अध्याय २५ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तत्र प्रतिविधिं सम्यगात्मयोगेन साधये । लोकेशमानिनां मौढ्याद्धरिष्ये श्रीमदं तमः ॥१६॥
तैसा गोकुळीं इंद्रयाग । सांवत्सरिक घे निजभाग । तो वर्जितां मी श्रीरंग । करीन मदभंग शक्राचा ॥१३॥
त्रिदशपूज्यता अभिमानी । स्वराज्यपदवी अमरभुवनीं । विश्वनियंता ऐसें मानी । मौनें न मनूनि मज ईशा ॥१४॥
तेथ या इंद्रकृत्याचा भंग । स्वयें करीन मी श्रीरंग । तेव्हां अपयशाचा डाग । पावेल अंग शक्राचें ॥११५॥
मज रक्षितां ऐश्वर्यशक्ति । इंद्र बापुडे वर्षेल किती । श्रीमदगर्वतमोऽपहति । तैं अपयशःप्राप्ति तयासी ॥१६॥
स्वसंभावना मूर्खपण । त्यापासूनि श्रीमदाज्ञान । मी निजात्मयोगें व्रज रक्षून । करीन मदभग्न शक्रातें ॥१७॥
ऐसेचि जे जे पदाभिमानी । यमवरुणादि क्रमेंकरूनी । त्यांची करीन मदझाडणी । हा सूचवी ध्वनि बहुवचनें ॥१८॥
गोपवृद्ध हो मानाल मनीं । सत्वें सुकृती देवयोनि । पाविजे ते भक्तगणीं । मदझाडणी त्यांची कां ॥१९॥
ऐसी आशंका सहसा न कीजे । सत्त्वसंपन्न मद्भक्त जे जे । पदाभिमान त्यां सहसा नुपजे । येर कवळिले रजें मदगर्वीं ॥१२०॥
न हि सद्भावयुक्तानां सुराणामीशविस्मयः । मत्तोऽसतां मानभंगः प्रशमायोपकल्पते ॥१७॥
निष्काम अनन्य माझ्या ठायीं । सत्त्वसंपन्न भजतां पाहीं । भोगवासना उठतां कांहीं । मी लवलाहीं त्यां वोपीं ॥२१॥
सकाम कर्मठ विविधा यज्ञीं । यजितां वरपडे होती विघ्नीं । अल्प वासना मद्भक्तगणीं । मी जाणोनि पुरवीतसें ॥२२॥
मदाराधन ध्रुवें केलें । निष्काम विरागें आराधिलें । वासनाबीज जाणोनि पहिलें । म्यां वोपिलें ध्रुवपद ॥२३॥
परी तो अढळपदींही सहसा । पदाभिमानाच्या न धरी लेशा । सुरासुरांच्या देखे क्लेशा । परी न पडे फांसा सत्त्वांच्या ॥२४॥
बळीनें इंद्रपदाच्या लोभें । ब्राह्मण अर्चिले मम वालभें । त्यासि मी वधूं न शकें क्षोभें । सप्रेम प्रभे भुलविलें ॥१२५॥
सुरकार्यार्थ छलना करूं । नटोनि वटुत्वें लेंकरूं । गेलों तव तो भजनें सधर । दानें समग्र अर्पिला ॥२६॥
तेव्हांचि कैवल्य तया जोगें । परी पूर्वील इंद्रपदेच्छाभोगें । कवळिला होता तें मी आंगें । द्वारीं जागें पुरवावया ॥२७॥
या इंद्राचें सुकृत वेंचे । तंववरी द्वार राखीन त्याचें । मग बळीसी इंद्रपदींचें । ऐश्वर्य साचें वोपीन ॥२८॥
ऐसे अनेक भक्तजन । सूक्ष्मवासनेस्तव सुरगण । जाले तथापि पदाभिमान । अणुप्रमाण न शिवे त्यां ॥२९॥
त्यांसि नाहीं सुरलोकीं । सप्रेम मद्भक्ति ठावुकी । भजनीं पडों नेदिती चुकी । निर्जरसुखीं विरक्त ॥१३०॥
ऐसे अपार माझे भक्त । पदाभिमानें अनुन्मत्त । सुरश्रियेसी नित्य विरक्त । विवेकवंत मत्प्रेमें ॥३१॥
ते शुद्धसत्त्वाचे निखळ । सुरपदींही वैराग्यशीळ । माझ्या ठायीं सप्रेमळ । मानिती किडाळ ऐश्वर्य ॥३२॥
अभेदप्रेमाचिया सुखा - । वरूनि कुरवंडिती पियुखा । शक्रपदादि वरिष्ठलोकां । भेद नरकासम म्हणती ॥३३॥
मी तयाचा आज्ञाधर । किंवा सबाह्य अभ्यंतर । प्रेमें कवळूनि निरंतर । तिष्ठें सादर सर्वदा ॥३४॥
आतां सकामरजें मिश्रित । करूनि यज्ञादिसुकृत बहुत । पदाभिमानी जे उन्मत्त । परी मद्भक्त म्हणविती ॥१३५॥
भूतमात्रीं माझी वसति । ते ते उन्मत्त नोळखती । पदाभिमानें गर्व धरिती । तुच्छ मानिती त्रिजगातें ॥३६॥
जैसा सामान्य माण्डलिक । नमनी नृपाचा मुद्रांक । राजा त्याचा भंगूनि तवक । करूनि सेवक वोळगवी ॥३७॥
तैसे उन्मत्त अमरगणीं । असदैश्वर्यें पदाभिमानी । त्यांसि प्रशम मजपासुनी । सुखालागूनि भेटवी ॥३८॥
बाळ आचरे अन्यायकरणी । माउली प्रवर्ते तत्ताडनीं । दुर्मति भंगोनि योजी गुणीं । तेंवि सुरगणीं मम दंड ॥३९॥
तस्मान्मच्छरणं गोष्ठं मन्नाथं मत्परिग्रहम् । गोपाये स्वात्मयोगेन सोऽयं मे व्रत आहितः ॥१८॥
तस्मात् इंद्राचा पदाभिमान । श्रीमदेंशीं प्रतापभग्न । करूनि गोकुळ मदेकशरण । संरक्षीन निजयोगें ॥१४०॥
मीचि नाथ यांचे शिरीं । परिग्रहरूपें यां मी हरि । त्राता रक्षिता कैवारी । नाहीं भवपूरीं मजवीण ॥४१॥
भंगीन इंद्राचा पदाभिमान । गोकुळ रक्षीन मदेकशरण । हा म्यां संकल्प वरिला पूर्ण । मिथ्या कोण करूं शके ॥४२॥
ऐसें विवरूनि अंतरीं । मायालाघवें श्रीहरि । चमत्कारें अद्भुत करी । तें अवधारीं कुरुभूपा ॥४३॥
इत्युक्त्वैकेन हस्तेन कृत्वा गोवर्धनाचलम् । दधार लीलया कृष्णश्र्छत्राकमिव बालकः ॥१९॥
ऐसा बोलोनि निजसंकल्प । गोवर्धनाद्रि मन्मथबाप । गरिष्ठ जैसा वज्रकल्प । उचली अल्पतूळप्राय ॥४४॥
प्रचंड गोवर्धनाचळ । लीलेंकरूनि श्रीगोपाळ । धरिता झाला व्रजवत्सल । सव्यकरतळ उभवूनी ॥१४५॥
पर्जन्यकाळीं वारुळावरी । वर्तुळ उगवे छत्राकारीं । तें छत्राक जैसा बाळक धरी । तेंवि मुरारि अचलातें ॥४६॥
हरिमायेची अगाध करणी । पर्वतातळवटीं समान धरणि । पटुतर गोष्ठसंरक्षणीं । केली ते क्षणीं ऐश्वर्यें ॥४७॥
वर्षोपल वात हिम । देऊं न शकती कोणा श्रम । भू विस्तीर्ण अतिउत्तम । जेथ विश्राम सर्वांसी ॥४८॥
एक्या हातें धरूनि शैल । तळीं निर्मूनि ऐसें स्थळ । जळें त्रासलें गोकुळ सकळ । तेथ गोपाळ प्रवेशवी ॥४९॥
अथाऽऽह भगवान् गोपान् हेंऽब तात व्रजौकसः । यथोपजोषं विशत गिरिगर्तं सगोधनाः ॥२०॥
परमनिर्भय निर्मूनि स्थळ । म्हणे गोपांतें गोपाळ । गोधनें सहित कुटुंबमेळ । येथ सकळ प्रवेशा ॥१५०॥
इंद्रासि वोपूनि अपयश । अव्याहत मिरवे यश । विजालक्ष्मीस्वप्रकाश । यालागीं श्रीश श्रीपति ॥५१॥
इंद्रें करितांही अपकार । त्याचा भंगोनि श्रीमद घोर । करी अनुग्रह उदार । दामोदर औदार्यें ॥५२॥
गोपगोपीगोधनांसी । अभय वोपी हृषीकेशी । पर्वतातळीं विश्रांतीसी । औदार्येशीं प्रवेशवी ॥५३॥
सर्वज्ञपणें रमाकांत । जाणे सर्वांचें मनोगत । म्हणोनि भंगी इंद्रकृत्य । व्रज निवांत संरक्षी ॥५४॥
देहबुद्धीवरी उदास । परम विरक्त कृष्ण परेश । म्हणोनि नाठवी इंद्रदोष । भंगोनि मदास अनुग्रही ॥१५५॥
अखिलैश्वर्यसमर्थ । चराचरात्मा कृष्णनाथ । सर्वभूतांच्या कल्याणार्थ । करी यथार्थ प्रतिज्ञा ॥५६॥
धरापांसूंची ढेंपुळी । ज्याच्या ऐश्वर्यें न विरे जळीं । अर्णवोदक न शोषे अनळीं । पावका न गिळी प्रभंजन ॥५७॥
सच्छिद्र शून्य अवघें गगन । असतां न गिळी प्रभंजन । ज्यांचें ऐश्वर्यशासन । शकती कोण उल्लंघूं ॥५८॥
तेणें उचलूनि गिरिवर । सव्यहस्तें धरिला सधर । मग व्रजौकसें समग्र । प्रार्थूनि सत्वर प्रवेशवी ॥५९॥
अहो अंब अहो ताता । म्हणे व्रजौकसां समस्तां । महावृष्टीची सांडूनि चिंता । हे गिरिगर्ता वसवावी ॥१६०॥
कुटुंब गोधनें समुदाव । सहित पदार्थ नावेंनांव । ज्यांसी पाहिजे तितुका ठाव । तिहीं तो स्वयमेव आवरिजे ॥६१॥
गुरें वांसुरें लेंकुरें । ग्रहसामग्री पशूंचे चारे । घेऊनि प्रवेशिजे अत्यादरें । आज्ञाउत्तरें माझिया ॥६२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP