ततोऽन्येन रुषा जघ्ने तं चापि शतधाऽच्छिनत् । एवं युध्यन्भगवता भग्ने भग्ने पुनः पुनः ।
आकृष्य सर्वतो वृक्षान्निर्वृक्षमकरोद्वनम् ॥२१॥

पुढती तिसरा उपडूनि शाळ । क्षोभें ताडिला बळाचा मौळ । येरें परजूनियां मुसळ । केला तत्काळ शतखंड ॥१२५॥
वानरयुद्धाचिया रीती । लंके सम्मुख राक्षसांप्रति । निर्दाळिलें वृक्षाघातीं । शिळाजीमूत वर्षोनी ॥२६॥
तया प्रकारें ये अवसरीं । भिडे रामेसी वृक्षप्रहारीं । तंव तो षड्गुणैश्वर्यधारी । वानरसमरीं न डंडळी ॥२७॥
जो जो वृक्ष प्लवंगम । टाकी तो तो भंगी राम । तेणें द्विविद विजयकाम । क्षोभे निस्सीम आवेशें ॥२८॥
वृक्षांपाठीं टाकी वृक्ष । राम भंगी साधूनि लक्ष । ऐसे मोडिले लक्षें लक्ष । केलें निर्वॄक्ष वन अवघें ॥२९॥
जे जे टाकिले तरुवर । रामें केले ते शतचूर । वानरें आवेश धरिला क्रूर । मग प्रस्तर निक्षेपी ॥१३०॥

ततोऽमुंचच्छिलावर्ष बलस्योपर्यमर्षितः । तत्सर्व चूर्णयामास लीलया मुसलायुधः ॥२२॥

सक्रोध वानर आवेशा चढे । झडझडां मारी शिळा धोंडे । मुसळघातें त्यांचे तुकडे । करी रोकडे बलभद्र ॥३१॥
जैसा संवर्तकमेघगण । करावया विश्वसंहरण । वर्षे त्यापरी पाषाण । दावी आंगवण द्विविदकपि ॥३२॥
कोपें खवळूनि अधिकतर । एकसमयीं शिळा सहस्र । गगनीं उडोनि करी प्रहार । त्या भंगी बलिभद्र निमिषार्धें ॥३३॥
मुसळें शिळा चूर्ण करी । निर्भय बलराम अंतरीं । तेणें वानरा क्रोध भारी । पुढती धरी आवेश ॥३४॥
शिळापरिणाह गव्यूतिमात्र । ऐसे प्रस्त दीर्घतर । बलरामावरी सहस्रेंसहस्र । टाकूनि भुभुःकार करी कपि ॥१३५॥
लघुलाघवें मुसलपाणि । शिळाचूर्ण उधळी गगनीं । निश्चळ निर्भय अंतःकरणीं । हास्य वदनीं करीतसे ॥३६॥
मग वानरें शिलायुद्ध । सोडूनि आवेशें प्रसिद्ध । अंगसंघट्टना झाला सिद्ध । तेंही विशद अवधारा ॥३७॥

स बाहू तालसंकाशौ मुष्टीकृत्य कपीश्वरः । आसाद्य रोहिणीपुत्रं ताभ्यां वक्षस्यरूरुजत् ॥२३॥

अपर कपींमाजी ईश्वर । म्हणोनि म्हणिजे कपीश्वर । द्विविदनामा महावीर । क्रोधें दुर्धर उठावला ॥३८॥
तालाऐसे बाहु दोन्ही । वज्रमुष्टि वळूनि पाणि । रोहिणीपुत्रातें धांवूनी । हृदयस्थानीं । ताडिलें ॥३९॥
जैसे इन्द्राचे वज्रप्रहार । साहे मंदराद्रि कठोर । तैसा अचळ बळभद्र । मुष्टिप्रहारें न डंडळी ॥१४०॥
मुष्टिप्रहार ओपिते काळीं । सहज वानर पातला जवळी । राम प्रतापी समरशाळी । धरी ते काळीं तें ऐका ॥४१॥

यादवेंद्रोऽपि तं दोर्भ्यां त्यक्त्वा मुसललांगले । जत्रावभ्यर्दयत् क्रुद्धः सोऽपतद्रुधिरं वमन् ॥२४॥

यादवीं वरिष्ठ जो बळभद्र । यालागीं म्हणती यादवेन्द्र । तेणें मुसळ आणि नांगर । टाकूनि सत्वर कपि धरिला ॥४२॥
बाहुकंठाए जे संधि । जत्रु त्यां म्हणिजे गीर्वाणशब्दीं । उभयाङ्गुष्ठतर्जनीमधीं । धरूनि निरोधी बळ कपीतें ॥४३॥
सक्रोध राम रगडी जत्रा । तेणें वानरा निर्वाणयात्रा । कर पद खोडूनि वमी रुधिरा । विवर्णवक्त्रा विकासी ॥४४॥
प्राणप्रयाणाचिये वेळे । वटारिले भयंकर डोळे । कर पद जाताती बेंबळे । देहीं मावळे स्मृतिचक्र ॥४५॥
जत्रु रगडितां नाकीं तोंडीं । लागली रक्ताची मुसाण्डी । गांडीवाटे लेंडें सांडी । निघाली नाडी प्राणांची ॥४६॥
माकद मारिलें पाला हगलें । तें बलरामें साच केलें । द्विविदें प्राण विसर्जिले । येरें सोडिलें शव त्याचें ॥४७॥
वानरकलेवर पृथ्वीवरी । पडतां झाली कैशी परी । कुरुशार्दूला तें अवधारी । वदे वैखरी वाशिष्ठि ॥४८॥

चक्रंपे तेन पतता सटंकः सवनास्पतिः । पर्वतः कुरुशार्दूल वामुना नौरिवांभसि ॥२५॥

द्विविदशरीर पडतां स्थूळ । थरथरां कांपला रैवताचळ । टांकी म्हणीजे विवरें सजळ । सहित विशाळ वनस्पति ॥४९॥
तरुवल्ली वीरुध लता । सानुशिखरांसह पर्वता । कंप झाला तो सांगतां । वाटे चित्ता आश्चर्य ॥१५०॥
प्रचंड वायु झगटतां नौका । माजी थरकते समुद्रोदका । तैसाचि रेवताचळही देखा । सकंप शाखामृगपतनें ॥५१॥
द्विविद नव्हे तो वानर । रामदळींचा महावीर । पडतां तयाचें शरीर । प्रचंड भूधर कांपिन्नला ॥५२॥
लाङ्गलिगोलाङ्गुळांच्या कदनीं । पाहूं पातले पीयूषपानी । गगनीं दाटल्या विमानश्रेणी । त्यां ते क्षणीं उत्साह ॥५३॥

जयशब्दो नमःशब्द साधु साध्विति चांबरे । सुरसिद्धमुनींद्राणामासीत्कुसुमवर्षिणाम् ॥२६॥

विजय होतां बळरामाचा । जयजयकार करिती वाचा । घोष गाजविती स्तवनाचा । नमो नमस्ते या शब्दीं ॥५४॥
साधु साधु भला भला । इहीं शब्दीं बळरामाला । पूजिती तो रव गगनीं भरला । विशद कथिला जातसे ॥१५५॥
सुरवर गर्जती जयजयकारीं । सिद्ध स्तविती नमस्कारीं । साधुशब्दें ऋषीश्वरीं । प्रलम्बारी पूजियला ॥५६॥
तेव्हां बळभद्राचिये मुकुटीं । मुनिसुरसिद्धीं कुसुमवृष्टि । करितां सुगंधें भरली सृष्टि । वनिता दृष्टी विलोकिती ॥५७॥
ऐसा द्विविद मर्दूनि राम । विजयी झाला पूर्णकाम । देखोनि वनिता ससंभ्रम । कवळिती सकाम होत्सात्या ॥५८॥
कंदर्पविलासविहार पूर्ण । स्वेच्छा करूनि संकर्षण । परतला तें निरूपण । सावधान अवधारा ॥५९॥

एवं निहत्य द्विविदं जगद्व्यतिकरावहम् । संस्तूयमानो भगवाञ्जनैः स्वपुरमाविशत् ॥२७॥

एवं म्हणिजे पूर्वोक्तपरी । द्विविदवानर मारूनि समरीं । द्वारका प्रवेशला सीरी । उत्साह गजरीं स्तुतिस्तवनीं ॥१६०॥
व्यतिकरषब्दें बोलिजे नाश । तत्कर्मीं ज्या विशेष हर्शः । ऐसिया द्विविद वानरास । मारूनि त्रिजगास तोषविलें ॥६१॥
तेणें जनांसी उत्साह भारी । म्हणती रामें मारिला वैरी । देश त्रासिलें येणें भारी । छळिल्या नारी पतिव्रता ॥६२॥
आजि हृद्रोग जनांचा शमला । कंटक काळजांतील उपडला । रामें द्विविदवानर वधिला । त्रिजगा झाला उत्साह ॥६३॥
धन्य रामा रेवतीरमणा । भला भला गा संकर्षणा । प्रतापवंता प्रलम्बघ्ना । यमुनाकर्षणा सुरपूज्या ॥६४॥
वासुदेवाग्रजा रामा । सीरपाणि पवित्रनामा । हली मुसळी कल्याणकामा । कामपाळा तालाङ्का ॥१६५॥
इत्यादि सुललित संबोधनीं । रामा स्तविती अनेक स्तवनीं । जनपदवेष्टित द्वारकाभुवनीं । लाङ्गलपाणि प्रवेशला ॥६६॥
ऐसें विशुद्द रामयश । त्रिजग भरित नित्य निर्दोष । ऐकोनि तोषला कुरुनरेश । पुन्हां विशेष श्रवणेच्छु ॥६७॥
ऐशी श्रीमद्भागवतीं । अठरा सहस्र श्लोकगणती । पारमहंसी संहिता म्हणती । शुकप्रीक्षितिसंवाद ॥६८॥
त्यांतील हा दशमस्कंध । अध्याय सप्तपष्टीतम प्रसिद्ध । रामें केला द्विविदवध । तें आख्यान विशुद्ध संपविलें ॥६९॥
श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । विद्धद्वृदचूडामणि । त्याचें सेवूनि पायवणी । महाराष्ट्रवाणी हरिवरदा ॥१७०॥
गाखाणिली दयार्नवें । श्रोतीं परिसतां सद्भावें । भोगिती अक्षयें साम्राज्यविभवें । सद्ग्रुसेवे निवटोनी ॥७१॥
पिपीलिकापुरीं वसति । करूनि व्याख्यान यथामति । निरूपिलें तें परिसोनि श्रोतीं । गुरुपदभक्ति मज द्यावी ॥७२॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे‍ऽष्टादशसाहस्स्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां रामचरिते द्विविदवानरवधोनाम सप्तषष्टितमोऽध्यायः ॥६७॥
पिंगलाब्दे ज्येष्ठशुक्ले द्वितीयभानुवासरे ।
पिपिलिकापुरे पूर्ण द्विविदाख्यानमुत्तमम् ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२७ ॥ ओवी संख्या ॥१७२॥ एवं संख्या ॥१९९॥ ( सदुष्टावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३१२९० )

सदुसष्टावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP