अध्याय ६३ वा - श्लोक ३१ ते ३६
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ततो बाहुसहस्रेण नानायुधधरोऽसुरः । मुमोच परमक्रुद्धो बाणांश्चक्रायुधे नृप ॥३१॥
सहस्र बाहूंचीं पृथग्विधें । रथीं घालूनि दिव्यायुधें । पांच शत धनुष्यें मौर्वीबद्धें । वाहूनि क्रोधें उठावला ॥६॥
एकेच समयीं सहस्र शर । चक्रधरावरी बाणासुर । विंधिता झाला परम क्रूर । म्हणे सधीर हो समरीं ॥७॥
दैत्य मायाप्रयोगास्त्रें । कृष्णावरी टाकिती निकरें । तितुकीं छेदिलीं कमलामित्रें । कोण्या प्रकारें तें ऐका ॥८॥
तस्यास्यतोऽस्त्राण्यसकृचक्रेण क्षुरनेमिना । चिच्छेद भगवान्बाहूञ्शाखा इव वनस्पतेः ॥३२॥
अनेक अस्त्रें अनेक शस्त्रें । बाणें प्रेरितां आसुरी मंत्रें । एकेच समयीं कमलामित्रें । छेदिलीं चक्रें अतितीक्ष्णें ॥९॥
क्षुरनेमि सहस्रार । प्रळयकाळींचा जेंवि भास्कर । श्रीकृष्णाचे आज्ञानुसार । समरीं तत्पर रसरसिक ॥३१०॥
तया सुदर्शनचक्रा हरि । आज्ञा करूनि प्रेरी समरीं । अस्त्रें छेदूनि वरीच्या वरी । बाणशरीरीं संघटलें ॥११॥
सहस्र शस्त्रें परजूनि बाण । करूं पाहे निवारण । पावकीं पडतां जैसें तृण । गेलीं जळोन तेंवि शस्त्रें ॥१२॥
गरागरां देवोनि भंवती भंवरी । बाणबाहूंचें खंडन करी । भंवते पनळ गळती रुधिरीं । असुर अंतरीं चाकाटला ॥१३॥
चक्रा निवारण न चले कांहीं । बाहु तुटोनि पडती मही । दुजा कैपक्षी समरीं नाहीं । तैं आठवी हृदयीं शिवचरणां ॥१४॥
वनस्पतीच्या जैशा शाखा । छेदितां महीवरी पडती देखा । बाणबाहूंचा तोचि लेखा । पडली मुखा दांतखिळी ॥३१५॥
आंगीं भयाची धडकी भरली । रणमदाची उठी उतरली । वीरश्रियेची अहंता गेली । पडली भुली शस्त्रास्त्रां ॥१६॥
तये समयीं शंकरगौरी । स्मरता झाला अभ्यंतरीं । म्हणे माझी मज वैखरी । ऐसिये परी फळा आली ॥१७॥
बाणें अंतरीं करितां स्मरण । भक्तकारुण्यें कळवळून । द्रवलें शिवाचें अंतःकरण । तें प्रकरण अवधारा ॥१८॥
बाहुषु च्छिद्यमानेषु बाणस्य भगवान्भवः । भक्तानुकंप्युपव्रज्य चक्रायुधमभाषत ॥३३॥
चक्र खंडित असतां पाणि । शंकरें जाणोनि अंतःकरणीं । भक्तकारुण्यें कळवळूनी । मूर्छना वारूनि उठावला ॥१९॥
सावध होवोनि पाहे निरुतें । तंव सुदर्शन भंवे बाणाभंवतें । बाणबाहूंचीं खंडित शतें । जाणोनि चित्तें कळवळिला ॥३२०॥
जृंभणास्त्राची मूर्छना गेली । भक्तकारुण्यें कृपा उदेली । सवेग येवोनि कृष्णा जवळी । स्तुति आदरिली ते ऐका ॥२१॥
भक्तानुकंपी पार्वतीरमण । चक्रायुधाप्रति येऊन । भक्तरक्षणार्थ मृदुभाषण । स्वमुखें स्तवन आदरिलें ॥२२॥
श्रीरुद्र उवाच - त्वं हि ब्रह्म परं ज्योतिर्गूढं ब्रह्मणि वाड्मये । यं पश्यंत्यमलात्मान आकाशमिव केवलम् ॥३४॥
भो भो स्वामी चक्रायुधा । नेणोनि तुझिया वास्तव बोधा । बाण समरीं पावला युद्धा । ऐश्वर्य प्रबुद्धा हें न वटे ॥२३॥
कां पां चित्र हें नव्हे म्हणसी । तरी ऐकावें इयेविशीं । तुझें गूढत्व शब्दब्रह्मासी । म्हणोनि वेदासी मौनमुद्रा ॥२४॥
नामरूपवाच्यमान । वाङ्मयब्रह्मीं तच्छंसन । तूं अनाम अरूप अवाच्य पूर्ण । ब्रह्मनिर्गुण अविषय ॥३२५॥
नाम रूप करणविषय । ध्येय चिंत्य मनोविषय । तूं अचिंत्य अप्रमेय । ब्रह्म वाङ्मय न प्रकटी ॥२६॥
ज्ञानगम्य जें जें झालें । नेति मुखें तें निगमीं त्यजिलें । अगम्य अगोचर ब्रह्म उरलें । गूढ राहिलें निगमींही ॥२७॥
अगोचर कैसें म्हणसी जरी । तरी परंज्योति या श्रुतिनिर्धारीं । ज्योतिषांतेंही प्रकाशकारी । स्वप्रकाश स्वतः सिद्ध ॥२८॥
सूर्यप्रमुखें ज्योतिर्मयें । तूतें प्रकाशूं शकती काये । तवाङ्गप्रभेच्या अन्वयें । ज्यांची सोय जग जाणें ॥२९॥
यालागीं परंज्योतिपदें । वाङ्मय ब्रह्म तूंतें वदे । तरी कैं भजती योगिवृंदें । प्रतीति नांदे त्यां कैसी ॥३३०॥
ब्रह्मप्रतीतिगोचर नाहीं । तरी नास्तिक्य सर्वां ठायीं । ऐसें न म्हणें शेषशायी । हेतु तद्विषयीं अवधारीं ॥३१॥
विशुद्धमानस जे अमलात्मे । ज्यातें पाहती अमळप्रेमें । केवळ आकाशाचिये प्रतिमे । अभ्यासनियमें अनुभविती ॥३२॥
एवं निर्गुणस्वरूप ज्ञान असो । सर्वांसी अगम्यमान । विराटविग्रह लीलेकरून । धरिला सगुण तो न कळे ॥३३॥
सगुण असोनि कां पां न कळे । तरी ऐकावें अंबुदनीळें । उदुंबरवृक्षासि अनेक फळें । जंतु मोकळे फळगर्भीं ॥३४॥
उदुंबरफळांत अंतर्वतीं । मशकां गोचर तत्प्रतीति । अनेक फळगर्भीची ज्ञप्ति । ते त्यांप्रति अगोचर ॥३३५॥
एवं महदल्पकपर्यायें । विराटरूप श्लोकद्वयें । वाखाणूनि स्तविता होये । तें कुरुरायें परिसावें ॥३६॥
नाभिर्नभोऽग्निर्मुखमंबु रेतो द्यौः शीर्षमाशाः श्रुतिरंघ्रिरुर्वी ।
चंद्रो मनो यस्य दृगर्क आत्मा अहं समुद्रो जठरं भुजेन्द्रः ॥३५॥
रामानि यस्यौषधयोंऽबुवाहाः केशा विरिंचो धिषणा विसर्गः ।
प्रजापतिर्हृदयं यस्य धर्मः स वै भवान्पुरुषो लोककल्पः ॥३६॥
शिव म्हणे तव सगुण रूप । महत् म्हणिजे समष्टिकल्प । त्यांमाजी आम्ही व्यष्टि अल्प । मशकरूप उदुंबरीं ॥३७॥
अखिल ब्रह्माण्डमय समष्टि । त्यामाजी जीव अल्प व्यष्टि । जीवां केंवि तुझी गोष्टी । अवगमे दृष्टी साकल्यें ॥३८॥
समष्टिस्वरूप म्हणसी कैसें । वेदें विवरण केलें जैसें । तेंचि तुझिया कृपावशें । स्तवनमिषें निरोपितों ॥३९॥
तुझा नाभि म्हणिजे गगन । वैश्वानर तुझें वदन । तुझें रेत तें जीवन । बीज संपूर्ण त्रिजगाचें ॥३४०॥
सुरलोक तें उत्तमाङ्ग । तुझे श्रवण ते दिग्विभाग । चरण केवळ हा भूभाग । नेत्र भग सोम मन ॥४१॥
आत्मा म्हणिजे अहंकार । तो प्रत्यक्ष मी शङ्कर । बाहु तुझे सर्व इंद्र । लोकेश्वर पृथक्त्वें ॥४२॥
समुद्र जठर ओषधि रोम । मेघ ते मस्तकींचे केशोद्गम । चिरंचि तव बुद्धीचें नाम । विसर्गाराम प्रजापति ॥४३॥
अपान मलोत्सर्ग निरृति । तुझें हृदय धर्ममूर्ति । एवं ब्रह्माण्ड अवयवव्यक्ति । लोकप्रतीति लोकात्मा ॥४४॥
आत्मा म्हणिजे तें शरीर । एवं अवघें सचराचर । व्यष्टि जीवलोकाकार । समष्टि समग्र तूं एक ॥३४५॥
जरी तूं म्हणसी परमेश्वरा । प्रादेशमात्र मम शरीरा । माजी पवाड चराचरा । केंवि हे गिरा बोलतसां ॥४६॥
प्रादेशमात्र शरीर सान । त्याची नाभि म्हणतां गगन । दिशा श्रोत्र सूर्य नयन । चंद्रमा मन केंवि घडे ॥४७॥
तरी ऐकें गा अकुंठधामा । तुझी अच्युत स्वरूपगरिमा । स्वधर्मसेतुरक्षणकामा । पुरुषोत्तमा अवतरसी ॥४८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 10, 2017
TOP