केशवचैतन्यकथातरु - अध्याय दुसरा
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
श्रीगणेशाय नम: ॥ ऐसें गुरुभक्तांचें महिमान । ऐकतां संतोष पावे मन । त्रिवर्ग बंधू एके ठायीं जाण । असतां अद्भुत वर्तलें. ॥१॥ बंधु त्रिंबकभटजीसहित । विश्वनाथभट बाबा तेथ । राहतें जाले निवांत । तंव पुढें कलह वर्तला. ॥२॥
बाबांची वृत्ती उदासीन । त्रिकाळ करावें संध्यास्नान । धर्मालागीं उदार पूर्ण । गृहकृत्य कांहीं करूं नये. ॥३॥
बंधूनें करूनि अनादर । भाषण केलें बहु कठोर । हस्त धरूनि गृहाबाहेर । विश्वनाथभटजीस घातलें. ॥४॥
त्याची पत्नी गिरिजाबाई । समागमें निघाली ते समयीं । बरोबर कांहीं घेतलें नाहीं । एका वस्त्रें निघालीं. ॥५॥
करुनी तिर्थयात्रेचा उद्देश । निघते जाले त्रिंबकेश्वरास । येऊनि राहिले ओतूरास । वस्तीलागीं उभयतां. ॥६॥
वस्त्र नाहीं नेसावयासी । अन्नही न मिळे खावयासी । ऐशा विपत्तीनें त्रासासीं । स्त्रीनें बहुत दिधलें. ॥७॥
ह्मणोन घोर वनामाझारीं । बाबाजी निघाले सत्वरीं । मांडवी पुष्पावतीचे तिरीं । स्नानसंध्येसी बैसले. ॥८॥
वज्रप्राय स्त्रियेचें वचन । स्मरोनियां अंत:करण । होऊनियां अतिदैन्यवाणें । रुदन करूं आरंभिलें. ॥९॥
तंव नारद भेटतां ध्रुवाला । बहुतां परि संतोष जाला । तैसें पूर्व पुण्य आलें उदयाला । विश्वनाथभटजींचें. ॥१०॥
जैसा व्यासपुत्र शुकयोगींद्र । तपोनिधि ज्ञान समुद्र । तैस राघवचैनत्य यतींद्र । पाठीं उभा राहिला. ॥११॥
ह्मणती, ‘ तूं कोण आलासी येथें ? । किमर्थ करितोसी शोकातें ? । खेद सोडुनि स्वस्थ चित्तें । वृत्तांत सांगें सर्वही. ’ ॥१२॥
करुनि साष्टांग नमस्कार । बाबाजी सांगती दु:खाचा प्रकार । म्हणती, ‘ महाराज ! हा संसार । घोरांदर मज जाहला. ॥१३॥
मी रुगुशाखाध्यायी ब्राह्मण । विश्वनाथ माझें अभिधान । पुण्यग्रामीं वस्तीलागुन । बंधूसहित राहिलों. ॥१४॥
तेथें कांहीं काळ असतां । बंधूनें करुनि अतिनिर्दयता । आह्मां स्त्रीपुरुषां उभयतां । गृहाबाहेर घातलें. ॥१५॥
तेथूनि ओतूरासी आलों । एका ब्राह्मणाचें गृहीं राहिलों । तेथेंही स्त्रीभाषणें पीडिलों । तें काय किती सांगावें ? ॥१६॥
भार्या ह्मणे, ‘ अहा रे दैवा ! । दु:ख जालें माझिया जिवा । पती मिळाला नाहीं बरवा । कैसें आतां करावें ? ॥१७॥
पोटीं नाहीं पुत्रसंतान । पदरीं नाहीं कांहीं धन । वस्त्र फाटूनि जालें जीर्ण । पोटभरी अन्न मिळेना. ॥१८॥
कानीं नाहीं बाळीबुगडी । मिळालीं नाहीं चांगलीं लुगडीं । सुख नाहींच अर्धघडी । जालें याचें संगतीनें. ॥१९॥
आपण मिळविना अधेला । मिळालें दे ब्राह्मणांला । ह्मणुनि बंधूनें घालविला । हात धरुनि बाहेरीं. ॥२०॥
हा कोणाचें आर्जव न करी । नाक धरुनि बसतो घरीं । जाईना कां गिरिगव्हरी । स्नानसंध्यालागीं पैं. ॥२१॥
ऐसीं स्त्रियेचीं दुर्भाषणें । समक्ष ऐकूनियां कर्णें । त्रास घेतला माझिया मनें । ह्मणोनि आलों या स्थळीं. ॥२२॥
कोणाची स्त्री ? कोणाचा बंधू ? । हा अवघाचि दु:खसंबंदु । तुह्मां ऐसा दयासिंधु । भेटतां सुख होतसे. ॥२३॥
या त्रैलोक्याचे ठायीं । स्वामी ! मजला कोणी नाहीं । पुढें संततीही कांहीं । जाली नाहीं सर्वथा. ’ ॥२४॥
ऐसें ऐकुनि दीन वचन । श्रीराघवचैतन्य आपण । त्या दु:खासी विभागी होऊन । बोलते जाले आदरें. ॥२५॥
‘ विश्वनाथा ! ऐकोनि घेईं । मजलाहि पुत्र नाहीं । याचें लवलाहीं । सांगे मजलागीं तूं. ॥२६॥
तूं ह्मणसी मज कोणी नाहीं । तरी तुज मी आहें सर्वस्वही ’ । ऐसें ह्मणोनि लवलाही । पूर्णकृपा पैं केली. ॥२७॥
विश्वनाथासी आपुले । स्वामींनीं मांडीवरी बैसविलें । मुखालागीं कुरवाळिलें । निजहस्तें करुनियां. ॥२८॥
कृपादृष्टि अवलोकिलें । बहुतांपरी संबोखिलें । परी चित्त बाबाचें उबगलें । स्त्रियेविषयीं सर्वथा. ॥२९॥
ह्मणती, ‘ पुरे हा संसार । माझी भार्या क्रोधी फार । जैसी तरवारीची धार । तैसी तीव्र बोलती. ॥३०॥
मज नाहीं प्रपंचाचें ज्ञान । मिळवितां न ये धन । न सोसवे स्त्रियेचें बोलणें । ह्मणोनि आलों सोडोनियां. ’ ॥३१॥
स्वामी बोलती कृपानिधी, । ‘ तुजसी स्त्रीत्यागासी आहे अवधी । मी सांगतों शास्त्रविधी । ऐकोनियां घेईं पां. ॥३२॥
पाणिग्रहित स्त्रियेसी । नेम केला विवाहदिवसीं । तुजसह धर्मार्थकामासी । सेवन करिन ह्मणऊनी. ॥३३॥
मोक्षइच्छा होती जेव्हां । स्त रियेसी सोडोनि जावें तेव्हां । नाहीं तरी पितरां देवां । द्वेष होईल सर्वथा. ॥३४॥
पंचविसावें वर्ष तुजलागून । नाहीं फिटलें स्त्रियेचें ऋण । जालिया एक पुत्रसंतान । त्याग करीं तियेचा. ॥३५॥
माझिया आशिर्वादेंकरून । पुत्र होईल तुजलागुन । मज करी अन्नप्रदान । क्षुधा फार लागलीसे. ’ ॥३६॥
मग आज्ञा मागुनी स्वामिसी । विश्वनाथभट आले ग्रामासी । साद्यंत वृत्तांत स्वस्त्रियेसी । कथन केला ते काळीं. ॥३७॥ ‘ राघवचैतन्य प्रसन्न जाले । पुत्र होईल ऐसें वदले । परि नेऊनियां धातलें । पाहिजे त्यांना भोजन. ’ ॥३८॥
गिरिजाबाई संतोषली । उत्तम प्रकारचीं अन्नें केलीं । ते विश्वनाथें घेऊनि वहिली । स्वामीसन्निध पातले. ॥३९॥
नखांच्या चुंबळी जाल्या ह्मणून । घातलें विश्वनाथें भोजन । स्वामी होउनि अति प्रसन्न । अक्षयी वर दिधला. ॥४०॥
‘ तुज होईल उत्तम पुत्र । पुढें वंशवृद्धी करील पवित्र । तुज मोक्ष होउनि चरित्र । प्रगट होईल भूमंडळीं. ’ ॥४१॥
‘ तथास्तु ’ ह्मणोन वंदन केलें । विश्वनाथभट गृहासीं आले । उभयतां स्त्रीपुरुषें सेवन केलें । शेष अन्न उरले तें. ॥४२॥
गिरिजाबाई जाली गर्भिणी । नव मास भरतां क्रमें करुनि । जाली पुत्राची जननी । उत्तम नगरीं द्विजगृहीं. ॥४३॥
कांहीं साहित्य पडतां उणें । सर्वदां संतापुनियां मनें । भर्त्यालागीं कठोर भाषणें । गिरिजाबाई करितसे ॥४४॥
दशम दिवस लोटल्यावरी । विश्वनाथ सोडुनी नगरी । जाते जाले वनामाझारीं । राघवचैतन्यासन्निध. ॥४५॥
प्राप्त होतां तेरावा दिवस । मिळोनी सुवासिनी ब्राह्मण । करिते जाले नामकर्म । नृसिंहभट ह्मणुनी. ॥४६॥
श्रीचैतन्यपदकमळीं । विश्वनाथें ठेऊनि मौळी । उभा हात जोडोनी जवळीं । प्रार्थनेसी करितसे. ॥४७॥
‘ सरली संसाराची कथा । मजला संन्यास द्यावा आतां । दूर करावी जी ! भवव्यथा । स्वामीराया ! दयाळा ! ’ ॥४८॥
वैराग्यें चित्त शुद्ध जालें । स्त्रीचें ऋणही फिटलें । ऐसें पाहुनि प्रसन्न जाले । राघवचैतन्य ते काळीं. ॥४९॥
संन्यासपद्धतीचे प्रकारें । माझे नामाचेनि अनुसारें । केशवचैतन्य नाम बरें । विचार करुनि ठेविलें. ॥५०॥
मग शिष्यातें सन्मुख बैसवून । करिती महावाक्याचें बोधन । शक्तिपातप्रभावकरून । साक्षात्कार केला पैं ॥५१॥
होतां ब्रह्माकार वृत्ती । मनाची मोडली प्रवृत्ति । मावळुनी गेली देहस्मृती । जीव भ्रांती उडाली. ॥५२॥
जाली निर्विकल्प समाधी । विलया गेली चित्तबुद्धि । सुख पावले निरवधि । केशवचैतन्य ते काळीं. ॥५३॥
ऐसे बहुत दिवस गेले । कोणातें ठाऊकें नाहीं जालें । पुनरपि स्मृति विसरले । करूं आदरिलें स्तवनासी. ॥५४॥
‘ धन्य धन्य जी श्रीगुरुराया ! । मज पावविलें आपले ठायां । काय उतराई होऊं पायां । श्रीगुरुमूर्ति ! तुमचे. ॥५५॥
अनुपम्य सुखातें पावलों । ब्रह्मरस पिउनी धालों । जन्मा येवोनि कृतार्थ जालों । स्वामीप्रसादेम करुनि. ॥५६॥
मी मातें चोरिलें होतें । तें सांपडलें तुमचेनि हातें । निज धन पाउनी निरुतें । संपन्न जालों सर्वदां. ॥५७॥
स्वामी ! पूर्वींचा मी कोण भुललों होतों कैसियानें । तुह्मी कैसें पावविलें नेऊन । हें मजलागीं सांगावें. ’ ॥५८॥
‘ अरे ! तूं ब्रह्म निर्विकार । सत्य ज्ञानानंत अपार । परि अनादि अविद्येस्तव संसार । तुजलागीं प्राप्त जाला. ॥५९॥
अविद्या तम आणि माया । तिचींचि नामें असति गा प्रिया ! । नसतां भासली सेवाया । कैशापरि ऐके तें. ॥६०॥
जैसें आकाशीं अभ्रपडळ । कीं सूर्यरश्मिवरी मृगजळ । तैसा शबलब्रह्मीं हा सकळ । भासता जाला चिद्विवर्त्त. ॥६१॥
चिच्छक्तिसहित ब्रम्हचैतन्य । त्यासि परमात्मा ऐसें अभिधान । तोचि प्रकृतीपुरुषरूपेंकरून । नटाचे परि जाहला. ॥६२॥ अर्धनारीनटेश्वर । जया म्हणे सांख्यशात्र । तो जीवेश्वरत्वें द्विप्रकार । जाला प्रतिबिंबत्वें. ॥६३॥
प्रकृती माया अविद्या जाली । माया त्रिगुणांतें विसरली । गुणक्षोभिणी ऐसी बोली । जियेलागीं असे पैं. ॥६४॥
मायाप्रतिबिंब तो ईश्वर । अविद्या प्रतिबिंब जीव थोर । अविद्या जाली नाना प्रकार । म्हणोनि जीव नाना जाले. ॥६५॥
माया ईश्वरें अवलोकिली । ती महातत्वातें व्याली । महातत्वापासुनि जालीं । अपंचीकृत भूतें पैं. ॥६६॥
शब्दस्पर्श रूप रस गंध । पंच तन्मात्रा नामें विविध । त्याचें पंचीकरण करितां प्रसिद्ध । पंचमहाभूतें जाहली. ॥६७॥
आकाश वायु तेज पाणी । पांचवी भुतें ही मेदिनी । त्यामाजी ईश्वर प्रवेशुनि धारण केली स्वसत्ते. ॥६८॥
ऐसें निर्मुनी ब्रम्हांड । त्यामाजी चतुर्दश भुवनें प्रचंड । तेथें स्थावर जंगम जिवाचे पिंड । निर्माण केलें अनुक्रमें. ॥६९॥
महाभूताचे स्थूळदेह घडिले । आपची कृताचे लिंगदेह जाले । अविद्या कारणदेह या बोलें । सांगितलें शास्त्रानें. ॥७०॥
येथवरी चैतन्य जें व्यापिलें । तें जीवदशेतें पावलें । ह्मणुनि आपणातें भुलले । स्वप्नाचियापरी. ॥७१॥
मी भुललों कासयानें । ऐसें तुवा पुसिलें म्हणून । सांगितलें अनुक्रमालागुन । बाळअख्याईसारिखें. ॥७२॥
ब्रम्हा उत्पत्तिचा अभिमानी । विष्णु प्रवृत्त असे पालनीं । रुद्र संहारालागुनी गुणव्यक्ति प्रगटला. ॥७३॥
आतां सांगतों उपसंहार । तो ऐकोनि घेईं परिकर । संसारइच्छा धरी ईश्वर । तेव्हां रूपें संहारी. ॥७४॥
सूर्य तपोनि द्वादशकळीं । शेष विषातें वमी पाताळीं । तेव्हां पृथ्वीची होऊनि होळी । राखोंडी होय सर्वांची. ॥७५॥
संवर्त मेघांच्या धारा । पडती गजशुंडाकारा । पृथ्वी वरी जैशा गोरा । साकरेच्या विरतसे. ॥७६॥
तेज शोषुनि घे आपातें । वात नाहींसें करी तेजातें । आकाश वायू नाहींसें करीत । पोकळी आंत सर्वस्वें. ॥७७॥
गुण नाहींसें करिती आकाश । गुण प्रकृतींते होती समरस । तेव्हां गुणसाम्या ऐसें तीस । नाम कर्ण होतसे. ॥७८॥
अविद्या आणि काम्य कर्म । संपूर्ण जिवाचे तेथें उपरम । बीजभाव तो गा ! उत्तम । पुनरपि सृष्टि व्हावया. ॥७९॥
ऐसा उपक्रमोपसंहार । ह्येत जात वारंवार । परि न चुके जिवाचा संहार । तत्त्वज्ञानावांचुनि. ॥८०॥
हें उपक्रमोपसंहारद्वय । अवघा अध्यारोपचि होय । आताम अपवादाची सोय । धरुनियां सांगतों. ॥८१॥
परि आधीं नित्यानित्यविवेचन । करावें लागे युक्तिकरून । जेणें अन्वयव्यतिरेकें लक्षण । ठायीं पडेनिश्चयीं. ॥८२॥
ज्ञानमात्र जो शुद्धात्मा । तोचि ब्रह्मांडीं परमात्मा । पिंडीं ह्मणती जीवात्मा । साक्षीं द्रष्टा तोचि पैं. ॥८३॥
स्थूळदेह जो भूतकार्य । तो आत्म्यासि दृश्य होय । म्हणोनि अनात्मा तो स्वयें । द्रष्टा त्याहुनि वेगळा. ॥८४॥ अपंचीकृतभूतांपासुनि । जाला सप्तदशकलेंकरुनी । लिंगदेह जो अनात्मपणीं । दृश्य होय सर्वथा. ॥८५॥
अविद्याकार्य कारणदेह । जो आपणांना अन्य पाहे । आत्मा तयाचा साक्षी पाहे । यास्तव त्याहुनि वेगळा. ॥८६॥
जागृत अवस्थ आणि स्वप्न । तिसरी अवस्था सुषुप्ति जाण । या आत्मयासी दृश्य म्हणुन । अनात्मरूप जाणाव्या. ॥८७॥
विश्व तेजासी अभिमानी । तिसरा प्राज्ञ नामें करूनि । हे प्रतिबिंबरूप म्हणुनि । अनात्में होत निश्चयें. ॥८८॥
देह अवस्था अभिमानी । हें संपूर्ण मायाकार्य म्हणुनि । ओळखावें व्यतिरेकेंकरूनि । यांत अन्वय आत्म्याचा. ॥८९॥
आतां पदार्थ शोधुन । ऐक सांगतों तुजलागुन । विराट मायाकार्य म्हणुन । मिथ्या होय सर्वथा. ॥९०॥
संपूर्ण लिंगदेहाचा अभिमानी । हिरण्यगर्भ या नामेंकरुनि । आणि संपूर्ण कारणदेहाची जननी । अविद्या तेहि टाकावी. ॥९१॥
उत्त्पत्ति स्थिति संहार । या तत्पदींच्या अवस्था परिकर । अभिमानी ब्रह्मा विष्णु रुद्र । हे संपूर्ण माईक पैं. ॥९२॥
तत्पदींची सर्वज्ञता । आणि त्वंपदींची किंचिज्ज्ञता । या माईक ह्मणुनि सर्वथा । टाकुन द्याव्या उभयही. ॥९३॥
जहद् आणि अजहद् । तिसरे ते जहदाजहद् । या लक्षणेकरूनि ब्रह्म अभेद । वस्तु तेचि जाणावी. ॥९४॥
जैसें घटमठीं अभिन्न । एक अखंड असे गगन । तैसें पिंडब्रम्हांडीं चिदाकाश पूर्ण । व्यापुनी उरलें पुष्कळ. ॥९५॥
हे वस्तु गा ! तुजप्रति । पूर्वीच बोधिली या निगुति । तेथें लीन जाली तुझी मती । जीव भ्रांति निमाली. ॥९६॥
हें सर्व साधनांचें सार । महावाक्याचें जिव्हार । ऐक्य पावती जीवेश्वर । या या स्थानीं निश्चित. ॥९७॥
श्रुति युक्ति आणि अनुभूति । तेथें मिळती निश्चिती । तें स्वरूप तुजप्रति । प्राप्त जालें ये काळीं. ॥९८॥
आतां मूळ अविद्या गेली । अहंता ममता मावळली । वासना वेली जळाली । कर्मफळासहित. ॥९९॥
येथवरी कथिला अध्यारोप । शुद्ध ब्रह्मीं करुनि आरोप । आतां अपवादाएं स्वरूप । सांगतों त एं ऐक पां. ॥१००॥
नाहींत ब्रह्मीं माया अविद्या । जीवेश्वर आणि ब्रह्मविद्या । प्रकृती चिच्छक्ति ज्या आद्या । त्याही नाहीं सर्वथा. ॥१०१॥
नाहीं त्रिगुणांची मांडणी । पंचभूतें जाली जया पाठिणी ( ? ) । ते अपंचीकृत भूतखाणी । नाहीं केवळस्वरुपीं. ॥१०२॥
अवस्था आणि देह अभिमानी । हे तरी कैंचें तयेस्थानीं । ब्रह्मीं नाना नाहीं ह्मणोनि । श्रुति सांगे निश्चयें. ॥१०३॥
ब्रह्माकार तुझें मन झालें । ते वेळींच जग मावळलें । ब्रह्मीं नसे हें ह्मणावया उरलें । नाहीं कोणी सर्वथा. ॥१०४॥
स्वप्न मिथ्या जागृतकाळीं । स्मरत असतां वेळोवेळीं । तैसें जग मिथ्या हें त्रिकाळीं । ज्ञानियासी सर्वथा ॥१०५॥
तूं शिष्य भेटलासि अनन्य । ह्मणुनि तुज बोधिलें शुद्ध चैतन्य । आतां तुझें नाम केशवचैतन्य । उपरम पावोनि केलें मौन्य । शिष्यातें, करुनियां धन्य । आपुलिया सारखें. ॥१०७॥
ऐसा गुरुशिष्यसंवाद । होतां वाढला परमानंद । देशधडी गेला खेद । अव्दयबोध जाहला ॥१०८॥
सांनिध्य उत्तम नाम नगरी । मांडवी पुष्पावतीचे तीरीं । घोर अरण्यामाझारी । वसते जाले उभयतां. ॥१०९॥
कांहीं काळ राहोनि तेथें । पुढें गमन होईल भागिरथीतें । ते कथा ऐकिजे स्वस्थचित्तें । तृतीयाध्यायीं सज्जनीं. ॥११०॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णिली पुण्यराशी । श्रवणमात्रें गुरुभक्तासीं । आल्हाददायक निश्चयीं. ॥१११॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरु । संपूर्णफलदानी उदारु । श्रवणमात्रें दु:खपरिहारु । होईल श्रोत्यांवक्त्यांचा. ॥११२॥
॥ श्रीराघवचैतन्य केशवचैतन्यार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP