एषां श्रियाऽवलिप्तानां कृष्णेनाध्मायितात्मनाम् । धुनुत श्रीमदस्तंभं पशून्नयत संक्षयम् ॥६॥

म्हणे अहो संहारघन । व्रजीं प्रळयजळें वर्षोन । नंदादिगोपांचा श्रीमद भग्न । करा संपूर्ण पशुनाशें ॥५४॥
श्रीमदें मातले हे गोप । कृष्णें वचनें दिधली वोप । म्हणोनि माझा यज्ञलोप । केला दर्प वाढवुनी ॥५५॥
यांचा दर्प नेइजे लया । गोधनें पाववूनियां क्षया । मीही येतसें सहाया । ऐरावता वळघोनी ॥५६॥
प्रथमश्लोकीं अन्वयार्थ । उल्लेख कथिला तोचि येथ । श्लोकामाजि प्रकटी अर्थ । मुनिसमर्थ तें ऐका ॥५७॥

अहं चैरावतं नागमारुह्यानुव्रजे व्रजम् । मरुद्गणैर्महावीर्यैर्नंदगोष्ठजिघांसया ॥७॥

म्हणाल गोपांशिरीं श्रीकृष्ण । असतां न चले आंगवण । तरी ऐरावतीं आरूढोन । येतों मागून सवेग मी ॥५८॥
मरुद्गण महाक्रूर । सवें घेऊनि निर्जरवीर । नंदगोष्ठाचा संहार । करूं सत्वर क्षोभोनी ॥५९॥
ऐसा जाणोनि निश्चय । न धरूनि कृष्णकैपक्षभय । करा नंदगोष्ठाचा क्षय । महाप्रळयमेघ हो ॥६०॥
मी असतां पाठीवरी । कृष्ण मानवी काय करी । वर्षोनियां मुसळधारीं । क्षणामाझारीं व्रज भंगा ॥६१॥

श्रीशुक उवाच - इत्थं मघवताऽऽज्ञप्ता मेधा निर्मुक्तबंधनाः । नंदगोकुलमासारैः पीडयामासुरोजसा ॥८॥

ऐसें इंद्रें आज्ञापून । मुक्त केला मेघगण । तेणें सवेग व्यापिलें गगन । करिती गर्जन भयानक ॥६२॥
नाना अभ्रांचे उमाळे । काळे निळे अरुण धवळे । मिश्र उठती एके काळें । तेणें झांकोळे रविप्रभा ॥६३॥
महाप्रतापें नंदगोष्ठ । धारा वर्षोनि दिधले कष्ट । पीडा पावविली यथेष्ट । तें ऐकें स्पष्ट नृपोत्तमा ॥६४॥

विद्योतमाना विद्युद्भिः स्तनंतः स्तनयित्नुभिः । तीव्रैर्मरुद्गणैर्नुन्ना ववृषुर्जलशर्कराः ॥९॥

नभेंसहित दिग्मंडळ । झांकूनि दाटलें अभ्र सजळ । माजि विद्युल्लता चपळ । तरळ बहळ झळकती ॥६५॥
भरोनि नभाचा अवकाश । विद्युल्लतांचा प्रकाश । दाटतां प्राणी पावती त्रास । भयें नेत्रांस झांकिती ॥६६॥
प्रळय तेजाच्या सागरीं । अपार उठती कल्लोळ लहरी । तैशा विद्युल्लतांच्या हारी । चमत्कारीं चमकती ॥६७॥
अकस्मात कडकडाडीं । एकविसां स्वर्गांची उतरंडी । कोसळे तैसी गर्जना गाढी । गाजे ब्रह्मांडीं भीकर ॥६८॥
सहस्रावधि तडाग फुटती । जैशीं प्रळययंत्रें सुटती । भयें प्राणी मूर्च्छित होती । कल्पान्त म्हणती बुध विबुध ॥६९॥
सातसातांचा एक गण । सात सप्तकें एकोणवन्न । आवहप्रवहादि ज्यां अभिधान । तें मरुद्गण क्षोभले ॥७०॥
गगनींहूनि पडतां पाणी । वरिच्यावरी उडविती गगनीं । त्या कडकडाटें उठती ध्वनि । नभभाजनीं नसमात ॥७१॥
सौधींहूनि भांडें पडे । प्रतिसोपानीं आदळे उडे । सप्त मरुद्गण तेणें पाडें । मेघगडाडें गाजविती ॥७२॥
पवनसाट सीतळ सबळ । लागतां गगनीं गोठे जळ । गारा होऊनि वर्षती स्थूळ । तेणें भूतळ आच्छादे ॥७३॥
चंडवायुझडझडाट । विद्युल्लताकडकडाट । शिळा रिचवती उद्भट । दुःखें संकट स्थिरचरां ॥७४॥
निगम गिंवसितां सागरीं । मत्स्यविग्रहें जैसा हरि । अंगचालनें उडवी वारि । तें भूवरी जेंवि परते ॥७५॥
कीं कल्पान्तीं महाप्रचंड । दिग्गजांचे शुंडादंड । धारा वर्तती तेंवि अखंड । सर्व ब्रह्मांड बुडवावया ॥७६॥
तेंवि न धरत अनावरा । गगनीं अखंड प्रचंड धारा । माजि काश्मीरासारिख्या गारा । महाथोरा रिचवती ॥७७॥

स्थूणास्थूला वर्षधारा मुंचत्स्वभ्रेष्वभीष्णशः । जलौघैः प्लाव्यमाना भूर्नादृश्यत नतोन्नतम् ॥१०॥

अनिलजलोपलेंशीं जळ । भूमीपासूनि नभोमंडला । भरोनि वर्षतां एकवेळ । निम्न उतळ लक्षेना ॥७८॥
गगनगंगांचे लोतले लोट । किंवा फुटला रोदसीघट । कीं विराला ब्रह्मांडमठ । आवरणोदकीं प्रळयान्तीं ॥७९॥
जळप्रवाहीं बुडाली धरा । निम्न अनिम्न अगोचरा । उपमे साम्य गमे सागरा । मोडला थारा सत्त्वांचा ॥८०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP