मुनिवराश्रम सोडुनि चालले सुरनदीतट-संनिध पातले ।
निरखिली नयनीं त्रिजगोद्धरा परमविष्णुपदी श्रुतिगोचरा ॥१॥
ऋषिवरें मग नाविक बाहिला म्हणत " पार करीं मुनिमंडला"
वदत " रामविना सकळां द्विजां करिन पार यथार्थ, कथी गुजा ॥२॥
मालिनी.
" रघुपतिपदपद्मी-रेणुयोगें शिळेची
सहज युवति झाली देखतां मात साची, ।
न करिल ललना हा केंवि या दारुनावे !
अधन मज कसी ते दूसरी स्त्री समावें ! ॥३॥
म्हणुनि पदयुगातें क्षाळिलें भक्तिमंतें
शिरिं धरि मग आपें दुर्लभें जीं सुरांतें ।
वळघौनि समस्ता नेतसे पार तीरा
पदरजमहिमा हे कोण वाणी उदारा ॥४॥
द्रुतविलंबित.
ऋषिकुळें मिनलीं जनकालयीं मखवरीं वसती अति उत्सहीं ।
समुनिराघव ते स्थळिं पातला परमतापस गाधिज आगळा ॥५॥
निरखिली मिथिलापुरि साजिरी उपवनीं विलसे बरी ।
परम जे रमणीय महींतळी नृप विदेह महीपति जे स्थळीं ॥६॥
शार्दूलविक्रीडित.
आला कौशिक, ऐकतां नरवरा आनंद झाला पुरा
सोपाध्याय सनागरा ससचिवें आला मुनीमोहरा ।
वंदी भक्तिपुर:सरा सुखकरा पाद्यार्ध्य वोपी बरा
पूसे त्या कुशलोत्तरास विनयें प्रार्थी, " चला मंदिरा " ॥७॥
देखें तैं रघुनायकास नयनीं, हे कोण सांगा मुनी
माझ्या फार मनासि तोष करितीम कीं सूर्य तारामणीं ॥
तैसे भासति शौर्यवंत सुगुणी सौंदर्यशाली, जनीं
नाहीं यासि समान, हे मुनिजनी कां वर्तती काननीं ॥८॥
" हाती बाण धनुष्य खड्ग विलसे, यांतुल्य कोणी नसे,
ऐसे आजि दिसे, " म्हणोनि नृपती तोषें मुनीला पुसे, ॥९॥
तेव्हां त्या मुनिनायकें निरखिलें श्रीरामवक्रांबुजा,
" ऐके तूज समस्त मी निगदितों हें सादरें भूभुजा ।
सांकेताविप भूपती दशरथा हें पुत्ररत्नावळीं
दैवें अदद्भुत लाधली, म्हणुनि या तो धन्य पृथ्वीतळीं ॥१०॥
कौसल्यासुत राम, लक्ष्मण दुजा देवी सुमित्रेचिया
पोटी संभवला असे अनुज तो शत्रुघ्न दूजा यया ।
कैकेयीसुत दिव्य सद्गुणमणी शोभे पित्या सन्निधी,
यातें देखुनि भूप तोषित मनीं, पर्वी जसा वारिधी, ॥११॥
" माझा जे मख नाशिती प्रतिदिनीं रात्रिंचरु दुर्मती,
मोठा दुर्मद तो सुबाहु दुसरा मारीच पापाकृती, ।
त्यांच्या संहरनार्थ हा रघुपतीं म्यां आणिला भूपती
मार्गी दारूण ताटिका निवटिली क्रूरा द्विजां भक्षिती ॥१२॥
स्त्रग्धरा.
" एके बाणें सुबाहु निशिचर वधिला धाडिला मृत्युधामा
आकाशीं हेळणेनें सबळ उडविला दुष्ट मारीचनामा ।
नेला तो यज्ञ सिद्धी द्विजकुळ समुदें पावलें निर्भयातें
येतां मार्गी अहल्या पद-कमळ-रजें मुक्त केलें सतीतें ॥१३॥
" आले यज्ञा निरीक्षू सहज तव पुरा, ऐकिलें ईशचापा
पाहाया कौतुकानें, नुचलिति धरणीपाल ते ज्यासि बापा, ।
दावीं यातें विदेहा," म्हणउनि वदतां फार संतुष्टचित्तें
पूजी श्रीरामपादांबुज विमलमनें आणवी कर्मुकाते ॥१४॥
सांगे राजा प्रधांना, "पुरहरधनुषा आणिजे यज्ञशाळे
पूर्वी मोठे बळाचे क्षितिपतिसुत ते फार पाहोनि गेले,
कोणी नाही तयाला उचलुनि सुभुजीं योजिलें त्या गुणाला
हा राजा राम आतां निरखिल नयनीं सत्यता हो पणाला ॥१५॥
पृथ्वी.
"सुरेंद्रधनुष्यापरी अति सुदीर्घ, घंटाशती
विराजित, सुपूज्य जें असम दूसरें या क्षिती, ।
महाबळपराक्रमी नुचलिलें पुरा भूभुजीं
शरासन सभांगणी निरखिजेल या सद्भुजीं" ॥१६॥
स्त्रग्धरा
आज्ञा वंदोनि माथां सचिववर जवें आणवी चापदंडा,
मस्तीचे थोर हस्ती ढकलिति शतधा वोढिति त्या प्रचंडा ।
यत्नें आणोनि भूपांगणविमळसभे ठेविले चांप तें ही
त्यातें देखोनि सारे क्षितिपति विटले वीर्य कोणासि नाही ॥१७॥
वसंततिलका.
बोले तदा जनकराजऋषी ऋषीतें हें ऊचली जारे रघूत्तम चाप हातें ।
योजीं गुणी, तरि यया गुणशीलरुपा सीता समर्पण करीन यथार्थ बापा ॥१८॥
पृथ्वी.
विलोकुनि तदा म्हणे मुनिवरेण्य रामा प्रती,
"पुढें शिवधनुष्य हें निरविलें तुवां सन्मती ।
त्वरें गुण नियोजिजे न सकती बळी भूपती,
पहा अतुल-विक्रमी अमित या सभे वर्तती ॥१९॥
"पुरा बहुत भंगले धरिणिपाळ सत्वागळे,
कितेक धनु देखतां न वदतां उगे चालले ।
समर्थ असुरीं सुरीं बहु निशाचरीं लक्षिलें,
तयांसि धरणीसुता युवतिरत्न ना लाधलें " ॥२०॥
स्वागता.
ऐकतां मुनिगिरा रघुरामा. तोष त्या परमचित्सुखधामा ।
कांस बांधुनि उभा जगजेठी, देखती सुरनरेश्वरकोटी ॥३१॥
सदनांतरि जानकी बरी । अवलोकी सकळांगसुंदरी ।
प्रमदाजनवेष्टिता असे भगणीं चंद्रकला तशी दिसे ॥२२॥
शार्दूलविक्रीडित.
भूपाळा रघुनायका निरखितां भूंदिनी तोषली,
भूषालंकृत भूभृतासम उभा जा भूभुजामंडळीं ।
"भूमीवरि धन्य मी, न घडतां भूभार माझें जिणें ॥२३॥
पृथ्वी.
बहूत नृप देखिले सबळ सैन्यभारागळे,
सभेंत तरि दाटले, मम पित्यासही भेटले, ।
विलोकुनि शरासना स्वमनिं वीटले, ऊठले,
धरोनि पथ चालिले, न कधिंही असे देखिले ॥२४॥
दिसे जलदशाम हा मदनकोटिदिव्याकृती
मनोहर विराजला विविध भूषणें साजती ।
करीं शर धनुष्य तें ऋषिगणांतरीं बैसला
सहानुज महाबळी त्रिगगवीर हा येकला" ॥२५॥
सखी वदत, " मैथिली, दशरथाचिये मंदिरीं
स्वयें प्रगटला हरी जलघि चंद्रमाचे परी, ।
अकल्पित यया पुरीं सहज पातला, हा तरी
वरील तुज निश्चयें जिणुनि वीरलक्षांतरी" ॥२६॥
सीता - " मनीं बहुत वेधला, सखि, सुभाग्य कीं लाधला, ।
अयोग्य पण बोलिला जनक हा अशा कोमला !
महेशधनु थोर तें गुण चढेल कैं याजला ?
विचार न सुचे मला बहुत जीव कोमेजला" ॥२७॥
सखी-" विचार तुज कायसा नृपसभेंत हा वीरसा
दिसे सबळ फारसा, लखलखीत हा आरसा, ।
तुझ्या हृदयासारसा कमळमंडलीं मित्रसा
विकासविल, भर्वसा मज दिसे सखे सर्वसा, ।
सतोष मग जानकी करित देवताप्रार्थना
"रमाधव कृपा करो, " म्हणुनि आदि नारायणा ।
स्तवोनि नमि सादरें, हृदयपंकजीं ध्याउनी
करोनि नमि सादरें, हृदयपंकजीं ध्याउनी
करोनि परमस्तुती गुणगणार्णवा गाउनि ॥२९॥
" कृपा करिल ते सती भगवती जगत्साक्षिणी
फळेल निजदैव हें तरि घडों शके साजणी ।
असो सबळ हें धनू कठिण कूर्मपृष्टापरी’ ।
सवेग उचलील हा नृपकुमार दंडापरी ॥३०॥
" जिणॊ पण परंतु हा न जिणतां जरी राहिला
वरीन रघुवीर हा पणचि एक माझा भला ।
त्यजीन तरि जीविता, न घडतां वृथा वांचणें
कशास अवनीतळीं करुनि व्यर्थ सारें जिणें ॥३१॥
शार्दूलविक्रीडित.
" हा श्रीराम महेशचाप उचलो, जिंतो पणा, ना जिणो
या पृथ्वीवरी दूसरा यशनिधी वीर्ये खणो ना खणो ।
म्या चित्तें वरिला रघूत्तम पती, राजा गणो ना गणो
माझा निश्चय हा जेगी< न बरवा कोणी ह्मणो ना ह्मणो ॥३२॥
" हा श्रीराम गुणाभिराम विलसे विश्राम योगीमना
हा मातें जरि कांत होईल तदा संपूर्ण ते कामना, ।
म्यांही भूप उदंडसे निरखिले, नाहीं असा देखिला
या पृथ्वीवरी सर्वराजमुकुटीं चूडामणी एकला ॥३३॥
पृथ्वी.
"सतत सुरमंडळी सकळ मातृका -योगिनी
विनायक अविघ्न ते करुनि चाप योजो गुणीं ।
करीन बलिपूजनें परम भक्तिभावें तयां
नमीन दिविजाधिपां करिति पूर्ण माते दया ॥३४॥
तदा सबळ कांअ ते रघुकुलोत्तमें बांधिली
विलोकिति समस्त ही नृपतिची सभा दाटली ।
करींद्र उचली जसा सबळ इक्षुदंडा-परी
गुणीं सजुनि वोढितां सहज दोन खंडें करी ॥३५॥
कडाड बहु जाहला, निनद या जगीं दाटला,
युगांत सम वाटला, पळचि दिग्गजां सूटला, ।
महोदधि उलाटला, हिमगिरी गमे फूटला,
कुसंशयचि फीटला, नृपति राघवा भेटला ॥३६॥
विलोकुनि जनावली परम कौतुका मानिती,
विदेहकुळबाळिका-अमित तोंष वर्णूं किती ।
सुरेंद्र सुमनावळी वरुषती शिरीं सादरें
तुरें अमरदुंदुभीनिनद तो नभांतीं भरे ॥३७॥
तदा मुनि मनांतरीं परम तत्व-सौख्या -परी
अचिंत्य सुख रुढलें न वदवे कदा वैखरी ।
अलिंगुनि रघूत्तमा, सकृप पाठि तो थोपटी,
ह्मणे " अतुळ विक्रमी त्रिजगतींत तूं धूर्जटी " ॥३८॥
क्षमासुरगिरावळी जयजयोक्त ते ऊठली
सबंदिजनमंडळी स्तविति भाट ते आगळी:-- ।
"सुधन्य ! रविच्या कुळीं उपजलासि ऐसा बळी,
यथार्थ वसुधातळीं दमिसि राक्षसांची फळी " ॥३९॥
तदा नृपतिबाळिका करिं धरोनि सन्मालिका
भजे गतिमरालिका, सपरिवेष्टिता-आळीका ।
सुयुक्तमणि जाळिकासहित वक्षसीं चोळिका,
लसत्तिलकभाळिका प्रविशली, सभाशालिका ॥४०॥
झणाझ्झणितनूपुरा अतिविचित्रभूषांभरा,
सुपुष्यकबरीभरा सरसिजानना सुंदरा,
सुरत्नमणिकंधरा अरूणपकबिंबाधरा
धरोनि युवतीकरा विलसली जशी इंदिरा ॥४१॥
समीप बसला मुनी भुवनमित्र लोकाग्रणी
सतोष मृगलोचनी पदसरोरुहें वंदुनीं
सरत्नसुममालिका मग समर्पिली सन्मनीं ॥४२॥
वसंततिलका.
संपूर्णशारदशशांकमुखी मृगाक्षी, श्रीरामचंद्रमुखचंद्र विशेष लक्षी
हें मुख्य बिंब अपणा प्रतिबिंब मानी, चित्तीं विदेहंकुळनंदिनि विश्वखाणी ॥४१॥
शार्दूलविक्रीडित.
आशीर्वाद करुनि कौशिक मुनी रामासि आलिंगुनी,
संतोषे निजदेहभाव विसरे आनंदबोधें मनी ।
झाला तुष्ट, म्हणे, "तुझीच जननी धन्यत्व पावे जनीं,
तूं तीच्या उदरांत सद्गुणमणी झालासि देवाग्रणी ॥४४॥
स्त्रग्धरा.
जांवायी राम झाला म्हणुनि बहु मनीं तोष भूपाळकाला,
राज्ञी त्या मेघनीळा निरखुनि म्हणती, " धन्य संसार केला ।
सीतेला कांत आला रविकुळमणि हा, आमुच्या कन्यकेला,
कोदंडा भंग केला, पणहि निवडला, थोर आनंद मेळा !" ॥४५॥
भुजंगप्रयात.
जगन्मोहना कोटिकामस्वरुपा, विलोकूनियां नागरी चारुरुपा ।
कशा मोहल्या बाहुल्याशा, तनूची जयां शुद्धि ते नाठवे, आणिकाची ॥४६॥
स्त्रग्धरा.
विश्वामित्रा विनंति करि जनक " कृपासागरा ब्रह्मरुपा,
धाडावें पत्र वेगी, दशरथ नृपती आणिजे सानुकंपा ।
राज्ञी श्रीराममाता कुमरसह गुरु सैन्य सामात्यवर्गी
यावें माझ्या पुरातें झडकरि, नलगो वेळ या उत्सवांगीं " ॥४७॥
शार्दूलविक्रीडित.
संतोषे वरपत्र कौशिकमुनी धाडी नृपाधीश्वरा,
आशीर्वादपुर:सरा स्वकुशलायुक्त-रम्याक्षरा ।
" आहे पुत्र बरा तुझा नृपवरा, श्रीराम तो साजिरा,
बंधू लक्ष्मण दूसरा सहचरा भूपाळका चातुरा ॥४८॥
" केला अध्वर सिद्ध राघवकरीं, संहारिलें राक्षसां,
मोठी ब्राह्मणघातिनी निवटिली ते ताटिका कर्कशा, ।
केली पावन पादपंकजरजें मार्गी अहल्या सती,
झाला या मिथिलेंत शंकरधनू भंगोनि सीतापती ॥४९॥
स्त्रग्धरा.
" सीता सीतांशुवत्क्रा मद-गज-गमना सुंदरी चारुनेत्रा
भूकन्या हेमगात्रा अतिविमळगुणा पुण्यशीळा पवित्रा, ।
ते तुझ्या ज्येष्ठ पुत्रा परिणुनि जगतीं मान्य केलें स्वगोत्रा
आतां बंधूकलत्रासहित सजुनि ये, मानिजे लग्नपत्रा ॥५०॥
वसंततिलका.
" यावें सुपुत्र-बळ-वाहन-पट्टराणी सामंत-सैनि-सबांधव-शस्त्रपाणी ।
विपेन्द्र मुख्य, अति सत्वर लोकनाथा यावें विवाहकरणीं मिथिलेस आतां ॥५१॥
" व्याही तुझा जनक, धीर उदार कीर्ती ज्ञानी वरिष्ठगुणपूर्ण सुभव्यमूर्ती, ।
सीता सुलक्षणवती, अनुरुपरामा दैवेंचि सून मिनली तुज सार्वभौमा ॥५२॥
" तीघी जणी कनकचंपकदामगौरी तीघां सुतांसि तुझिया जनकें कुमारी ।
सेमोनि, लग्नकरणीं तुझि वाट पाहे, हें पत्र देखत निघें, न उशीर लाहे" ॥५३॥
शार्दूलविक्रीडित.
ऐसें कुंकुमपत्र चार चतुरा संगे नृपा धाडितां,
पाहे वाचुनि तोषयुक्त नृपती, सांगे सुमंता स्वतां ।
"सेना सत्वर सज्ज आजि करणें रामासि भेटावया
जाणें सत्य विदेहराजनगरा, लग्नासि साधावया ॥५४॥
" राज्ञीसाग्नि वसिष्ठ सद्गुरु सवें आधीं पुढें चालिजे,
सेनानायक शस्त्र-सायकवती वेगी चमू योजि जे,
ध्यावे पुष्कळ ते पदार्थ, धन जें खर्चावया पाहिजे ॥५५॥
सुहासा.
" भरतरिपुत्र पुढें गजयानीं, हय, रथ, पत्ति-वरायुधपाणी ।
गमन करीत सुवेष्टित वीरीं, नगर-जनांसह, सत्परिवारीं. " ॥५६॥
दशरथ भूपति हेमरथी तो भुवि कुलिशायुध साम्य दिसे तो,
सचिवगणी चतुरंग समेतें नयनवतां करि तोष मनातें ॥५७॥
स्त्रग्धरा.
" आला साकेतवाला दशरथ, विपुला संपदेसीं " " सुशीला
सीतेचा लाभ झाला, म्हणउनि फुगला," " त्याच वेळे निघाला, ।"
ऐशा ऐकोनि बोलां, अतिशय मिथिलानायका तोष झाला,
प्रेमें भेटावयाला सचिवगुरुजनीं सामुरा शीघ्र गेला ॥५८॥
वसंततिलका.
पूजी सुराधिप तयासि कुबेर जैसा, स्नेहाधिकें दशरथासि विदेह तैसा, ।
अर्ची विधी विहित जाणुनि जो उदार तो तुल्यशीलगुणवीर्य, धनी अपार ॥५९॥
शिखरिणी.
पित्याला भेटाया रघुपति सुमित्रासह तदा
त्वरें आला, वंदी पितृचरण भावें परमुदा, ।
विलोकी पुत्रातें दशरथ, महातोषमनसें
सुतां भेटे, प्रेमें बसवुनि निजांकी वदतसे : -- ॥६०॥
" तुला मोठ्या भाग्यें अनुजसह आतां निरखिलें,
दरिद्र्याचें गेलें धन, शतगुणें जेंवि मिनलें, ।
तसें झालें रामा तवमुखसरोजा निरखितां,
मनाच्या संतोषा कवण जगिं मापी गुणवता ॥६१॥
" मुनी विश्वामित्रें सकळ मज कल्याण यश हें
दिलें रामा आतां कथन करणें काय किति हें, " ।
मुखा पाहे, भेटे घडिघडिसि, आध्राण शिरसीं
करी संतोषें, तो अज सुत महानंद मनसीं ॥६२॥
शार्दूलविक्रीडित.
संप्रार्थी मिथिलेंद्र, " राजतिलका, चाला महामंडपीं,
जेथें सर्व समृद्धिका मिरवती तेथें वसावें नृपीं, ।
कीजे मंगलकार्य सर्व, " म्हणतां संतोषला भूपती,
शोभे दिव्यरथीं सुरेंद्रविभवें, बंदी जया वर्णिती ॥६३॥
पृथ्वी.
महासदन निर्मिलें दशरथासि राहावया, विदेहकुलनायकें वसविलें नृपाळा तया, ।
समस्त सुपदार्थ जे विपुल ते स्थळीं ठेविले नरेंद्र-मृगनायका उचित त्या परी चांगलें ॥६४॥
मुहूर्तशुभवासरीं सकलसानुकूलग्रहीं
सुचंद्रम सतारका बळ विवाह पुण्योत्सहीं, ।
सतोष रघुनायका जनक, तातबंधू सवें
सवाद्यगजरें बरें स्वसदनासि ने वैभवें ॥६५॥
शार्दूलविक्रीडित.
रत्नस्तंभवितानमंडप वरी आबद्धदिव्यांबरीं
नानातोरणरंगभूमि चतुरीं निर्माण केलीपरी,
शोफा फार बरी सुरासुरवरो ना देखिली या परी,
स्वर्गाहुनि विदेहराजनगरीं सन्मंदिरीं साजिरी ॥६६॥
तेथें सुंदर बोहलीं मिरवलीं, मुक्ताफळीं शोभलीं ।
नारेळी-कदली-सपूग फणसीं, नानांबरी निर्मिलीं ।
रम्यें आस्तरणें विशाल रचिलीं, भद्रासनें मांडिलीं,
तेथें ब्राह्मणवेदवंत, बहुतीं शब्दीं सभा दाटली ॥६७॥
जेथें नागरिकी द्विजेंद्र अबला सालंकृता सोज्वळा
नानावासविभूषणीं विलसल्या देवांगनाशा भल्या
वेषें सुंदर शोभल्या मिरवल्या या मंडपीं दाटल्या ॥६८॥
भेरी दुंदुभि वाजती रव महा कोंदाटला ते स्थळीं,
गाती गायक, नाट्य रम्य करिती वेश्या सभामंडळीं ।
नानानागरिकीं विराजति, अशा आणी सभामंडपा
सद्रत्नासनिं बैसवी वधुवरां, आनंद चित्तीं नृपा ॥६१॥
विश्वामित्र वसिष्ठ आणिक शतानंदादि मोठे मुनी,
त्यांतें वंदुनि तोषयुक्त बसवी तद्योग्य हेमासनी, ।
पार्श्वी राम सुखासनस्थित यथान्यायें विधी पूजिला,
पाद्यार्ध्ये, मधुपर्क पूर्णविधिनें देवेश तो अर्चिला ॥७०॥
सीता सुंदर नोवरी बहु बरी सज्जोनि रत्नांबरीं
आणी मंडपमंदिरीं, रघुवरा अर्पावया साजिरी ।
भार्यायुक्त पदारविंदयुगुलें तीर्थोदकें पावनें,
प्रक्षाळोनि जळें धरोनि शिरसा "मी धन्य लोकीं " म्हणें ॥७१॥
वसंततिलका.
हातीं धरी क्षितिसता उदकाक्षतेंशीं, अत्यादरें करि समर्पण पुण्य़राशी ।
वारांनिधी निजसुता हरिला निवेदी, अर्पी तसा जनक रामपदारविंदीं ॥७२॥
शार्दूळविक्रीडित.
साध्वी सुंदरि ऊर्मिळा स्वतनया ते लक्ष्मणा दीधली,
मांडव्या भरतासि बंधुदुहिता सालंकृता अर्पिली, ।
देवी ते श्रुतकीर्ति शत्रुहनना भूपाल अत्युत्सवें,
चौघेही वर दारवंत बरवे ते शोभती वैभवें ॥७३॥
रथोद्धता
अग्निसाक्षि-वसुधा-सुरसाक्षी वेदयुक्त विधिसीं जळसाक्षी ।
पावल्या प्रियतमाभिमतातें वांच्छिती अमरि दुर्लभ त्यातें ॥७४॥
मालिनी.
दशरथकुमरांशी मैथिलांच्या कुमारी करिति विविध चेष्टा लोकचर्याप्रकारीं ।
सखिजन शिकवीती ऊटणीं, खेळ नाना, पुरयुवति सुतोषे गीत गाती तनाना ॥७५॥
उपजाति.
नीरांजने सुंदर अक्षवाणें ओंवाळिती नागरि निंबलोणें ।
सानंदले नागर, उत्सवातें विलोकिती अद्भुत नृत्य गीतें ॥७६॥
विचित्र अन्नें वसनें सुरंगें सुगंधमाळाभरणें अनर्ध्ये ।
अप्राप्त हा मानव तैं दिसेना जेथें मिळाली शतकोटिसेना ॥७७॥
मालिनी.
जनक नृपति बोले, " चारुमित्रा सुशीला, कनकरुधिरगात्रा पुत्रिका दिव्यलीला ।
पदकमलवरातें अर्पिली म्यां सुधन्या ह्मणउनि सकृपेनें पाळिजे लोकमान्या" ॥७८॥
शार्दूलविक्रीडित.
विश्वामित्र, वसिष्ठ, राघव सभे सद्धेमपीठासनीं
संतोषें बसवूनि पूजुनि कथा सांगे तदा पावनी ।
राजामैथिल तो विदेहनृपती, " कन्या कशी लाधली
ते द्यावी रघुनायकासी, म्हणुनी श्रीनारदें बोलिली ॥७९॥
" यज्ञार्थी वसुधाविशुद्धि करितां जांबूनंदें-लांगलें
कन्यारत्न तदा अपार सुकृतें तैं हें मला लाधलें ।
लागे दिव्य कुमारिका हलमुखा सर्वोत्तमा सुंदरी,
सर्वी लक्षणिंयुक्त देखुनि अशी म्यां आणिली मंदिरीं ॥८०॥
" माझी जे प्रिय सुंदरी गुणवती पट्टांगणेला सुता,
हे आणूनि दिली, शरच्छशिमुखी सद्भूषणालंकृता ।
आला नारद मदगृहासि, महती वीणा करीं घेउनी
संचारें त्रिजगासि पावन करी, नारायणा गाउनी ॥८१॥
" म्यां प्रेमे अभिवंदिला, बसविला, सन्मानिला, पूजिला,
संतोषोनि कृपा करोनि मजला सद्गुह्य हें बोलिला, ।
‘राया ऐक, ’ म्हणे तुला निगदितों साक्षाच्चिदात्मा प्रभू,
भक्तानुग्रहकारणी अवतरे तो देवकार्या विभू ॥८२॥
‘झाला राम गुणाधिधाम वसुधापृष्ठीं अयोध्यापुरीं,
कौसल्याउदरीं अजात्मजमहाराजाचिया मंदिरीं, ।
चौरुपें अपणा विभागुनि असे नामें चतुर्धा धरी,
हे चिच्छक्ति जगत्रयादिजननी तद्योगमाया खरी ॥८३॥
" हे सीता तव कन्यका गुणवती यत्नें रमानायका,
रामा अर्पण तूं करी, न दुसरा लाहे इयेतें निका ’ ।
ऐसें गुह्य कथूनियां विधिसुतें प्रस्थान केलें, तदां
हे लक्ष्मी जगदीशशक्ति म्हणुनी म्यां भाविली सर्वदा ॥८४॥
" तैं चिंताकुल जाहलों, रघुवरा हें योजिजे म्यां कदां,
कैसा तो मिथिला पुरी प्रवेशितो, कोण्या मिषें एकदां ?
पूर्वी त्र्यंबकचाप हें ममगृही पित्रादिकीं पूजिलें
होतें, जें त्रिपुरा वधूनि वडिलां श्रीशंकरें दीधलें ॥८५॥
" तेव्हां म्यां पण योजिला क्षितिभुजां दर्पघ्न सर्वांपरी,
येणें तूं मुनिनायका मजवरी केली कृपा यापरी,
तूझ्या या करुणाघनें रघुपती तो आणिला मंदिरीं ॥८६॥
पृथ्वी.
" मनोरथतरु कसा सफळ आजि झाला, मला
असार नरजन्मही सरससा मना भासला
तुला धरणिनंदिनीसह विचित्र हेमासनी
प्रभो निरखितों, गमे परम भाग्य ! या लोचनीं ॥८७॥
" प्रकाशित जसा रवी, दिससि राघवा या भुवि
प्रभा वसुमतीसुता विमल हे तुझी वैभवी ।
पदाब्जधृतमस्तकीं विधि रची जगा कारणें
बलि त्रिदिवनाथ तो तव पदांबुसंधारणें ॥८८॥
" पदाब्जरज लागतां मुनिसती अहल्या शिळा
महातम तरोनियां जगिं विराजली निर्मळा ।
सुरेंद्रनिकुरंबका अति अलभ्य, दैवें अम्हा
अकल्पितचि लाधलें मुनिकृपें, नमी जे रमा ॥८९॥
वसंततिलका.
"त्वपादपंकजपराग मुनींद्रवृंदीं सेवोनियां भवभया त्यजिलें अनादी, ।
त्वन्नामकीर्तन करोनि, सुदु:ख शोक जिंतानि, भक्तपद पावति जें अशोका ॥९०॥
" तुझ्या पदाब्जयुगुलीं शरणागतातें जाणोनि किंकर, कृपा करिजे अम्हांतें, ।
ऐसें तुला विनवितों करुनासमुद्रा राहो अखंड हृदयीं रघुनाथमुद्रा " ॥९१॥
ऐसी करी स्तुति विदेहनृपाल, रामा, अर्पी सुवर्ण धन कोटि सहस्त्रनेमा, ।
दे अश्वलक्ष गजवृंद अनेक संख्या दासी पदाति रथ कोण करील लेखा ? ॥९२॥
दिव्यांबरें, मणिगणाभरणें उदंडें, छत्रें अनेक, चवरें नवरत्नदंडे, ।
मुक्तावली सुमणि निर्मित दिव्या हार, सीतेसि दे दुहितृवत्सल तो उदार ॥९३॥
वसंततिलका.
तैसेंचि दे भरत लक्ष्मण शत्रुनाशा, जे आंदणीं उचित फार करी सुतोषा ।
तो पूजिलां गुरु वशिष्ट अरुंधतीशीं तैसाचि कौशिक ऋषीश्वर ही विशेषीं, ॥९४॥
व्याही तसा नृप अजात्मज राजराणी; सर्वांसि पूजुनि यथाविधि तोष मानी, ।
रत्नें धनें सुवसनें गज दास दासीम ऐसें अपार नृप दे अति सत्वराशी ॥९५॥
तो पाठवी निजपुरा रविवंशदीपा सीता सबाष्पनयना निरखोनि बापा ।
‘येते’ म्हणोनि पुसतां नृपती विदेही तोही सशोकभर वाहत ! पूर्ण देहीं ॥९६॥
माता अलिंगुनि सुता अतिबाष्पकंठी । सप्रेमयुक्त धरिली हृदयीं सुकंठी ।
" माये बरी सदनिं नांद पतिव्रता हो सेंवीत जा सतत साजणि रामनाहो ॥९७॥
" जो वृद्ध राजा तव सासरा सती, सासा तिघी सेवित जा यथारिती ।
सखे न सावत्र म्हणोनि पाहिजे सत्कीर्ति माये जगतींत राखिजे " ॥९८॥
उपजाति.
संबोधिल्या फारपरी, कुमारी जशा शोभति दिव्य नारी ।
जाऊं निघाल्या निजनाथगेहा प्रियां सवें शोभति दिव्यदेहा ॥९९॥
उपजाति.
प्रयाणकाळीं रघुनाथ भेरी मृदंग नानापरि भारी ।
तो शब्द कोलाहल तीनि लोकीं मोहो करी भूतगणीं अशेखीं ॥१००॥
शार्दूलविक्रीडित.
सीता-राम विवाह चापदलनी हे सत्कथा पावती,
भक्ती नित्य पढेल जो नर, सदा सिद्धी तया आंगणीं
भोगी सर्व सुखासि संतति-युतें, अंतीं रमेशाचिया
पावे दुर्लभदेवकांक्षित पदा, सायुज्य लाभे तया ॥१०१॥
(इति बालकांडे षष्ठ: सर्ग:)