श्रीगणेशाय नमः । गुरुवर परब्रह्म गोविंद । प्रकटी ग्रासूनि अभेद भेद । सहजीं सहज परमानंद । चिन्मात्रबोध वंदिला ॥१॥
गुकारें गुणभ्रांतिचिच्छेत्ता । रुकारें प्रकटी अरूपकता । अरूप अगुण अविकारता । न लभे वार्ता गुणरूपीं ॥२॥
गुणरज्जूचें दृढ बंधन । बद्ध झाले प्राणिगत्ण । ते सोडावयालागीं सघृण । कळवळून अवतरला ॥३॥
जलचरासी कीजे साजणें । तैं आपण जलचर होणें । तयाचि परी करुणापूर्णें । गुरुत्वें धरणें गुणरूपा ॥४॥
जलाचीच लवणगार । लवण जडत्वें राहे स्थिर । गार स्पर्शें पुन्हा नीर । होय साचार ज्यापरी ॥५॥
तेंवि विग्रह सच्चिदानंद । धरूनि प्रकट केला बोध । प्राणी विषयीं झाले बद्ध । बोधें प्रबुद्ध ते केले ॥६॥
स्वसान्निध्यें तारिलें एकां । एक रंगोनि दास्यसुखा । पाजूनि स्वानुभवपीयूखा । निजात्मतोखा पावविलें ॥७॥
पदार्थमात्रीं आहे गुरु । प्रभूचा विभूतिविस्तारु । परी तो अवघा प्रपंचपरु । जंव तो गुरुवर न भेटे ॥८॥
वन्ही असे सकळ काष्ठीं । परी अयोग्य तो रहाटीं । जेव्हां पडती हव्यवाटीं । तेव्हां तुटी काष्ठत्वा ॥९॥
प्रपंचज्ञानाचा उपदेष्टा । त्यासि गुरुत्वींच प्रतिष्ठा । प्रपंचाचिया निरसी कष्टा । मी तूं श्रेष्ठा गुरुवर ॥१०॥
ब्रह्म व्यापक सर्वगत । परी भ्रांतासी नोहे प्राप्त । भ्रांति छेदूनि बोधिसी स्वहित । तो तूं मूर्त परब्रह्म ॥११॥
सद्गुरु वेगळें ब्रह्म भावी । तो बुडाला नरकार्णवीं । त्याची निष्फल ज्ञानपदवी । नुगवे गोंवी कल्पांतीं ॥१२॥
अंतःकरणाकारें वेत्ता । करणवृंदां वेदकता । मिथ्या विषयांसी वेद्यता । प्रकाशकता हे ज्याची ॥१३॥
भानु प्रतिबिंबा करी व्यक्ति । म्हणोनि मुख्यबिंब यासी म्हणती । गोसमुच्चय ज्याचेनि ज्ञप्ति । तो तों चिन्मूर्ति गोविंद ॥१४॥
भित्ती अभेद चित्रीं भेद । सूर्य नेत्रां दावी विशद । तेंवि प्रकाशूनि करणवृंद । अभेदीं भेद प्रकटिसी ॥१५॥
तया प्रकटणियामाझारीं । अधोर्ध्वगतीच्या दोनी परी । इष्टानिष्टमिश्रप्रकारीं । त्रिगुणाकारीं त्रैविध्य ॥१६॥
बद्ध मुमुक्षु आणि मुक्त । हे अधिकारभेद एथ । उत्तम मध्यम कनिष्ठ त्यांत । आदिमध्यांतसाधना ॥१७॥
ब्रह्मधर्मजिज्ञासुद्वय । प्रवृत्तिनिवृत्ति युग्म होय । अतितरतमादि प्रत्ययें । शंसात्रय नीचोच्चा ॥१८॥
पवित्रापवित्र दोन्ही कोटी । आचारव्यवहारांचिये पोटीं । प्रायश्चित्तें अनंतकोटी । शुद्धाबुद्ध घडामोडी ॥१९॥
ऐशिया प्रकटूनि भेदभावा । रूपा आणिलें भवार्णवा । कोणा नुगवतां करूनि गोंवा । देऊनि उगवा खुणगांठी ॥२०॥
तुमची खुणगांठी तुह्मांविणें । कोणी ब्रह्मांडीं सोडूं नेणे । म्हणोनि गुंतलीं श्रुतिपुराणें । तुमच्या वदनीं उगवती ॥२१॥
आणि कर्माची गहन गति । ऐशी महर्षींची वदंती । जंव वरी कृपेनें न कथां युक्ति । तंव हे गुंती उगवेना ॥२२॥
जैसें सृजिले भेद भ्रांति । तैशीच आनंदा अभिव्यक्ति । भ्रांतीस्तव पडे गुंती । सहजस्थिति विसरूनि ॥२३॥
अनेक जाति अनेक व्यक्ति । सर्वत्र आनंदाची व्याप्ति । विपरीतबोधें दुःखदुर्गति । जीव भोगिती विमुखत्वें ॥२४॥
तडागावरील रसाळशाखा । सफळित जळीं देखोनि मूर्खा । ग्रहणीं श्रमतां पावे दुःखा । पात्र शोका अलाभें ॥२५॥
आनंदेन सह जायते । तो सहजानंद म्हणती ज्ञाते । मूर्ख कवळिती विषयांतें । मग दुःखातें पावती ॥२६॥
स्वयें आपण आनंदमय । हें नेणोनि कवळी विषय । तो दुःखाचें पात्र होय । आश्चर्य काय यदर्थीं ॥२७॥
आपणामाजि जें प्रकाशे । श्रमे तयाच्या अभिलाषें । रोषदोषतोषें पोषें । हर्षामर्षें हुंकारें ॥२८॥
तो निरसूनि भ्रांतिबोध । अवैपरीत्यें जो विशुद्ध । तो तूं केवळ परमानंद । स्वानंदकंद सन्मात्र ॥२९॥
सच्चिदानंद मायोपाधि । नामनिर्देश व्यवहारसिद्धि । अपरोक्षबोध जो निरुपाधि । स्वसंवेद्य वंदिला ॥३०॥
भेद गाळूनि अभेद होणें । देहा टवटवी मी काय जाणें । तुझेनि बोधें तुझेपणें । जें निवडणें तें नमन ॥३१॥
ऐशिया नमनें करुणामूर्ति । कृपावरें आज्ञापिती । दशमस्कंधीं भागवतीं । करीं व्युत्पत्ति नवगामी ॥३२॥
आबाल सुबोध सद्भाविक । श्रवणपयोदा चातक । गीर्वाणश्रवणीं बधिर मूक ।म्हणोनि अटक त्यांसि हे ॥३३॥
प्रार्थूनि पंडित विचक्षण । करविती देशभाषाव्याकिह्यान । तें ऐकती श्रीसंपन्न । अनुत्पन्न तळमळती ॥३४॥
पंडित कैंचे गांवोगांवीं । जठरभरणाची पडली गोंवी । म्हणोनि भाषाव्याख्यानें उपजवीं । सर्वां भोगवीं श्रवणसुख ॥३५॥
म्हणती भाषा न कीजे श्रवण । तो व्युत्पन्नतेचा दुरभिमान । भाषे वेगळें कैं पुराण । कोण श्रवण करी करवी ॥३६॥
व्युत्पन्न देशभाषार्थ । वाखाणूनि इच्छिती अर्थ । तो रोधला जठरस्वार्थ । म्हणोनि ग्रंथ दूषिती ॥३७॥
आपण न पढे दुसर्‍या नेदी । मूर्ख पुस्तकें घाली बंदी । त्याची न वाढे वंशवृद्धि । मंदबुद्धि हा तैसा ॥३८॥
जैं भाषेचा ग्रंथ पढे । तेणें सन्मार्ग जैं उजेडे । तैं तो आपणचि ज्ञात्याकडे । भजनचाडें प्रवर्ते ॥३९॥
स्वार्थ रोधला ऐसें म्हणती । तरी तो प्रारब्धाचिये हातीं । पूर्वदत्तासारिखी प्राप्ति । वृथा दूषिती ग्रंथांतें ॥४०॥
पंडित देशभाषेचा अर्थ । निरूपिती तो लिहिला ग्रंथ । अबळीं वाचितां तो यथार्थ । कां परमार्थ नुपलभे ॥४१॥
म्हणोनि अबळां सद्भाविकां । निववीं सुगम करूनि टीका । मूळ ग्रंथ सर्व लोकां । होय ठाउका तें करीं ॥४२॥
ऐशी आज्ञा ऐकोनि कानीं । बद्धांजलि नम्रमूर्ध्नि । सप्रेम दृष्टि ठेवूनि चरणीं । अंतःकरणीं सोत्साह ॥४३॥
कपादृष्टीच्या स्नेहसलिलें । स्वामीं दयेचें भरतें भरलें । दयार्णव म्हणोनि संबोधिलें । संतीं ठेविलें तें जाम ॥४४॥
परी मी अनुचराचि खरा । कासया महत्त्व किंकरा । देऊनि गौरवा दातारा । मी म्हणियारा अंकित ॥४५॥
म्हणियें सांगितलें तें घेणें । करावया सामर्थ्य देणें । विघ्नापासोनि संरक्षणें । आपुलेपणें निर्भय ॥४६॥
संतीं अवधानाचेनि वेतनें । सादर होऊनि म्हणिये घेणें । जीवन पावतां मादृशें तृणें । रसाळपणें टवटविती ॥४७॥
आतां नवमाध्यायीं कृष्णनाथा । सप्रेम पान्हा पाजितां माता । दुग्ध देखिलें उतोनि जातां । धांवे त्वरिता त्याकडे ॥४८॥
अतृप्त कृष्ण थानींचा काढी । तो सक्रोधें पात्रें फोडी । म्हणोनि धरावया तांतडी । लवडसवडी धांविली ॥४९॥
धरोनि बांधों गेली उखळीं । तंव दावां न समाये वनमाळी । विश्वोदर हे बोध नव्हाळी । बाळकेली हे दावी ॥५०॥
शुक म्हणे गा सौभद्रजा । श्रवणप्रेमें अधोक्षजा । सेवूनि उभविली कीर्तिध्वजा । विष्णुसायुज्या साधिलें ॥५१॥
अपूर्व कृष्णाची बाललीला । ते तूं परिसें सप्रेमळा । श्रवणमात्रें तारी सकळां । जे कलिमलां नाशक ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP