एवं तौ लोकसिद्धाभिः क्रीडाभिश्चेरतुर्वने । नद्यद्रिद्रोणिकुंजेषु काननेषु सरस्सु च ॥१६॥

ऐशा मनुष्यलोकीं विविधा । बालक्रीडा ज्या प्रसिद्धा । वृंदावनीं समान मुग्धा । क्रीडोनि विबुधा लाजविती ॥४४॥
यमुनापुलिनीं गोवर्धनीं । गिरिकंदरीं काननीं । निकुंज उपवनीं उद्यानीं । क्रीडती दोन्ही बळकृष्ण ॥१४५॥
रम्य सरोवरांच्या पाळीं । कुंजसदनीं नवशाद्वलीं । समानवयस्यांचिये मेळीं । रामवनमाळी क्रीडती ॥४६॥
ऐशिये क्रीडेच्या उत्साहीं । लोकत्रया तोष पाहीं । परंतु दुर्जनाचिये देहीं । अपूर्व कांहीं प्रवृत्ति ॥४७॥

पशूंश्चारयतो गोपैस्तद्वने रामकृष्णयोः । गोपरूपी प्रलंबोऽगादसुरस्तज्जिहीर्षया ॥१७॥

रमणीय गोवर्धनाची कूटें । दर्‍या द्रोणि गिरिकपाटें । सरोवरें तटाकतटें । वाळवंटें सरितांचीं ॥४८॥
यमुनापुलिनींचे मृदुलतर । वनोपवनीं क्रीडापर । संवगडियांशीं नंदकुमार । देखोनि असुर पातला ॥४९॥
तया वृंदावनाच्या ठायीं । संवगडियांशीं क्रीडतां पाहीं । रामकृष्ण चारिती गाई । तंव विवरी हृदयीं प्रलंब ॥१५०॥
पूतना शकट तृणावर्त । अघ बक धेनुकादि समस्त । रामकृष्णाचा करिती घात । पावले मृत्यु अवघेची ॥५१॥
ते बापुडे मंदमती । न विचारितां बुद्धि परती । मारूं गेले कृष्णाप्रति । तेणें निघातीं ते वधिले ॥५२॥
करितां बलिष्ठेंशीं छळ । बुद्धि विवरिजे अति प्रबळ । बुद्धीवेगळें बळ तें विकळ । होय तत्काळ विपरीत ॥५३॥
धान्यजातींत विजातीय खडा । निसूनि टाकिती येकीकडां । तेथें षड्रसाकारक्ष्वेडा । होतां निवाडा न करवे ॥५४॥
तेंवि गोपाळांचिये मेळीं । खेळतां बलराम वनमाळी । गोपाळवेशें अतर्क्य छळीं । करितां केली छळीन मी ॥५५॥
जैसी जालंधराचें नटें । वृंदा छळिली श्रीवैकुंठें । कीं गौतमाकारकपटें । अमरश्रेष्ठें अहल्या ॥५६॥
ऐसें विवरूनि खळदुर्मति । स्वयें नटोनि गोपाकृति । राहु लिप्सा धरूनि अमृतीं । अमरपंक्तीं जेंवि रिघे ॥५७॥
तैसा कपटीं प्रलंबासुरु । रामकृष्णांची जिघांसा करूं । आला होऊनि गोपकुमरु । जाणें अंतर श्रीपति ॥५८॥

तं विध्वानपि दाशार्हो भगवान् सर्वदर्शनः । अन्वमोदत तत्सख्यं वधं तस्य विचिंतयन् ॥१८॥

सर्वद्रष्टा जो यदुपति । अचिंत्यैश्वर्याचिये स्थिती । जाणोनिही दैत्य दुर्मति । त्याशिं संगति आदरिली ॥५९॥
आपणा करूं आला घात । त्याचा विवंचूनि निपात । नेण होऊनि संवगडियांत । त्यांशीं क्रीडत आनंदें ॥१६०॥
येरवीं भूतभविष्यवर्तमान । अखिलद्रष्टाही सर्वज्ञ । प्रलंबाचें जेणें मरण । तें क्रीडन आदरिलें ॥६१॥

तत्रोपाहूय गोपालान् कृष्णः प्राह विहारवित् । हे गोपा विहरिष्यामो द्वंद्वीभूत यथायथम् ॥१९॥

मग बैसोनि एके ठायीं । समीप होकरूनियां गायी । गोपाळांतें शेषशायी । वृत्ता न कायी बोलत ॥६२॥
पाहोनि अवघेचि गोपाळ । कृष्ण जाणे सर्वही खेळ । म्हणे समान येथींचें भूतळ । परम मृदुल सुखरूप ॥६३॥
दोघे करूनि धुरंधर । गडी वांटूनि घेऊं येर । हारिजैत क्रीडापर । खेळूं समग्र ये ठायीं ॥६४॥
सबळा सबळ अबळा अबळ । कृशा कृश स्थूळा स्थूळ । लहान थोर वांटूं सकळ । समानशीळ संवगडे ॥१६५॥
चपळा चपळ कुटिला कुटिल । विकळा विकळ समळा समळ । कुशला कुशल अमळा अमळ । अवघे गोपाळ विभागूं ॥६६॥
ऐसे समान वांटिल्या गडी । कोणीं खाऊं नये रडी । डाव येतां घ्यावी चढी । ऐसी परवडी खेळाची ॥६७॥
नंदतनय बोलतां ऐसें । अवघे नाचती संतोषें । भक्तिप्रेमें ब्रह्मरसे । क्रीडामिसें विचरतसे ॥६८॥

तत्र चक्रुः परिवृढौ गोपा रामजनार्दनौ । कृष्णसंघट्टिनः केचिदासन् रामस्य चापरे ॥२०॥

श्रीकृष्णाच्या वाक्यावरूनी । लहानथोर गोप मिळोनि । राम आणि चक्रपाणि । मुख्यस्थानीं बैसविले ॥६९॥
येर गडी समसमान । दोनी दोनी विभागून । संज्ञा ठेविती भिन्न भिन्न । दुरी जाऊनि ते दोघे ॥१७०॥
वृषभ आणि भद्रसेन । दोघे एकीकडे जाऊन । मेरुमंदर संज्ञा करून । आले फिरोन हरीपाशीं ॥७१॥
म्हणती कोण्ही घ्या हो मेरु । कोणी घेईजे मंदरु । कृष्णासि म्हणे रोहिणीकुमरु । करीं स्वीकार तूं आधीं ॥७२॥
अग्रजाच्या वाक्यावरून मेरु मागे जनार्दन । मंदर वृषभाचें अभिधान । संकर्षण त्या घेत ॥७३॥
याचि क्रमें अवघे गडी । वाटोनि घेती निवडानिवडी । अग्रजावरी नेघे चढी । म्हणोनि रडी हरि जाय ॥७४॥
मग श्रीराम आणि कृष्ण । दोघे वांटिले समान । प्रलंब आणि संकर्षण । तुल्य योजोनि वांटिले ॥१७५॥
कृष्णफळीसि कित्येक आले । अपर रामविभागा गेले । परस्परें क्रीडते झाले । तें परिसिलें पाहिजे ॥७६॥


References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP