भगवानपि तद्वीक्ष्य गोकुलं भयविद्रुतम् । मा भैष्टेति गिराश्वास्य वृषासुरमुपाह्वयत् ॥६॥

ऐसे व्रजजन कृष्णा शरण । देखोनि कृष्णें ही संत्रस्तजन । गोकुळ भयभीत जाणून । अभय देवोन आश्वासी ॥६४॥
पळतां देखोन गोकुळासी । भिऊं नका हो म्हणे त्यांसी । मी असतां हृषीकेशी । कृतांतासी त्रासीन ॥६५॥
अरिष्टा उदेलें परमारिष्ट । म्हणोन प्रवेशला हा गोष्ठ । निमेषामाजी करीन पिष्ट । भोगील कष्ट कृतकर्में ॥६६॥
ऐसे व्रजजन आश्वासोन । अरिष्टा सम्मुख श्रीभगवान । करिता झाला आवाहन । गिरा गर्जोन साटोपें ॥६७॥

गोपालैः पशुभिर्मंद त्रासितैः किमसत्तम । बलदर्पहाऽहं बलदर्पहाऽहं दुष्टानां त्वद्विधानां दुरात्मनाम् ॥७॥

दुष्टांमाजी परम श्रेष्ठा । मूर्खा मंदमति अरिष्टा । गाईगोपांसीं कुचेष्टा । वृथा पुष्टां कां करिसी ॥६८॥
गाई गोपां संत्रासूनी । कोण पुरुषार्थ इच्छिला मनीं । तुजसारिख्या दुष्टदमनीं । चक्रपाणि मी सिद्ध ॥६९॥
दुष्टबळाचा निहंता । दुर्जनाचा दर्पहंता । दुरात्मयाची दुष्ट अहंता । मी संहर्ता श्रीकृष्ण ॥७०॥
मज नेणोनि गोपगाई । त्रासितां लज्जा न वाटे कांहीं । पुरुषार्थ वाहसी आपुले ठायीं । तरी सत्वर येईं सामोरा ॥७१॥
मी दुष्टांचा दमनकर्त्ता । तूं वाहसी दुष्ट अहंता । मजसी गांठी पडली आतां । कोण रक्षिता तुजलागीं ॥७२॥

इंत्यास्फोट्याच्युतोऽरिष्टं तलशब्देन कोपयन् । सख्युरंसे भुजाभोगं प्रसार्यावस्थितो हरिः ॥८॥

ऐसें बोलोनि कैटभारि । डावा बाहु उजव्या करीं । ठोकूनि आवेश प्रदीप्त करी । दुष्टाअंतरीं तलशब्दें ॥७३॥
तलशब्द तो बाहुध्वनि । तेणें करूनि अरिष्टमनीं । क्षोभ उपजवी जगद्योनि । समरांगणीं साटोपें ॥७४॥
सलंब बाहु भुजगापरी । संवगडियाच्या स्कंधावरी । पसरूनि उभा निर्भय हरि । दुराचारिहननार्थ ॥७५॥
स्वयें अच्युत जो अविनाश । करावया अरिष्टनाश । उभा राहिला सावकाश । त्रिजगा तोष यश गातां ॥७६॥

सोऽप्येवं कोपितोऽरिष्टः खुरेणावनिमुल्लिखन् । उद्यत्पुच्छभ्रमन्मेधः कुद्धः कृष्णमुपाद्रवत् ॥९॥

ऐसा क्षोभवितां अरिष्ट । तोही जात्या दैत्य दुष्ट । बळें क्षोभोनि उद्भट । झाला नीट समरंगीं ॥७७॥
खुरें उकरी अवनीतळ । पुच्छें विध्वंसी घनमंडळ । कृष्णावरी धांविला प्रबळ । यंत्रगोळ पैं जैसा ॥७८॥
क्रोधें क्षुब्ध जैसा भुजंग । कीं अनावर मार्गणवेग । तैसा धांविला अतिसवेग । कमलारंग लक्षूनी ॥७९॥

अग्रन्यस्तविषाणाग्रः स्तब्धासृग्लोचनोऽच्युतम् । कटाक्षिप्याद्रवत्तूर्णमिंद्रमुक्तोऽशनिर्यथा ॥१०॥

तीक्ष्ण शृंगाग्रें पैं दोन्ही । पुढें धरूनि शस्त्रस्थानीं । आरक्त लोचनें ज्वलित वहिन । स्तब्ध पक्ष्मणी न हालती ॥८०॥
क्रूर कटाक्षें वक्रदृष्टी । श्रीकृष्णाची अंगयष्टि । लक्षूनि धांवें दुष्ट हट्टी । अरिष्ट कपटी कुटिलात्मा ॥८१॥
इंद्रें प्रेरिला जैसा अशनि । वृत्रासुरावरी प्रज्वळोनी । कडकडाटें धांवे गगनीं । तैसा कृष्णीं संघटला ॥८२॥
केवळ क्रोधाब्धि अरिष्ट । क्षोभें लोटला अतिउद्भट । अगस्तितुल्य कंबुकंठ । उठिला घोंट भरावया ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP