श्रीगोविंदपरब्रह्मणे नमः ।
भवसुखरसिकां विरामकरणा । स्वरतिप्रद तूं स्वपादशरणा । श्रीगोविंद त्रिजगोद्धरणा । भवसंहरणा भगवंता ॥१॥
पावे उद्भव संभव । अकार मात्रा आविर्भव । जागृतिगोचरदृश्यभाव । भव हें नाम भ्रमजनित ॥२॥
तेथ भ्रमकर विषयाभास । रसिक रुचिकर तत्स्पर्शांश । श्रोत्रादिकां इंद्रियांस । चित्प्रकाश वश येणें ॥३॥
विवरूनि मुळींचीं निजात्मरूप । अधिष्ठूनि मनसंकल्प । विपरीतज्ञ सविक्षेप । करी साक्षेप भवभोगा ॥४॥
भवभोगाची रसालता । विभवें वाढवी विशाळता । इहामुष्मिका भवावर्त्ता - । माजि न निघतां परिभ्रमे ॥५॥
निघावयाची सेचि न करी । अधिकाधिक हव्यास धरी । रसाळ रसिक भवसुखलहरी । मानूनि भंवरी प्रिय भावी ॥६॥
मैंद मानूनि प्रियतम सखा । आप्त भावूनि पारिखा । आडवी वरपडिया मरणोन्मुखा । वांचवी देखा निग्रहणें ॥७॥
पाठी लागे बलात्कारें । मैंदा सहित धरूनि निकरें । फांसे दावूनि बोधितां खरें । विटें अंतरें तत्संगा ॥८॥
तेंवि रसाळ विषयाभास । इहामुष्मिकरूपीं क्लेश । कवळूनि करी आयुष्यनाश । तो चिदाभास गुरु बोधी ॥९॥
तीव्र व्रतांच्या पाउलीं । अविद्या अडवी फलाशाभुली । चालवूनियां फांसे घाली । मैंदावळी रिपुषट्क ॥१०॥
सपाश मैंद आणूनि बोधा । बळेंचि करूनि प्रवृत्तिरोधा । कृपेनें चुकवी वाटवंधा । काढी निषेधामाजूनि ॥११॥
ऐसा भवरसविरामकर । स्वबोध रुचवी अमृतोद्गार । स्वपादशरणां वज्रपंजर । भेद भयंकर निरसूनी ॥१२॥
स्वसंविद्बोधश्रीमंता । गोविंद तो तूं वेदवेत्ता । गोमय त्रिजगा परित्राता । अचिंत्यानंतैश्वर्यें ॥१३॥
तव पदप्रणतिवैभवलेश । वाहती त्रिजगीं सभाग्य दास । त्यांमाजि कनिष्ठ मी निःशेष । कृपेनें विशेष तोषवुनी ॥१४॥
भागवतींच्या दशमस्कंधा । बोधवावया अबळां मुग्धां । भाषाव्याख्यानप्रबोधा । कथिला धंदा आज्ञेनें ॥१५॥
समर्थाज्ञानुशासनें । एकादशिनीत्रयव्याख्यानें । श्रीपदपीठीं व्याङ्मयसुमनें । यथामतीनें अर्पिलीं ॥१६॥
आतां चतुर्थ एकादशिनी । क्रमें उपायिली व्याख्यानीं । तदर्थ सेवेसि हे विनवणी । श्रीपद वंदुनी कीजतसे ॥१७॥
परम दुर्बोध जेथींचा अर्थ । प्रज्ञा शंकी व्याख्यानार्थ । कृपापांगें स्वसामर्थ्य । आज्ञा समर्थ स्वामीची ॥१८॥
श्वफलकासि यमुनास्नान । करितां विश्वरूपदर्शन । देता झाला श्रीभगवान । तैं अगाध स्तवन तो करी ॥१९॥
तिये अक्रूरस्तवविवरणीं । धिषणारमण नुमली वाणी । म्हणोनि श्रीचरणीं विनवणी । वारंवार कीजतसे ॥२०॥
हें ऐकोनि नाभीकार । देती उचलूनि अभयकर । म्हणती स्तनपानाचा प्रकार । शंकेसी थार नसतांही ॥२१॥
पालनीं तत्पर असतां जननी । स्तनपा स्तन्यार्थ वृथाचि ग्लानि । तैसी सशंका हे विनवणी । तुज लागूनि स्फुरतसे ॥२२॥
आम्ही वसवूनि तुझिया हृदया । बोलवूं तें तें बोलावया । त्वां का शंका करणें वांया । अक्षय अभया जाणोनि ॥२३॥
हें ऐकोनि मौनें नयन । करूनि आदरिलें व्याख्यान । तेथ श्रोतीं सावधान । अनुक्रमणिका परिसावी ॥२४॥
यात्रार्थ अंबिकावनीं बल्लव । अजगरें गिळितां नंदराव । त्यासि सोडवि वासुदेव । हा प्रथमाध्याय चौतिसावा ॥२५॥
पंचतिसाव्या माजि गोपिका । परस्परें युग्मश्लोका । वर्णिती कृष्णाच्या कौतुका । वियोगदुःखा निरसावया ॥२६॥
छत्तिसीं वधिलें अरिष्टासी । तंव इकडे नारद कंसापाशीं । कथितां रामकृष्ण व्रजनिवासी । तो केशी अक्रूरासी पाठवी ॥२७॥
कृष्णें केलें केशिहनन । तंव नारद पातला मथुरेहून । तेणें केलें भावें स्तवन । व्योमनिबर्हण सदतिसावा ॥२८॥
कृष्णध्यानें एकनिष्ठ । अक्रूर गोकुळीं प्रविष्ट । रामकृष्णीं तो पूजिला प्रकट । सुखसंतोष अडतिसावा ॥२९॥
रामकृष्ण जातां मथुरे । विविध गोपींचीं स्निग्धांतरें । एकुणचाळिसीं देखिला अक्रूरें । विष्णुलोक यमुनेंत ॥३०॥
चाळिसाव्यामाजि अक्रूर । जाणूनि कृष्ण हा ईश्वरेश्वर । सगुण निर्गुण द्विप्रकार । स्तवी साचार नमूनियां ॥३१॥
एकेताळिसामाजि हरि । मथुराप्रवेशीं रजका मारी । तंतुवाय सुदामा नामधारी । वर दे हरि त्या तोषें ॥३२॥
बेताळिसाव्या अध्यायांत । कुब्जा केली लावण्ययुक्त । धनुष्यभंगरक्षकघात । कंस सचिंत तछ्रवणें ॥३३॥
त्रेताळिसावा कुवलयापीड । मर्दूनि रंगीं शिखंडकचूड । चाणूरेंशीं सम अपाड । बोले कैवाड मधुरोक्ति ॥३४॥
चव्वेताळिसाव्या अध्यायीं । समल्ल कंसा वधिलें पाहीं । कंसस्त्रिया शेषशायी । बोधूनि पितरां भेटला ॥३५॥
एवं चतुर्थ एकादशिनी । विदित इत्यादि निरूपणीं । श्रोतीं सावध होइजे श्रवणीं । हे विनवणी सेवेसी ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP