केशवचैतन्यकथातरु - अध्याय तिसरा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्रीगणेशाय नम: ।
श्रीराघवचैतन्य केशवचैतन्य । या उभयतांनीं सोडोनि पूर्वस्थान । क्षेत्र जनस्थानासी जाऊन । गोदास्नान पैं केलें. ॥१॥
त्रिरात्र राहोनि तयेस्थळीं । श्रीराम पाहिला नेत्रकमळीं । चक्रतीर्थासी प्रात:काळीं । चतुर्थदिवशीं पातले. ॥२॥
कुशावर्तीं करूनि स्नान । घेतलें त्रिंबकेश्वराचें दर्शन । गंगाव्दाराप्रति जाऊन । वसते जाले दिनत्रय. ॥३॥
तेथुनी श्रीव्दारकेप्रति । जाते जाले चैतन्यमूर्ति । स्नानें करुनि गोमतीं । कृष्ण यदुपति वंदिला. ॥४॥
नारायणसरोवरा जाऊन । करुनियां समुद्रस्नान । आदिनारायणाचें दर्शन । घेते जाले आदरें. ॥५॥
तेथुनी पुष्करतीर्थासी गेले । तीर्थस्नान करोनि वहिलें । कांहीं काळ तेथें राहिले । उभय यतीवरिष्ठ. ॥६॥
उत्तर दिशेचीं तीर्थें करून । दृष्टीं पाहिले नरनारायण । बद्रिकेदारातें वंदून । प्रयागासीं पातले. ॥७॥
तेथें गंगायमुनासंगम । दृष्टीं पाहिला अति उत्तम । वंदिला श्रीत्रिविक्रम । ब्रह्मभावें करोनि. ॥८॥
पाहुनि श्रीक्षेत्र काशी । उभयतां संतोषले मानसीं । दर्शनमात्रें भागीरथीसी । स्तविते जाले आदरें. ॥९॥
‘ श्रीविष्णुपदापासुन । गंगे ! तूं जालीस निर्माण । स्वसामर्थ्येंमात्रें करुन । जग पावन करशी तूं. ॥१०॥
गंगे ! तुज भागीरथें प्रार्थिलें । ह्मणुनि भूतळीं येणें केलें । भागीरथी हें नाम जालें । भगीरथाच्या योगें पैं. ॥११॥
प्राणी राहोनि शत योजन । गंगेकरितां तुझें स्मरण । तो तेथेंचि होतसे पावन । स्मरतां माते ! करसी तूं. ॥१२॥
मार्गीं तुजलागीं पाहुन । प्राशन करिलें जन्हुनें । जान्हवी हें नामकरण । माते ! तुज जाहलें. ॥१३॥
तूं उत्तमामाजीं उत्तम । तुझे तीरीं वसती मुनिसत्तम । तुझें स्नान करितां श्रीपुरुषोत्तम । विष्णु प्रसन्न होतसे. ’ ॥१४॥
ऐसें बहुतांपरी स्तविली । भागीरथी संतोष पावली । चैतन्यदर्शनें निवाली । ब्रह्मनिष्ठ आले ह्मणुनी. ॥१५॥
करुनि मनकर्णिकेचें स्नान । घेतलें विश्वेश्वरदर्शन । चैतन्यरूपें करुनी ध्यान । स्तवनालागीं आदरिलें. ॥१६॥
‘ जय जय शिव विश्वंभरा । नित्य निरंजन निर्विकारा ! । अविनाशा अनंता अपारा ! । शुद्धस्वरुपा स्वयंभू ! ॥१७॥
तूं सच्चिदानंदस्वरूप । तुजला नाहीं नामरूप । तथापि स्मरणकर्त्याशीं निष्पाप । करित अससी निजमहिमें. ॥१८॥
तुझ्या शक्तीचा हा विस्तार । प्रगट जालें चराचर । म्हणुनि तूतें विश्वाधर । म्हणती शास्त्रें पुराणें. ॥१९॥
तूं स्वयें असतां निर्गुण । संपूर्ण जगतासी कारण । माया तुझ्या योगें करुन । चैतन्य रूपा भासतसे. ॥२०॥
तूं भक्तकामकल्पद्रुम । तूं कर्मफलदाता नि:सीम । स्वशरणागताचे श्रम । परिहार करिसी तात्काळ. ॥२१॥
तूं सर्व विश्वाचा संहर्ता परमात्मा रूपें वर्तसी. ॥२२॥
तूं सर्वांसीं कारण । कार्य रूप तूंचि जाण । विश्वीं नसे कांहीं आन । तुजवांचुनि सर्वथा. ॥२३॥
तूं कर्म आणि कर्त्ता । तूं धर्म आणि आचरविता । तू वेदरूपें समस्तां । प्रकाशन करतोसी. ॥२४॥
तूंचि वर्ण आश्रम संपूर्ण । तूं मन्वादिकांच्या रूपें करुन । स्वयें धर्मातें आचरून । स्थापन करिसी सर्वदा. ॥२५॥
तूं सकळंचा प्राण । तूं सकळांचें जीवन । आंदन आर्ता ( ? ) अन्न । सर्वरूपें सर्वांसीं. ॥२६॥
संपूर्ण देवांचा तूं देव । म्हणोनि तुझें नाम महादेव । कल्याणकारक म्हणुनी शिव । तुजलागीं म्हणताती. ॥२७॥
हे गिरिजावल्लभा कामारि ! । हर शंभो पिनाकधारी ! । सर्पभूषण नंदीवरी । बैसुनियां चालसी. ॥२८॥
चिताभस्मातें गुंढुन । करिशी रुद्राक्षधारण । जटाजूट हेमवर्ण । मस्तकावरी शोभतसे. ॥२९॥
दशभुज पंचानन । प्रतिमुखासी त्रिनयन । अर्धचंद्र शोभायमान । मस्तकावरी विलसतसे. ॥३०॥
नीळकंठ त्रिशुळ डमरु । गळा रुंडमाळा परिकरु । गजचर्म वेष्टुनि फणीवरु । कटिप्रदेशीं शोभला. ॥३१॥
हे शंभु अनंता अपारा ! निजानंदा निर्विकारा ! । कृपा करीं वो दातारा ! । प्रसन्न व्हावें या काळीं. ’ ॥३२॥
ऐसें करितां पुष्कळ स्तवन । श्रीविश्वेश्वर जाले प्रसन्न । लिंग डोलूं लागलें जाण । सर्व जन पाहाती. ॥३३॥
उभय चैतन्यमूर्तीलागुन । संपूर्ण काशीमाजील जन । करुनि साष्टांग नमन । स्तुति स्तवन करिताती. ॥३४॥
म्हणती, ‘ येथें बहुत जन आले । परंतु शिव नाहीं प्रसन्न जाले । लिंगही नाहीं डोललें । आजपर्यंत सर्वथा. ॥३५॥
स्वामी ! तुमचें दर्शनें करून । आह्मीं संपूर्ण जालों धन्य । आणि हें क्षेत्र तुमच्या योगें करून । परम पावन जाहालें. ’ ॥३६॥
असो. श्रीविश्वेश्वर ॥ डोलत होता एक प्रहरभर । संपूर्णांनीं पूजा उपचार । करुनि गजर पैं केला. ॥३७॥
करुनि पूजाउपचार । यतींचा केला बहु सत्कार । भरिलें द्रव्याचें भांडार । सेवकजनीं ते काळीं. ॥३८॥
त्या द्रव्याचें शिवालय बांधिलें । त्यामाजीं शिवलिंग स्थापिलें । त्याचें नाम केशवचैतन्य ठेविलें । काशीमध्यें व्दिजवरीं. ॥३९॥ काशीक्षेत्रीं देवालय । अद्यापि विराजमान आहे । सर्व जन दर्शनासी लवलाहें । नियमें जाती प्रतिदिवशीं. ॥४०॥
ऐसी काशींत कीर्ती ठेऊन । तेथुनि जगन्नाथासीं केलें गमन । करुनि पूर्वसमुद्राचें स्नान । जगन्नाथदर्शन घेतलें. ॥४१॥
तेथुनि कल्याणकलबुरग्यासि आले । तेथें स्थळ राहावयासी नाहीं मिळालें । म्हणुनी उभयतां खेद पावले । पर्जन्यवृष्टी होतसे. ॥४२॥
मग एका मसिदी माझारीं । राहते जाले उभय मस्करी । पादरक्षा मध्यकोनाड्याभीतरें । मसिदींत ठेविल्या. ॥४३॥
तंव तेथील अधिकारी मुल्लाणा । दीपलावावयासी आला जाणा । उभयतांलागीं भाषणा । करितां जाला निष्ठुरत्वें. ॥४४॥
मुलाणा म्हणे, ‘ तुम्हीं हें काय केलें ? । आमचे धर्मालागीं बुडविलें । मसिदीमध्यें जोडे ठेविले । मुख्य स्थानीं जाऊनी. ’ ॥४५॥
ऐसा मुलाणा भरुनि रागें । सवेंचि जाऊनि लगबगें । तेथील काजीप्रत वृत्तांत सांगे । बहू खेदातें करुनि. ॥४६॥
‘ हिंदूचे फकीर दोघे आले । आमचे मसिदीत उतरले । आणि पायांतील जोडे ठेविले । आपले निमाजस्थानीं पैं. ॥४७॥
म्यां तयांतें निवारिलें । परि ते ऐकेनासे जाले । या करितां सांगावया वहिलें । आलों तुम्हांसंनिध. ’ ॥४८॥
ऐसें ऐकोनि तो काजी । त्वरित आला मसिदीमाजी । क्रोधयुक्त होउनी तो पाजी । बोलता जाला निष्ठुरत्वें. ॥४९॥
‘ ब्राम्हणगुरु तुम्हीं संन्यासी । न जातां ब्राम्हणगृहासी । सोडुनि आपुले धर्मासी । आमचे धर्मासी बुडविलें. ॥५०॥
तुम्हीं येथुनि जावें सत्वरी । नाही तरी दंड होईल भारी. ’ । ऐसें ऐकुनि ते यतीवरकेसरी । निर्भय वसते जाहले. ॥५१॥
मग काजीनें मुल्लाणा पाठविला । आणि निजामशाहा पातशाहाला । वर्तमान कळविता जाला । साद्यंत तेथें जालें तें. ॥५२॥
इकडे अनेक यवनांचा मेळा । भोंवता होता जाला गोळा । जैसा जंबुकांचा पाळा । व्याघ्रापाशीं मिळतसे. ॥५३॥
ग्रामामधील जन । मिळते झाले संपूर्ण । यवनांलागीं भय दारुण । होतें जालें ते वेळीं. ॥५४॥
तंव सैन्यासहित बादशाह तेथें । येऊनी पातला त्वरित । सर्वांनीं सांगतां वृत्तांत । आपले मनीं दचकला. ॥५५॥
बादशाहाची येतां स्वारी । प्रळय वर्तला ग्रामामाझारीं । ब्राह्मणांचे घरोघरीं । पीडा करिते जाहले. ॥५६॥
ह्मणती, ‘ ठोका येथील ब्राह्मणांसीं । यांणींच आणविलें संन्याशी । बिघडविले आमुचे धर्मासी । मसिद खराब पैं केली. ’ ॥५७॥ ब्राह्मण मुलांबाळासहित । येत जाले मसिदींत । स्वामीसन्निध रुदन करित । बसते जाले ते काळीं. ॥५८॥
ह्मणती, ‘ तुम्हांकरितां आम्हाला । बादशाहा दु:ख देता जाला । आतां ग्राम सोडोनि आम्हाला । जाणें आलें ये काळीं. ’ ॥५९॥ स्वामी विचारिती मानसीं, । ‘ आह्माकरितां ब्राह्मणांसी । दु:ख  होतें अहर्निशीं । जावें आता येथुनि. ’ ॥६०॥
करितां द्विजांचें शांतवन । तंव बादशाहाचि आला आपण, । ह्मणे, ‘ तुम्ही आहांत कोण । मसिदींत  राहिलां ? ॥६१॥
निजाम पढावयाचें स्थान । तेथें ठेविलें पादरक्षेलागुन, । आतां सोडोनि आमचा ठिकाण । जावें अन्य स्थळासि. ॥६२॥
जोडे घेऊनियां हातीं । जावें निघोनि निश्चितीं । नाहीं तरि तुम्हांप्रति । शासन करीन ये काळीं. ’ ॥६३॥
निजामशाहा बादशाहासी । बोलते जाले उभय संन्यासी, । ‘ तूं आपले म्हणतोसि मसिदीसी । तरी बोलवूति इजसी न्यावें पैं. ॥६४॥ आम्ही पृथ्वीवरि बैसलों, । तुझें मसिदीस नाहीं शिवलों, । कोठुनि आलों ना गेलों । असो जेथील तेथेंची. ’ ॥६५॥
मग निजामशाहा आपण । धरूनि करामतीचा अभिमान । कर्णांमाजी बोटें घालून । निमाज करिता जाहला. ॥६६॥
‘ मसिदमा मसिदमा ’ ऐसें ह्मणून । हाका मारी उच्च स्वरेंकरून । वारंवार उठून बसून । प्रार्थनेसीं करितसे ॥६७॥
ऐसी प्रार्थना बहुवेळ । केली, ती जाली निर्फळ, । मसिद न बोलोनि एकांगुळ । ढळली नाहीं ते काळीं, ॥६८॥
मग श्रीचैतन्यमूर्ति योगेश्वर । धर्मरक्षणार्थ जयांचा अवतार । एक परमात्मा एक ईश्वर । नररूपें प्रगटले. ॥६९॥
तेज:पुंज उभय मूर्ति । त्रैलौक्यभरी जयांची कीर्ति । लोकोद्धारार्थ त्यांची प्रवृत्ति । पावन करिती सर्वांतें. ॥७०॥
सर्वदा ज्यांची  ब्रह्मीं स्थिती । देहत्वेम दिसती लोकांप्रति । हें जावया जगदांती । चमत्कारा दाखविलें. ॥७१॥
मसिदीस पुसती ‘ तूं कवण ? ’ ती म्हणे, ‘ मी तुकची दासी आंदण. ’ । स्वामी म्हणती, ‘ याचा ठिकाण सोडून । चाल येथुनी. ’ ॥७२॥ मग इंद्रादि देवांचें विमान । जैसें अंतरिक्षीं करी गमन । तैसी स्वामीसह आपले आपण । मसिद उडती जाहली. ॥७३॥
कलबुरगें सोडोनि दुरी । जाती जाली पाव कोशावरी । परंतु मृत्तिका तिळभरी । ढळली नाहीं तियेची. ॥७४॥
यवनस्पर्श होईल ह्मणुनि । स्वामी अदृश्य जाले तयेस्थानीं । पाठीमागें तो बादशाहा मनीं । विचार करित बैसला. ॥७५॥
म्हणे, ‘ हा पुरुष महान थोर । हिंदुमाजीं पीरपैगंबर, । तयाचा केला म्यां अनादर । धिक्कार असो मजलागीं. ॥७६॥
मी अधमांमाजी अधम । केला सिद्ध पुरुषाचा अतिक्रम । मजप्रति जाला भ्रम । आपण श्रेष्ठ ह्मणऊनि. ॥७७॥
हे उभय यती परमात्मस्वरूप । यांचें छळणेचें मज घडलें पाप । आतां मज देऊनि शाप । दग्ध करतिल ये क्षणीं. ॥७८॥
आतां तयांतें जावें शरण । करावा अपराधनिवेदन् । मग जैसें घडेल दैवेंकरून । तैसें घडो ये काळीं. ’ ॥७९॥
मग उभय हस्तांतें बांधुनी । बादशाहा आला तयेस्थानीं । तव स्वामी न दिसती नयनीं । अदृश्य होते जाहले. ॥८०॥
मग बहु शोका आदरिलें । सर्व भोगां त्यजिलें । बहुत दिवस उपवास केले । प्राण व्याकुळ होतसे. ॥८१॥
मग तया मसिदीमाझारीं । दोन कबरा बांधिल्या शेजारीं । राघवदराज केशवदराज या परी । नामें ठेविलीं तयांचीं. ॥८२॥ सव्यभागीं बैसुनि ब्राह्मण । करुनि रुद्रावर्तन । वेदोक्त मंत्रें पूजाविधान । करिते जाले सर्वदां ॥८३॥
वामभागीं संपूर्ण यवन । कमला पठती आपण । त्रिकाळ निमाज करून । उभे असते जाहले. ॥८४॥
बादशाहा करितो उपोषण । ह्मणोनि स्वामी होऊनि प्रसन्न । आळंदगुंजोटी दीड योजन । तेथें प्रगट जाहले. ॥८५॥
बादशाहानें ऐकूनि वार्ता । मार्गीं घाली दंडवतां । घेऊनि यवनजाति समस्ता । आळंदगुंजोटीसी पातला. ॥८६॥
हस्त बांधूनि उभा राहिला, । ‘ मीं तुमचा अपराध केला, । आतां शासन करा मजला । ह्मणजे निर्दोष होईन. ॥८७॥
नलगे मज राज्यसंपत्ती । करीन शरिराची माती । फिरेन तुमच्या सांगातीं । फकीर होऊनि ये काळी. ’ ॥८८॥
तयाचा दृढ भाव पाहून । चैतन्यमूर्ति जाले प्रसन्न, । देते जाले अभयदान । ‘ निर्भय ऐसं ’ ह्मणऊनि. ॥८९॥
बादशाहा ह्मणे, ’ स्वामीराया । जरी मजवरी तुमची पूर्ण दया । तरी सोडुनि ग्रामास या । जाऊं नये अन्य कोठें. ॥९०॥
भक्ति पाहोनि बादशाहाची । स्वामी ह्मणती, ‘ घडेल तैसेंचि. ’ । ऐसें बोलोनि रवानगी त्याची । आशिर्वाद देऊनि पैं केली. ॥९१॥ सच्छिष्य केशवचैतन्याप्रति । [ श्रीराघवचैतन्य प्रती । ] श्रीराघवचैतन्य आज्ञापिती, । ‘ तुवां जावें उत्तमग्रामासी निश्चिती । अनुष्ठानतळीं आमुच्या. ॥९२॥
आमची जाली बहु प्रसिद्धि । आतां फार होईल जनउपाधी । आतां याकरितां समाधी । घेतों आह्मी या स्थळीं. ’ ॥९३॥
ऐसें आज्ञापुनि आपण । पावते जाले अंतर्धान । मग सर्वांनीं अमित द्रव्य वेंचून । समाधी बांधिली तये स्थळीं. ॥९४॥
‘ राघवदराज ’ तयालागुनी । नांव ठेविलें यवनांनीं. । ‘ राघवचैतन्य ’ ब्राह्मणांनीं । म्हणत असावें सर्वदां. ॥९५॥
एक भागीं पूजा करिती ब्राह्मण । एक भागीं पूजा करिती यवन । अद्यापि तेथील महिमान । चालली असे यापरी. ॥९६॥
देशोदेशींचे यात्रेकरी येती । नाना प्रकारचे नवस करिती । तयांचे मनोरथ पूर्ण होती । नवसांसी स्वामी पावूनि. ॥९७॥
सभोंवतीं केलीं उपवनें । विचित्र स्थळें बांधिलीं जाण । वापी कूप तडाग खनन । केलीं स्थळोस्थळीं पैं ॥९८॥
उत्साह महोत्साह होती । निशाणें पताका शोभती । भेरी चौघडे वाजती । प्रतिदिनीं त्या स्थानीं. ॥९९॥
जैसी इंद्राची अमरपुरी । कीं द्वारकेची आणिली दुजी सरी । तैसें स्थळ ते अति कुसरीं । निर्माण होते जाहले. ॥१००॥
गुरुसेवा घडावी म्हणऊनि । गाव मान्य त्रैकोश तेथुनि । मठिका बांधुनि तये स्थानीं । केशवचैतन्यबाबानीं. ॥१०१॥
गुरुसमाधीचे दर्शनासी । यावें आळंदगुंजोटीसी । मागुते मान्यहाळासी । जावें पूजा करूनि. ॥१०२॥
श्रीगुरूचा वियोग जाला । म्हणूनि उद्विग्नता मनाला । ऐसा बहुतकाळ गेला । तंव स्वामीदर्शन जाहलें. ॥१०३॥
स्वरूप सुंदर सांवळी तनु । तेज:पुंज जैसा भानु । सरळ नासिका नीघोट हनु । विशाळ नयन शोभती. ॥१०४॥
आजानुबाहु दंड सरळ । विस्तीर्ण हृदय विशाळ । त्रिवळीखालीं नाभीकमळ । अति सखोल शोभतसे. ॥१०५॥
कर्दळीस्तंभाचिये परि । जानुद्वय अति साजिरी । नखें पादांगुळ्यापरीं । चंद्र रेखा ठेविल्या. ॥१०६॥
चंद्रासम सुंदर वदन । जटा शोभती हेमवर्ण । सर्वांगीं भस्म विराजमान । दिगंबर मूर्ति नेटकी. ॥१०७॥
ऐसें राघवचैतन्यदर्शन । अकस्मात होतें जालें जाण । दंडवत नमस्कारांतें करून । केशवचैतन्य उभे ठेले. ॥१०८॥
मग श्रीगुरु जालें बोलते, । ‘ पूर्वींच सांगितलें होतें तूतें । कीं तुवां जावें उत्तमग्रामातें । अनुष्ठानस्थळीं आमुचे. ॥१०९॥
तेथें दाखवूनि चमत्कार । करावा जगताचा उद्धार । भक्ति ज्ञान वैराग्य परिकर । प्रगटावें सर्वत्रीं. ॥११०॥
ब्रह्मरूपेंकरून कांहीं । आमचा तुजला वियोग नाहीं । आतां खेद सांडूनियां लवलाही । जावें मांडवीतीरासी. ’ ॥१११॥
ऐसें वदोन राघवचैतन्य । मागुतीं पावले अंतर्धान । मग केशवचैतन्य तेथून । प्रस्थान करिते जाहले. ॥११२॥
मागें मिळुनि भक्तमंडळी । त्या मठामाजीं मान्यहाळीं । पादुका स्थापिल्या तयेवेळीं । केशवचैतन्यस्वामीच्या. ॥११३॥
सर्व जन म्हणती केशवचैतन्य । भाविक ह्मणती बाबाचैतन्य । दोन्हीं नामें एकची जाण । अत्यादरें बोलती. ॥११४॥
ती कथा चतुर्थ अध्यायीं । वर्णिली जाईल पाहीं । महाराष्ट्रदेशासी लवलाहीं । केशवचैतन्य पावले. ॥११५॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णिली पुण्यरासी । श्रवणमात्रें गुरुभक्तासी । आल्हाददायक निश्चयीं. ॥११६॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरु । संपूर्णफलदायनी उदारू । श्रवणपठणें दु:खपरिहारू । होईल श्रोत्यावक्त्यांचा. ॥११७॥
॥ श्रीराघवचैतन्य केशवचैतन्यार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP