श्रीशुक उवाच - स इत्थं द्विजमुख्येन सह संकथयन्हरिः । सर्वभूतमनोऽभिज्ञः स्मयमान उवाच तम् ॥१॥

द्विजांमाजी जो कां मुख्य । तेणेंसीं सह यदुनायक । या प्रकारें तो सम्यक । वदत होत्साता ते काळीं ॥६॥
लोकत्रयाचा आर्तिहरण । यालागिं हरि ऐसें अभिधान । सर्व भूतांचें जाणे मन । ब्राह्मणालागून तो बोले ॥७॥
करितां गुरुगृहींच्या सुखगोष्टी । विप्रमनोगत अंतर्दृष्टी । लक्षूनि वदला जें वाक्पुटीं । श्रवणपुटीं तें ऐका ॥८॥
मजकारणें सदनींहून । मज्जामयेतें संप्रार्थून । पृथुक आणिले उपायन । ते लज्जेकरून द्विज नार्पी ॥९॥
जामया सुशीळा साध्वी सती । मदर्थ पृथुक याचून निगुती । भातुकें धाडिलें मज या हातीं । तें द्यावया चित्तीं सलज्ज हा ॥१०॥
उद्दाम ऐश्वर्य देखूनि दृष्टी । परम सलज्ज द्विज हा पोटीं । विश्वश्रीमंता जगजेठी । पृथुकमुष्टी केंवि दीजे ॥११॥
ऐसा विस्मय मानूनि मनीं । स्वयें सर्वज्ञ चक्रपाणी । ब्राह्मणातें बोले वदनीं । सादर श्रवणीं तें ऐका ॥१२॥

ब्रह्मण्यो ब्राह्मणं कृष्णो भगवान्प्रहसन्प्रियम् । प्रेम्णा निरीक्षणेनैव प्रेक्षन्खलु सतां गतिः ॥२॥

ब्रह्म ऐसें वेदा नाम । प्रणवापासूनि त्रिधा जन्म । वेदत्रयी म्हणतां निगम । अभेद पर एकात्मा ॥१३॥
प्रणवोच्चारें मंत्रमात्र । तत्कारें द्विजरक्षणमात्र । सांग सत्कारें अध्वर । एंव समग्र निगमात्मा ॥१४॥
मंत्रमूर्ती संप्रवृत्ति । त्रिधा अभेद आम्नायव्यक्ति । तेथें साकल्यें निगमशक्ति । जाणे श्रीपति रहस्य हें ॥१५॥
सृष्टिस्थितिलयकर्मबीज । मूर्तिमंत ऐसे द्विज । हें वर्म जाणोनि गरुडध्वज । मानी पूज्य यास्तव त्या ॥१६॥
ब्राह्मणाच्या आशीर्वचनें । प्रतिपाळी जो चतुर्दश भुवनें । हृदयीं लत्ताप्रहारसहनें । भूषण मिरवी श्लाघ्यत्वें ॥१७॥
मंत्र म्हणिजे अक्षरपंक्ती । ब्राह्मणवदनें व्यक्त होती । इतर वर्णां नाहीं शक्ती । वेदाध्ययन करावया ॥१८॥
ब्राह्मणापासूनि बाहुजांहीं । वेदाध्ययन कीजे पाहें । अध्यापनीं त्या अधिकार नाहीं । ऐसी आम्नायीं मर्यादा ॥१९॥
आह्निकाचरणापुरते मंत्र । वसविती वैश्यवर्णाचें वक्त्र । समग्र श्रवणीं त्यां अधिकार । अनर्ह शूद्र श्रुतिश्रवणीं ॥२०॥
ब्राह्मणवचनें पौराणोक्ती । प्रकटिती शूद्रकर्मप्रवृत्ती । साङ्ग षट्कर्मांची वसती । मूर्तिमंत द्विजरूपीं ॥२१॥
आशीर्वादें हरिहरसदनें । संतुष्ट ब्राह्मण वोपिती वदनें । क्षोभले तरी अधःपतनें । देती दैन्यें दिविजांतें ॥२२॥
ऐसा जाणोनि ब्राह्मणमहिमा । श्रीकृष्ण जो ब्रह्मण्यनामा । तो ब्राह्मण स्वप्रियतमा । वदता जाला निजवदनें ॥२३॥
ब्राह्मणाचें सप्रेमभजन । जाणे यास्तव षड्गुणपूर्ण । अव्याहत श्रीभगवान । बोले वचन द्विजवर्या ॥२४॥

श्रीभगवानुवाच - किमुपायनमानीतं ब्रह्मन्मे भगतागृहात् । अण्वप्युपाहतं भक्तैः प्रेम्णा भूर्येव मे भवेत् ।
भूर्यप्यभक्तोपहृतं न मे तोषाय कल्पते ॥३॥

सन्मात्रनिष्ठ जे कां संत । त्यांची सद्गती श्रीभगवंत । तेणें द्विजातें सप्रेमभरित । पाहोनि निश्चित बोलतसे ॥२५॥
म्हणे भो भो ब्राह्मणोत्तमा । तुम्ही निजगृहींहूनि आम्हां । उपायन आणिलें धरूनि प्रेमा । तें मज का ना नार्पियलें ॥२६॥
म्हणे तूं म्हणसी अल्पस्वल्प । कृष्ण केवळ त्रैलोक्यभूप । तरी हा न धरूनि संकल्प । ऐकें स्वरूप प्रेमाचें ॥२७॥
मद्भक्त जे सप्रेमळ । अणुप्रमानही फल जल दल । प्रेमें अर्पिंता तिहीं केवळ । मज कनकाचळसम होय ॥२८॥
मेरुप्रमाण अभक्तांहीं । मज कारणें अर्पितां पाहें । तें मज नोहे तोषदायी । जाण निश्चयीं हें गुह्य ॥२९॥

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥४॥

पत्र पुष्फ फल जीवन । मजकारणें भक्तीकरून । जितात्मा मद्भक्त अर्पितां जाण । तें मी संपूर्ण भक्षितसें ॥३०॥
तुरंबावें किंवा प्यावें । चोष्यादि निःसार विसर्जावें । ऐसा विभाग न धरूनिं जीवें । भक्षीं आघवें भक्ताचें ॥३१॥
गोपाळांच्या वनभोजनीं । मी लिप्साळु चक्रपाणी । विदुराचिया कदन्नाशनीं । अमृताहूनी संतोषें ॥३२॥
मी नंदाचा गोरक्षक पाहें । अभक्तप्रतिष्ठे दूर होयें । मद्भक्तांच्या गुंतोनि स्नेहें । अंकित होयें त्या सदनीं ॥३३॥
गौरवांच्या नृपपर्वडी । त्याची मजला न वटे गोडी । ऐसी माझी स्वयंभ खोडी । तुजही फुडी विदित असे ॥३४॥
इत्यादि वचनें पुरुषोत्तमें । विप्र बोधिला उपायनकामें । तथापि सलज्ज मनोधर्में । संकोचवर्ष्में मौनस्थ ॥३५॥

इत्युक्तोऽपि द्विजस्तस्मै व्रीडितः पतये श्रियः । पृथुकप्रसूतिं राजन्न प्रायच्छदवाड्मुखः ॥५॥

विश्वश्रियेचा जो कां पति । तया कारणें पृथुकप्रसूती । ब्राह्मण नार्पी सलज्जवृत्ति । लक्षी क्षिती अधोवदनें ॥३६॥
भो भो कौरवचूडामणि । ऐसी द्विजाची मनोग्लानिं । सर्वसाक्षी चक्रपाणी । जाणोनि करणी काय करी ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP