मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २१ वा| श्लोक १ ते ५ अध्याय २१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० अध्याय २१ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - इत्थं शरस्त्वच्छजलं पद्माकरसुगंधिना । न्यविशद्वायुना वातं स गोगोपालकोऽच्युतः ॥१॥शुक म्हणे गा गौरवनाथा । शरत्काळाची स्वच्छता । पूर्वाध्यायीं सविस्तरता । तुज तत्त्वता निवेदिली ॥३२॥ऐसे शरत्काळींचे गुण । तिहीं गुणाढ्य वृंदावन । पूर्वकथेचें अनुसंधान । संक्षेपकथन वनशोभा ॥३३॥वनामाजीं स्वच्छ जळें । स्थळोस्थळीं अतिनिर्मळें । त्यामाजी विकासलीं कमळें । सुपरिमळें मघमघिती ॥३४॥पंकजवनावरूनि अनिळ । घेऊनि परागधूलिमेळ । वनीं धांवे सुगंधानिळ । तेथ गोपाळ प्रवेशे ॥३५॥गाई गोपाळ संकर्षण । सवें घेऊनि जगज्जीवन । हृदयीं उत्साह मानूनि पूर्ण । तोषें कानन प्रवेशला ॥३६॥कुसुमितवनराजिशुष्मिभृंगद्विजकुलघुष्टसरःसरिन्महीध्रम् ।मधुपतिरवगाह्य चारयन् गाः सहपशुपालबलश्चुकूज वेणुम् ॥२॥सरिता आणि सरोवर । सगुल्मलतांशीं गिरिवर । इहीं सालंकृत कांतार । शोभे विचित्र सुमनादि ॥३७॥शरत्काळींचें उन्मादकर । मधु सेवूनि मातले भ्रमर । जाणूनि श्रीकृष्णसंचार । करिती गजर स्वानंदें ॥३८॥सरितासरोवरजीवनीं । चित्रविचित्रकमलवनीं । रोल्म्बांचा झुंकारध्वनि । मधुरगानीं गांधर्वीं ॥३९॥तैसेच स्थलारविंदीं भ्रमर । लतागुल्मीं कुसुमभार । मधु प्राशूनि आनंदकर । रुंजी करिती हरिप्रेमें ॥४०॥नानाद्रुमीं विहंगम । फळें भक्षोनि उत्तमोत्तम । हृदयीं चिंतूनि पुरुषोत्तम । करिती सप्रेम विराव ॥४१॥गंधर्व आणि मुनीश्वर । वनीं जाहले पक्षी भ्रमर । कृष्णक्रीडेचा अवसर । परम सादर साधावया ॥४२॥ते जे भ्रमरपक्षियाति । त्यांचें अभीष्ट जाणूनि चित्तीं । रामगोपेंशीं श्रीपति । ओपी विश्रांति संचारें ॥४३॥उभा राहोनि ठायीं ठायीं । कोमळ तृणीं चारी गाई । वेणुस्वरें लावी सोई । खेचरभूचरजलचरां ॥४४॥कृष्णवेणूचा मधुरध्वनि । भ्रमरपक्ष्यांच्या गायनीं । द्यावाभूमी वेधलीं दोन्ही । व्रजकामिनी हृतचित्ता ॥४५॥तद् व्रजस्त्रिय आकर्ण्य वेणुगीतं स्मरोदयम् । काश्चित्परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्ववर्णयन् ॥३॥शरच्चंद्राचिया मंडळा । देखोनि द्रवती तत्काळ शिळा । येरां प्राकृतां पर्वतोपळां । प्रेमजिव्हाळा न द्रवे ॥४६॥प्रभा मात्र ते पांघुरती । ताप सांडूनि विश्रामती । आंगींचीं तेजें प्रकाशिती । परी न द्रवती वैजात्यें ॥४७॥तेवीं विधिवरें सुरयोषिता । व्रजीं जाहल्या गोपवनिता । ऐकोनि श्रीकृष्णवेणुगीता । झाला चित्ता स्मरोदय ॥४८॥श्रीकृष्णाचें वेणुगीत । कानीं पडतां वेधलें चित्त । मग त्या सेवूनि एकांत । वदती वृत्तांत परस्परें ॥४९॥कृष्ण क्रीडत असे वनीं । परोक्ष म्हणिजे अनिके स्थानीं । व्रजामध्यें कोण्ही कोण्ही । गोपकामिनी मिळाल्या ॥५०॥समानवयस्का समानव्यसनी । समानगुह्यप्रभाषिणी । ऐसिया स्वसखिया मिळोनी । कृष्णवर्णनीं अनुरक्ता ।५१॥सखियांकारणें परस्परें । कथिती कृष्णाचीं चरित्रें । तेणें वेधतां हृदयश्रोत्रें । संतप्त गात्रें स्मर करी ॥५२॥तद्वर्णयितुमारब्धाः स्मरंत्यः कृष्णचेष्टितम् । नाशकन् स्मरवेगेन विक्षिप्तमनसो नृप ॥४॥श्रीकृष्णाचें विचेष्टित । हृदयीं स्मरोनि इत्थंभूत । झाल्या वर्णनीं उद्युक्त । मनीं मन्मथ अवतरतां ॥५३॥मन्मथवेगें विकळचित्ता । साहों न शकती विरहव्यथा । परस्परें करिती कथा । तें नृपनाथा परियेसीं ॥५४॥कृष्णस्वरूप त्यांचे मनीं । बिंबलें सगुण सर्वाभरणीं । काम क्षोभे ज्यांचे स्मरणीं । तें आकर्णीं नृपवर्या ॥५५॥बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयंतीं च मालाम् । रंध्रान्वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृंदैर्वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः ॥५॥गोपीमानसीं कृष्णरूप । जैसें स्मरलें लावण्यदीप । स्मरणें क्षोभविला कंदर्प । शुक सकृप तें वर्णी ॥५६॥सकळलावण्याचें बीज । तें वरवपु तेजःपुंज । ज्याच्या स्मरणें मकरध्वज । दावी चोज चराचरां ॥५७॥ज्या वपूच्या स्मरणमात्रें । काम क्षोभोनि तापवी गात्रें । मा तें प्रत्यक्ष देकह्तां नेत्रें । कोण्हा सांवरे देहभाव ॥५८॥विविध मृत्तिकांचे गोळे । जन्मती चौर्यांशीं लक्ष खोळे । तेथ स्वयोनीच्या तारुण्यबळें । काम खवळे अनावर ॥५९॥तये योनीच्या विरहदुःखें । भ्रमती परस्परें कामुकें । बळावीण सर्वलोकें । स्मरकौतुकें अनुभूत ॥६०॥स्मरविरहाची भरतां भुली । चंद्र चंदन शीतळ जाळी । रसना रसा न सांभाळी । करणें आंधळीं सहजेंची ॥६१॥परी ते स्वजाती पृथग्योनीं । नोहे अन्यजातीमोहनी । क्रीडतां देखिजे सकल जनीं । मन्मथ मनीं नुपजे कीं ॥६२॥व्याघ्री देखोनि कंदर्पखाणीं । मनुष्य सकाम नोहे मनीं । कीं लावण्य देखोनि भुजंगिणी । मूषक मैथुनीं खवळेला ॥६३॥जरी मदोन्मत्त हस्ती । न रमे सिंहाचे उपस्थीं । मा येर ज्या सामान्य्ह जाती । धरी असक्ति तेथ तर्ही ॥६४॥स्वयोनीचाचि कामाभिलाष । भासवी रतिसुखाचा आभास । जैसा कूपीं प्रतिभावेश । करी भ्रंश सिंहातें ॥६५॥तैसा लटिकाची विषयकाम । करी चराचरां सकाम । श्रीकृष्ण वास्तव कंदर्पधाम । पूर्णकाम परमात्मा ॥६६॥ जीवनालागीं सर्वभूतें । जातियोनिभेदरहितें । सेवूं धांवती आर्तभूतें । तेंवि कृष्णातें स्थिरचर ॥६७॥कृष्णात्मकचि होतां काम । आत्मरूप तें कृष्णप्रेम । तेणें विषयाचा विराम । वृत्ति उपरमे सहजेंची ॥६८॥कृष्णकामें भुलला हर । काम जाळूनि झाला शंकर । विषयी कामाचे किंकर । दुःख दुर्धर भोगिती ॥६९॥नारद वेधला कृष्णकामें । ब्रह्मचर्यें कृष्णीं रमे । द्वैत विसरोनि कृष्णप्रेमेम । आत्मारामें रमविला ॥७०॥सनकादिक ऊर्ध्वरेते । ते वेधले कृष्णसुरतें । विसरोनियां तनुमनांतें । कृष्णीं एकांत रातले ॥७१॥कृष्णकामें वेधला फणी । नित्य भोगी कृष्णशयनीं । कृष्णीं सकाम अब्जयोनि । हरि हृद्भुवनीं भोगीतसे ॥७२॥एवं आब्रह्मस्तंभपर्यंत । कृष्णकामीं सर्व आसक्त । येर विषयीं केले भ्रांत । ते भवग्रस्त दुर्दैवें ॥७३॥ऐसें वरवपु तेजःपुंज । विशेष नटनाट्याची वोज । ब्रह्मादिकां नोहे उपज । ते अधोक्षज अवलंबी ॥७४॥नाट्यकौतुकें महेशें । प्रार्थितां नटला मोहिनीवेशें । सकामभ्रमें तो होऊनि पिसें । निष्कामदशे विसरोनी ॥७५॥हंसनाट्यें मोहिला विधि । कीं नटुनटें मुनींची मादी । शुक्रादि बलिमखसंसदीं । श्रुतिसंवादीं भुलविली ॥७६॥आधींच लावण्य वरवपु । विशेष नाट्याचा आटोपु । गोपी स्मरतां श्रीकृष्णरूपु । केंवि कदर्प खवळेना ॥७७॥इंद्रनीळाचे गालींव किळ । ज्योतिर्मय कृष्ण सुनीळ । सहज वरवपु सोज्वळ । भूषामेळ वरनाट्यें ॥७८॥जया वरवपूच्या ठायीं । नाट्यें मुकुट धरिला पाहीं । मयूरबर्हाची नवाई । रचना कांहीं विचित्र ॥७९॥चैतन्यघन श्रीकृष्णतनु । देखणें पिऊनि धाले नयन । दृश्यभावीं पडलें शून्य । मुकुटीं श्रीकृष्ण तें धरी ॥८०॥तोचि शोभे बर्हापीड । चैतन्यघन प्रकाशनिबिड । ज्याचा सर्वात्मक उजियेड । शोभवी वाड गुणागुण ॥८१॥उभयश्रवणीं कर्णिकारें । कृष्णस्वरूपश्रवणादरें । शोभे आणूनि अभ्यंतरें । अत्यादरें विकाशती ॥८२॥मकरकुंडलें श्रवणासक्त । पूर्वींच होतीं रत्नखचित । कर्णिकाराचा विशेष एथ । कथिला अद्भुत बरनाट्यें ॥८३॥घनीं सौदमनींची दाटी । तैसी पीतांबर मालगांठी । इंद्रधनुष्याची राहटी । शोभे कंथीं वैजयंती ॥८४॥न पवोनि गुणांचा शेवट । लाजोनि अधोमुखें प्रकट । प्रेमोत्कर्षें स्तोत्रपाठ । करिती बोभाट क्षुद्रघंटा ॥८५॥वज्रे वैडूर्य अमूल्यमणि । रुक्ममंडित ललामश्रेणी । त्रैलोक्यरचना चित्रवेखणीं । रशना जघनीं प्रभाढ्य ॥८६॥अंदु नूपुरें वांकी वाळे । कृष्णचरणप्राप्तिबळें । धन्य मानूनि प्रेमबहळें । गुणीं रसाळें गर्जती ॥८७॥केयूरांगदें करकंकणें । रत्नमुद्रिका कंठाभरणें । कौस्तुभ श्रीवत्सलांछनें । धातुलेपनें नटशोभा ॥८८॥कोण्ही म्हणती अलंकार । श्लोकीं नसतां वर्णिलें फार । चतुरीं करावया हा विचार । सिंहेक्षणीं वक्ष्यमाणीं ॥८९॥मागें पुढें जरी वर्णिलें । येथ काय फेडूनि ठेविलें राजिक दैविकासि भ्याले । किंवा नेले जायाचे ॥९०॥असो मूर्खांची आशंका । कोण वर्णी विश्वात्मका । सालंकृता नटनाटका । स्मरती गोपिका स्मरतप्ता ॥९१॥कोटिचंद्रांची शोभा वदनीं । कुटिल कुंतळ रुळती श्रवणीं । उभयकुंडल तरणिकिरणीं । कुंतळश्रेणी लखलखती ॥९२॥बर्हस्तबकमंडित मुकुट । ललाटपाटीं नीटनिघोंट । स्मरचापाकृति भृकुटितट । अवक्र व्यंकट कटाक्ष ॥९३॥अनंगाचे सायक साङ्ग । तैसे वेधक कृपापाङ्ग । अनंगरंगें सुकृतभंग । हे अभंग सुखदानी ॥९४॥सकल लावण्याचें स्थान । सरळ सुरेख शोभे घ्राण । विश्वदेखणे विशाळ नयन । जो आकर्षण बरवंट ॥९५॥कुंतळ कुंडलजोडपाडें । मिश्रप्रभा दोहींकडे । पडतां शोभती उभयगंडें । तें लावण्य तोंडें विधि न वदे ॥९६॥दशनीं वज्रमणींची कांति । कीं शशाङ्ककळांची द्विधापंक्ति । कीं इंदिराधरामृताची व्यक्ति । दंताकृती परिणमली ॥९७॥उभयोष्ठांच्या मीलनोन्मीलनीं । उदयास्तांची होत शिराणी । म्हणतां ब्रह्माम्डांचिया श्रेणी । तेचि क्षणीं घडमोडी ॥९८॥कोमळ हनुवटी त्या तळवटीं । मृगमदकेशरतिलक ललाटीं । भ्रमर रुंजती श्रवणीं मुकुटीं । आणि कंठीं वनमाळे ॥९९॥रूपरेखा लावण्यगुण । नटनाट्यादि सालंकरण । मंदित मांडूनि त्रिभंगी ठाण । वेणु श्रीकृष्ण वाजवी ॥१००॥वृक्ष झाले कल्पद्रुम । जीव अवघे सुरसत्तम । विरोनि गेला भेदभ्रम । पुरुषोत्तमसान्निध्यें ॥१॥ठायीं ठायीं मांडूनि ठाण । ठकारें ठाकोनि मधुसूदन । वेणु वाहतां गोगोपगण । होती कंकण रसलोभें ॥२॥स्वपद म्हणिजे कैवल्यसदन । त्याहून सुखतम वृंदावन । करूनि रमवी स्वपादशरण । प्राणिगण स्थिरचर जे ॥३॥अथवा स्वपद वैकुंठभुवन । चहूं मुक्तींचें अधिष्ठान । तत्तुल्य करी वृंदावन । स्वयें श्रीकृष्ण संचारें ॥४॥कीं ध्वजवज्रांकमंडितचरणीं । श्रीकृष्ण विचरे वृंदावनीं । शोभा प्रकटीं लावण्यखाणी । जे रतिजननी त्रिजगातें ॥१०५॥वनश्रीसंपन्न रतिजनक । स्वपदचिह्नीं जगन्नायक । परम रमणीय सकौतुक । वृंदारण्य प्रवेशला ॥६॥तेथ देहुडें मांडूनि ठाण । वेणु वाहे मधुसूदन । वाम कपोल बाहुलग्न । दक्षिणभागीं करयुग्म ॥७॥सुनील कोमलांगुलिमेळ । स्वरसुताळें रंध्रीं चपळ । किंचित्कुंचित ओष्ठयुगळ । नीलप्रवाळ रंगाक्त ॥८॥अल्प उन्नत भृकुटितट । वेणु सुढाळ सरसनीट । माजीं अधुरसुधेचा पाट । फावे प्रकार त्रिजगातें ॥९॥नादरूपें अमृतलहरी । उसळोनि भरती दिगंतरीं । खेचरीं भूचरीं जलचरीं । चरीं अचरीं रस लाहो ॥११०॥अधरसुधेकरोनि तत्त्वता । वेणु पूरित होत्साता । वृंदावनीं प्रवेशतां । गोप गुणकथा वर्णिती ॥११॥सनकादिक सामगानें । गंधर्वादि तानमानें । जयजयकारीं सुरगर्जनें । तें एथ गाणें गडियांचें ॥१२॥ऐसें ध्यानीं नटवरवपु । स्मरतां तापवी हररिपु । अधरसुधाध्वनीचें रूप । श्रवणें कंदर्प क्षोभवी ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP