स्वात्मप्रचीती - अध्याय पहिला

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


ॐ नमोजी मंगळमूर्ति । सर्वां आदी तूं गणपती ॥
ग्रंथ वदावया स्फूर्ति । देई मातें सत्वरीं ॥१॥
आतां नमो सरस्वती । जे कां आदिमाया भगवती ॥
आदि अनादि चिच्छक्ति । देई मती बाळकां ॥२॥
आतां वंदू संतसाधु । जे करिती जडमूढासि बोधू ॥
स्वयंप्रकाश ब्रह्मानंदु । कलियुगामाजी अवतरले ॥३॥
साष्टांग नमू वो दिगंबर । जो तिही देवांचा अवतार ॥
भवसिंधूचा पैलपार । उतरवी जो सर्वांतें ॥४॥
दत्तात्रया पूर्ण अवतारा । ब्रह्मानंदा निराकारा ॥
सत्यस्वरूप दातारा । तूं वदविता ग्रंथातें ॥५॥
तूं प्रत्यक्ष गा अवतारा । ब्रह्मानंदा निराकारा ॥
देही असूनि देहातीत । विदेहत्वें वर्तसी ॥६॥
सहज करितां तुझें स्मरण । गुप्तरूपें येसी धावून ॥
किं तेथेंची होसी अवतीर्ण । क्षणमात्र न लागतां ॥७॥
तूंचि या ग्रंथीं अवतरलासी । तूंचि माझे मुखें वदसी ॥
तूंचि एथें येउनि लिहिसि । दुजे कोणी नसे कां ॥८॥
ॐ नमो सद्गुरू रघुनाथश्रेष्ठ । जो ब्रह्मज्ञानी अति सुभट ॥
जो आनंदकंदाचा मूळपीठ । कलिमाजी प्रगटला ॥९॥
ऐके वो श्रोतिया समर्था । माझे शरिरीं घडिली व्यवस्था ॥
पूर्वीं पासुनि झाली कथा । ते मी तुज सांगतों ॥१०॥
दक्षिणदेशीं पुण्यनगरीं । नष्टकनाम हुंडेकरी ॥
वेतन घेउनि त्याचे पदरीं । कारभारीं होतों मी ॥११॥
तों कोणी एके अवसरीं । पेठेमाजी त्याचि नगरी ।
ठाकूरदास विष्णुद्वारी । कीर्तन करी सप्रेम ॥१२॥
प्रेमानंदीं बहु डुलत । वेदशास्त्रीं जो पारंगत ॥
ब्रह्मज्ञान मूर्तिमंत । ज्याचे ठायीं राहिलें ॥१३॥
निस्पृहत्वें कीर्तन करी । हें ऐकिलें लोकाचारीं ॥
आलस्य निद्रा करूनि दूरि । कीर्तनासि पै गेलों ॥१४॥
श्रवणीं ऐकुनि हरिगुण । वेधुनि गेलें तन्मन ॥
सवेंचि तेणें कथिलें ज्ञान । जें कां शरीरीं प्रत्यक्ष ॥१५॥
अनेक प्रकारचें मतांतर । सांगूनि भेदीतसे अंतर ॥
झणे ‘ तुझीच रे ! ईश्वर । नरदेहीं अवतरला ॥१६॥
तुझी तिन्ही अवस्था जाणतां । जागृती स्वप्न सुषुप्ति व्यथा ॥
या तिहींचा जो पहाता । तेंचि तुमचें स्वरूप ॥१७॥
सर्वांभूतीं ईश्वर असे । असोनिया प्रगट नसे ॥
जैं काष्ठामाजी अग्नी वसे । परि न दिसे कवणासी ॥१८॥
विप्रें घेतल्या श्रौताग्नी । त्याचीच करितो मंथारणी ॥
काष्ठ - काष्ठाचे संघट्टणीं । निघे अग्नी भडभडा ॥१९॥
होतांचि तेथ अग्नीउदय । क्षणक्षणीं काष्ठता सरूनि जाय ॥
कठिणता कांहीं न राहे । अग्नीच होय सर्वांगीं ॥२०॥
तैसाच तुमचे हृदयीं ईश्वर । प्रत्यक्ष नांदतो सर्वेश्वर ॥
परि तुझां न दिसे साचार । सद्गुरू परिकर दाखविला ॥२१॥
किती रे ! सांगावें तुम्हांला । मानव असूनि पशु कां झालां ? ॥
जागृती असुनि निजाला ॥ भूलूनि गेला विषयांतें ॥२२॥
दोष आचरूनि करितां बंड । यम करील खंशविखंड ॥
हिशोब द्याल कवणें तोंडें । नाहीं केलें ह्मणवूनि ॥२३॥
आहारे ! सर्वस्व चुकला । आपआपणाशींच वैरी झालां ॥
येतां काळुजीचा घाला । श्वास टाकूं न देचि ॥२४॥
आतां व्हा रे ! सावधान । वयाअ कां दवडितां निधान ॥
मेळविली बहु श्रमानें । व्यर्थ दवडूं नका रे ! ” ॥२५॥
ऐसें ऐकुनी कीर्तन । माजेहं दचकलें अंत:करण ॥
नेत्रीं पातलें जीवन । कंठ दाटून तो आला ॥२६॥
पाठीं उभे राहिले कांटे । शरीर कांपे थरथराटें ॥
बोलूं जातां कंठ दाटे । शब्द होटीं न निघती ॥२७॥
वाटे आतांचि येईल मरण । म्यां कांहीं न केलें साधन ॥
व्यर्थ गमाविलें जिणें । विषयमदें करूनी ॥२८॥
आहा रे दुर्दैव ! कटकटा । वस्तु लाभली रे चोखटा ॥
झुगारिसी वारा वाटा । विषयांध होऊनि ॥२९॥
ऐसा होतांचि पश्चात्ताप । हृदयीं उदेला संताप ॥
वाटे बहुत केलें पाप । कांहींएक नुमजोनी ॥३०॥
सवेंचि विसर्जिलें कीर्तन । लोक गेले सर्व उठून ॥
मी तेथेंचि राहिलों बैसून । सात घटिकांपर्यंत ॥३१॥
वाटे पोटांत झाली आगी । झाली सर्वांगीं तगमगी ॥
बाळक मरतां मातेलालीं । दु:ख जेंवि होतसे ॥३२॥
तैसा मी भयभीत झालों । ठाकुरदासाजवळीं गेलों ॥
हात जोडोनि विनम्र झालों । स्तुती वदलों विशेष ॥३३॥
धन्यधन्य तुमचें कीर्तन । एकोनि झालें समाधान ॥
आतां उद्विग्न झालें मन । सर्व त्यागुनि जातसें ॥३४॥
साधू वदला प्रसन्नवदन । ‘ तूं होशील रे ! नारायण ’ ॥
मला तोच शकुन मानून । तेथूनिया निघालों ॥३५॥
एका वाणियाचे घरीं । जागर केला सर्व रात्रीं ॥
दिन उगवलियावरी । तेथूनिया निघालों ॥३६॥
मग तुळशीबागेंत जाऊन । घेतलें साधूचें दर्शन ॥
तोही बोले कृपावचन । ‘ गुरुकृपा लाहसी, ॥३७॥
ते बांधुनि शकुनगांठी । तेथुनि निघालों उठाउठी ॥
ग्रामाबाहेर एकवेठीं । तपस्वी थोर देखिला ॥३८॥
करित होता पात्रमज्जन । कपाळीं विभूतीचें भूषण ॥
जटामंडित शोभामयान । दैदीप्यमान देखिला ॥३९॥
तयाप्रती केलें नमन । तांब्या तयाप्रती देऊन ॥
मागुती त्यातें वंदूने । मार्गाप्रती चालिलों ॥४०॥
उत्तरेसि चिंचवाड नगरी । गणपती वसे देवाघरीं ॥
जाउनि त्या ग्रामाभीतरीं एक बैरागी देखिला ॥४१॥
जवळला दुपाटा काढुनी । तो वैरागियातें देउनि ॥
करूनि तयासि नमन । पुढील मार्गी लागलों ॥४२॥
तव दिठीं देहुग्राम देखिला । जेथें तुकया संत जहाला ।
वैकुंठासि निघोनि गेला । शरिरासहित आपुले ॥४३॥
धन्य धन्य ते देहू नगरी । साधूअवतार जीभीतरि ॥
तुच्छ वाटे अमरपुरी । देव जेथें राहती ॥४४।
मग घेतलें पांडुरंगदर्शन । तुका जातां वैकुठालागून ॥
जियें वाकुडी केली मान । ते म्यां दृष्टी देखिले ॥४५॥
ते साक्ष अद्यापिवरी । पहावें तेथें जाऊनी चतुरीं ॥
दुसरी वैकुंठ पंढरी । विष्णू तेथें नांदतसे ॥४६॥
अस्तु तया स्थळीं जाऊन । उदासीन झालें मन् ॥
वाटे मी नरतनूस येऊन । कांहीं सार्थक न केलें ॥४७॥
ऐसा होऊनि उदासीन । वस्त्रें वांटिलीं साधूलागून ॥
एक धोत्र पांघरूण । रात्रौ जागर पै केला ॥४८॥
क्षणक्षणा अश्रु येती नयनीं । बहु संताप उठे मनीं ॥
वाटे म्यां जन्मासि येऊनि । कांहींच केलें नाहीं कीं ॥४९॥
ऐसा अहोरात्र खेद करितां । भानुउदय जाला अवचिता ॥
मग स्नानासी घाटावरुता । इंद्रायणीच्या पातलों ॥५०॥
पूर्व दिशा अवलोकून । केलें तुकारामाचें स्तवन ॥
समर्था ! तूं धन्यधन्य । मजवर कृपा करी कां ॥५१॥
ऐसें करितां स्तवन । तों दृष्टी पडली कौपीन ॥
दुसरे कटिसूत्रालागून । देखता झालों ते ठायी ॥५२॥
तेंचि प्रसादवस्त्र घेऊन । तेथें कौपीन केली धारण ॥
सर्वांगीं भस्म लावून । केलें ध्यान दत्ताचें ॥५३॥
मग करसंपुटीं जळ घेऊन । सांडिलें संकल्पा लागून ॥
जीवभाव मन:प्राण । गुरु अर्पण केलासे ॥५४॥
हृदयीं ठेविला नेम करून । आजपासून द्वादश महिने ॥
उपरी सात दिन जाण । देहधारण करणें हा ॥५५॥
मजला दत्तात्रयदर्शन । झालिया ठेवीन हा प्राण ॥
नाहीं तरी देह अर्पण । केला असे गुरुपायीं ॥५६॥
ऐसा करुनि निश्चय अंतरीं । साक्षी तुकोबा बाहेरी ॥
याचे करूनि दीर्घस्वरें । तेथें वदता जाहलों ॥५७॥
काढिली लज्जेची गवसणी । निर्लज्जशस्त्र हातीं घेउनी ॥
त्याचि ग्रामांत जाउनी । भिक्षाटण पैं केलें ॥५८॥
भक्षुनि इंद्रायणीचे तीरीं । प्रयाण केलें अति सत्वरीं ॥
अंतरीं प्रेमाश्रुचिया लहरी । जळ तुंबळ दाटलें ॥५९॥
मार्गीं चालतां नाहीं भान । ध्यानीं वेधुनी गेलें मन ॥
उत्तर दिशा अवलोकून । मार्ग क्रमण बहु केला ॥६०॥
अखंड वाचेसी नामस्मरण । दत्त अवधूत हेंचि भजन ॥
त्रैलोक्यीं जयांचें गमन । जग उद्धरा अवतरले ॥६१॥
करूनि त्याचें नामस्मरण ॥ पाउल ठेवी भूमीलागुन ॥
ऐसें अखंड लागलें ध्यान ॥ वेधलें मन निजरूपीं ॥६२॥
ऐशी स्थिती अवलोकून । मार्गीं पाहतां हासती जन ॥
“ वेडा आला रे ! ” ह्मणवून ॥ दाविती दुरून एकमेकां ॥६३॥
त्यांतील एक जवळ येऊन । पुसता होय मजलागून ॥
त्यासी सांगों कवणें गुणें ! । हेंही भान नसेची ॥६४॥
असो कांहीं न जातां ग्रामाभीतरीं ॥ तैसेंच जावें वरचेवरी ॥
मार्गीं अरण्याभीतरीं । बहु उल्हासें पळावें ॥६५॥
पोटीं पश्चात्तापाचा व्याळ । तेणें पळाली क्षुधा सकळ ॥
तृषा उदेली अळुमाळ । उदकप्राशन बहु केलें ॥६६॥
मार्गीं ब्राह्मण आढळती । ते भोजनासी चला ह्मणती ॥
क्षुधा न आणोनि चित्तीं । कोठें भोजन न केलें ॥६७॥
ऐसें झाले तीन दिन । मार्गीं चालतां देश कठिण ॥
नद्या पर्वत उल्लंघून । देहे क्षीण पैं झालें ॥६८॥
चतुर्थ दिन उगवालियावरी । दिन आला दीडप्रहरीं ॥
दिठीं देखिली घोडनगरी । जे कां पुरी सिद्धाची ॥६९॥
अनेक प्रकारचीं गुह्यस्थानें । ऋषींनीं केलें अनुष्ठान ॥
हरिश्चंद्र राजा सत्वनिधान । त्याची तेथें समाधी ॥७०॥
जातां तया ग्रामाभीतरीं । जन पाहती बहुतापरी ॥
आश्चर्य करिती अंतरीं ॥ ह्मणती “ वेडाअ आला हो ! ” ॥७१॥
त्यांचिये बोलाचें भूषण । अंतरीं प्रेम चढे द्विगुण ॥
वाटे माझें शहाणपण । केव्हां जळूनि जाईल हें ॥७२॥
असो समय पाहुनी माध्यान्ह । नदीतीराप्रती जाऊन ॥
फाटक्या चिंध्या वेचून । बहु कंटकें जोडिल्या ॥७३॥
जाउनी तया ग्रामाभीतरीं । हिंडता झालों घरोघरीं ॥
मागोबिया माधुकरी । हरिश्र्चंद्रतीर्थीं भक्षिली ॥७४॥
तेथें भिकोबाबावा संत । असे वस्तीसि नांदत ॥
उदासीन पाहुनि मातें । घरासि नेलें आपुल्या ॥७५॥
तेथें रहिलों तीन रात्र । त्यानें दिधलीं वस्त्रपात्रें ॥
सहस्रथिगळी कंठा विचित्र । एक नरोटी दोधली ॥७६॥
तेथें एकादशीव्रत आलें । आहारार्थ अन्यत्र झाडेपाले ॥
शिजवून त्यांचे पिळे कले । तेचि भक्षिले दोघांनीं ॥७७॥
द्वादशीस केलें गमन । ब्राह्मणवाड्यास येऊन ॥
कानफाट्याचे मठीं जाऊन । एकरात्रीं राहिलों ॥७८॥
करितां दिगंबरस्मरण । कानफाटिया बोले वचन ॥
तुझा दिसतो निश्चय पूर्ण । तरि त्वां जावें गिरनारा ॥७९॥
तेथें दत्तात्रयाचें स्थान । योगी करिती अनुष्ठान ॥
तुजलागीं प्रत्यक्ष दर्शन । तेथें जातांचि होईल पैं ॥८०॥
तेंचि ऐकोनि आर्तभूत । पश्चिमे जावया झालों उदित ॥
दृष्टीं पाहूं गिरनारपर्वत । ऐसा निश्चय दृढ केला ॥८१॥
तेथोनि केलें प्रयाण । जुन्नर ग्रामासि आलों जाण ॥
ठाकूरमंदिर शुद्ध पाहून । तेथें जाउनी राहिलों ॥८२॥
तेथें वैरागियाचे वृंद । मातें पाहोनि करिती विनोद ॥
वल्कलवसनी मतिमंद । अससी कोण सांग पां ॥८३॥
त्यांसि म्या केला नमस्कार । जोडोनिया दोन्ही कर ॥
मी तुमचा दासकिंकर । कृपा मजवर असों द्या ॥८४॥
मातें पुसतां कवण वर्ण । तरै मी जातीचा ब्राह्मण ॥
ठाऊकें नाहीं ब्रह्मज्ञान । व्यर्थ जन्मोनि कष्टलों ॥८५॥
तुम्ही उत्तम दिसतां संत । मजवरी व्हावें कृपावंत ॥
दत्तात्रय मूर्तिमंत । भेटे ऐसें सांगावें ॥८६॥
ऐसें ऐकुनि माझें वचन । सर्वही ह्मणती ‘ बुद्धीहीन ॥
ब्राह्मण असतां मलिन । भांतिरूप दीसतो ’ ॥८७॥
एक ह्मणती झाल वेडा । एक ह्मणती नि:संग उघडा ।
एक ह्मणती बुद्धि प्रौढा । वेडा कैसा ह्मणावा ? ॥८८॥
एक ह्मणती मंत्र चळला । एक ह्मणती भांग प्याला ॥
एक ह्मणतीं कासया आला । जाई ग्रामाभीतरीं ॥८९॥
एक ह्मणती असों द्या परता । एक ह्मणती सत्य ह्मणतां ॥
परि कांहचिं होईल कांहीं करतां । वस्त्रपात्र संरक्षा ! ॥९०॥
ऐसे वदले बहुप्रकार । ऐकुनि आश्चर्य वाटलें फार ।
निस्पृही असुनि लोभाकार । यांची वृत्ति दीसते ॥९१॥
अस्तु बहु प्रकारचे जन । तयांसी करावें साष्टांग नमन ॥
आपुले आंगीं अनुभव घेऊन । शुद्धवृत्ती करावी ॥९२॥
त्याचि ग्रामीं कुशाबा संत । कौपीनधारी पिशाचवत् ।
वेडिया सारेखा असे फिरत । शुद्ध नाहीं देहाची ॥९३॥
मुद्रा लावूनि खेचरी ॥ अलक्ष पाहे दिगंतरीं ।
श्वासोश्वास वाहती अंतरीं । सुषुम्ना - मार्गीं चालतु ॥९४॥
ऐसी तयासी धारणा । दृष्टी पाहिला योगिराणा ॥
तयासी केले साष्टांगनमना । हात जोडोनि विनविलें ॥९५॥
लोक ह्मणती वेड्यासी वेडा । भेटी कां जैशी दगडदगडा ॥
यांच्या शब्दाचा उघाडा । काय लोकीं समजावा ॥९६॥
ऐसें बोलुनिया जन । गेले आपुलाले घरा उठून ॥
मग तया संतासी विनीत होऊन । गुजगोष्टी बोलिलों ॥९७॥
बोलता झाला मातें वचन । ‘ कंथा जतन करी कां ! ’ ॥९८॥
तेव्हां वृत्तेस आनंद होऊन । म्यां तयासी केलें नमन ।
आज्ञा मागून त्यालागून । पुढील ग्रामा चालिलों ॥९९॥
मार्गीं बहुतचि आनंद झाला । वाटे मज अवधूत भेटला ॥
कंथा जतन कर ह्मणाला । हाचि शकुन पै मातें ॥१००॥
कृतनिश्चयता दृढ अंतरीं । गु दर्शनाचा प्रेमा भारी ॥
आनंदसिंधूच्या भीतरीं । भावार्थ नद्या मिसळल्या ॥१०१॥
पुढील कथेचें अनुसंधान । विचित्र आहे रसाळ गहन ॥
करूनि सर्वांगाचे कान । श्रोतेजनीं परिसावें ॥१०२॥
इतिश्री स्वात्मप्रचीतीग्रंथ । संमत दत्तात्रय अवधूत ॥
निरंजनीं आत्मप्रचीत । गुरुकृपें जहालीं ॥१०३॥
॥ श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 20, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP