त्या मयसभेंत रचना पाहुनि राजा सुयोधन भ्रमला,
प्रौढकविकृतींत जसा बाळ म्हणे जो ‘ कळे अदभ्र मला. ’ ॥१॥
मानुनि जळ स्थळाला वस्त्रातें आवरी करें वाटे,
कोठें पडे जळीं तो जळ न, जळ स्थळ चि तें खरें वाटे. ॥२॥
पिहित द्वार अविवृतसें मानुनि जातां कपाळ आपटलें,
झाला व्याकुळ दुर्मति आपुलिया चि भ्रमाचिया पटलें. ॥३॥
जाय बळें उघडाया कर देउनि उघडिल्या हि अरारा ज्या,
तोंडघसींच पडे हो ! होय चमत्कार तापकर राज्या. ॥४॥
भीमार्जुन पोषिति अतिहासा अंधजसुदुःसहा यम ही.
त्यां ‘ निजभरहर हरिचे सुसहाय ’ म्हणे, न ‘ दुःसहाय, ’ मही. ॥५॥
त्या उपहासें झाला बहुत चि संतप्त तो सुयोधन हो !
चित्तीं म्हणे, ‘ मरो, परि अपमानित सर्वथा सुयोध न हो. ’ ॥६॥
जातां पुरासि मार्गीं शकुनि म्हणे कुरुवरास, ‘ सांग मला,
तूं अप्रसन्न कां ? गा ! वाङ्नियम सदैव विहित कां गमला ? ’ ॥७॥
दुष्ट म्हणे, ‘ जें झालें खर दुःख कृतांतरूप मामा ! तें
दावार्चिसें कराया भस्म पहातें तरूपमा मातें. ॥८॥
झालें युधिष्ठिराला भूमंडल विक्रमें वश, कुनेते
भ्राते नव्हेत त्याचे, नरतनुधर सर्व देव शकुने ! ते. ॥९॥
तो राजसूय सन्मख, वैश्यापरि ते तसे करद राजे,
समरीं न गणायाचे अभिमानी वज्रभृत्करदरा जे. ॥१०॥
एक हि शतांत न, जसा अज सिंहें हुंगिल्या अजा तारी,
तेंवि न नृप चैद्याला; मारविता रक्षिता अजातारी. ॥११॥
श्रीकीर्तिभूतिमहिमा शक्रींचा या युधिष्ठिरीं भूपीं;
अन्यत्र लेश. कैचें सलिल. जसें सागरीं तसें कूपीं ? ॥१२॥
या स्वसपत्नोत्कर्षें जळतों मीं अंतरीं च, अ - सुखा या
सोसील कोण मानी ? देतों मीं पावकासि असु खाया. ॥१३॥
घेउनि दे गुर्वाज्ञा मज हा अग्नींत काय होमाया;
दुःखद जो स्वपराला त्याची ज्ञात्यासि काय हो ! माया ? ॥१४॥
भ्रमलों सभेंत, केला उपहास तिहीं ससेवकानीं कीं,
फसलों दैवें पंकीं, हंसखग जसा फसे बकानीकीं. ’ ॥१५॥
शकुनि म्हणे “ राया ! ते प्रिय, अप्रिय काय तूं अगा ! धात्या ?
‘ कर्मानुरूप देतो फळ ’ म्हणति असें भले अगाधा त्या. ॥१६॥
पुण्य तसें चि तयांचें, व्हावा उत्कर्ष नित्य नव साचा;
महिमा पूर्वींच्या हा सुकृतभराचा, नव्या न नवसाचा. ॥१७॥
यत्न तदुच्छेदीं त्वां शत केले, परि कवे ! न शकलास;
पूर्णेंदु काय जिंकीं उडु ? ज्याच्या जिंकवे न शकलास. ॥१८॥
तुज ही सहाय गुरु, गुरुसुत, कृप, वृष, बंधु, भीष्म आहेत;
होईल पूर्ण दिग्जय, बहुदक्षिणयज्ञ, कीर्ति हा हेत. ” ॥१९॥
नृप त्यासि म्हणे, ‘ मामा ! योजिसि येथें कशास सामातें ?
सांग उपाय, युधिष्ठिरपरिभव जेणें घडे, असा मातें. ’ ॥२०॥
शकुनि म्हणे, ‘ पांडुसुत, द्रुपदनृपति, तत्सहाय कंसारी,
यांसि भुजबळें जिंकी ऐसा कैंचा समर्थ संसारी ? ॥२१॥
परि एक उपाय असे, धृतराष्ट्र तुला म्हणेल जरि, कर गा !
होइल युधिष्ठिराची श्री - पृथ्वी निश्चयें चि तरि कर - गा. ॥२२॥
प्रेम बहु, पटुत्व नसे द्यूतीं, धर्म स्वयें असे भोळा,
अनिवर्तनप्रतिज्ञा; तच्छ्रीला या बळें करीं गोळा. ’ ॥२३॥
कुरुखळ म्हणे, ‘ तरि नृपा ! घे आज्ञा, तूं चि हें वद पित्यातें.
मीं हें बोलों न शकें, जरि करितो बहु दया, तदपि त्यातें. ’ ॥२४॥
करुनि कुविचार, नगरीं जावुनि, एकांत समय पाहूनीं,
नृप गांठिला हळू हळु तच्छास्त्रविवेकचंद्रराहूनीं. ॥२५॥
शकुनि वदे, ‘ राजा ! हा झाला त्वज्ज्येष्ठपुत्र कृश हरिण,
क्षण हि स्वस्थ नसे चि, व्याघ्रवनामाजि जेंवि शिशुहरिण. ’ ॥२६॥
वृद्ध वदे, ‘ वत्सा ! कां पांडुर क्रुश जाहलासि सांग मला ?
भोगिसि भोग सुरांचे, निष्कंटक राज्य, खेद कां गमला ? ’ ॥२७॥
कलिपुरुष म्हणे, “ देती तिळ हि न सुख हे स्वभाग्यभोग मला;
पाहुनि युधिष्ठिरश्री मज तुच्छ स्वविषय प्रभो ! गमला. ॥२८॥
मतिचक्षु भेदिलें हो ! माझें अतिदुःसहें किरीटी - कणें;
मज संसारीं कैंचें चिंतेनें लागतां किरी टिकणें ? ॥२९॥
मीं घटतों, परि तुमचें मन केवळ बाढ तात ! ते ज्यानें
अवलोकिले, कळे त्या शिशुशशिसे वाढतात तेज्यानें. ॥३०॥
इतरांची काय कथा ! जे देणार त्रिखर्व बळि बा ! गा !
त्यांतें वारित होते द्वारप, दारापुढें न ज्यां जागा. ॥३१॥
संज्ञा केली होती, कीं होतां लक्ष त्या मखीं पात्र,
उच्चगृहाग्रगपुरुषें फुंकावा शंख एकदा मात्र. ॥३२॥
वाजत होता संतत दर, जाणों विष वचोगृहीं वमला;
त्या अनिशरवश्रवणें बापा ! आलें खरें च हींव मला. ॥३३॥
मयकृतसभेंत पडलों मीं वापींत स्थळभ्रमें सहसा.
हसले सपत्नदार हि, न म्हणे कोण्हीं हि कीं, ‘ उगे, न हसा. ’ ॥३४॥
खदखद हांसे भीम हि, जिष्णु हि मजला तसे चि बा ! यम ही;
तद्दर्दशा न करितां, निस्तेजा मज वठेल काय मही ? ॥३५॥
पडलों उघडूं जातां, द्वार गमे विवृत ही यथापिहित.
तत्कृतबोधाहुनि मज गमलें तम, अहित जर्हि तथापि हित. ॥३६॥
विवृतद्वाराकार प्रेक्षुनि भित्तिप्रदेश जों शिरतों,
फुटलें तें थोडें, बहु जें धरिलें शत्रुनें स्वयें शिर तों. ॥३७॥
‘ धृतराष्ट्रसुता ! ये, मीं दाखवितों, द्वार हें, न बापा ! हें, ’
वदला असें वृकोदर जें, तद्वाक्यार्थ तूं चि बा ! पाहें. ” ॥३८॥
अतिशयित भाग्य त्याचें, स्वीय हि अतिशयित दुःख कळवीलें.
जों त्या खळतिलकानें कांहींसें अंधचित्त वळवीलें; ॥३९॥
तों शकुनि म्हणे, “ राया ! अभिमानधना ! सुयोधना ! जरि ! तें
भाग्य हरावें चि असें इच्छिसि जिंकूनि दुर्जया अरितें, ॥४०॥
तरि मज कपटद्यूतीं आहे बळ, फार हा उपाय भला,
धर्म हि न म्हणेल ‘ नको, ’ हें ही ठावें असे यथार्थ मला. ॥४१॥
धर्माची ‘ आहूतो न निवर्तेयं ’ असी प्रतिज्ञा, ते
न मृषा, द्यूताप्रति अतितरखर म्हणति न असिप्रति ज्ञाते. ” ॥४२॥
खळमणि म्हणे, ‘ नृपाळा ! दे आज्ञा, श्री हरील शकुनी ती.
कां ग स्वीकारावी, करिल जरि महारिला वश कु - नीती ? ’ ॥४३॥
धृतराष्ट्र म्हणे, ‘ पुसतों विदुराला, तो विवेकराशि कवी
मज हित सदा शिकवितो, जेंवि बृहस्पति सुरेश्वरा शिकवी. ’ ॥४४॥
भरतकुलकलंक म्हणे, ‘ मोडील विदुर विचार हा केला,
मग मीं मरेन, राया ! कथितों मारूनि उच्च हाकेला. ॥४५॥
तो चि इहामुत्रसुखद तुज, न प्रिय सुत, जसा प्रिय क्षत्त;
मजमागें राज्य करा दोघे, कोणांस हो ! नको सत्ता ? ’ ॥४६॥
पुत्रप्रियकर राजा आज्ञापुनियां निजानुगां बरवी
जींत सहस्र स्तंभ स्वर्णमणिखचित असी सभा करवी. ॥४७॥
आप्तानीं विदुराला हा कपटद्यूतमंत्र जाणविला;
मग त्या धृतराष्ट्रें ही तो बुद्धिसुधासमुद्र आणविला. ॥४८॥
नमुनि कवि म्हणे, ‘ राया ! न द्यूतविचार हा मला रुचला.
त्यजुनि सहकार पिकला, पिक लाजेना वरावया कुचला ? ’ ॥४९॥
अंध म्हणे, ‘ होवूं दे द्यूतक्रीडाविनोद भावांत;
अस्मन्निकट तयांच्या न शिरेल दुराग्रह स्वभावांत. ॥५०॥
मीं तूं द्रोण, नदीसुत बैसों जेथें समर्थ, घात कसें
द्यूत करील ? शमेल श्रीरामगुणांसमक्ष पातकसें. ॥५१॥
होणें होतें, साधो ! चित्त तुझें ही न काळजी वाहो,
ज्याचें आचरण जसें, त्या तैसा फळद काळ जीवा हो. ’ ॥५२॥
क्षम हि बुधोक्त न रुचलें, रुचलें बालोक्त अक्षम हि, म्यां तें
काय वदावें ? भुलला दोषज्ञ हि भूप अक्षमहिम्यातें. ॥५३॥
‘ धर्मासि सुहृत्द्यूतक्रीडार्थक्षिप्र आण जा, विदुरा ! ’
ऐसें वदे वचन, तें कविहृदयास चि न, कांपवी भिदुरा. ॥५४॥
असकृद्धितोपदेशें बिदुर न शकला नृपासि वळवाया,
कीं तो पुत्रस्नेहें झाला सिद्ध स्वकीर्ति मळवाया ! ॥५५॥
जो पोकळ वळवाया स्वमनास हि न शकला, तया खळ तो
सिकतासेतूस महाबळतोयमहौघसा, कसा वळतो ? ॥५६॥
धर्मासि निरोप हरिप्रस्थीं कटु केवळ स्व - भावाचा,
चिंताम्लानच्छविनें कविनें कथिला चळ - स्वभावाचा. ॥५७॥
जी पतिदत्त गरळरस आणुनि पाजी सुता कयाधू, ती,
हो विदुररीति हि सख्या; दोघींच्या अपयशा दया धूती. ॥५८॥
धर्म म्हणे, ‘ बापाजी ! ऐसें म्हणतात काय हो तात ?
बहु उत्तम, वचनकरा तारक गुरुचे चि पाय होतात. ॥५९॥
गमले तुम्हांपरिस ते कितव हित वसुंधरावरा ! कांहीं,
जाणों तुम्हीं बुडविली श्री उद्धरिजेल त्या वराकांहीं. ॥६०॥
न विचक्षण हित मानी दर्शितनवपुष्टिगुणभरा रोगा,
नवकितवसचिवमंत्रें तरि कुरुगुरुभाग्य बहु भरारो गा ! ॥६१॥
चाला, अवश्य येतों, भावि चुकेना चि जें भलें खोटें,
अयश पुन्हां वृद्धपणीं गुरुचें होईल, दुःख हें मोटें. ॥६२॥
स्वप्नीं हि अनय न घडो, अपकीर्ति नसो, असें असेल मनीं,
तरि तारील जगत्पति मज, सालस जरि नसेंन तन्नमनीं. ॥६३॥
युद्धास द्यूतास हि जावें, ‘ नाहीं ’ म्हणों नये, बा ! हे
माझी अशी प्रतिज्ञा सत्या अत्यादरोचिता आहे. ’ ॥६४॥
ऐसें वदोनि राजा सकुटुंब निघोनि गजपुरा आला;
त्याला पाहुनि आप्तां थोडा, बहु हर्ष दुर्जना झाला. ॥६५॥