अध्याय १ ला - श्लोक १ ते २
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - एकदा गृहदासीषु यशोदा नंदगेहिनी । कर्मातरनियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधि ॥१॥
कोणे एके अवसरीं । दासी गुंतल्या कार्यांतरीं । स्वयें यशोदा मंथन करी । जे नंदाघरीं गेहिनी ॥५३॥
अन्यकार्यांतरांच्या ठायीं । दासी गुंतल्या असतां पाहीं । स्वयें यशोदा मंथितां दहीं । स्मरले हृदयीं हरिगुण ॥५४॥
यानि यानीह गीतानि तद्बालचरितानि च । दधिनिर्मंथने काले स्मरंती तान्यगायत ॥२॥
राया ये लोकीं तपोधन । भगवद्गुणांचें गायन । गाती त्याचें बाल्याचरण । करी गायन यशोदा ॥५५॥
तैसें सप्रेम जे गाती । नर नारी हो भलती याती । त्यांच्या पायां लागती मुक्ति । सिद्धि तिष्ठती सेवेसी ॥५६॥
( चाली वैराटिका ) गौळियाचे कूळीं । जन्मला गोकूळीं । माझा वनमाळी । परब्रह्म ॥५७॥
काय पुण्य माझें । किंवा या नंदाचें । रत्न वैकुंठींचें । पोटा आलें ॥५८॥
अष्टमीचे रातीं । जन्मला श्रीपति । त्रैलोक्यसंपत्ति । आली घरा ॥५९॥
श्रावण पवित्र । रोहिणी नक्षत्र । आनंदाचें पात्र । विश्व केलें ॥६०॥
कृष्णाचीया जन्मा । पासूनी गोकूळीं । भाग्याची आगळी । वृद्धी झाली ॥६१॥
वाळले वठले । वृक्ष पाल्हाईले । कृष्णाचें चांगलें । बाळपण ॥६२॥
जन्मतांची कान्हा । वांझा गाईं पान्हा । भाकडा खडाणा । वोळलीया ॥६३॥
जन्मतांचि हरि । वृद्ध नरनारी । निर्जर शरीरीं । दिव्य झाल्या ॥६४॥
अपुष्पीं सुमनें । निर्जळीं जीवनें । माझ्या बाळकृष्णें । प्रकाशिलीं ॥६५॥
गाई व्याघ्र एक - । मेकां कुरवाळीती । कृष्णें नीजशांति । प्रकाशीली ॥६६॥
पीडा रोग वारा । न बाधी शरीरा । कृष्णें चराचरां । ब्रह्मानंद ॥६७॥
लेंकुरें वासूरें । सर्व गाई गूरें । नंदाच्या कूमरें । सुखी केलीं ॥६८॥
दुष्टभावें आली । पूतना शोखिली । क्रुष्णस्पर्शें गेली । मोक्षपदा ॥६९॥
पाय लावूनियां । मोडियेला गाडा । ब्रह्मांडीं बळियाडा । कृष्ण माझा ॥७०॥
कृष्णासि घेऊनि गेला तृणावर्त । दुष्ट अधःपात । पावला तो ॥७१॥
जांभईच्या मीसें । मुखीं लोकत्रय । कृष्णें सविस्मय । दाखवीलें ॥७२॥
गर्गऋषीश्वरें । वर्तिली पत्रीका । कृष्ण तिहीं लोकां । मुकूटमणि ॥७३॥
दुष्टांसी दंडण । सन्मार्गा मंडण । योगियांचें ध्यान । कृष्ण माझा ॥७४॥
संहर्ता दुर्दर्प । कामिनी कंदर्प । मन्मथाचा बाप । कृष्ण माझा ॥७५॥
धर्मसंस्थापन । भक्तांचें भूषण । साधुसंरक्षण । कृष्ण माझा ॥७६॥
कृष्णाचें खेळणें । पाहतां लोचनीं । भुलल्या गौळणी । कृष्णरूपा ॥७७॥
बाळक्रीडा करी । गोकुळीं श्रीहरि । पाहतां नरनारी । पडिलें ठक ॥७८॥
पाहतां कृष्णासी । विसरल्या संसार । पाहती चराचर । कृष्णमय ॥७९॥
कृष्णरूपीं मनें । रंगोनि राहिलीं । कृष्णमय झालीं । बाह्यांतरें ॥८०॥
सबाह्य अंतरीं । रंगला श्रीरंग । तापत्रयभंग । तेणें झाला ॥८१॥
साबडे बोबडे । कृष्णाचे संवगडे । कृष्णा मागें पूढें धांवताती ॥८२॥
इंद्रनीळ डोळां । बैसला सांवळा । गोपिकां सकळां । समाधिस्थ ॥८३॥
इंद्रनीळ काळें । पिऊनियां डोळे । भोगिती सोहळे । उन्मनीचे ॥८४॥
श्रीकृष्णाच्या रूपें । रंगले लोचन । तेणें देहभान । हारपलें ॥८५॥
कृष्णमय जन । कृष्णमय मन । श्रीकृष्ण चिद्घन । परब्रह्म ॥८६॥
कृष्ण न्याहाळितां न हालती पातीं । सहज पूर्ण स्थीति । बाणलिया ॥८७॥
माणिकें प्रवाळें । रत्नमुक्ताफळें । भूषणीं आगळें । कृष्णतेज ॥८८॥
सुवर्णाचे तार । तेजाचे अंकूर । लावण्य शृंगार । श्रीकृष्णाचा ॥८९॥
इंद्रनीळखाणी । प्रभेची अंगणीं । लोचनासि धणी । फावली हे ॥९०॥
सावळें चांदीणें । अंगणीं फांकलें । बहु कष्टीं देखीलें । चित्सूख हें ॥९१॥
कृष्ण नाचे खेळे । वाजताती वाळे । त्या नादें मावळे । देहस्मृति ॥९२॥
कृष्णाचें गायन । ऐकोनियां मन । अनाहतीं उन्मन । होउनि ठेलें ॥९३॥
कृष्णाच्या किंकीणी । ऐकतां श्रवणीं । नाद ब्रह्म मनीं । कोंदाटलें ॥९४॥
कृष्णसंरक्षणीं । यशोदा रोहीणी । तटस्थ ईक्षणीं । पाहत ठेल्या ॥९५॥
काया वाचा मन । कृष्ण संरक्षितां । वेधियेलें चित्ता । कृष्णनाथें ॥९६॥
कृष्णसंरक्षण । निषेधाचे ठायीं । न पाहोंची कांहीं । कृष्णाविणें ॥९७॥
कृष्णा दूध पाजूं । कृष्णा चारूं लोणी । आंग्या टोप्या लेणीं । कृष्णनाथा ॥९८॥
कृष्णा वाळे वांकी । घागर्या नूपूरें । चरणीं झणत्कार । पैंजणाचा ॥९९॥
कृष्णा क्षुद्रघंटा । मेखळा किंकीणी । रुक्मरत्नमणि । जडित केलें ॥१००॥
सुवर्णनेंगूलें । कौशेय कटिसूत्र । मेखळे जगत्र रेखियेलें ॥१॥
व्याघ्रनखें पटी । रत्नाचें पदक । शोभे श्रीवत्सांक । कृष्णनाथा ॥२॥
सुवर्णश्रृंखळा । पांचूची जीवती । अमूल्य शोभती । मुक्ताफळें ॥३॥
अर्धचंद्राकार । ताईत श्रीकंठीं । चांगली हनुवटी । श्रीकृष्णाची ॥४॥
नवरत्नजडिताच्या । सुवर्नमुद्रीका । दशांगुळी देखा । कृष्णनाथा ॥१०५॥
सामुद्रिकें चिन्हें । कृष्णाचे तळहातीं । पाहतां विश्रांति । लोचनांसी ॥६॥
कुंडलें कुडकिया । जडित घोंसबाळ्या । श्रीकृष्ण सांवळ्या । श्रवणशोभा ॥८॥
सहस्र कुंतळ । रुळती गंडस्थळीं । काजळानें काळीं नेत्रकमळें ॥९॥
सूर्यप्रभा लोपी । तैशी माथां टोपी । पिंपळपान ओपी । विद्युत्प्रभा ॥११०॥
कृष्णाचे नासाग्रीं । शोभे मुक्ताफळ । हिर्यांचें झळाळ । दंतपंक्ति ॥११॥
श्रीकृष्णाचे ओठ । प्रवाळें रंगले । बोलणें चांगलें । श्रीकृष्णाचें ॥१२॥
कृष्ण माझें जन । कृष्ण माझें धन । कृष्नें माझें मन । वेधियेलें ॥१३॥
जीवांचें जीवन । मनाचें मोहन । विश्रांतीचें स्थान । कृष्ण माझा ॥१४॥
कृष्ण गणगोत । कृष्ण चित्त वित्त । श्रीकृष्ण एकांत । हितगूज ॥११५॥
कृष्ण माझा आत्मा । श्रीकृष्णपरमात्मा । कृष्णसर्वोत्तमा - । वीण नेणें ॥१६॥
कृष्ण माता पिता । कृष्ण बहिणी बंधु । कैवल्याचा सिंधु । कृष्ण माझा ॥१७॥
श्रीकृष्ण चूलता । श्रीकृष्ण माऊसा । कैवारी कुवसा । कृष्ण माझा ॥१८॥
श्रीकृष्ण सासूरें । श्रीकृष्ण माहेर । नाहीं दुजा थार । कृश्णा वीण ॥१९॥
श्रीकृष्ण अंतरीं । श्रीकृष्ण बाहेरीं । कृष्ण चराचरीं । कोंदलासे ॥१२०॥
सबाह्य सारीखा । कृष्ण प्राणसखा । कृष्ण प्रेम सुखा । पार नाहीं ॥२१॥
कृष्ण चोरी लोणी । सांगती गौळणी । तेणें अंतःकरणीं । तोष दाटे ॥२२॥
अकाळीं वासूरें । सोडूनि गाईसीं । सांगे गोपिकांसी । कृष्णनाथ ॥२३॥
गोपिका धांवती । वासूरें सावरूं । ऐकोनि गजरु । कृष्ण हांसे ॥२४॥
गोपाळांचे खांदा । उखळीं वेंधूनी । शिंकींचीं दुधाणीं । कृष्ण फोडी ॥१२५॥
दुग्धभांडातळीं । वोडवी अंजूळी । करी वनमाळी । दुग्धपान ॥२६॥
गोपाळांसी वोपी । दुग्ध दधि लोणी । गोरसाची धणी । मर्कटां दे ॥२७॥
उलंडी गोरस । फोडूनी दूधाणीं । कृष्णासी गौळणी । धरूं जाती ॥२८॥
कृष्ण दापी नारी । चोरट्या म्हणोनी । गह्रींचा घरधणी । कृष्ण सत्य ॥२९॥
गौळणींसी खूणा । गृहाचीया सांगें । संमार्जिल्या हागे । गृहा माजी ॥१३०॥
जे घरीं नातुडे । गोरस कृष्णासी । कृष्ण त्या गृहासी । आग लावी ॥३१॥
पालखीं मंचकीं । निद्रिस्तें लेंकूरें । त्यांचे घे चिमोरे । कृष्णनाथ ॥३२॥
कृष्णाचीं गार्हाणीं । सांगती गौळणी । क्षोभ माझे मनीं । उदैजेना ॥३३॥
ऐकोनी गार्हाणीं । सुख वाटे पोटीं । कृष्णाची हनुवटी । धरुनी चुंबी ॥३४॥
गोपिकांचे मनीं । आनंद दाटला । कृष्ण कोंदाटला । अभ्यंतरीं ॥१३५॥
कृष्ण प्रीतीसाठीं । संसाराची तूटी । कैवल्यसंतुष्टि । कृष्णप्रेमें ॥३६॥
कृष्ण खाय माती । सांगती गोपाळ । मोहें उतावीळ । पाहों जातां ॥३७॥
रागें रागें कृष्ण । धरियेला मणगटीं । धर्षणा शिंपूटी । उगारिली ॥३८॥
वामहस्त कृष्ण । मुखा आड धरी । भयभीय श्रीहरि । पाहे डोळां ॥३९॥
काकूळती कृष्ण । ग्लानि करी फार । तेणें अभ्यंतर । कळवळीलें ॥१४०॥
मुखीं झाडा घेतां । ब्रह्मांड पाहीलें । तटस्थ राहीलें । चित्त वेधें ॥४१॥
पाताळें भूगोळ । द्वीपें कुळाचळ । दिशा लोकपाळ । कृष्णीं देखे ॥४२॥
पंचभूतें गण । त्रयाचा विस्तार । सर्व चराचर । कृष्णमय ॥४३॥
कृष्णावीण कांहीं । विश्वीं दूजें नाहीं । ऐशी माझ्या देहीं । बोधलें मी ॥४४॥
आनंदें निर्भर । श्रीकृष्णाच्या वेधें । श्रीकृष्णउद्बोधें । स्वानुभवीं ॥१४५॥
अध्यस्त प्रपंच । संकल्प विराला । कृष्णात्मक झाला । स्वानुभव ॥४६॥
नाठवेची देह । नाठवेची गेह । झालें कृष्णमय । प्रेमसूख ॥४७॥
मी माझें नाठवे । कृष्णेंवीण कांहीं । आनंदाचे डोहीं । सामरस्य ॥४८॥
कृष्णप्रेमें वेडी । कृष्णामृतगोडी । कृष्णरूपीं बूडी । दिधली मनें ॥४९॥
श्रीकृष्णाचे योगें । मायेच्या पदरें । अवस्था वोसरे । अनुभवीली ॥१५०॥
स्वप्न किंवा माझे । बुद्धीचा विभ्रम । कीं हे मेघश्याम - । योगमाया ॥५१॥
माझ्या श्रीकृष्णाचा । नैसर्गिक योग । दावी लोपी जग । स्वस्वरूपीं ॥५२॥
नंदाची मी राणी । व्रजाची स्वामीणी । मी माझें म्हणोनी । भ्रांत झालें ॥५३॥
ऐसी ज्याची माया । तोचि हा श्रीकृष्ण । माझ्या चित्ता खूण । बाणली हे ॥५४॥
कृष्ण विश्व लोपी । मुख मेळऊनी । स्तन्य दे उचलूनि । बालकृष्णा ॥१५५॥
बाळपण गाय । श्रीकृष्णाचें माय । स्तनीं न समाय । प्रेमपान्हा ॥५६॥
द्रवे अभ्यंतर । कृष्णाचें चरित्र । यशोदा सुंदर । प्रेमें गात ॥५७॥
तैशा नरनारी । गाती ज्या संसारीं । त्यांचे अभ्यंतरीं । कृष्ण नांदे ॥५८॥
निपुत्रिकां पूत्र । निर्धन धनासी । रोगी आरोग्यासी । पावे येणें ॥५९॥
यशोवृद्धि होय । विघ्नांचा उपशम । हृदयीं कृष्णप्रेम । उदैजतां ॥१६०॥
नारीसीं भर्तार । प्राणप्रीति करी । पुरुष राजद्वारीं । मान्य होय ॥६१॥
दळीतां कांडीतां । यशोदेचे परि । गाती ज्या सुंदरी । कृष्णनाथा ॥६२॥
वाटितां घांटीतां । पोळिया लाटीतां । गाती कृष्णनाथा । प्रेमभावें ॥६३॥
रांधितां शेंदितां । बाळा परियें देतां । गाती पुण्यवंता । कृष्णक्रीडा ॥६४॥
घुसळण धुसळीतां । धान्य पाखडितां । अंगण झाडितां । कृष्ण गाती ॥१६५॥
साधनाचें दैव । मोक्षाचें वैभव । कृष्णदयार्णव । प्रेम वोपी ॥६६॥
( चाली पूर्वील ) ऐशी यशोदा मंथनकाळीं । श्रीकृष्णाची बाळकेली । आठवतां ते हृदयकमळीं । गाय वेल्हाळी सप्रेम ॥६७॥
ऐशी द्रवोनि अभ्यंतरीं । यशोदा जैसें मंथन करी । ते मंथनक्रियेचे परी । शुकवैखरी वर्णितसे ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP