत होता व म्हणूनच प्रतापशाली अशा त्या बलीच्या ठिकाणी असणारी लक्ष्मी. त्याजपासून निघून जाऊन इंद्राकडे गेली. तेव्हां ते पाहून बलीला पश्चाताप झाला. ॥२१-२२॥
हे प्रभो, हे मत्सराचे अथवा अभिमानाचे फल होय. ह्यास्तव , हे मांधात्या,  प्रतापशाली लक्ष्मीने आपला त्याग करु नये ह्या हेतूने तू हे सर्व लक्षात ठेव. ॥२३॥
दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे. तो तिला अधर्मापासून झाला असे आमच्या ऐकण्यात आहे. हे पृथ्वीपते राजा, त्या दर्पाने अनेक देवदैत्य आणि राजर्षि ह्यांचा विनाश केलेला आहे. ह्यास्तव तू त्याजविषयी सावध रहा. ह्या अहंकाराचा ज्याने जय केला असेल तो राजा, व ज्याचा त्याने पराजय केला असेल तो दास होतो. ॥२४-२५॥
ह्यास्तव, हे मांधात्या, तुला जर आपले अस्तित्व चिरकाल असावे अशी इच्छा असेल, तर अहंकाराशी संबध्द असलेल्या तुझ्या हातून अधर्माचे सेवन घडणार नाही अशा प्रकारचे तू वर्तन ठेव. ॥२६॥
मत्त झालेले, प्रमादशील, अज्ञ आणि उन्मादग्रस्त ह्यांचे सान्निध्य व ते समीप आल्यास त्यांचे सेवन ह्यांपासून तू सदैव परावृत्त होऊन रहा. ॥२७॥
तसेच, ज्याचा निग्रह केला असेल असा अमात्य व विशेषेकरुन परस्त्रिया आणि अविवाहित स्त्रिया ह्यांच्याशी केव्हांही समागम करुं नये. ॥३०॥
वर्णसंकराच्या योगाने कुलामध्ये पापरुपी राक्षसाचा प्रवेश होतो. राजाच्या हातून प्रसाद घडल्यास पुरुषत्वशून्य, अंगविकल, जिव्हा स्थूल असलेले, विचारशून्य - ॥३१॥
हे आणि अशा प्रकारचे दुसरेही लोक उत्पन्न होतात. सारांश, राजाने विशेषेकरुन प्रजेचे हित होईल अशा प्रकारचे वर्तन ठेवावे. ॥३२॥
क्षत्रियांकडून प्रमाद घडू लागल्यास मोठा दोष उत्पन्न होतो; प्रजेमध्ये संकर करुन सोडणार्‍या अधर्माची अभिवृध्दी होऊ लागते; ॥३३॥
शीतकाल नसता शीताची उत्पत्ती होते व शीतकाल असेल त्या वेळी शीतलता मुळीच असत नाही; आणि अवृष्टी व अतिवृष्टी होऊन प्रजेमध्ये रोगाचा प्रवेश होतो. ॥३४॥
अशी स्थिती प्राप्त झाली असता भयंकर ग्रह नक्षत्रांच्या ठिकाणी येतात आणि राजाचा नाश करणारे अनेक उत्पात दृष्टिगोचर होऊ लागतात. ॥३५॥
जो राजा स्वत:चे व प्रजेचेही संरक्षण करीत नाही, त्याच्या प्रजेचा प्रथम संहार होतो व नंतर तोही नाश पावतो. ॥३६॥
राष्ट्रामध्ये एकटया मनुष्याचे द्रव्य दोघांनी घेणे, दोघांचे दुसर्‍या अनेक लोकांनी घेणे व अविवाहित स्त्रिया दूषित होणे हे राजास दूषण होय असे सांगितलेले आहे. ॥३७॥
जेव्हा राजा धर्माचा त्याग करुन प्रमादशील होऊन राहतो, तेव्हा अमुक पदार्थ आपला आहे असे म्हणण्यास मनुष्यास काहीच उतर नाही. ॥३८॥
उतथ्यगीतेचा पहिला अध्याय संपला.

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP