बहुरूपैकरूपं तद्दृश्यते न च दृश्यते । मायामयं मयकृतं दुर्विभाव्यं परैरभूत् ॥२१॥
क्वचिद्भूमौ क्वचिद्व्योम्नि गिरिमूर्ध्नि जले क्वचित् । अलातचक्रवद्भ्राम्यत्सौभं तददुरवस्थितम् ॥२२॥

सौभ मयकृतमायामय । मयोपदिष्ट्यूक्तिनिचय । स्मरूनि शाल्व चाळिता होय । अलातप्राय तीव्रजवें ॥३४॥
प्रद्युम्नप्रमुख यादववीर । पाहती सौभसेनाभार । तंव ते चंचल अत्यंततर । नोहे स्थिर पळमात्र ॥१३५॥
गगनीं पवनीं अवनीं जीवनीं । अनेक रूपें दिसती नयनीं । एक किंवा अनेक म्हणोनी । निश्चय कोणी करूं न शके ॥३६॥
क्षणैक दिसे क्षणैक न दिसे । दूर समीप यथावकाशें । तर्किलें नवचेचि मानसें । चाञ्चल्यवशें चमत्कृत ॥३७॥
मयासुराची दैत्यमाया । यास्तव लक्षिलें न वचे राया । अतर्क्य नेत्रां यदवांचिया । भ्रमकर झालें ते काळीं ॥३८॥
क्षणैक भूतळवटीं दिसे । क्षणैक गगनगर्भीं आभासे । क्षणैक पर्वतमौळीं वसे । क्षणैक विलसे सिन्धुजळीं ॥३९॥
कोलती आंधारीं गरगर । भवंडितां भासे चक्राकार । न दिसे सांधा भिन्न पदर । तैसें सर्वत्र सौभ दिसे ॥१४०॥
एके स्थळीं स्थिर ऐसें । न वचे निर्द्धारिलें मानसें । मयमायेच्या भ्रमावेशें । लक्षितां दिसे सर्वत्र ॥४१॥
ऐसें मयमायेचें कपट । तथापि यादववीर सुभट । समराङ्गणीं महाधीट । शरसंघाट वर्षती ॥४२॥

यत्र यत्रोपलक्ष्येत ससौभः सहसैनिकः । शाल्वस्ततस्ततोऽमुंचन्शरान्सात्वतयूथपाः ॥२३॥

ससैन्य शाल्व जिकडे जिकडे । सौभेंसहित देखतां पुढें । अमोघ विन्धिती कुर्‍हाडें । यादव गाढे यूथपति ॥४३॥
परम कर्कश सोडिती बाण । समरीं शाल्वाचे घ्यावया प्राण । मारूं पाहती ससौभ सैन्य । शरौघ तीक्ष्ण वर्षोनी ॥४४॥
म्हणाल तीक्ष्ण शरौघ कैसे । शुकें वर्णिले उपमावशें । भाषाव्याख्यान श्रोतीं तैसें । निजमानसें जाणावें ॥१४५॥

शरैरग्न्यर्कसंस्पर्शैराशीविषदारासदैः । पीड्यमानपुरानीकः शाल्वोऽमुह्यत्परेरितैः ॥२४॥

यादव वर्षती तीक्ष्ण बाण । दाहक प्रळयाग्निसमान । कीं कल्पान्तींचे चंडकिरण । तैसें दारुण कडतरती ॥४६॥
अग्नि सूर्य सर्वांग तावी । मारक मार्गण दाहक तेंवीं । सर्पोपमेची ऐका ठेवी । वदती कवी ज्या अर्थें ॥४७॥
आशीविष हें सर्पा नांव । स्पर्शतां कोण्ही एक अवयव । अल्पस्पर्शमात्रें जीव । जाय अपूर्व हें याचें ॥४८॥
यदुवीरांचे तैसे शर । भेदतां भंगती शत्रुभार । अल्पशराचा स्पर्श मात्र । होतां गात्र अरि त्यजिती ॥४९॥
ऐसे दुःसह क्रूर मार्गण । पडतां त्रासिला शाल्व ससैन्य । सौभपुरेंसीं भिद्यमान । केला म्लान समरंगीं ॥१५०॥
वृष्णिभोजान्धयादववीरीं । ससौभ सेनेसीं शाल्ववैरी । सूर्याग्निसर्पासमान शरीं । त्रासिला समरीं प्रतापें ॥५१॥
म्हणाल शाल्वा शिववरदान । सौभ मयमायाकृत गहन । विशेष प्रतापी प्रचंड सैन्य । कांहीं आंगवण त्या नव्हती ॥५२॥
ससैन्य शाल्वें तिये समयीं । यादव त्रासिले समस्तही । ऐका समग्र कथितों तेंही । कथाप्रवाहीं अनुक्रमें ॥५३॥

शाल्वानीकपशस्त्रौघैर्वृष्णिवीरा भृशार्दिताः । न तत्यजू रणं स्वं स्वं लोकद्वयजिगीषवः ॥२५॥

शाल्वनृपाचे यूथपति । तिहीं समरीं यदवांप्रति । भेदूनि त्रासिलें बहुतां रीती । परी न डंडळिती अणुमात्र ॥५४॥
वर्षूनी शस्त्रांस्त्रांचे निकर । वृष्णिप्रमुख यादवभार । केले समरंगीं जर्जर । तथापि धीर न सांडिती ॥१५५॥
यादव वीर जे जे ठायें । होतें अधिष्ठूनि रणमही । अणुमात्र सोडिली नाहीं तिहीं । प्रलोभ देहीं धरूनियां ॥५६॥
विजयी मरूनि वरिजे स्वर्ग । कीं शत्रु भंगूनि कीर्ति चांग । दोहींवीण तिसरा मार्ग । वृष्णि अभंग न जाणती ॥५७॥
उभय लोक जयाचे चाडे । यादवसमरीं भिडती गाढे । प्राण वांचवावया कुडकुडे । मागिलीकडे न पळती ॥५८॥
मायावतीची विद्या गहन । शंबरहननार्थ लाधला पूर्ण । तेणें मायावी प्रद्युम्न । गगनीं स्यंदन गतिमंत ॥५९॥
शाल्व सौभेंसीं पळे जिकडे । प्रद्युम्न रथें वावडे तिकडे । अमोघ वर्षोनियां कुर्‍हादें । त्रासिले गाढे रिपुभार ॥१६०॥
प्रद्युम्न रथेंसीं लागला पाठीं । ससैन्य शाल्व धुकधुकी पोटीं । सौभ पळवी उठाउठी । देतसे घरटी दिक्चक्रा ॥६१॥
सौभ उतरतां धरणीतळीं । प्रद्युम्नरथ संघाटतां जवळी । द्युमान्नामा महाबळी । समरशाळी काय करी ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP