अध्याय ८१ वा - श्लोक २६ ते ३०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
पतिव्रता पतिं दृष्ट्वा प्रेमोत्कण्ठाश्रुलोचना । मीलिताक्ष्यनमद्बुद्ध्या मनसा परिषस्वजे ॥२६॥
पतिव्रता देखोनि पति । यथारूप पूर्वस्थिति । कृशाङ्ग सर्वस्वें अनुपपत्ति । म्हणे श्रीपतिश्रिय हा पैं ॥७१॥
धन्य याचें अनुष्ठान । जेणें तुष्टला श्रीभगवान । अमरविभवाहूनि गहन । संपदा संपूण वोपिल्या ॥७२॥
ऐसें मानसीं जंव विवरी । तंव प्रेमसंभ्रम अभ्यंतरीं । सात्विक अष्टभाव उभारे । साध्वीशरीरीं ते काळीं ॥७३॥
प्रेमोत्कंठा कंठ रोधी । मूर्च्छित जाली मनोबुद्धी । नेत्रीं आनंदबाष्पनदी । गात्रें स्वेदीं डवडविलीं ॥७४॥
पुलक रोमाञ्च थरकले देहीं । सकंप गात्र तिये समयीं । शब्द न फुटे न वदे कांहीं । श्वास तोही पांगुळला ॥१७५॥
ऐसें अष्टभावांचें भरितें । पतिव्रतेच्या आंगीं पुरतें । भरोनि वोसरलें मागुतें । मग नेत्रातें झांकिलें ॥७६॥
पतिव्रतेसी कान्त वंद्य । हरिहर वाञ्छिती आशीर्वाद । ऐसा विवरूनि हृदयीं बोध । वंदी सद्य निजकान्ता ॥७७॥
म्हणे हा द्विजोत्तम । अखिलकल्याणाचें धाम । प्रत्यक्ष हाचि पुरुषोत्तम । करी प्रणाम या बुद्धी ॥७८॥
बुद्धिपूर्वक ऐसा नमिला । नेत्र लावूनि हृदयीं नेला । मनोबाहीं आलिंगिला । बाह्य गलबला सांडूनियां ॥७९॥
पतिव्रतेनें ऐसा पति । देखोनि नमिला सप्रेमभक्ति । यावरी द्विजें देखिली स्वयुवति । कोणे रीती तें ऐका ॥१८०॥
पत्नीं वीक्ष्य विस्फुरन्तीं देवीं वैमानिकीमिव । दासीनां निष्ककंठीनां मध्ये भान्तीं सविस्मितः ॥२७॥
विमानारूढ जेंवि पौलोमी । वेष्टित शतशा अमरोत्तमीं । तेंवि स्फुरद्रूप हेमललामीं । दासीमध्यगा देदीप्य ॥८१॥
शतानुशत भंवत्या दासी । अमराङ्गना न तुळती ज्यांसी । दिव्य सौन्दर्याच्या राशी । त्यांमाजी सतीसी द्विज देखे ॥८२॥
गुणलावण्यमंडित यष्टी । अमूल्य दिव्य पदकें कंठीं । जेंवि आवरणें श्रीचक्रपीठीं । तेंवि धरटी दासींची ॥८३॥
रत्नदंडी चामरें करीं । ऐशा वीजिती दिव्यकिङ्करी । एकी होऊनियां पुढारी । वेत्रधारी खोलती ॥८४॥
येकी भरोनी कनककुम्भ । वागविती सुधोपम अंभ । एकी घेऊनि सुरसौरभ्य । पुष्पकदंब पैं एकी ॥१८५॥
ऐसिया दिव्यदासींमध्यें । भासुर विलसे परमानंदें । तयेतें देखोनि वेदविदेम । विस्मित हृदयीं आश्चर्यें ॥८६॥
दिव्यरूपिणी हरिसंकल्पें । भासे इंद्राणीचिया रूपें । पूर्ववोळखीचेनि नयनमापें । बाह्मणें साक्षेपें उमाणिली ॥८७॥
मग तो म्हणे हे ममाङ्गना । इची शुचीही न पवे तुळना । पतिव्रता हे वृत्तसंपन्ना । ऐसें निजमनामाज विवरी ॥८८॥
शिबिकाप्रमुख विचित्र यानीं । बैसावया नागरजनीं । आग्रह केला परि तो ज्ञानी । चरणीं चालूनी गृहा गेला ॥८९॥
प्रीतः स्वयं तया युक्तः प्रविष्टो निजमन्दिरम् । मणिस्तम्भशतोपेतं महेन्द्रभवनं यथा ॥२८॥
पतिव्रते वनितेसहित । प्रीतिपूर्वक द्विजवरनाथ । प्रवेशला निजसदनांत । पाहे निकेत सुरतुल्य ॥१९०॥
निर्जरपतीचें जेंवि सदन । तेंवि मंदिर देदीप्यमान । पाहे एकाग्र करूनि नयन । संपदा गहन हरिदत्त ॥९१॥
शतशा रत्नमणींचें स्तंभ । जेंवि रविबिम्बबीजाचे कोंभ । तुळवट किलचा पाट स्वयंभ । दाविती शोभ वैदूर्य ॥९२॥
त्रिपंचसप्तनवमाळिकें । त्वाष्ट्रनिर्मितें तात्काळिकें । त्रिजगज्जनकें ऐन्द्रजाळिकें । विश्वपाळकें प्रकाशिलीं ॥९३॥
ऐसिया भवनांमाजी समृद्धि । भगवत्प्रेमसुकृतसिद्धि । ब्राह्मण देखे विशाळबुद्धि । पदार्थऋद्धि ते ऐका ॥९४॥
पयःफेननिभाः शय्याः दान्ता रुक्मपरिच्छदाः । पर्यङ्का हेमदण्डानि चामरव्यजनानि च ॥२९॥
दुग्धफेना ऐसे श्वेत । गजदंताचे पर्यंक दान्त । कनकवसनीं आच्छादित । हंसपिच्छोत्थ तूळिका ॥१९५॥
मृदुळवसनांचे पासोडे । उपबर्हणें चहूंकडे । कनकशृंखळांचे जोडे । अंतरिक्षडोल्हारे ॥९६॥
रत्नदंडी चामर व्यजन । प्रतिमंचकीं पृथक भिन्न । परिचर्यार्थ किङ्करगण । अमरां समान विराजती ॥९७॥
आसनानि च हैमानि मृदूपस्तरणानि च । मुक्तादामविलंबीनि वितानानि द्युमन्ति च ॥३०॥
रत्नखचितें कनकासनें । परममृदुळें वरी आस्तरणें । ऊर्ध्वभागीं दिव्य वितानें । मुक्तादामें विलंबित ॥९८॥
ठायीं ठायीं रत्नमनि । गगनगर्भीं जेंवि द्युमणि । स्फाटिका भित्तीचिया सदनीं । दीपस्थानीं वैदूर्य ॥९९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP