अध्याय ३ रा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नन्वहं ते ह्यवरजा दीना हतसुता प्रभो । दातुमर्हसि मन्दाया अङ्गेमां चरमां प्रजाम् ॥६॥

दादा निश्चयात्मक तुझी अनुजा । परमदीन मी मृतप्रजा । तूं तो समर्थ भोजराजा । मजलागीं तुझा आधार ॥६४॥
भाग्यमंद मी अदृष्टहीन । दीनाहूनि परमदीन । तुझे कृपेचें भाजन । तरी इतुकें वचन पाळावें ॥६५॥
धीर उदार भोजवंशीं । मी याचितें तुजपाशीं । तूंही समर्थ द्यावयासी । तरी एवढें प्रजेसि मज ओपीं ॥६६॥
सर्वांहूनि कनिष्ठ प्रजा । म्हणोनि जीव कळवळी माझा । तथापि कन्या हे महाराजा । नोहे अष्टम तुझा हा वैरी ॥६७॥

श्रीशुक उवाच - उपगुह्यात्मजामेवं रुदत्या दीनदीनवत् । याचितस्तां विनिर्भर्त्स्य हस्तादाचिच्छिदे खलः ॥७॥

जैसीं रुदती अनाथें दीनें । तयांहूनि कोटिगुणें । देवकी आक्रंदें दुःखानें । नयनीं जीवनें पाझरती ॥६८॥
ओंटींमाजीं धरूनि कन्या । दीर्घ स्वरें करी रुदना । दीनाहूनि परमदीना । अतिकृपणा अनाथा ॥६९॥
जाणोनि पराविया बाळा । न करी मावेचा कळवळा । गुह्यप्रदेशीं धरूनि बाळा । परमस्नेहाळा देवकी ॥७०॥
बाळ कवळूनि ऐसें पोटीं । करुणा भाकीतसे ओंठीं । कंस द्रवेना अनुमात्र पोटीं । दुष्ट कपटी दुर्जन ॥७१॥
ऐसा प्रार्थितां बहुत परीं । तीतें झिडकारी दुराचारी । हस्तापासोनिया कुमारी । बळेंचि हरी दुरात्मा ॥७२॥
नक्र आंसुडी गजेंद्रचरण । कां निषादपाशीं गुंततां हरिण । नाना जलचरादि गळीं मीन । तेंवि दुर्जन आंसुडी ॥७३॥

तां गृहीत्वा चरणयोर्जातमात्रां स्वसुः सुताम् । अपोथयच्छिलापृष्ठे स्वार्थोन्मूलितसौहृदः ॥८॥

गर्भापासूनि मात्र पडिलें । प्रसूतिस्रावें गिरबडलें । दुष्टें तैसेंचि आंसुडिलें । स्नेह सोडिला निष्ठुरें ॥७४॥
देह पाहिजे वांचविला । एवढाचि स्वार्थ पाहिला । सुहृद्भाव उन्मळिला । जेवीं पहिला संवचोरें ॥७५॥
ते भगिनीतनया ओढूनि हठीं । दोन्ही चरण धरूनि मुष्टीं । भवंडूनिया शिलापृष्ठीं । जंव आपटी सक्रोधें ॥७६॥

सा तद्धस्तात्समुत्पत्य सद्यो देव्यम्बरं गता । अदृश्यतानुजा विष्णोः सायुधाष्टंमहाभुजा ॥९॥

तंव देवी जगज्ज्योति । जी परमात्म्याची प्रकृति । जे शिवाची संभूति । परा म्हणती जयेतें ॥७७॥
विश्वव्यापकाची अनुजा भगिनी । म्हणूनि व्याप्तीसी नव्हे उणी । जे वस्तूची गवसणी । फेडूं कोणी न शकती ॥७८॥
वेगळी काढूनि कोणी दावी । ऐसा समर्थ गोसांवी । नाहीं म्हणोनि इची पदवी । वेदही न दावी पृथक्त्वें ॥७९॥
दुधा आंतूनि आली साय । ती दुधावेगळी होते काय । दूधपणाची फोडूनि त्राय । ते न जाय निवडले ॥८०॥
दुग्धसारा साय नांव । दुग्धें तयेचा सद्भाव । तेवीं जें वस्तूचें वास्तव । परी स्वभाव वस्तूचा ॥८१॥
ऐशी अघटितघटनापटीं । रची ब्रह्मांडाचिया कोटी । तयेतें कंस जंव आपटी । तंव पिळोनि मुष्टि निसटली ॥८२॥
सवेग केलें उत्प्लवन । ठेली देवता होऊन । प्रकटविलें मुळींचें ध्यान । तें पहाती नयन कंसाचे ॥८३॥
अष्टमहाभुज सायुध । देवीरूप धरिलें सद्य । प्रकट ठेली उदायुध । जे अगाध योगिनी ॥८४॥
दारोयंत्रीं अग्निस्पर्श । होतां गगनीं करी प्रवेश । तैसा दावी चंडावेश । पाहे कंस भयभीत ॥८५॥
तया चक्रबाणाचियेपरी । गगनीं संचरे खेचरी । ऊर्ध्ववदनें अगोचरी । कंस अंतरीं निरीक्षी ॥८६॥

दिव्यस्रगम्बरालेपरत्नाभरणभूषिता । धनुःशूलेषुचर्मासिशङ्खचक्रगदाधरा ॥१०॥

अष्टमहाभुजा खेचरी । अष्टायुधें धरिलीं करीं । योगमाया परमेश्वरी । अलंकारें मंडितां ॥८७॥
धनुष्य बाण शूल चर्म । चक्र गदा खङ्गोत्तम । शंख धरिला जैसा सोम । प्रभे साम्य बंधुत्वें ॥८८॥
चैत्रवनादि नंदनवनें । तेथील देवीं वेंचूनि सुमनें । माळा निर्मूनि चंद्रानने । सप्रेम भजनें अर्पिल्या ॥८९॥
विश्वात्मकाचिया आवरणें । वर्ते तयेची प्रावरणें । कैशीं काय वर्णिजे कोणें । जीं चित्सुवर्णें निर्मिलीं ॥९०॥
मलयमातेचा सुरभिगंधु । तेणें मिश्रित केला इंदु । तोचि सर्वांगीं लेपनानंदु । पैं विशुद्ध अवतरला ॥९१॥
ब्रह्माविष्णुरुद्राकृति । नाना सुरनरादि सर्व व्यक्ति । जडित केले त्या रत्नपंक्ति । वोप देती सुढाळें ॥९२॥
ऐसें चराचरात्मक लेणें । लेइली चिच्छक्ति भूषणें । सच्चित्सुखाचीं आभरणें । कंसें पुण्यें देखिलीं ॥९३॥
कैशीं देखिलीं ऐसें म्हणसी । तरी तूं नृपवरा परियेसीं । सांगेन सविस्तर ते तैशी । निजमानसीं अवलोकीं ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP