अध्याय ३६ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
ततो मुष्टिकचाणूरशलतोशलकादिकान् । अमात्यान्हस्तिपांश्चैव समाहूयाऽह भोजराट् ॥२१॥
केशी धाडूनि व्रजापति । मागें कंसें विवरूनि चित्तीं । रामकृष्णांच्या घाताप्रति । अभिनव युक्ति आदरिली ॥६९॥
मुष्टिक चाणुर शल तोशल । महाप्रतापी प्रचंड मल्ल । आणि अमात्य बुद्धिकुशल । हस्तिपाळ प्राणसखा ॥१७०॥
पाचारूनि ऐसियां चतुरां । करूनि एकांतीं बैसकारा । भोजेंद्र सांगे गुह्य विचारा । कुरुनरेंद्रा तो ऐकें ॥७१॥
भो भो निशम्यतामेतद्वीरचाणूरमुष्टिकौ । नंदब्रजे किलाऽसाते सुतावानकदुंदुभेः ॥२२॥
अमात्यां अंबष्ठां आणि मल्लां । मुष्टिकचाणूरशलतोशलां । कंस संबोधी बुद्धिकुशलां । कितवां खळां कुटिळांतें ॥७२॥
अहो ऐकिलें कीं अपूर्व । केवढा कपटी हा वसुदेव । येणें दावूनि स्नेहभाव । केलें लाघव तें ऐक ॥७३॥
सप्तम देवकीगर्भ च्यवला । ऐसा शब्द रूढ केला । रोहिणीपुत्र वाखाणिला । गोकुळा नेला कैवाडें ॥७४॥
अष्टम गर्भाचिये वेळे । दोघें असतां बंदिशाळे । कैसें कैवाड केलें कुटिळें । कोणा न कळे तें वर्म ॥१७५॥
पुत्र झाला देवकीउदरीं । कन्या जन्मली नंदाघरीं । दोघी प्रसूत एके रात्रीं । कोणे प्रकारीं या नकळे ॥७६॥
यशोदे समर्पूनि निजकुमर । कन्या आणिली अतिसत्वर । सर्वां अलक्ष रचिला मंत्र । न कळे विचित्र हें कैसें ॥७७॥
द्वारपाळ दृढविश्वासी । सावध होती द्वारापासीं । आणि भंवते नगरवासी । होता यमुनेसि महापूर ॥७८॥
न कळे दुष्टाचें अंतर । संवचोराचा स्नेहविचार । माझा करावया संहार । व्रजीं कुमर लपविले ॥७९॥
आनकदुंदुभीचे ते सुत । नंदव्रजीं वाढती गुप्त । गवेषणार्थ प्रेरिले भृत्य । तिहीं ते समस्त मारिले ॥१८०॥
कर्मरेखा बळिष्ठ माझी । म्हणोनि नारद आला आजी । शत्रु वाढती नंदव्रजीं । हे गोष्टी सहजीं उमजविली ॥८१॥
वसुदेवाचा करितां घात । नारदें धरिला माझा हात । सांगितला नीतिवृत्तांत । न मारीं तत्सुत न वधितां ॥८२॥
मग वसुदेवाचा निग्रह केला । नंदव्रजा केशी गेला । पुढें मंत्र जाईल रचिला । तो तुम्हीं परिसिला पाहिजे ॥८३॥
रामकृष्णौ ततो मह्यं मृत्युः किल निदर्शितः । भवद्भ्यामिह संप्राप्तौ हन्येतां मल्ललीलया ॥२३॥
रामकृष्ण जे वसुदेवसुत । मज कारणें तेथूनि मृत्यु । अलोट विचार दैवकृत । कथिला निश्चित मुनीनें ॥८४॥
तरी ते येथें आलिया वरी । तुम्हीं वधावे माझे वैरी । मल्ललीलेची दावूनि परी । जनामाझारीं क्रीडार्थ ॥१८५॥
हें जरी मानेल तुमच्या मना । तरी मल्लरंगाची कीजे रचना । कलाकौशल्य युक्ति नाना । सावधाना अवधारा ॥८६॥
मंचाः क्रियंतां विविधा मल्लरंगपरिश्रिताः । पौरा जानपदाः सर्वे पश्यंतु स्वैरसंयुगम् ॥२४॥
कुशल शिल्पिक पाचारूनी । मल्लरंगाचिये स्थानीं । सभा कीजे विविधारत्नीं । स्तंभवितानीं अलंकृत ॥८७॥
मुख्य स्थानीं भद्रपीठ । रत्नरौक्ममंचक श्रेष्ठ । वीरअंगलग सुभट । तिहीं निकट असावें ॥८८॥
त्याहूनि अवरे अमात्यमंचा । भंवता परिधि यूथपतींचा । यथाधिकारें नागरिकांचा । बैसो जनांचा समुदाय ॥८९॥
ऊर्ध्वमाडिया जालंधरें । तेथ बैसिजे अंतःपुरें । नागरी स्त्रिया सह लेंकुरें । पृष्ठीं अंतरें प्रजांचिया ॥१९०॥
एवं समस्त लहान थोर । आणूनि आनंदें निर्भर । मल्लरंग कौतुकाकार । सर्वीं सादर पहावा ॥९१॥
मल्लयुद्धें क्रीडापरें । पाहोत नरनारीलेंकुरें । आपुलाल्या यथाधिकारें । मंचांतरें बैसोनी ॥९२॥
ऐसी अमात्यां करूनि आज्ञा कंस हस्तिपा करी सूचना । तें तूं ऐकें मात्सीरमणा । अभिमन्युनंदना परीक्षिति ॥९३॥
महामात्र त्वया भद्र रंगद्वार्युपनीयताम् । द्विपः कुवलयापीडो जहि तेन ममाऽहितौ ॥२५॥
कंस म्हणे गा अंबष्ठा । हस्तिपांमाजि परम श्रेष्ठा । मल्लरंगाचिया दारवंठा । करीं पैठा महागज ॥९४॥
कुवलयापीड नाम हस्ती । मदोन्मत्त जो भद्रजाति । ज्याचे तुलने ऐरावती । गौण भासे यवमानें ॥१९५॥
तो नेऊनि रंगद्वारीं । क्षोभवूनियां उभा करी । रामकृष्ण येतां वैरी । दोघे मारीं रगडोनी ॥९६॥
रामकृष्ण वासुदेवकुमर । केवळ विष्णूचे अवतार । माझे शत्रु परम क्रूर । मर्दीं कुंजर प्रेरूनी ॥९७॥
पूर्वीं कालनेमी दैत्य । तो मी हिरण्यकशिपुसुत । माझा विष्णूनें केला घात । मग जन्मलों येथ भोजकुळीं ॥९८॥
यामुनपर्वतीं माझिये माते । कपटें भोगिलें दृमल्य दैत्यें । हें रहस्य कथिलें तूंतें । येर सर्वांतें अप्रगट ॥९९॥
हरिवंशीं हा सविस्तर । कंसें स्वमुखें जन्मविचार । केला अंबष्ठा गोचर । अध्याय अवग्रपर्यंत ॥२००॥
रामकृष्ण द्वारा आंत । येतां द्वाःस्थीं द्वारें पिहित । करितां कोठें न लाहती पंथ । कीजे निःपात गजयोगें ॥१॥
इतुका हस्तिपा कथिला मंत्र । पुन्हा अमात्यांप्रति विचार । सांगे उत्साहरचनापर । ऐकें सविस्तर तो राया ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP