स्वात्मप्रचीती - अध्याय पांचवा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्री कृपामूर्ति अवधूता । त्रैलोक्यामाजी तुझी सत्ता ।
माझिया बुद्धीचा तूं दाता । होई आतां गुरुराया ॥१॥
मागिल्या अध्यायीं कथाभाग । निरंजनीं गुरुकृपा सांग ।
होऊनी झाला भवभंग । आत्मसंग पावला ॥२॥
आतां ऐकावें श्रोतेजनीं । मुमुक्षुपंथाची सुराणी ।
मज दीनाची साबडी वाणी । गोड केली पाहिजे ॥३॥
वदविता दत्तात्रय मायबाप । तुह्मीही आहां त्याचें स्वरूप ।
श्रवणीं मनालागीं विक्षेस्प । सहसा येऊं न द्यावा ॥४॥
आतां ऐकावा कथारंग । द्वैतभावना झाली भंग ।
करूनिया आत्मसंग । सुखासनीं पहुडलों ॥५॥
मग सवेंचि देहावरी येऊन । सद्गुरुसवें केलें गमन ।
गंगातीरीं आनंदवन । तया स्थाना पैं गेलों ॥६॥
मार्गीं चालतां आनंद भरित । कांहीं हसत कांहीं रडत ।
मोठियानें धुमा ठोकित । सैरावैरा । अरण्यीं ॥७॥
ऐसा सायंकाळ पर्यंत । बहुत मी झालों उन्मत्त ।
मग सद्गुरु ह्मणती सावचित्त । होई आतां लेंकुरा ॥८॥
मग म्यां प्रेमानंद - लहरी । गिळूनि दिधली ढेकरी ।
सायंकाळ होतां माघारी । मठालागी पातलों ॥९॥
ते दिनीं रात्रीं झालें स्वप्न । गंगेंत बंगला केला बाइन ।
तयावरी मी गेलों चढून । वरी जाऊनी बैसलों ॥१०॥
तों इतकियांत एक ब्राह्मण । दुसरे रघुनाथगुरु आपण ।
उभयता बोलते झाले वचन । त्याचें अपान बंद करा ॥११॥
मी सवेंचि जागा होऊन । गुरूतें केलें विचारण ।
ते ह्मणती दत्तात्रय येऊन । योगधारणा कथियेली ॥१२॥
तों दुसरें दिवशीं प्रात:काळीं । अपानवायु अंतराळीं ।
चढूनि लागली असे टाळी । खचरी मुद्रा अलक्ष ॥१३॥
शुद्ध सप्तमी असे ते दिनीं । जयंती नवदिवस तेथोनी ।
उपवासमौनातें अवलंबुनी । देवापाशीं बैसलों ॥१४॥
रात्रंदिवस नंदादीप । पूजाविधान जपजाप्य ।
वाद्यें वाजवी अमूप । वाजंत्री आदि करूनी ॥१५॥
प्रात:काळीं देवाचें पूजन । पंचामृत उष्णोदकें करून ।
वस्त्रअलंकार भूषण । पुष्पमाळा बहुपरी ॥१६॥
नैवेद्यासी शर्करादुग्ध । दक्षणा तांबूल त्रयोदश अंग ।
मंत्र पुष्पांजळी सांग । विधियुक्त मंत्रें करूनी ॥१७॥
ऐसें होतां तीन दिन । चमत्कार झाला मजलागून ।
देवापाशीं होतों बैसून । रात्र मध्यान्ह पैं झाली ॥१८॥
करित बैसलों होतों ध्यान । तों एक वेश्या जवळ येऊन ।
तिनें आपुल्या स्तनेंकरून । माझे हृदयीं ताडिलें ॥१९॥
आणखी एक्याचि हारीनें । आठ वेश्या गृह बांधून ।
आपुलाल्या द्वारीं बैसून । मज बोलवूं लागल्या ॥२०॥
म्यां तयातें धिक्कारून । मग पुढारां केलें गमन ।
तेव दृष्टी देखिला ब्राह्मण । बहु स्त्रिया समवेत ॥२१॥
स्त्रिया लेवोनि वस्त्र भूषण । सुस्वरें करिती गायन ।
वर्णिती श्रीगुरूचे गुण । धन्यधन्य ह्मणवोनी ॥२२॥
तयांलागीं दृष्टी पाहून । निघता झालों एकीकडून ।
गंगातटीं निरंजनस्थान । त्यातळीं येऊन बैसलों ॥२३॥
सहस्त्र चंद्राचे किरण । तैसें माझें स्वरूप होऊन ।
एकटाची राहिलों  बैसून । तेज अळुमाळ फाकलें ॥२४॥
तंव रघुनाथ गुरु आपण । खालीं उतरले माडीवरून ।
माझें तेज गेलें झाकून । पूर्ववत जहालों ॥२५॥
सद्गुरूंनीं कृपा करूनी । एक अष्टदलातें निर्मूनी ।
दाखविलें मजलागुनी । अत इ लाघव तयाचें ॥२६॥
तें अष्टदळ घेऊनी हातीं । पाहता झालों तयाप्रती ।
एकें द्वारें पाहतां व्यक्ति । अष्टद्वाराचि दिसतसे ॥२७॥
सवेंचि तेथुनि गेलों उठून । स्त्रीरूप नोवरी झालों आपण ।
हिरवी पातळ चोळी नेसून । हरिद्रा सर्वागीं लाविली ॥२८॥
दुसरी स्त्री जवळी येऊन । मजशी बोलती झाली वचन ।
रघुनाथबावासी त्यागून । किमर्थ येथें आलासी ॥२९॥
बोवा हे भृगूंचा अवतार । त्यांजपाशीं जाई सत्वर ।
जाऊनी दीप नीट कर । उजेड होईल अंतरा ॥३०॥
ऐसें मजलागीं सांगून । स्त्री अदृश्य झाली आपण ।
सवेंचि ध्यान विसर्जन । करिता झालों अंतरीचें ॥३१॥
नेत्र उघडोनि जों पाहिलें । तंव कोणी नाहींसें झालें ।
दत्तमूर्तीतें अवलोकिलें । नमन केलें साष्टांग ॥३२॥
तंव अकस्मात् कर्णांतुनी । उठती झाली एकचि ध्वनी ।
वाटे वाद्यें वाजती गगनीं । शब्द अनेक प्रकारचे ॥३३॥
उठल्या वाजंत्र्याच्या ध्वनी । नगारे वाजती दणाणी ।
क्षणक्षणा वाजती किणकिणी । घड्याळादि सारिखे ॥३४॥
सवेंचि कर्णामाजी सरारी । उठे एकचि भरारी ।
गोमासी गेली कर्णाभीतरीं । ऐसें वाटूं लागलें ॥३५॥
ऐसी होतां वाद्यध्वनी । क्षणक्षणा बाहेर यावें उठूनी ।
पाहतां बहुत यामिनी । ध्वनी कोठें नसेची ॥३६॥
एकांतीं बैसतां जाऊन । वाद्यें वाजती पहिल्याप्रमाण ।
मग अंतरीं भ्रम उपजून । मठीं फिरूं लागलों ॥३७॥
सवेंचि उगवला दिनमणी । जाऊन कथिलें गुरुलागुनी ।
ते ह्मणती तुज उमजोनी । अर्थांतर सांगतों ॥३८॥
अष्ट वेश्या त्या सिद्धी जाण । तुझे हृदयीं जें केलें ताडण ।
तरि सर्व मनोरथ होतील पूर्ण । ब्रह्म तोचि दत्तात्रय ॥३९॥
भोंवता स्त्रियांचा समुदाव । तें ऋद्धिसिद्धींचें वैभव ।
त्यांसी त्यागिलें त्वां स्वभावें । हें उत्तम त्वां बहु केलें ॥४०॥
तेजस्वी झालें तुझें रूप । तें पाहिलेंसि आत्मस्वरूप ।
स्वप्रकाश ब्रह्मरूप । होऊनिया ठेलासी ॥४१॥
अष्टदळ तें ब्रह्म निर्गुण । वेदशास्त्रें द्वारें करून ।
त्याजला पहावे जिकडून । तिकडून दिसे सर्वही ॥४२॥
वाद्यें वाजली कर्णांतरीं । ते दशनाद झाले अंतरीं ।
वेगळाले बहुतापरी । किंकणि आदि करूनिया ॥४३॥
नवरी झालासी हळदी लागून । तें गुरूसी लाविलें लग्न ।
 दुसरी स्त्री जवळी येऊन । वदली खूण भृगूची ॥४४॥
स्त्रीरूप घेऊनि दत्तात्रय । तुजला सांगितली सोय ।
सत्वरीं भृगूपाशीं जाय । उजेड करी ह्मणाला ॥४५॥
असो माझा अवतार कोण । याविण तुज काय कारण ।
शुद्ध करूनि अंत:करण । ज्ञानदीप लावी कां ॥४६॥
आतां तूं आनंदघन झालासी । राज्यपदवी पावलासी ।
सच्चिदानंद विलासी । होउनि सुखें भोगी कां ॥४७॥
तुझे सुखासी नाहीं पार । पावलासी जीवन्मुक्तीचें घर ।
नको पुसूं वारंवार । सुखी राहे अंतरीं ॥४८॥
मग मी स्तब्धाचि राहिलों । स्वस्वरूपातें पहाता झालों ।
देह - स्फूर्तीसी विसरलों । दोन घटिकापर्यंत ॥४९॥
मग देहावरी येऊन । गुरुसी केलें साष्टांगनमन ।
सद्गुरु कृपावंत होऊन । आज्ञा करिते जहाले ॥५०॥
तुज सांगितलें ब्रह्मज्ञान । त्वाहीं सेविलें भाव करून ।
पूर्वपुण्याचे बळेंकरून । प्राप्त तूतें जहालें ॥५१॥
योगधारण याच्यापुढें । सर्वस्वी दिसताहे बापुडें ।
जैसें पितळी सोन्यापुढें । तैसी वायूधारणा ॥५२॥
जरी ह्मणसी नाहीं पाहिलें । तरी मी सांगतों ऐक वहिलें ।
मग दशमीचे दिवशीं जाण । दोनप्रहर रात्री पाहून ॥५३॥
मग दशमीचे दिवशी जाण । दोनप्रहर रात्री पाहून ।
निरंजन स्थानीं बैसून । सांगते झाले मजप्रती ॥५४॥
प्रथमारंभीं योगासन । पंचदश केलें गोरक्षानें ।
तें मजहाती करवून । पाहिलें गुरूनें सर्वही ॥५५॥
यमनियमादि अष्टांग । तेंहि निवेदन केलें सांग ।
षट्कर्म योगाचीं आंगें । तींहि मज दाखविलीं ॥५६॥
अष्ठकुंभक दशमुद्रा जाण । चारी अवस्था सुलक्षण ।
तें मज केलें निवेदन । आत्मचिंतन शेवटीं ॥५७॥
सर्व एके रात्रीं सांगून । चित्त केलें परिपूर्ण ।
ह्मणती सर्व आहेत साधन । आत्मप्राप्तीलागी पैं ॥५८॥
आतां कोठें न घाली मन । सर्वदा करी आत्मचिंतन ।
तेणेंचि होशील परिपूर्ण । अखंडत्व सर्वदा ॥५९॥
मग म्यां तथास्तु ह्मणून । वंदिता झालो गुरुचरण ।
मग सवेंचि खालीं उतरून । देवापाशीं पैं गेलों ॥६०॥
दुसरे दिवशीं रात्रीशी । मार्गशीर्षशुद्ध एकादशी ।
मंडळी आली जागरणासी । तंव गुरुपाशीं मी गेलों ॥६१॥
जाउनी साष्टांग केलें नमन । सद्गुरु वदोनि आशीर्वचन ।
वर्षते झाले कृपाघन । जो अप्राप्त देवेंद्रा ॥६२॥
मजवरी कृपादृष्टी करून । करविलें दुग्धातें प्राशन ।
नांव ठेविलें निरंजन । तेचि काळीं पै माझें ॥६३॥
ह्मणती ऐक आज्ञोत्तर । स्वमुखें प्राकृत कविता कर ।
ठेवी मस्तकीं अभयकर । येच क्षणीं वदे कां ॥६४॥
दत्तात्रय तांबूल देऊन । आज्ञा केली तुजलागून ।
तैशीच म्यांही तुजकारण । कवित्वबुद्धि दीधली ॥६५॥
ऐसें ऐकुनि गुरुचें वचन । प्रफुल्लित झालें माझें मन ।
तेव्हां दौत लेखणी घेऊन । अभंग लिहिता जहालों ॥६६॥
पंच अभंगांतें लिहून । दाखविलें गुरु लागून ।
तयांनीं होऊनि हास्यवदन । प्रेमटाळी पीटिली ॥६७॥
ह्मणती रे ! तूं धन्यधन्य । होशील सर्वांमाजी मान्य ।
तुझी कविता वाचितां अन्य । तेहि धन्य होतील पैं ॥६८॥
ऐसें ऐकुनि गुरुचें उत्तर । लोळता झालों चरणावर ।
जोडोनिया दोन्ही कर । विनत झालों तयांसी ॥६९॥
सद्गुरुराया ! समर्था ! । तुम्ही पुरविलें माझ्या आर्ता ।
मानवी असता झालों कर्ता । ब्रह्मसृष्टी दूसरी ॥७०॥
ऐसें वाटे माझिया मना । काय मी देऊं गुरुदक्षणा ।
द्रव्यसंपत्ति उपभोग नाना । मिथ्या मजप्रती दीसती ॥७१॥
पाहतां राहिलें एक शरीर । तेंहि नाशिवंत असार ।
मी अकिंचन झालों फार । काय देऊं दक्षणा ॥७२॥
आतां विनती आदि अंतीं । आज्ञा करावी मजप्रती ।
गुरुदक्षणा पायांप्रती । प्रविष्ट होय सर्वस्वी ॥७३॥
सद्गुरु ह्मणती ऐक गोष्टी । त्वां मज दिली सर्व सृष्टी ।
स्वरूपीं ठेवी अखंड दृष्टी । कवित्व मुखीं वदत जा ॥७४॥
हें चालवी माझें व्रत । दक्षणा पावली सर्व मातें ।
तुजप्रती पाहुनि माझें चित्त । आनंदयुक्त सर्वदा ॥७५॥
ऐसें ऐकुनि गुरुउत्तर । हात जोडोनि वारंवार ।
वदता झालों स्तुती उत्तर । प्रेमयुक्त होउनी ॥७६॥
जयजयाजी गुरुराया ! । जयजयाजी करुणालया ! ।
जयजयाजी योगिराया ! । करी दया मजवरी ॥७७॥
जयजया स्वामी समर्था । जयजया गूढज्ञान अर्था ! ।
जयजय भवभंग परमारथा । हारली व्यथा बहु माझी ॥७८॥
मज रंकातें राज्यपदवी । देऊनी संपत्ति आघवी ।
चिद्विलासाचिये गांवीं । नांदविलें सुखरूप ॥७९॥
ऐसें करुनिया स्तुतीतें । आज्ञा मागुनी सद्गुरूतें ।
जावोनी मठिका आंत । जागरणासी बैसलों ॥८०॥
द्वादशी त्रयोदशी होऊन । दत्तजन्म चतुर्दशी लागून ।
करूनिया प्रात:स्नान । सर्व आली मंडळी ॥८१॥
देवासि घालोनिया स्नान । षोडशोपचारीं पूजा करून ।
जन्मकाळीं गुरुकीर्तन । करूनि बुका उधळीला ॥८२॥
जयंतीचे पारणालागून । कांहींच नव्हता ठिकाण ।
दत्तात्रयें चमत्कार करून । सामुग्रीतें निर्मिलें ॥८३॥
क्षेत्रांतील गृहस्थ मिळाले । रात्रौ सद्गुरुपाशीं आले ।
कोण कोण त्यांचीं नामें वहिलें । सांगतों तें परियेसा ॥८४॥
भगवंतपंत बारामतकर । रामहारी विप्र मल्हार ।
महिपतभट बापु भोगुरकर । सज्जन ह्मणती जयातें ॥८५॥
भगवद्भक्त तिघे जण । राघव कृष्नशर्मा ब्राह्मण ।
तिसरा राजारामबावा जाण । भटपति ह्मणती जयातें ॥८६॥
ह्मणती आह्मी सर्वत्र मिळून । करूं दत्तजयंती लागून ।
पौर्णिमेस्सी करूं पारणें । संतर्पण चांगलें ॥८७॥
अपरात्रीं साहित्य करून । प्रात:काळीं स्वयंपाक सारून ।
 केलें ब्राह्मणसंतर्पण । शतसंख्या परियंत ॥८८॥
ब्रह्मण बैसले भोजनासी । चमत्कार झाला ते घटिकेसी ।
गुरूंनीं सोडुनि मंडळीसी । दूर जाऊनी बैसले ॥८९॥
ते पंक्तीलागून । कोण कोण होते ब्राह्मण ।
त्यांचें परिसा नामाभिधान । यथा निगुती सांगतों ॥९०॥
स्वयंप्रकाश यतीश्वर । जो योगीमाजी तपेश्वर ।
सर्व त्यागी निरंतर । आत्म स्वरूपीं निमग्न ॥९१॥
शीतोष्ण - पर्जन्यधारी । व्यथा सोशी शरीरीं ।
दु:ख न पवतां अंतरीं । नग्न फिरे सर्वदा ॥९२॥
द्वितीय आनंदभट दातार । जे वेदांतवक्ते अतिचतुर ।
शास्त्र - विद्येचे रत्नाकर । भांडारगृह विद्येचें ॥९३॥
केशवभट कर्मनिष्ठ । जो योगियांमाजी वरिष्ठ ।
अग्निसेवा एकनिष्ठ । अहोरात्र करितसे ॥९४॥
परम चतुर अच्युतरावजी । विज्ञान कळा जयामाजी ।
वाचे बोलतां सहजीं । जगासी बोध होतसे ॥९५॥
पांचवे वासुदेवअण्णा भिडे । ब्रह्मनिष्ठ शांत उदार फुडे ।
सर्व कुशळ चातुर्य गोडे । परोपकारीं सर्वदा ॥९६॥
ऐसी मंडळी पंक्तीस घेऊन । सद्गुरु बैसले आपण ।
राघवाचे मठीं जाऊन । भोजनासी बैसले ॥९७॥
मग सर्वत्र मंडळीनें । इकडे देवाचा नैवेद्य करून ।
भोजनासी पात्रें टाकून । भृगुस्थानीं बैसले ॥९८॥
तंव ते आप आपणासी वदती । भटजी येथें न दिसती ।
आह्मांसी आगांतुक भाऊन चित्तीं । तिकडे जाऊनि बैसले ॥९९॥
ऐसें वदोनि ब्राह्मण । चालिले घराप्रती उठून ।
हें ऐकिलें वर्तमान । सद्गुरुरायें ते काळीं ॥१००॥
तेथें अघटित केली करणी । न समजतां कोणा लागुनी ।
बैसले असतां एके स्थानीं । दोन्ही ठिकाणीं दीसती ॥१०१॥
एक ह्मणती आहेत भटजी । एक ह्मणती मिथ्या वदतां जी ।
एक ह्मणती भास झाला जी । भटजी तिकडेच बैसले ॥१०२॥
एक ह्मणती आमचे शेजारीं । बैसले आहेत घटका चारी ।
पहात असतां नेत्रांतरीं । धूर कांहो आलासें ? ॥१०३॥
ऐसें एकमेकासी वदून । बैसले भोजनालागून ।
सद्गुरु नाटकी पूर्ण । उभय ठायीं जहाले ॥१०४॥
सर्वांनीं करूनि भोजन । तांबूल दक्षिणा घेऊन ।
करुनि देवासी नमन । आपुले घरीं पैं गेले ॥१०५॥
ऐसी दत्तजयंती करूनी । आनंद केला सर्वत्रांनीं ।
क्षेत्रांत कीर्ति गेली होउनी । निरंजनें जयंती केली हो ॥१०६॥
म्यां नाहीं काडी हालविली । नाहीं देवाची सेवा केली ।
कांहीं न करितां कीर्ति झाली । सर्व जगामाझारी ॥१०७॥
उभय सद्गुरुचें देणें । दोहोंसी होऊनी एकपण ।
मज माकडासी लेणें । लेवविलें संभ्रमें ॥१०८॥
धन्यधन्य सद्गुरु समर्थ । मजहातीं करविला ग्रंथ ।
आत्मप्रचीति यथार्थ । ते मज हातीं वदवीली ॥१०९॥
जैशी काष्ठपुतळी करूनी । हस्तकीं तबक देउनी ।
पाठविली सभेलागुनी । तैसें मजहातीं करविलें ॥११०॥
श्रीकृष्णें राजसूययज्ञीं । अर्जुनासी पुढें करूनी ।
करविली अचाट करणी । तैसें मजहातीं वदविलें ॥१११॥
साळुंकी पक्षी असतां मूढ । बोले मानवी भाषा गोड ।
परि शिकविता राहे एकीकडे । तैसें मजहातीं करविलें ॥११२॥
त्रिमळियाचा नंदी सजविला । मान हालवी बोलिल्या बोला ।
परि त्रिमलि शिकविला भला । तैसें केलें मजहातीं ॥११३॥
मा तों होतों मंद । लिहिलें नव्हतें बाळबोध ।
परि दत्तरघुनाथ आनंदकंद । प्रज्ञा दिधली विषेश ॥११४॥
आतां विनवणी मंगळमूर्ति । जयांनीं विशाळ दिधली स्फूर्ती ।
साह्य झाली सरस्वती । आदिमाता भवानी ॥११५॥
तेचि मूळपीठ - निवासिनी । निरंजनाची कुळस्वामिनी ।
मज अकिंचनासी राजधानी । कवित्वस्फूर्ति दीधली ॥११६॥
नमन तया साधुवृंदा । कृपाघन वर्षती सदा ।
कवि ह्मणविलें मतिमंदा । सुखसंपदा देऊनी ॥११७॥
आतां नमो मातापितर । ज्यांनीं दाखविला संसार ।
मज आत्मप्राप्तीचें घर । ठाऊक ज्यांचेनि जहालें ॥११८॥
वृत्तिवंत कळंबकर । बालाघाट वंजरातीर ।
माता लक्ष्मी पिता श्रीधर । श्रोत्री उपनांव आमुचें ॥११९॥
आतां विनंती श्रोतियांलागुनी । जे आर्तभूत ब्रह्मज्ञानी ।
मुमुक्षुपंथाची सुराणी । पाहूं इच्छिती सर्वदा ॥१२०॥
त्यागुनि द्यावा भवसंसार । पहावें गुरुमायेचें घर ।
तुह्मांसी विनंति करूनि साचार । तरिच भवपार व्हाल कीं ॥१२१॥
पहिली पहावी शास्त्रप्रचीति । दुसरी घ्यावी गुरुप्रचीति ।
तिसरी ते आत्मप्रचीति । उपरी ग्रंथीं लिहलीसे ॥१२२॥
जरि ऐसा पश्चात्ताप घडेल । तरिच डोळा उघडेल ।
नाहीं तरी सप्रेम बोल । येणार नाहीं अंतरीं ॥१२३॥
ह्मणाल लटकें हें वचन । तरि पुसा गुरुसि जाऊन ।
तेव्हां मिळेल माझी खूण । ज्याप्रमाणें वदलों तें  ॥१२४॥
निरंजनाचे बोबडे बोल । हें अरण्यांतील वांकडें फूल ।
गुरु आत्मलिंगा बहुसाल । पूजा करितसे अंतरीं ॥१२५॥
तें लिंग ह्मणाल जरी सान । तरि ठेवावया नाहीं ठिकाण ।
ब्रह्मांडाएवढें कल्पून । उगेंच अनुमान सांगतों ॥१२६॥
तया देवाकडे पाहून । ग्रंथ लिहिला संपूर्ण ।
समाप्तीचा कवण ठिकाण । तोहि आतां परिसावा ॥१२७॥
गंगातीर जनस्थान । दत्तात्रया जवळी बैसून ।
ग्रंथ संपविला जाण । तो दिन तुह्मां सांगतों ॥१२८॥
संवत अठराशें अडुसष्टाशीं । प्रजापति नाम संवत्सरासी ।
शुद्ध दशमी पौषमासीं । दो प्रहरांसी संपला ॥१२९॥
सद्गुरूनें कृपा करून । ग्रंथावरि हात ठेवून ।
स्वात्मप्रचीति नामाभिधान । या ग्रंथासी ठेविलें ॥१३०॥
इतिश्री स्वात्मप्रचीति ग्रंथ । संमत दत्तात्रय अवधूत ।
निरंजनीं आत्मप्रचीत । गुरुकृपें जहाली ॥१३१॥
॥ श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP