अध्याय २१ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दृष्ट्ववाऽऽतपे व्रजपशून् सहरामगोपैः संचारयन्तमनुवेणुमुदीरयन्तम् ।
प्रेमप्रवृद्ध उदितः कुसुमावलीभिः सख्युर्व्यधात् स्ववपुषांबुद आतपत्रम् ॥१६॥
कृष्णरंगीं रंगला मेघ । शीलसद्गुण न वंची आंग । सबाह्य कृष्णीं अर्पूनि चांग । भजन साङ्ग संपादी ॥४३॥
रामगोपेंशीं धेनुप्रति । वनीं संचरतां श्रीपति । तदनुलक्ष्यें वेणुगीति । करी विश्रांति त्रिजगातें ॥४४॥
तेव्हां तीव्र तपे उष्ण । तें देखोनि सदय घन । करी जो विश्वार्तिनाशन । वेंचूनि जीवन आपुलें ॥२४५॥
कृष्ण जनार्तिहरणशील । विद्युद्वसनी कांति सुनील । इत्यादि समसाम्यें दयाळ । मेघ केवळ हरिसख ॥४६॥
अपौल्या सख्यातें देखोनी । झणें तापेल तीव्र उष्णीं । म्हणोनि अंतरीं कळवळूनी । मेघ गगनीं प्रकटला ॥४७॥
सप्रेमभरें कृष्णावरी । सुरसुमनांची वृष्टि करी । अथवा शीतळ कुसुमापरी । अमृततुषारी वर्षत ॥४८॥
छत्र होवोनि आपण । करी आतपनिवारण । अनुलक्षूनि वेणुगान । करी गर्जन मंदतर ॥४९॥
ऐसा सबाह्य सेवितां कृष्ण । कृष्णमयचि झाला घन । कृष्णप्रेमाथिला धन्य । आम्ही हीन अभाग्या ॥२५०॥
ऐशा विरहें गोपी तप्त । आपणां अभिमानें निंदित । आम्हांहूनि भाग्यवंत । म्हणती किरातकामिनी ॥५१॥
पूर्णाः पुलिंद्य उरुगायपदाब्जरागश्रीकुंकुमेन दयितास्तनमंडितेन ।
तद्दर्शनस्मररुजस्तृणरूषितेन लिंपन्त्य आननकुचेषु जहुस्तदाधिम् ॥१७॥
कैशा सभाग्य पुलिंदवनिता । तरी त्या ऐका हो तत्त्वता । कृष्णांघ्रिकुंकुमरागलिप्ता । होऊनि मन्मथा परिहरिती ॥५२॥
कृष्णांघ्रिकुंकुम त्यां कैं प्राप्त । म्हणाल तरी ते ऐका मात । कृष्ण केवळ कमलाकांत । प्रिय एकांत ते भोगी ॥५३॥
कमलाकुचीं कुंकुमलग्न । तिहीं करितां पटमर्दन । कुंकुमें रंगले कृष्णचरण । तेणें अरुणभा तळवां ॥५४॥
तदुपरि दयिता सप्रेमळा । कुंकुममंडितकुचमंडळा । मर्दिती श्रीकृष्णचरणकमळां । सुरतवेळा स्वानंदें ॥२५५॥
उरुगाय म्हणिजे विशाळकीर्ति । त्या कृष्णाची लावण्यमूर्ति । तळवां स्वयंभ माणिक्यकांति । ते जडली ज्योति कुंकुमा ॥५६॥
कमलादयिताकुंचमंदल । कृष्णचरणयोगें अरुण । तिहीं चरणीं फिरतां वन । तृणीं संलग्न कुंकुम तें ॥५७॥
इत्यादि लक्षणीं उपयुक्त । कुंकुम देखूनि तृणरूषित । पुलिंदवनिता मन्मथतप्त । प्रेमें लेपिती कुचवदनीं ॥५८॥
कामज्वराचें उपशमन । कृष्णचरणींचें कुंकुम जाण । घेऊनि चर्चिती स्तनआनन । आनंदोन त्या निवती ॥५९॥
कामज्वरें कुच तापले । हरिपदकुंकुमें विलेपिले । व्यथा सांडोनि विज्वर झाले । मनोरथ फळले तयांचे ॥२६०॥
यास्तव धन्य पुलिंदवनिता । हरिपदप्रसाद झाल्या प्राप्ता । आम्ही विरहिणी कंदर्पतप्ता । जन्मोनि वृथा भूभार ॥६१॥
कृष्णपदप्रसादलेश । लाहोनि न पवोंचि संतोष । आम्हांहूनि भाग्य विशेष । पुलिंदवनिता भोगिती ॥६२॥
तंव आणखी गोपी हर्षें । म्हणती प्रेमाच्या उत्कर्षें । गोवर्धनही कृष्णदास्यें । भाग्यविशेषें रंगला ॥६३॥
हन्तायमद्रिरबला हरिदासवर्यो यद्रामकृष्णचरणस्पर्शप्रमोदः ।
मानं तनोति सहगोगणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसकंदरकंदमूलैः ॥१८॥
हरिदासवर्गामाजीं श्रेष्ठ । गोवर्धनचि परमवरिष्ठ । रामकृष्णीं एकनिष्ठ । प्रेम उत्कृष्ट तच्चरणीं ॥६४॥
चरणस्पर्शें पावला मोद । तृणोद्गमादि रोमांच विशद । प्रस्रवोदकाचे बाष्पबिंदू । पाझर स्वेदसमसाम्य ॥२६५॥
सभाग्यमहिमा इत्यादि चिह्नीं । कृष्णचरणस्पर्शें करूनी । विस्तारी जो आनंदोनी । हृदयभुवनीं सर्वदा ॥६६॥
भाग्यें आपुल्या स्थळाप्रति । गोगोपेंशीं रामश्रीपति । आले जाणोनि सप्रेमभक्ति । पूजनादि सादर ॥६७॥
गोधना तर्पी पानीयतृणीं । कंदमूळफळभोजनीं । गोप बळराम चक्रपाणि । अवंचकपणीं अर्चित ॥६८॥
आपुलिये कंदरदेशीं । वसती गोपी विश्रांतीसी । कंदरोद्भवां उपचारांसी । सहसा कोणासि न वंची ॥६९॥
मृगपक्ष्यादिवनचरश्रेणी । कुटुंबपोष्यें पंक्तीसि आणी । अनन्यभावें श्रीकृष्णचरणीं । गिरि सद्गुणी हा धन्य ॥२७०॥
आनन्यभावें भेदरहित । वैर विसरला समस्त । जड होत्साता सद्भाववंत । धन्य हरिरत गिरिवर हा ॥७१॥
तंव आणिकी म्हणती गोपरामा । हा सखिया हो विचित्रमहिमा । पैल स्थावरां जंगमां । विपरीत कर्मा प्रकाशी ॥७२॥
गा गोपकैरनुवनं नयतोरुदारवेणुस्वनैः कलपदैस्तनुभृत्सु सख्यः ।
अस्पंदनं गतिमतां पुलकस्तरूणां निर्योगपाशकृतलक्षणयोर्विचित्रम् ॥१९॥
गाई गोपाळ घालोनि पुढें । मागें राम कृष्ण निज गडे । वनीं उपवनीं चारितां कोडें । पाहती निवाडें जे प्राणी ॥७३॥
कोमल पदांचे विन्यास । मधुरवेणुगायन सुरस । सेवितां ताटस्थ्य जंगमास । स्थावरांस चंचलता ॥७४॥
जंगम जे जे प्राणिमात्र । कृष्णक्रीडारसाचें पात्र । होतां सेविती सन्मात्र । बाह्य गात्र अचेष्ट ॥२७५॥
लांचावतां वेणुस्वरीं । वृत्ति उपरमे माघारी । इंद्रियें सप्राण अंतरीं । निर्विकारी मन होय ॥७६॥
मग ते सुषुप्ति गाढमूढ । कीं शुष्कद्रुमाचें लांकूड । तैसें देह अचेष्ट जड । होती गूढ हरिरूपीं ॥७७॥
तैशाचि स्थावरवृक्षादि याति । वेधतां श्रीकृष्णवेणुगीतीं । अंतरीं द्रवोनियां झरताती । सत्त्ववृत्ति बाष्पांबु ॥७८॥
पर्णीं थरकती तरुवर । तेचि स्वानंदरोमांकुर । इत्यादि अष्टभावप्रकार । जड स्थावर प्रकटिती ॥७९॥
हें व्हावया काय कारण । पैल पहा हो उपलक्षण । मस्तकीं निर्योगवेष्टन । ऐका विवरण पैं त्याचें ॥२८०॥
धेनु खडाणा नाटोपती । धीट सैराट चौताळती । केवळ मनाच्या चंचळ वृत्ति । स्थिर न होती बावरीया ॥८१॥
वेणुनादाची टाकोनि सडक । सवेग करिती अंतर्मुख । ते बळराम यदुनायक । विश्ववेधक ऐश्वर्यें ॥८२॥
सडक दोर पदबंधन । स्कंधीं मस्तकीं परिवेष्टन । निर्योगपाशकृतलक्षण । हें व्याख्यान ये पदींचें ॥८३॥
चंचलासी करिती स्थिर । स्थिरा योजिती संचार । नंदकुमार कीं हे ईश्वर । महिमा विचित्र हा त्यांचा ॥८४॥
अष्ठधा प्रकृति जड केवळ । स्वचैतन्यें करिती चळ । जीवचैतन्या निश्चळ । करिती तत्काळ स्ववेधें ॥२८५॥
चेताचेतविपर्यासें । वेणुगानें लावोनि पिसें । वृंदावनीं कीडामिसें । विश्व चिद्रसें भरिताती ॥८६॥
शुक म्हणे गा कुरुमंडना । गोपी मानसें कवळूनि कृष्णा । विरहवेधें कथिती गुणां । त्या व्याख्याना निरूपिलें ॥८७॥
एवंविधा भगवतो या वृंदावनचारिणः । वर्णयन्त्यो मिथो गोप्य; क्रीडास्तन्मयतां ययुः ॥२०॥
षड्गुणैश्वर्यें संपन्न । वृंदावनीं क्रीडतां कृष्ण । त्याच्या क्रीडा मनीं स्मरोन । करिती कथन परस्परें ॥८८॥
एवं पूर्वोक्त ज्या ज्या क्रीडा । विविध निरोपिल्या तुजपुढां । कृष्णविरहें मन्मथपीडा । हरणचाडा त्या वदती ॥८९॥
एवं वृंदावनीं श्रीहरि । गोपगोधनपरिवारीं । वेणुगायनें सप्तस्वरीं । गोपी शरीरीं स्मरतप्ता ॥२९०॥
सालंकृत हरीचें ध्यान । तत्क्रीडांचें अनुसंधान । करितां तन्मयता पावोन । सुखसंपन्न जाहल्या ॥९१॥
तया गोपींचा विसांवा । तो श्रीकृष्ण चोविसावा । सप्रेम वाटे ज्यां पुसावा । तिहीं परिसावा अध्याय हा ॥९२॥
इये अध्यायीं इतुकी कथा । शुकें निवेदिली भारता । त्यावरी कात्यायनीव्रता । पुढें कथिता होईल ॥९३॥
तो अध्यय बाविसावा । यज्ञपत्न्यांचा विसांवा । एकाग्र होवोनि परिसावा । जरी वाटे वसावा हरि हृदयीं ॥९४॥
भागवतींचें हेंचि बिरुद । श्रवणीं वेधूनि पावतां मोद । तेथें प्रकटोनि गोविंद । ओपी आनंद स्वसुखाचा ॥२९५॥
तपें तीर्थें व्रत्यें शिणतां । कृष्णप्रेमानंद चढे हाता । तो येथ सुलभ भागवता । श्रवण करितां सद्भावें ॥९६॥
परंतु इतुकेंचि पथ्य करणें । सद्गुरुचरणांतें दृढ धरणें । त्याचिया मुखें हें विवरणें । अंतःकरणें एकाग्रें ॥९७॥
म्हणाल सद्गुरु कोठें मिळे । तरी जें परब्रह्म सांवळें । गाई राखे गोवळमेळें । तें हृत्कमळीं स्मरोनी ॥९८॥
निष्ठा धरीत भागवतीं । स्वयमेव प्रकटे सद्गुरुमूर्ति । निरसोनि संशयाची गुंती । चित्सुखविश्रांति भोगवी ॥९९॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र परमामृत । परमहंस जेथ रमत । संहिता विख्यात पारमहंसी ॥३००॥
शुकपरीक्षितिसंवाद । त्यामाजीं पावन दशमस्कंध । मिथ्या गोपींचा अनुवाद । अध्याय विशद एकविसावा ॥१॥
आदिसद्गुरु श्रीदत्तात्रेय । तत्कृपेचा वरदान्वय । जनार्दनद्वारा वाढता होय । एकात्मसोय एकनाथीं ॥२॥
तत्पादभजनीं चिदानंद । रहस्य पावला स्वानंद । तेवी कृपेनें गोविंद । ओळला वरद दयार्णवा ॥३॥
गोविंद सद्गुरु कृपेची साठवण । म्हणोनी दयार्णव म्हणीजे पूर्ण । संतीं प्रक्षाळोनिया चरण । कीजे शरण सनाथ ॥४॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकाया दयार्णवानुचरविरचितायां वृंदावनवेणुवादनक्रीडा मिथ्यागोपीसंवादो नाम एकविंशतितमोऽध्ययः ॥२१॥
श्रीरामार्पणमस्तु ॥ श्लोक ॥२०॥ टीका ओव्या ॥३०४॥ एवं संख्या ॥३२४॥ श्रीगुरुशिवाय नमः ॥ ( एकविसावा अध्याय मिळून ओवीसंख्या ११२८७ )
एकविसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 01, 2017
TOP