शिलाद्रुमाश्चाशनयः सर्पा आसारशार्कराः । प्रचंडश्चक्रवातोऽभूद्रजसाच्छादिता दिशः ॥११॥

गगनींहून पडे सर्पवृष्टि । तक्षकादि विखार कोटि । नरनारींच्या झोंबतां कंठीं । आकान्त उठी द्वारकेंत ॥७२॥
शिळावर्षाव होतसे भारी । रत्नखचित मंदिरावरी । पडतां होती ते चकचुरी । तेणें बोहरी जनपदा ॥७३॥
वृक्ष पडती मोठमोठे । निर्भय ठाव न मिळे कोठें । विजा पडती कडकडाटें । वाळुका घनदाट वरी वर्षे ॥७४॥
प्रचंड भंवती चक्रवात । धुळी गगनोदरीं भ्रमत । तेणें दिक्चक्र आच्छादित । महा आकान्त पुरगर्भीं ॥७५॥

इत्यर्द्यमाना सौभेन कृष्णस्य नगरी भृशम् । नाभ्यपद्यत शंकराजंस्त्रिपुरेण यथा मही ॥१२॥

विधिहरां जो नाभीकारी । त्या कृष्णाची दिव्य नगरी । सौभें त्रासिली नाना परी । दुःखलहरींमाजी भ्रमे ॥७६॥
अत्यंत अर्दिंता द्वारका । महा आकान्त मांडला लोकां । सुख न पवोनि पावले दुःखा । मारिती हांका आक्रोशें ॥७७॥
जैसी पूर्वीं त्रिपुरासुरें । मही त्रासिली महानिकरें । तैसींच सोंभै कठोरप्रहारें । भंगिली क्रूरें द्वारावती ॥७८॥
साभापासूनि शस्त्रास्त्रवृष्टी । होतां जनपद देखूनि कष्टी । प्रद्युम्न प्रतापी जगजेठी । सक्रोध पोटीं आवेशला ॥७९॥

प्रद्युम्नो भगवान्वीक्ष्य बाध्यमाना निजाः प्रजाः । मा भैष्टेत्यभ्यधाद्वीरो रथारूढो महारथः ॥१३॥

षड्गुणैश्वर्यसंपन्न । जैसा जनक जनार्दन । तैसाचि तदात्मज प्रद्युम्न । अर्दित देखोन निज नगरी ॥८०॥
पीडित देखूनि आपुल्या प्रजा । आवेश न धरे रुक्मिणीतनुजा । प्रजातें नाभीकारूनि वोजा । निघाला पैजा समरंगा ॥८१॥
मन्मथनामा महारथी । ज्याचा दारुकात्मज सारथी । शस्त्रास्त्रांची करूनि भरती । संग्रामाप्रती उठावला ॥८२॥
महावीर वीरश्रीकान्त । अपर न पाहोनि संघात । शत्रुसमरीं लोटिला रथ । जेंवि आदित्य तमावरी ॥८३॥
शंख स्फुरिला वीरश्रीभरें । ऐकूनि यादववीर बावरे । उठावले आवेशें क्रूरें । जेंवि कां वारें अनळेंसीं ॥८४॥
वीर निघाले सग्रामहांवे । त्यांमाजी मुख्यमुख्यांचीं नांवें । कथितों तैसें तां जाणावें । येर आघवे त्यांसरिसे ॥८५॥

सात्यकिश्चारुदेष्णश्च सांबोऽक्रूरः सहानुजः । हार्दिक्यो भानुर्विंदश्च गदश्च शुकसारणौ ॥१४॥
अपरे च महेष्वसा रथयूथपयूथपाः । निर्ययुर्दंशिता गुप्ता रथेभाश्वपदातिभिः ॥१५॥

सात्यकिनामा जो युयुघान । धनुर्विद्यामंत्रप्रवीण । आणि वैदर्भीनंदन । चारुदेष्ण महारथी ॥८६॥
साम्ब जाम्बवतीचा सुत । समरंगीं अपर कृतान्त । अक्रूर अनुजबंधूंसहित । निघता झाला संग्रामा ॥८७॥
अक्रूराचे अनुज कोण । श्वफल्कत्तनय बारा जण । आसंगादि रणप्रवीण । धनुर्विद्यापारग जे ॥८८॥
आसंग सारमेय मृदुर । मृदुवद्गिरि महाक्रूर । धर्मवृद्ध सुकर्मा क्षेत्र । अरिमर्दन शत्रुघ्न ॥८९॥
गंधमाद आणि प्रतिबाहु । हे अक्रूराचे अनुज भाऊ । समरीं ज्यांचा धरिती भेऊ । शत्रुसमुदाय प्रबळही ॥९०॥
बारा अक्रूराचे हे अनुज । द्वादश सूर्यांसम तेज । तैसेचि दोघे अक्रूरतनुज । उपदेव आणि देववान ॥९१॥
प्रबळ योद्धा जो कृतवर्मा । हार्दिक्यसंज्ञा ज्याचिया नामा । आणि भानुविन्द ज्या सत्यभामा । कृष्णवीर्यें प्रसवली ॥९२॥
देवकीची ज्येष्ठ भग्नी । देवरक्षिता वसुदेवपत्नी । तिचे जठरींचा वज्रमणी । वीराग्रणी गदा नामा ॥९३॥
कृष्णानुज म्हणती ज्यातें । जेणें भंगिलें मागधातें । तोही वीरश्रीआवेशातें । मदनासांगातें निघाला ॥९४॥
आणि शुक सारण हे दोन्ही । संग्रामभुवनींचे केवळ तरणी । अपार यादवांचिये श्रेणी । गणना वदनीं वदवेना ॥९५॥
तुळणा नसेचि कार्मुकास । म्हणोनि वीर ते महेष्वास । जिणे अयुतरथ कर्कश । अतिरथी त्यास म्हणावें ॥९६॥
संख्यारहित रथियां जिणे । महारथी तयातें म्हणणें । यादव ऐसिये आंगवणे । समराङ्गणा निघाले ॥९७॥
अयुतरथांची संख्यागणती । त्याचा यूथप तो अतिरथी । अयुतयूथपांचा पती । महारथी यादव तो ॥९८॥
ऐसे यूथपांचे यूथप । यादवसेनापति अमूप । निघाले समरंगा साटोप । शाल्वदर्पप्रभंजना ॥९९॥
यूथपा माथां आतपत्राणें । पृथक दुन्दुभि ध्वज निशाणें । द्विभागीं चामरें ढळती तेणें । भासती तुळणे अमरांचे ॥१००॥
आंगीं वज्रकवचें बाणलीं । प्रतापें शस्त्रास्त्रें परजिलीं । हयगजयानें पालाणिलीं । रथी पदाति सन्नद्ध ॥१॥
यूथ यूथप महारथी । सैन्यवलयें वेष्टित भवतीं । ऐसे अनेक चमूपती । समरक्षिती प्रवेशले ॥२॥
त्यानंतरें युद्ध प्रबळ । शाल्वांयादवांमाजी प्रबळ । कैसें झालें तें प्राञ्जळ । परिसा केवळ रौद्र रसा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP