अध्याय ६३ वा - श्लोक ४६ ते ५३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीभगवानुवाच - यदात्थ भगवंस्त्वन्नः करवाम प्रियं तव ।
भवतो यद्व्यवसितं तन्मे साध्वनुमोदितम् ॥४६॥
भो भगवन्ता उमापति । त्वां जें प्रार्थिलें आम्हांप्रति । तें तव प्रिय सुनिश्चिती । आम्हां सर्वार्थीं करणीय ॥२४॥
त्वां जें निश्चयें प्रतिपादिलें । आणि आम्हांतें अनुमोदिलें । तें सर्वार्थीं साधु भलें । मान्य केलें पैं आम्हीं ॥४२५॥
बाणासुराच्या रक्षणोद्देशें । आम्हां स्तविलें त्वां संतोषें । तें म्यां मान्य केलें असे । समरावेशें या न मारीं ॥२६॥
आणिकही एक्या गुणें । बाणासुरा म्यां वांचवणें । तेंही कथितों तुजकारणें । सावध श्रवणें अवधारीं ॥२७॥
अवध्योऽयं ममाप्येष वैरोचनिसुतोऽसुरः । प्राल्हादाय वरो दत्तो न वध्यो मे तवान्वयः ॥४७॥
हा मारावया योग्य नव्हे । काय म्हणोनि पुससी जरी हें । तरी वैरोचनि जो असुरवर्य । त्याचा तनय औरस हा ॥२८॥
आणि प्रह्रादासि म्यां दिधला वर । तुझे वंशींचा न मारीं असुर । तस्मात् अवध्य बाणासुर । मजपासूनि हा निर्धारें ॥२९॥
तुझिया स्तवनें तोषलों भारी । तव प्रार्थना अङ्गीकारीं । विशेष हा मद्भक्तान्वयधारी । न मारीं समरीं मी यातें ॥४३०॥
जरी तूं म्हणसी तरी कां पहिलें । याचें सैन्य संहारिलें । बाणबाहूंचें खंडन केलें । तेंही वहिलें अवधारीं ॥३१॥
दर्पोपशमनायास्य प्रवृक्णा बाहवो मया । सूदितं च बलं भूरि यच्च भारायितं भुवः ॥४८॥
सहस्र शाखांचा पादप । दैत्यें मानूनि धरिला दर्प । तया दर्पाचें स्वरूप । अल्प स्वल्प तुज कथितों ॥३२॥
पूर्वीं अनन्यभावें शरण । होवोनि भजतां तुझे चरण । तैं त्वां होवोनि सुप्रसन्न । मागें वरदान म्हणीतलें ॥३३॥
येणं शोणितपुररक्षणा । तुज याचिलें गौरीरमणा । पुढती प्रसन्न करूनि जाणा । समराङ्गणा प्रार्थिलें ॥३४॥
सहस्रबाहुबळप्रताप । तेणें दैत्या चढला दर्प । म्हणे त्रिजग समरीं मसीं अल्प । तुज साटोप धरीं म्हणे ॥४३५॥
सहस्र भुजांचें कंडूशमन । करावया समर्थ नाहीं आन । तुज शिवातें म्हणे बाण । समराङ्गण करीं मजसीं ॥३६॥
ऐकोनि याच्या सदर्प बोला । त्वांही क्षोभोनि वर दीधला । उषा वरील जैं दाद्ला । तैं मिळेल तुजला प्रतियोद्धा ॥३७॥
तया दर्पाचें उपशमन । सत्य करावया तव वरदान । बाणबाहूंचें कृंतन । चक्रेंकरून म्यां केलें ॥३८॥
आणि भूमीसी भाररूप । बाणचमूचा प्रचंड दर्प । तो म्यां सज्जूनि शार्ङ्गचाप । ससाक्षेप संहरिला ॥३९॥
आतां ऐकोनि तव प्रार्थना । म्यां जीवदान दिधलें बाणा । चारी बाहु रक्षिले जाणा । अजर तव गणामाजी असो ॥४४०॥
चत्वारोऽस्य भुजाः शिष्टा भविष्यंत्यजरामराः । पार्षदमुख्यो भवतो नकुतश्चिद्भयोऽसुरः ॥४९॥
अवशिष्ट रक्षिले चारी कर । ते या होतील अजरामर । तव पार्पदांमाजी वर । निर्भय असुर मम वरें ॥४१॥
तुझ्या पार्षदांमाजी मुख्य । वरिष्ठ होवोनि भोगील सुख । माझा अनुग्रह हा निष्टंक । ऐकोनि त्र्यम्बक तोषला ॥४२॥
श्रीकृष्णाचा होतां वर । चक्रें रक्षिले चारी कर । शिवें आणूनि बाणासुर । ठेववी शिर हरिचरणीं ॥४३॥
कृष्णे हस्त ठेवूनियां माथां । झाला स्वमुखें अभय देता । बाणें सांडूनि जीवभयव्यथा । भजला तत्त्वता तें ऐक ॥४४॥
इति लब्ध्वाऽभयं कृष्णं प्रणम्य शिरसाऽसुरः । प्राद्युम्निं रथमारोप्य सवध्वा समुपानयत् ॥५०॥
अभय लाहूनि ऐसिये परी । श्रीकृष्णातें वंदूनि शिरीं । प्रवेशोनिया शोणितपुरीं । सोडी झदकरी अनिरुद्धा ॥४४५॥
देऊनि अभ्यंग सोद्वर्तन । उषा नोवरी कन्यारत्न । वसनाभरणीं गौरवून । रथारोहण करवी त्यां ॥४६॥
बोहरें वाहोनि दिव्य रथीं । सवेग आणिलीं कृष्णाप्रति । बळकृष्णांतें करी विनंती । कीजे वसती दीन एक ॥४७॥
रामकृष्ण म्हणती तया । तुजवरी पूर्ण शिवाची दया । यालागीं ओपिलें पूर्ण अभया । स्नेह हृदयामाजी धरीं ॥४८॥
सेना पडली समराङ्गणीं । त्यांची पुरगर्भी विलपणी । उत्साह न वटे अंतःकरणीं । आग्रह पूजनीं न करावा ॥४९॥
समरीं यादव झाले क्षती । अमृतापाङ्गें त्यां श्रीपति । अक्षत करूनि वाहे रथीं । द्वारके जाती तें ऐका ॥४५०॥
हरिवंशीं बाणासुर । सोडिल्या शंकरें देवोनि वर । केला प्रमथगणीं किंकर । शोणितपुर त्यागूनी ॥५१॥
कुम्भाण्ड प्रधानें घेऊनि अभय । श्रीकृष्णेंसीं केला स्नेह । कृष्णें शोणितपुरींचा राय । शक्रप्राय तो केला ॥५२॥
उषाविवाह कुम्भाण्डकें । मन्मथपुत्रेंसीं कौतुकें । करूनि वधूवरें द्वारके । यादवेंसीं बोळविलीं ॥५३॥
अक्षौहिण्या परिवृतं सुवासः समलंकृतम् । सपत्नीकं पुरस्कृत्य ययौ रुद्रानुमोदितः ॥५१॥
द्वादश अक्षौहिणी सेना । वोहरें सहित दिव्य स्यंदना । वेष्टूनि चालिले द्वारकाभुवना । विजयगर्जना करूनियां ॥५४॥
मंडित अनर्घ्य वसनाभरणीं । कुंकुमतिलक माळा सुमनीं । सवें सालंकृत उषा पत्नी । पुरस्कारूनियां अनिरुद्धा ॥४५५॥
दर्प भंगिला बाणाचा । वीर वर्णिती प्रताप वाचा । गजर केला गजभेरींचा । भार कृष्णाचा निघाला ॥५६॥
द्वारकापुरा निघते समयीं । शंकराज्ञा शेषशायी । घेतां शंकर कवळूनि हृदयीं । रहस्य कांहीं त्या वदला ॥५७॥
बाण मद्वरें झाला मत्त । समरा प्रार्थी मज उद्धट । तें हें माझें अभिप्रेत । पूर्ण समस्त त्वां केलें ॥५८॥
श्रीकृष्ण म्हणे मजलागूनी । बहुत घडली उद्धट करणीं । पराभविलें समराङ्ग्णीं । पिनाकपाणि तें क्षमिजे ॥५९॥
शिव म्हणे मम मनोगर । तैसें तुवां केलें उचित । अनुमोदूनि इत्थंभूत । यादव समस्त बोळविले ॥४६०॥
विचित्र वाजती मंगळ तुरें । सुरवर वर्षती सुमनभारें । वीर गर्जती जयजयकारें । सहित वोहरें विराजती ॥६१॥
अमर वंदूनि हरिहरांसी । ऋषि महर्षि देवर्षि । जाते झाले स्वस्थानासी । हरिविजयासी वर्णित ते ॥६२॥
हरिवंशादि ग्रंथान्तरीं । धेनु बाणाच्या वरुणाघरीं । तदर्थ वरुणेंसिं भिडे हरि । हे शुकवैखरी येथ नसे ॥६३॥
असो ऐसें शोणितपुरीं । शंकरप्रमुख जिंकूनि समरीं । अनिरुद्धेंसी बाणकुमरी । द्वारकानगरीं प्रवेशले ॥६४॥
पुधें आहुकनृपाजळी । वार्तिका वार्ता कथिली समूळीं । वोहरें सहित राम वनमाळी । प्रतापशाळी पातले ॥४६५॥
रायें ऐकूनि हे वार्ता । सहस्रें सहस्र प्रेरूनि दूतां । नगरी झाला शृंगारविता । पुढें सात्वता पाठविलें ॥६६॥
मंगळ तुरांचिया नगरीं । कैसे प्रवेशले गजरीं । रामकृष्ण यादवभारीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥६७॥
स्वराजधानीं समलंकृतां ध्वजैः सतोरणेंरुधितमार्गचत्वराम् ।
विवेश शंखानकदुंदुभिस्वनैरभ्युद्यतः पौरसुहृद्द्विजातिभिः ॥५२॥
नृपाची आज्ञा पडतां श्रवणीं । द्वारकेमाजी समस्त जनीं । आपुलालिये सदनोसदनीं । अलंकरणीं त्वरा केली ॥६८॥
चित्र विचित्र तगटी ध्वज । रत्नखचित कलश सुतेज । मंदिरें दिसती तेजःपुंज । तोरणीं स्रज सुमनांचे ॥६९॥
मार्गचत्वर पण्यवीथि । चंदनकुंकुमें प्रोक्षिल्या निगुती । पूर्ण कलश सदीपपंक्ति । विराजती सर्वत्र ॥४७०॥
सालंकृत नारीनर । शोभती जैसे अप्सरा अमर । सज्जूनि हयरथकुंजरभार । आले नागर सामोरे ॥७१॥
आप्त सुहृद पौरवर्ग । वैदिक शास्त्रज्ञ द्विज अनेग । पुढें पाहूनियां श्रीरंग । करिती प्रसंग स्तवनाचा ॥७२॥
एक ओहरां प्रशंसिती । कित्येक रामकृष्णांतें स्तविती । कित्येक हरियश उज्वळ गाती । विप्र पधती शान्तिसूक्तें ॥७३॥
गजदुंदुभि वाजती गजरें । काहळा मृदंग मंगळ तुरें । आनकगोमुखकंबुस्वरें । पूर्व द्वारें प्रवेशलें ॥७४॥
आपुली राजधानी द्वारका । सालंकृता सकौतुका । रामकृष्ण यादवकटका । सहित स्वपुरीं प्रवेशले ॥४७५॥
वोहरें मिरवूनि हाटवटीं । आले नृपासनानिकटीं । उषा अनिरुद्ध पाहतां दृष्टी । तोषला पोटीं उग्रसेन ॥७६॥
दोघां घेऊनि मांडियेवरी । वसनाभरणें अलंकारी । हस्त उतरोनि मुखावरी । म्हणे हरगौरीसम नांदा ॥७७॥
रामकृष्णपद्युम्नमुखीं । राया वंदूनि निज मस्तकीं । उठूनि वसुदेवदेवकादिकें । स्नेहविशेषीं आलिंगिलें ॥७८॥
नम्रमौळें करूनि अपरां । आज्ञा मागूनियां नृपवरा । मग येऊनि निजमंदिरा । माता समग्रा हरि वंदी ॥७९॥
रामकृष्णादिकांच्या जननी । अनिरुद्ध उषा देखोनि नयनीं । आनंदभरित अंतःकरणीं । आशीर्वचनीं गौरविती ॥४८०॥
नातुनातसुनेचें मुख । पाहूनि रुक्मिणी मानी सुख । रेवतीहृदयीं न माय हरिख । तोषती अनेक हरिजाया ॥८१॥
रतिरुक्मवती नंदनस्नुषा । देखोनि पावल्या परम तोषा । रोचनासदनीं गृहप्रवेशा । आले विदुषांसमवेत ॥८२॥
करूनि लक्ष्मीपूजनासी । कनकमुद्रा ब्राह्मणांसी । भूरि वांटूनि हृषीकेशी । अहेर सुहृदांसी समर्पी ॥८३॥
रोचना रति रुक्मवती । भाणवसातें निरोविती । म्हणती वृद्धाचाररीति । यथानिगुती तूं चाळीं ॥८४॥
आपुले कंठींचीं कंठाभरणें । रत्नजडितें करकंकणें । समषेनि उषेकारणें । क्षीरप्राशनें करविती ॥४८५॥
आतां असो हा वृद्धाचार । कथितां ग्रंथ वाढेल फार । करूनि दिव्यान्नप्रकार । भोजनें नागर तोषविले ॥८६॥
कैसें केलें उषाहरण । हरिहरांचें समराङ्गण । राया त्वां जें पुशिलें पूर्ण । तें संपूर्ण निरूपिलें ॥८७॥
याचें श्रवणपठन करितां । दृष्टादृष्ट फळें हातां । तें तूं परिसें कौरवनाथा । मी तत्वता तुज कथितों ॥८८॥
य एवं कृष्णविजयं शंकरेण च संयुगम् । संस्मरेत्प्रातरुत्थाय न तस्य स्थात्पराजयः ॥५३॥
सोयरीक दैत्या देवा । समराङ्ग शिवकेशवां । अघटित परीचा हा आघवा । स्मरे सद्भावें इतिहास ॥८९॥
बाणबाहूंचें खंडन । जृंभणास्त्रें उमारमण । जिंकूनि निर्जर जनार्दन । झाला आख्यान तें जें हें ॥४९०॥
प्रभाते श्रवणपठन करिती । अथवा हृदयीं जे स्मरती । ते नर सर्वदा विजय वरिती । पराजयविपत्ति त्यां न शिवे ॥९१॥
राया पावन हरीचे गुण । पुण्यश्लोक करिती श्रवण । ते सर्वदा विजयवान । कलिमलखंडन करूनियां ॥९२॥
हरियश उज्ज्वल त्रिजगामाजी । गंगा जन्मली हरिपदकंजीं । भगवन्मूर्ति हॄत्पंकजीं । त्रिविधा आजि समरसतां ॥९३॥
श्रीमद्भागवतीं ऐसी अठरा । सहस्र विस्तारेंसीं । दशमस्कंधीं नृपापाशीं । कथाविशेषीं शुक वदला ॥९४॥
यावरी पुढिले अध्यायीं । नृगोद्धरण शेषशायी । करील ते कथा सर्वही । श्रवणालयीं सांठविजे ॥४९५॥
मखसुकृतें अमरत्व लाहती । शेखीं मरोनि मर्त्य होती । एक अमरत्वा वांछिती । एवं संसृति अवघींच ॥९६॥
एकनाथ प्रतिष्ठानीं । मर्त्या अमर्त्या अमृतदानी । चिदानंदें वास्तवपणीं । स्वानंदभुवनीं विराजती ॥९७॥
गोविन्दान्वयबोधात्मक । प्रपंचवस्तूसी अपृथक । वेदान्तवाक्याचा परिपाक । भरी चिद्रस दयार्णवीं ॥९८॥
तें हें हरिवरदा व्याख्यान । श्रोते श्रवणीं करिती पान । अमृतत्वीं समरसोन । ब्रह्म परिपूर्ण ते होती ॥४९९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्क्म्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां शंकरप्रमुखसमरवर्णनबाणबाहुखंडनानिरुद्धोषासहद्वारकानयनं नाम त्रिषष्टितमोऽध्यायः ॥६३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५३॥ ओवी - संख्या ॥५५२॥ ( त्रेसष्ठावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३०१५४ )
त्रेसष्ठावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP