मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४ था| श्लोक २१ ते २५ अध्याय ४ था आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २८ श्लोक २९ ते ३१ श्लोक ३२ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४७ अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा अध्याय ३ रा - श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर तस्माद्भद्रे स्वतनयान्मया व्यापादितानपि । माऽनुशोच यतः सर्वः स्वकृतं विन्दतेऽवशः ॥२१॥वसुदेव तो ज्ञानराशि । शोक बाधी देवकीसि । म्हणोनि विवेकें बहिणीसि । विचारासि सांगतो ॥२६५॥अहो भद्रे विचारराशि । आत्मबोधाचिये प्रकाशीं । अविद्येची निरसूनि निशी । मोहपाशीं न पडिजे ॥६६॥देहबुद्धि सांडूनि पाहीं । पुत्र तुझे नव्हती कांहीं । मी मारितां नव्हे कांहीं । हे भ्रांति देहीं कर्माची ॥६७॥कर्मान्वयें पाहतां जाण । प्राणिमात्र कर्माधीन । कृतकर्मासि वश होऊन । करी भ्रमण परवशता ॥६८॥स्वकृत भोगिल्यावीण न सरे । म्हणोनि अनेक जन्मफेरे । ख्याती तैसेंचि निमित्तांतरें । कर्म पसरे पुढें पुढें ॥६९॥यास्तव तुझीं म्यां लेंकुरें । जरी मारिलीं असती निकुरें तेंहीं स्वकर्म भोगिलें खरें । तूं शोकपूरें न लोटें ॥२७०॥यास्तव सहसा शोक न करीं । ज्ञानें कर्में दोहीं परी । विवरूनि पाहतां अंतरीं । शोकासि उरी असेना ॥७१॥एव ऐकें वो बहिणी । ऐशी आशंका तुझिये मनीं । दोष नसतां ब्रह्महननीं । हत्त्या कोठूनि बाधी ते ॥७२॥शिवापाठी ब्रह्मकपाट । वृत्रहत्त्यी त्रिदशां कष्ट । प्रायश्चित्तविधीचे पाट । शास्त्रसंघाट बोलती ॥७३॥ब्रह्मराक्षस महाक्रूर । रावणादिक दुष्ट असुर । त्यांचे हत्येचा परिहार । श्रीरामचंद्र आचरला ॥७४॥रामेश्वर ज्योतिर्लिंग । स्थापूनि निष्पाप केलें जग । ऐसा हरिहरांचा प्रसंग । तैं ज्ञानमार्ग नव्हता हा ॥२७५॥ऐसें न म्हणें ममानुजे । गुह्य सांगेन तें तूं बुझें । जेणें अंतर उमजे तुझें । तैसें वोजे परियेसीं ॥७६॥हरिहर धर्मंस्थापक । तयाधीन वर्त्तती लोक । म्हणोनि प्रायश्चित्तविवेक । तिहीं सम्यक विवरिला ॥७७॥श्रेष्ठ आचरोनि स्वयें दावी । येणें मार्गें अबलां लावी । पुढें तयांसि न पदे गोंवी । निजात्मपदवी पावती ॥७८॥एरव्हीं संहारितां सृष्टि । पापें रुद्र होता कष्टी । तैं प्रायश्चित्ताची रहाटी । पुन्हा सृष्टि न गिळिता ॥७९॥म्हणोनि ज्ञानदृष्टीपुढें । भेदभ्रमाचें स्वप्न उडे । देहीं दृढ अहंता वाढे । तोंवरी न खंडे अज्ञान ॥२८०॥यावद्धतोऽस्मि हन्तास्मीत्यात्मान मन्यतेऽस्वदृक् । तावत्तदभिमान्यज्ञो बाध्यबाधकतामियात् ॥२२॥अपरोक्षसाक्षात्कारेंवीण । स्वस्वरूपाचें विपरीत ज्ञान । तेणें गुणें देहाभिमान । दृढ अज्ञान वाढवी ॥८१॥मी मरता आणि मारिता । ऐशी स्फुरे जंव अहंता । तंववरी आपली अनोळखता । पावे बद्धता अज्ञानें ॥८२॥बाध्य म्हणजे महापाप । बाधक तें कर्मसंकल्प । देहात्मवादें हा आरोप । आत्मा निर्लेप नेणता ॥८३॥देहाचें मरण आणि मारणें । आत्मत्वें मानिलें जेणें । त्याचे देहबुद्धीचें ठाणें । कोण्या गुणें उठेल ॥८४॥म्हणोनि तुम्ही विचारखाणी । विशोक होऊनि अंतःकरणीं । माझिया अपराधाच्या श्रेणी । अंतरींहूनि विसराव्या ॥२८५॥क्षमध्वं मम दौरात्म्यं साधवो दीनवत्सलाः । इत्युक्त्वाश्रुमुखः पादौ श्यालः स्वस्रोरथाग्रहीत् ॥२३॥वसुदेवाचा शालक कंस । बहिणी आणि मेहुणियास । विनीत होऊनि विशेष । स्वापराधा क्षातवी ॥८६॥म्हणे केवढें माझें दौर्जन्य । ऐकोनि वारियावरील वचन । स्नेह सांडिला उन्मळून । देहरक्षण करावया ॥८७॥एक सुहृद स्नेहाळ पूर्ण । समरांगणीं ओपिती प्राण । करूनि सुहृदाचें रक्षण । धन्य धन्य म्हणविती ॥८८॥भगिनीचिया प्राणघाता । मी प्रवर्त्तलों देहस्वार्था । तुम्हीं विवेकें त्या अनर्था - । पासूनि तत्त्वतां रक्षिलें ॥८९॥मियां दुर्जनें महाक्रूरें । मारिलीं उपजतांचि लेंकुरें । कर्में ठकिलें हेंचि खरें । म्हणोनि विचार सांडावलों ॥२९०॥तुम्हांसी बंधन केलें निगडीं । कम्रें बुद्धि दिधली कुडी । लज्जा वाटे वदतां तोंडीं । अधम ब्रह्मांडीं मी एक ॥९१॥तुम्ही साधु निरपराधी । शत्रुमित्रीं समानबुद्धी । मी दुरात्मा अपराधी । कृपानिधि मज तुम्ही ॥९२॥देहलोभें विषयचाडें । घडॊं नयेतितुकें घडे । साधु क्षमेचे मेरू गाढे । सहसा कुडें नाठवती ॥९३॥क्षमाक्षीराब्धिजलशायी । साधु समत्वें झाले पाहीं । ते दुर्जनमशकछळणा घायीं । न पवती देहीं उपोढ ॥९४॥साधु समत्वें दीनवत्सल । साधु भूतात्मे दीनदयाळ । साधु कारुण्यें कोमळ । क्षमाशील पुण्यात्मे ॥२९५॥साधु सुखाचे सुधाकर । संसारश्रांता अमरागार । साधु भवाब्धीचें पार । सत्य साचार दाविती ॥९६॥परोपकाराचिया श्रेणी । करितां न शिणती अंतःकरणीं । ऐशी साधूंची अगाध करणी । लिहितां धरणी चुटपुटी ॥९७॥आतां माझिया अपराधकोटि । स्मरोनि निष्ठुर न होइजे पोटीं । आठवूनि आपली दुष्ट रहाटी । पडे सृष्टीं मूर्च्छित ॥९८॥टाहो फोडूनि दीर्घ रडे । स्फुंदस्फुंदोनि मूर्च्छित पडे । म्हणे कैसें कर्म कुडें । कोणापुढें न वदवे ॥९९॥वसुदेवदेवकीचे चरण । दृढ धरूनि करी रुदन । म्हणे अपराध क्षमा करून । स्नेहवर्धन करावें ॥३००॥गंगे क्षालिती जेंवि समळ । ते मलनाशिनी गंगा अमळ । तैशीं तुम्ही दीनदयाळ । मजवरी स्नेहाळ होइजे ॥१॥वर्षाकाळींचें अमंगळ । वाहोनि गेलिया समळ डहूळ । मग पातला शरत्काळ । निवडे निर्भळ चिद्गंगा ॥२॥तैशी कर्माची कुटिल वेळा । क्षालूनि गेलिया क्लेशकाळा । आतां निर्मळ क्षमाशीळा । स्नेह आगळा पावन ॥३॥मजवरी करूनि कृपादृष्टि । मम दौरात्म्य न धरिंजे पोटीं । प्रार्थीं चरण वंदूनि मुकुटीं । पसरूनि ओटी क्षांतवी ॥४॥ऐसा बंधूचा अनुताप । देखोनि देवकी सदय सकृप । जैशी धरित्री ग्रीष्मींचा ताप । सांडी आप वर्षतां ॥३०५॥मोचयामास निगडाद्विश्रब्धः कन्यकागिरा । देवकीं वसुदेवं च दर्शयन्नात्मसौहृदम् ॥२४॥मग तोडूनि लोहबंधनें । मुक्त केलीं दोघें जणें । अमरीं वरद ओपिलीं वचनें । कंस तेणें कळवळिला ॥६॥घोरोग्रसेनात्मजापासून । त्राहें म्हणून प्रार्थिला भगवान । तेणें योगमाया प्रेरून । कंसाचें मन मोहिलें ॥७॥मग विश्वासोनि मायावचना । केलें निगडविमोचना । क्षणोक्षणीं लागे चरणां । करी प्रार्थना स्नेहवादें ॥८॥म्हणे काया झालिया कृश । विवर्ण कांति धूसर केंस । चिरकाळ भोगिले मदर्थ क्लेश । अशेष दोष मजमाथां ॥९॥म्हणोनि कंठीं घातली मिठी । रुदन करूनि धरी हनुवटी । हस्तें कुरवाळूनि पाठी । सांगे गोष्टी स्नेहाळ ॥३१०॥एथूनि सरली क्लेशनिशी । उदया आला सुकृतशशी । माझिया अपराधांच्या राशि । क्षमामंजूषीं सांठवा ॥११॥श्वेतवस्त्र साबणें उजळे । तैसें निर्मळ नोहे काळें । वसुदेव देवकी पुण्यशीळें । झालीं स्नेहाळें विनवितां ॥१२॥भ्रातुः समनुतप्तस्य क्षान्तरोषा च देवकी । व्यसृजद्वसुदेवश्च प्रहस्य तमुवाच ह ॥२५॥ऐकूनि बंधूची विनवणी । सशोक अनुतापाची वाणी । देवकीवसुदेव कळवळूनि । खेद सांडोनि राहिलीं ॥१३॥हास्यवदनें कंसाप्रति । मधुरोत्तरीं गौरविती । कंसें बोधिल्या त्या उक्ति । सन्मानिती स्वीकारें ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP