षष्ठी विभक्ति
आमच्या गांवाजवळ शेटजींचा एक मळा आहे. त्यांत हल्लीं कांहीं पीक नाहीं. म्हणुन गुराखी मुलांनीं आपलीं गुरें मळ्यांत घातलीं. हें शेटजींच्या गड्यानें पाहिलें तो तीं गुरें कोंडवाड्यांत नेऊं लागला. मुलें म्हणालीं, “ मळ्यांत पीक नाहीं मग तूं आमचीं गुरें कोंडवाड्यांत कां नेतोस ? गुरांचे मालक व आमचे आईबाप आम्हांस रागावतील. ’ गडी ऐकेना. मुलें रडूं लागलीं तरी गड्याचे मनावर कांहीं परिणाम झाला नाहीं. त्यानें सर्व गुरें कोंडवाड्यांत घातलींच. त्या गुरांत पांडू पाटलांचा एक घोडा, गणू चौघर्यांचे बैल, शामू महाराजांची म्हैस, विष्णूपंत कुळकर्ण्यांच्या तीन गाई व एकीचें वासरू अशीं सर्वांची मिळून दहाबारा जनावरें होतीं.
या लिहिण्यांत कोणत्या शब्दांत षष्ठि विभक्तीचे कोणते प्रत्यय लागले आहेत ते पहा.
मूळ शब्द विभक्ति - प्रत्यय विभक्ति - प्रत्यय लागलेला शब्द षष्ठी विभक्तीचा संबंध असलेला शब्द व त्याचें लिंगवचन
शेटजी चा शेटजींचा मळा पुल्लिंगी एकवचन
आपण लीं आपलीं गुरें नपुंसकलिंगी अनेकवचन
आम्ही चीं आमचीं गुरें नपुंसकलिंगी अनेकवचन
पाटील चा पाटलांचा घोडा पु. एकवचन
चौधरी चे चौधर्यांचे बैल पु. एकवचन
महाजन ची महाजनांची म्हैस स्त्रीलिंगी एकवचन
कुळकर्णी च्या कुळकर्ण्याच्या गाई स्त्रीलिंगी अनेकवचन
आम्ही चे आमचे आईबाप पु. अ. व.
गुरें चे गुरांचे मालक पु. अ. व.
एक चें एकीचें वासरूं न. लिं. ए. व.
सर्व चीं सर्वांचीं जनावरें न. लिं. अ. व.
यांत एक गोष्ट लक्षांत येईल कीं, षष्ठीचा मूळ प्रत्यय चा असून त्याचीं त्याचा ज्या नामाशीं संबंध असेल याच्या लिंगवचनाप्रमाणें एकवचनी चा, ची, चें व अनेकवचनी चे, च्या, चीं अशीं रूपें होतात. जसें पाटलांचा घोडा, चौधर्यांचे बैल, महाजनांची म्हैस, कुळकर्ण्याच्या गाई, एकीचें वांसरूं, सर्वांचीं जनावरेम.
सामान्य नियम - षष्ठी विभक्तीचा नपुंसकलिंगी नामाशीं संबंध असतां एकवचनीं चें आणि अनेकवचनीं चीं प्रत्ययावर अनुस्वार द्यावा.
षष्ठी विभक्तीचें वचन प्रत्ययावरून ठरवावयाचें नसतें; तर तें ज्या नामास षष्ठीचे प्रत्यय लागले असतील त्याच्या वचनावरून ठरवावयाचें असतें. जसें -
(१) किल्ल्याचा दरवाजा, किल्ल्याचे दरवाजे, किल्ला एकवचन.
शेळ्यांचा कळप, शेळ्यांचे कळप; शेळ्या अनेकवचन.
(२) विटेची बाजू, विटेच्या बाजू; वीट एकवचन.
दगडांची भिंत, दगडांच्या भिंती; दगड अनेकवचन.
(३) मुलांचें झबलें, मुलांचीं झबलीं; मूल अनेकवचन.
कागदांचें पुडकें, कागदांचीं पुडकीं; कागद अनेकवचन.
षष्ठी विभक्तीचे प्रत्यय लागलेले शब्द अनेकवचनी असल्यास त्यांवर ( म्हणिजे त्यांच्या उपान्त्य अक्षरावर ) अनुस्वार द्यावा. जसें - गुरांचे मालक, सर्वांचीं जनावरें.
शेटजींचा, पाटलांचा, चौधर्यांचे, महाजनांचीं, कुळकर्ण्यांच्या यांतील मूळ शब्द आदरार्थीं बहुवचनी आहेत; म्हणून त्यांच्या उपान्त्यावर अनुस्वार आले आहेत.
षष्ठी विभक्तीच्या प्रत्ययाचा विचार करतांना आणखी दोन गोष्टींकडे लक्ष पुरवावें लागेल.
(१) आमचे गांवांत, गड्याचे मनावर या शब्दांत चे हा षष्ठी विभक्तीचा पत्यय असून त्याचा गांव, मन या नपुंसकलिंगी नामाशीं संबंध असल्यामुळें, त्यावर अनुस्वार द्यावा असें वाटेल. पण ते षष्ठी विभक्तीचे प्रत्यय नाहींत. त्यावर अनुस्वार देऊं नये. आमच्या गावांत, गड्याच्या मनावर याप्रमाणें हे शब्द लिहावयास पाहिजेत. तसे लिहिले असतां च्या या अक्षरावर आपण अनुस्वार देत नाहीं. हल्लीं बोलण्यांत व लिहिण्यांत आमच्या, गड्याच्या याऐवजीं आमचे, गड्याचे असें रूप करितात. हें षष्ठींचे सामान्य रूप आहे म्हणून त्यावर अनुस्वार येत नाहीं.
विभक्ति - प्रत्यय लावण्यापूर्वीं जसें नामाचें सामान्यरूप करतात, तसें कांहीं वेळेस शब्दाचा पुढील विभक्ति प्रत्यय - लागलेल्या शब्दाशीं संबंध आला असतांही करतात. जसें - मोठ्या माणसानें, त्याच्या बापानें, गोड्या पाण्याचें इ.
(२) चमचा - चमचे, गालिचा - गालिचे, काची ( फळें विकणार्या बलुची ( लोक ), निमचे ( एक हत्यार ), बाकुची ( एक नवस्पति ) हे मूळ शब्द आहेत. त्यांची प्रथमा विभक्ति समजावी.