पंचीकरणादी अभंग - २६ ते ३०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२६
हिरियाच्या पोटीं मांदुसाच्या कोटी । सुवर्णाच्या ताटीं काचखडे ॥१॥
काचखडे हेमीं तैसें दृश्य रामीं । स्वरूपविश्रामीं भ्रम माया ॥२॥
माया हे असार स्वरूप तें सार । पाहिला निर्धार रामदासीं ॥३॥

२७
ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारें जाणिजे ते ॥१॥
जाणिजेते चवी गुळा साखरेची । पाहा तो तेथेंचि भेद आहे ॥२॥
भेद आहे तैसा अभेदाचे परी । जाणिजे चतुरीं दासी म्हणे ॥३॥

२८
वृक्षाविण छाया गुणाविण माया । बिंबाविण वाया प्रतिबिंब ॥१॥
प्रतिबिंब भासे सिंधुविण लहरी । सोन्याविण परी अळंकार ॥२॥
अळंकार कृत्य कृर्त्याविणें केंवी । कैंची गथागोंवी निर्गुणाची ॥३॥
निर्गुणासि गुण हेंचि मूर्खपण । दृश्याविण खुण दृष्टांताची ॥४॥
दृष्टांताची खुण परब्रह्मीं घडे । वेद मौन्य पडे कासयासी ॥५॥
कासयासी तेव्हां अद्वैत पाहावें । द्वैतचि स्वभावे ब्रह्म जालें ॥६॥
जालें परब्रह्म अत्यंत सुगम । ब्रह्म आणि भ्रम एकरूप ॥७॥
एकरू पाहे दूध आणि ताक । हंसेविण काक बोलताती ॥८॥
बोलताति सर्व ब्रह्म ऐसें बंड । सर्वही थोतांड सत्य जाणा ॥९॥
सत्य जाणा ब्रह्म । निर्मळ निश्चळ । मायेचा विटाळ जेथें नाहीं ॥१०॥
जेथें नाहीं गुण त्या नांव निर्गुण । गुरूमुखें खुण ठाईं पडे ॥११॥
ठाईं पाडी सत्य शाश्वत स्वरूप । मग आपेंआप बुजसील ॥१२॥
बुजसील साच धरितां विश्वास । ओवी रामदास सांगतसे ॥१३॥

२९
रत्पारखिया रत्नचि परीक्षी । अलक्षातें लक्षी ऐसा नाहीं ॥१॥
ऐसा नाहीं कोणा देवाचा पारखा । आपली ओळखी ठाई पाडी ॥२॥
ठाइ पाडी निज स्वरूप आपुलें । असोनि चोरिलें जवळीच ॥३॥
जवळी ना दुरी पाताळी ना वरी । सबाह्य अभ्यंतरीं कोंदलेंचि ॥४॥
कोंदलेंचि असे परि तें न दिसे । जवळीच कैसें आढळेना ॥५॥
आढळेना अंगीं असोनी सर्वांगीं । जयालागीं योगी धुंडिताती ॥६॥
धुंडिताति कडीकपाटीं शिखरीं । समागमें हरीं चोजवेना ॥७॥
चोजवेना एका सद्गुरूवांचुनी । न्सिह्चय हा मनीं पाविजेतो ॥८॥
पाविजे निश्चयो दृढ स्वरूपाचा । तिहीं प्रतीतींचा एक भाव ॥९॥
ऐक्यभाव भक्ति रामीरामदासीं । विभक्ति विश्वासी दुरी ठेली ॥१०॥

३०
बाह्य नारिकेळ भीतरीं नरोटी । तैशापरि दृष्टी स्वस्वरूपीं ॥१॥
स्वस्वरूपीं माया जैसी द्रुमीं छाय़ा । कां ते भासे वायां मृगजळ ॥२॥
मृगजळ भासे मार्तंडाकरितां । स्वरूपीं पाहातां बिंब नाहीं ॥३॥
नाहीं जेथें बिंब कैंचें प्रतिबिंब । एकचि स्वयंभ स्वस्वरूपीं ॥४॥
स्वस्वरूपीं भास नाथिला आभास । धरिजे विश्वास दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP