चिद्बोधरामायण - पंचम सर्ग

बालकांड
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


शार्दूलविक्रीडित.
विश्वामित्र ऋषी तया रघुवरा भेटावया कारणें
आला, तो नयनांबुजांसि करवी सानंद तें पारणें ।
झाला मानुषवेषधारक असे मायाविलासी हरी
साकेताधिनिवासभास्करकुलोत्तंसाचिये मंदिरीं ॥१॥
विपेंद्रा अवलोकितां दशरथें साष्टांग वंदोनियां
पूजी सांग भूपति सादरें घडिघडी बद्धांजुळी, "स्वामिया
मी तो धन्य गृहाश्रमीं म्हणुनियां केली समर्थे दया ॥२॥
"ऐसे श्रेष्ठ महानुभाव सदना येती अदृष्टें जया
तेव्हां सर्वहि संपदा वरुषती त्या मंदिरी स्वामिया ।
सांगावें करुणाघना, कवणिया कार्यार्थ जी पातलां ?
इच्छा जे तुमची करीन सहसा" राजा असें बोलिला ॥३॥
संतोषोनि नृपालका प्रति वदे तो सृष्टिकर्त्ता मुनी, ।
" तूं तो धन्य उदार राघवकुलालंकार चूडामणी ।
मातें दे तव ज्येष्ठ पुत्र बरवा श्रीराम हा साजिरा
सगें लक्ष्मण दुसरा सुत तुझा जो सद्‍गुणी गोजिरा ॥४॥
" माझा यज्ञ विनाश नित्य करिती ते पापधी दुष्कृती
जे मारीच सुबाहु नाम असती मोठे दुरात्मे क्षिती ।
देव ब्राह्मण पीडिती मुनिवरां स्वच्छंद ते भक्षिती
ऐसे राक्षस वर्तती बलीनधी त्यांच्या विनाशाप्रती " ॥५॥
बोले राव महानुभाव मुनिला, " ही धाकुटीं लेकुरें
युद्धीं दक्ष नव्हेति, शिक्षण कसें होईल त्यांचे बरें ?
झाले वृद्धदशेंत पुत्र मजला, जाणा तुम्ही सर्वही
दारिद्रा कृपणासि वित्त मिनलें कष्टें, नुपेक्षी कही ॥६॥

भुजंगप्रयात.
"तसे राघवा-वेगळें सर्व कांही मला माग, देईन हें राज्य तेंही ।
न वांचे घडी एकही राम नेतां न याची सुतां, तूंचि हो प्राणदाता" ॥७॥
असें ऐकतां क्रोधताम्राक्ष झाला मुनी, तेधवां बोलिला भूभुजाला ।
" वदोनी मला ’ सर्व देईन’ ऐसे न देसी ! तरी पुत्र घेउनि बैसें " ॥८॥
असें ऐकतां बोलिजेलें वसिष्ठें, " नृपा गुह्य तूं आइके एकनिष्ठें ।
नव्हे राम जी पुत्र तूझा हरी हा, जगा निर्मिता पाळिता तोचि तो हा ॥९॥
"मनुष्याकृती जाहला, रावणातें वधायां, विधी प्रार्थितां साच येथें
तया लक्ष्मणा जाण तूं शेष ऐसें तुझा कैकयीपुत्र हा चक्र भासें ॥१०॥
" असे शंख शत्रुघ्न हा सायुधेंसी विभू पातला सुकृतौघें विशेषीं ।
तपें याचितां जाहला पुत्र तूझा असें जाण तूं निश्चयें राजराजा ॥११॥
" जगां निर्मिती जानकी योगमाया, विदेहात्मजा जाहली दिव्यकाया,
तिशीं योजिजे या मिषें कौशीकानें तुला याचिला, राम हा शीघ्र देणें" ॥१२॥
अशी ऐकतां गुह्यवाणी गुरुची मनी तोषला भूपती रम्यवाचीं ।
मुनीला वदे " राम सौमित्र दोघे त्वरें नेइजे, कार्य कीजे प्रसंगें" ॥१३॥
ऋषी तुष्टला फार भूपाळकाला वदे कोटि आशीर्गिरा एकवेळां ।
त्वरें चालिला, सानुजा रामराया सवें घेउनी दुष्ट पापी वधाया ॥१४॥

शार्दूलविक्रीडित.
कोदंडे बरवीं करीं विलसतीं, तूणी पाठीवरी
हस्तीं खेटकखड्ग सायुध असे शोभेति दोघे परी ।
जैसे सूर्य शशांक रुपधर हे श्रीराम सौमित्र कीं
पायीं चालति ! कौशिकासह, गमे लोकां महाश्चर्य कीं ॥१५॥
कांही मार्ग उलंघितां रघुवरा बोले मुनी आदरें
"ये रामा धरणीधरा म्हणुनियां भक्तिप्रमोदोत्करें ।
विद्या श्रेष्ठ बला तशी अतिबला देवीं पुरा निर्मिल्या
दोघी, ह्या जपतां कदापि समरी संकष्ट नोहे भल्या ॥१६॥

उपजाती.
क्षुधा तृषा क्लेश कदां न बाधीं आणीक ही नासति सर्व आधी ।
घ्या शीघ्र, ऐसे म्हणऊनि देतां संतोष वाटे रघुनाथचित्ता ॥१७॥

भुजंगप्रयात.
ऋषी दाखवी ताटकारण्य रामा " महा राक्षसी या वनीं घोरकामा ।
सदा विप्र भक्षी, वसे काळरुपा वधीं पापिणी ते मदोन्मत्त बापा ॥१८॥
असे दोष तूं जाण नारीवधाचा ! निशाचारिणी प्राण घेते जगाचा ।
मदाज्ञें करी नाश ईचा नुपेक्षीं तुला सर्वदां वर्तणें देव-पक्षीं " ॥१९॥
असें ऐकतां घे धनू राम हातीं टणत्कारितां कांपले स्वर्गवर्ती, ।
न साहों शके नाद तो दैत्यवामा, म्हणे " कोण आला असा वीरनामा " ॥२०॥
करीं शूळ घेवोनि धांवे समोरीं महाराक्षसी दारुणी फार घोरी ।
नरांत्राचिया माळिका कंठदेशीं रची मस्तकें कुंडलें कर्णदेशीं ॥२१॥
बर्‍या दीसती लांगळाकार दाढा, तनू काळमेघापरी मुक्तचूडा ।
विशाळाक्षिणी दीर्घजिव्हां कराळा अशी राक्षसी दीसली रामडोळां ॥२२॥
तदा धांवली देखतां राम दृष्टी म्हणे " मीनलें भक्ष्य हें, भूक पोटीं !
ऋषिश्रेष्ठ हा ग्रासिजे साच आतां अदृष्टें असें लागलें आजि हातां " ॥२३॥
त्वरें काढिला बाण कल्पांतकारी अधी ताटकां तेधवां कामचारी
तदां देखिली सुंदरी यक्षनारी अनर्घ्यांबरें भूषणे तोषकारी ॥२४॥
पिशाचत्वतें पावली शापयोगें पहा मुक्त झाली विभूच्या प्रसंगें ।
नमस्कारुनी राघवा भक्ति भावें त्वरें चालिली देवलोका प्रभावें ॥२५॥
मुनी राम आलिंगिला प्रेमबुद्धि मनीं मानिली थोर हे कार्यसिद्धी
वदें सर्व ही अस्त्रविद्या प्रभूला पहा ! मूळविद्याधिपा स्वामियाला ॥२६॥

स्त्रग्धरा.
नेला सिद्धाश्रमातें, मुनिवरतिलकें सानुजा राघवातें
तेथें जीं ब्रह्मवृंदें, पुजिति रघुवरा भक्तिसानंदचित्तें ।
कंदे मूळें फळें तीं, मधुसुरभिजळें अर्पिती प्रेमभावें
चित्तीं जाणोनियां कीं त्रिभुवनपति हे पातलें आजि दैवें ॥२७॥

शार्दूलविक्रीडित.
बोले राघव कौतुकें ऋषिवरा " घ्या यज्ञदीक्षा बरी,
दावावे कपटी महाबळनिधी दैत्याधमा लौकरी, ।
संतोषें मुनिनायकें मखवरा आरंभ केला, तदा
आले राक्षस घोररुप जडवी जे विघ्नकर्ते सदा ॥२८॥
ते मारीच सुबाहु नामक मखद्वेष्टे मुनीभक्षिते
नानारक्त अमेध्य मांस मळ ते अस्थी शिरा वर्षिते ।
त्यातें देखुनि रामचंद्र धनुषीं योजोनि बाणद्वया
सोडी लक्षुनि, ते क्षणींच सहसा नेला सुबाहु क्षया ॥२९॥
मारीचा शतयोजनें उडविलें, टाकी जळीं सागरीं,
त्याचे सैनिक मारिले सकळही ते लक्ष्मणें संगरीं ।
संतोषोनि सुरेंद्र तैं वरुषती पुष्पें विचित्रें शिरीं,
झाला यज्ञ समाप्त, विघ्न हरलें निश्चिंत विप्रा करी ॥३०॥

वसंततिलका.
मांडीवरी बसविलें रविवंशकेतू आलिंगिले मुनिवरें परसौख्यहेतू
पूजार्ह त्यांसि परि पूजुनि कंद मूळें सांगे पुराणकथनें विविधें रसाळें ॥३१॥
संतोषला मुनिमनोरथवारिराशी उल्लंघिला हरिचिया करुणाविलासीं ।
तै अष्टभाव अति सात्विक ते उदेले सानंद सद्गतितकंठ गिरा न बोले ॥३२॥

नेत्रांबुजीं सकल पूर्ण शुभाश्रुधारा झाला दिसे सपुलकांचित देह सारा ।
सुस्वेद कंप विलसे अतिभक्तियोगें ज्याचे मनासि दुसरें न कदापि लागे ॥३३॥

भुजंगप्रयात.
तदा रामचंद्रा म्हणे " देवराया, चलावें विदेहा नृपातें पहाया, ।
करी यज्ञ तो मीनले भूप सारे बळी ज्यापुढें शक्र ही तो न थारे ॥३४॥

पृथ्वी.
"महेशधनु मंदिरीं बहुत काळ तेथें असे,
सुरासुर निरीक्षिती, परि न ऊचले थोरसें, ।
विलोकुने सकौतुकें दशरथासि भेटावया
पुन्हां त्वरित जाइजे रघुवरा अयोध्ये तया" ॥३५॥
म्हणे "मुनिवरा मला निरखिजे नृपा मैथिला,
महामख विराजला, मृडधनुष्य दावा मला,
बहूत ऋषिमंडळा अमित भूभुजांच्या कुळा
विलोकुनि महाबळा निजपुरीस जाऊं चला" ॥३६॥
सतोष मुनि कौतुकें नृपकुमारसंगे ऋषी
सवेग मग चालिला जनकपट्टणा सौरसीं ।
पथीं वन निरीक्षिलें अति विचित्र रामें तदा
मृगादि परिवार्जिले नसति पक्षि भृंगें कदा ॥३७॥
पुसे "मुनिवरा, बरा दिसत आश्रमांचे परी
परंतु विहगें मृगें नसति काय या भीतरी ? ।
तरु सफळ शोभती कुसुमगुच्छयुक्ता लता
वदा जरि तुम्हां असे विदित वृत्त हें तत्वता " ॥३८॥
वदे " नृपतिशेखरा रघुवरा बरा आइकें,
पुरा मुनिसुरासुरीं नमित गौतमें कौतुकें ।
वसोनि परमाश्रमीं करित मोक्षकासी तपा
सहोनि निशिवासरीं हिमनिवातवर्षातपा ॥३९॥
"तयासि अतिसुंदरी स्वतनया अहल्या विधी
प्रसन्नमनसें दिली स्वमननिर्मिता शुद्धधी ।
बरा मुनि गृहाश्रमीं सहज वर्ततां स्वालयीं
तपें हरिस तोषवी सुकरकर्मयोगें तयीं ॥४०॥
"सुराधिप निरंतरीं मुनिवधूविलासीं धरी
विशेष रति अंतरीं कुसुमसायकाचे शरी, ।
विदारित मनें हरी समय तोचि पाहे, घरी
नसे मुनि तदा करी स्वरुप गौतमाचे परी ॥४१॥
प्रवेश करि आंत तो, गणुनिया मुनी नाथ तो
सती रतिस देत, तों सदनिं पातला कांत तो ।
सुरेश मनिं भीत तो स्वसमवेषधारीच तो ।
प्रिया ठकुनि जात तो नयनिं देखिला भ्रांत तो ॥४२॥
" अरे कवण तूं असा अधम वेषधारी तसा
मुनींद्रसदनीं कसा प्रविशलासि दुर्मानसा ।
नवीनभगलालसा कृपणदुष्कृती बाळसा
मुखीं मळिण कोळसा दिससि या जगीं पोळसा ॥४३॥
" अरे कुटिल दुर्मती धरुनि वेष माझा सती
ठकोनि पळसी किती, कवण ते तुला रक्षिती ।
मुरारि गिरिजापती विधि सुरेश ते दिक्पती
असे परि न दीसती मज पुढें उभे राहती " ॥४४॥
नमोनि पदसारसा म्हणत इंद्र " हा मी असा,
मनोज अरि हा असा फिरवि घोरकामी जसा ।
असे परि कृपारसा सममना मुनी तूं कसा
न लक्षुनि ममाघसा करिं दया क्षमासौरसा" ॥४५॥
" मनीं धरुनि ज्या भगा परवधूसि तूं दुर्भगा,
रतोनि फिरसी उगा करुनि जन्म हा वाउगा ।
ववेण्य म्हणसी जगा परि खरापरे माजगा
न बांधुनि मनोमृगा, मुनिसतीस केला दगा ॥४६॥
" सहस्त्रभग हे तनू तव घडेल देवाधमा !"
म्हणोनि मग शापिला सुरपती, मुनीसत्तमा ।
नमूनि मग चालिला बहुत लाजला तो मनीं,
पुढें निरखिली तदा पररता उभी कामिनी ॥४७॥

शार्दूलविक्रीडित.
"दुष्टे ! तूं परसंगिनी दृढ शिळा होउनि राहे वनी,
देवाधीश मनीं कळोनि रतसी तत्संगमा इच्छुनी ।
आतां या विजनीं वसे निशिदिनीं वारी तमा भोगुनी
सीतोष्मा सहुनी असें बहु दिनीं क्लेशादिकां पावुनी ॥४८॥

द्रुतविलंबित.
" विहग भृंग मृगें उरगादिकें असति सत्व धरेवरि जीतुके ।
त्यजुनि जातिल राहसि एकलि न निरखूं शकतील जनावली ॥४९॥

उपजाति.
"त्रेतायुगीं राघव या वनांती येईल, तेव्हां तुज जान मुक्ती " ।
बोलोनि गेला मुनि सत्वराशी, शिळा अहल्या वनदेशवासी ॥५०॥

वसंततिलका.
आहे वनीं तप करुनि सुदीर्घकाळें चिंती तुझें पद अखंडित कांतबोलें,
ते उद्धरीं पदरजें मुनिरजवामा, प्रख्यात हो यश तुझे जगतींत रामा" ॥५१॥

भुजंगप्रयात.
असें ऐकतां फार संतुष्ट चित्तें म्हणे राम, " ते दाखवा शीघ्र मातें
शिळारुपिणी भामिनी गौतमाची तरी ते नदी घोरचिंतामताची " ॥५२॥

पृथ्वी.
करीं धरुनि दाखवी त्रिजगमित्र तेव्हां सती,
विलोकन करी शिळा सतृणवेष्टिता श्रीपती, ।
तपें बहुत कष्टली अशनपानहीना कृशा
रमाधवपदांबुजस्मृतिविभिन्नहृत्कल्मषा ॥५३॥

शार्दूलविक्रीडित.
पादस्पर्श करुनि जों निरखिलां तैं ते शिळा कांपली,
कांहीशी हालली उलटली, नारी तशी भासली, ।
तेव्हां ती बसली अशीच दिसली, चीरांबरें नेसली,
लज्जाधोमुख होउनी सुनयना वेगें उभी राहिली ॥५४॥
हर्षे त्या मुनिनायिकापदयुगा श्रीराम वंदोनियां
बोले " दाशरथी" असे विनवुनी सद्वंश सांगे तिया ।
" झालों धन्य, सुलाभ आजि घडला, माते ! तुला देखिलें, "
ऐशीं राघवभाषणें परिसतां आश्चर्य तैं मानिलें ॥५५॥

पृथ्वी.
स्मरोनि मुनिसत्तमें कथित ते निकें अंतरी
म्हणे " त्रिजगतीपती रघुपतीच हा, श्रीहरी ।
कृपा करुनि पातला परम भाग्य माझ्या वना,
तपासि फळ लाधलें, निरखिलें जगज्जीवना" ॥५६॥

उपजाति.
दुर्वादलश्यामल राघवातें संपूर्णचंद्राननसुंदरातें ।
धनुर्धरातें करुणाकरातें पुन्हां विलोकी परमार्द्रचित्तें ॥५७॥
नमी पदांभोरुह भक्तिभावें अत्यादरें प्रेमवती, स्वभावें ।
अर्ध्यादिकें पूजुनि राघवातें स्तवी अथोक्ती कमलावराते ॥५८॥
आनंदबाष्पाकुलचारुनेत्रा सुस्वेदरोमांचितभव्यगात्रा. ।
सगद्गदा, मंद गिरा अहल्या वदे तदा चित्रकिरीटमाल्या ॥५९॥
" झालें पवित्रा रघुनाथ, आजि मी पदाब्जरेणू लभतां तुला नमी, ।
जे इच्छिजे पद्मज शंकरादिकीं ध्यांनी सदां रंजितमानसीं निकी ॥६०॥

वंशस्थ.
"विचित्रचर्या तव राघवा देसे मनुष्यरुपी जग मोहसी असें, ।
न चालसी चालत तूं न बोलतां तूं बोलसी, मायकभाव आश्रिता ॥६१॥

वसंततिलका.
"त्वपाद-पंकज-पराग-पवित्र-गात्रा
भागीरथी भवविरिंचिमुखा पवित्रा ।
जे नित्य पावन करी, तुज आजि देखें
मी धन्य भाग्य किति काय वदों अलेखें ॥६२॥

वंशस्थ.
" मनुष्यरुपी हरि तूं परात्मका श्रीराम नामात्मक तूं गुणात्मका
धर्नुवरा पद्मपलाशलोचना भजों सदा अन्य नसोचि वासना ॥६३॥

वसंततिलका.
"पादारविंदरज वांछिति त्या श्रुती ही,
त्वन्नाभिपंकजसमुद्भव तो विधी हो, ।
त्वन्नामसारस जाणतसे पुरारी,
श्रीरामचंद्र करुणाघन मोह वारी ॥६४॥
" त्वकीर्ति चारु अवतारज सत्यलोकीं
गाती विरिंचि सुर नारद मुख्य ते कीं, ।
आनंदबाष्पपरिषिक्त - कुचाग्रभागीं
वागीश्वरी सतत गानकरी शुभांगी ॥६५॥
" तो तूं अनादि पुरुषोतम नित्यपूर्ण
ज्योतिस्वरुप अज अव्यय तूं पुराण ।
मायातनू धरिसि लोकविमोहिनी हे
तूं हीनदीन जगदुद्धरणार्थ पाहें. " ॥६६॥

उपजाति.
"सृष्टिस्थितिव्यत्ययकारणार्थी मायी विधी-विष्णु-शिवादि मूर्ती
या नामरुपादिविशिष्ट भेदें स्वतंत्र तूं वर्तसि कीं विनोदें ॥६७॥

"नमीन रामा तव पादपंकजा वक्षस्थळी नित्य धरी सुधाब्जिजा ।
लोकत्रया आक्रमिलें जयें जें ध्येय कीं निस्पृह त्या यतीश्वरा ॥६८॥
" जगासि तूं आदि, जगतयाश्रया निर्लेप नि:संग गुणा अजाऽव्यया
ओंकारवाच्या वचनासि दूरा वाचात्मका वाचक भाव पूरा ॥६९॥

उपेंद्रवज्रा.
"जगन्मया, कारण-कार्य-रुपा-कर्तृत्व-तत्साधन-हेतु बापा, ।
फलात्मका, व्यापक शक्ति सारी तुझी विलासे बहुतां प्रकारीं " ॥७०॥

उपजाति.
"तुझ्याचि मायेंगुणमोहितांला न जाणवे जाण यथार्थ तूला, ।
मनुष्य ते मानिति साअ तूतें मायाविलासी पुरुषोत्तमातें " ॥७१॥
" नभा परी अंतर बाह्य पूर्ण नि:संग निर्लेप विभू पुराण ।
अनंत तूं अच्युत शुद्ध बुद्ध तूं अद्वयानंदसुख प्रसिद्ध ॥७२॥

इंद्रवज्रा.
मी योषिता हीनमती विमूढा आज्ञा कशी जाणिन सर्व गूढा ।
तूंतें विभो, यास्तव भक्तिभावें साष्टांग पायीं सतधा नमावें ॥७३॥

उपजाति.
प्रारब्धयोगें भलत्या स्थळीं ही घडो सुखें वास, परंतु कांही ।
त्वत्पादपंकेरुहभक्ति राहो, हें प्रार्थिते तूज सुदीर्घबाहो ॥७४॥
"नमोस्तु सर्वाद्य पुराणपुरुषा, सर्वोत्तमा सर्वगुरु महाशया, ।
नमो नमो तूज पुन:पुन्हा नमो, गुणाकरा मन्मथसुंदरा नमो ॥७५॥

मालिनी.
" भवभयहर एका भानुकोटिप्रकाशा करधृतशरचापा नीलमेघावभासा ।
कनकरुचिरवस्त्रा रत्नभूषाढयगात्रा सकरूण अवलोकीं सानुजा राजपुत्रा" ॥७६॥

उपजाति.
स्तवोनि ऐसें पुरुषा पुराणा, नमी पदाब्जास, करी प्रदक्षिणा ।
आज्ञापिली जाय सती पतीला भेटावया शुद्धमती अहिल्या ॥७७॥

भुजंगप्रयात.
अहिल्याकृत स्तोत्र जो भक्तिभावें पढे, त्या नरा या जगीं सर्व पावे, ।
जडे मुक्ति सायुज्य ते रामपायीं, घडे पातका नाश हा बोल काई ? ॥७८॥

वसंततिलका.
पुत्रार्थ जे सुमनसें रघुराज पायां ध्यानीं धरुनि जरि वत्सर एक भक्तया ।
हे स्तोत्र नित्य पठणा करिजेल वंध्या ते पुत्र सद्‍गुणमणी प्रसवेल सध्या ॥७९॥
जे जे मनोरथ असाध्य, प्रयत्नें स्तोत्रासि पाठ करितांचि विनाचियत्नें ।
साधे असें रघुपतीचरनप्रसादें हें निश्चयें सतत भक्तिबळे विशुद्धें ॥८०॥

शार्दूलविक्रीडित.
हो ब्रह्मग्न सुवर्णचोर कपटी असो मद्यपि,
हो का सदगुरुदारहीनगमनी, भोगीं महालोलुपी ।
ऐसा ही स्तवराज नित्य पढतां तात्काळ निष्पापता
लाहे, जाण सुभक्तिमंत जपतां कैसा उरे पाहतां ॥८१॥
(इति बालकांडे पंचम: सर्ग: ॥)
==========================

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP