अध्याय पाचवा

हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.
मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.


ॐ नमोशिव शिव सिध्दासि नमस्कार केला । पूर्व ग्रंथ झाला त्याचे कृपे ॥१॥
त्याचे कृपेचे अदभुत सामर्थ्य । आपुला चरित्रार्थ वदविती ॥२॥
चांगदेवे जन्म नरदेही धरिला । अयोनि जन्मला कैशा रीती ॥३॥
कथा हे विचित्र स्वानुभवखाणी । ऐकावी सज्जनी पुष्यवंती ॥४॥
पुण्य जोडे बहु संतकथानके । जळती पातके महादोष ॥५॥
तप्तेचांगदेवीहूनि तोरणमाळा । गोरक्षाजवळ गेला तेव्हां ॥६॥
आदेश करुनि गोरक्षा नमिती । गुरुची पध्दती म्हणूनिया ॥७॥
गोरक्षे बहुत केलासे आदर । म्हणती आजि थोर लाभ झाला ॥८॥
जयाचे भावार्थ प्रकटला शंकर । झाला विश्वेश्वर वाटीयाचा ॥९॥
गोरक्ष म्हणती भक्तशिरोमणि । उत्कंठा हे मनीं काय असे ॥१०॥
कवणा कर्मालागी येथे बीज केले । काय अपेक्षिले तुमच्या चित्ते ॥११॥
ऐसे बोलतांचि गोरक्ष वचनी । मस्तक चरणी ठेवियेला ॥१२॥
म्हणती, विज्ञापना आहे एक स्वामी । ती करावी मान्य तुह्मी आतां ॥१३॥
सिध्दाईचा भर होता वटेश्वरी । एक पुरुष, नारी तेथे आली. ॥१४॥
तेही अनुष्ठान केले अति तीव्र । तेणे वटेश्वर तोपलासे ॥१५॥
बहुत संकट पडियले मज । बोलिलो सहज तयांप्रति ॥१६॥
काय ते अपेक्षा तुमचे मनी असे । संततीसंपत्तीची मज सांगा ॥१७॥
कोणते स्थळी तुम्ही करीतसां वास । कवण वृत्तीस करीतसां ॥१८॥
ऐसे ऐकोनियां बोलत ब्राह्मण । माझा भाव पूर्ण तुमचे ठायी ॥१९॥
आपुले वचन मजलागीं द्यावें । सार्थक करावें या देहांचे ॥२०॥
ऐशिया भावार्थे मज गोविले वचने । मग ग्लांति करुनि बोलियले ॥२१॥
आमुचिया वंशी पुत्राचे संतान । तुज ऐसे निधान व्हावे बापा ॥२२॥
अभय तयासी दिधले हो ऐसे । तुमच्या वंशासि येईन मी ॥२३॥
तुमचिये घरी भिक्षेलागी येती । नाथ म्हणविती कानफाडे ॥२४॥
भिक्षा घेऊनियां बाजविती पुंगी । नादाचिये संगी प्रकटेन ॥२५॥
नादापासूनिया प्रकटे लेकरुं । तोच मी अवतारु घेईन तेथे ॥२६॥
नियम तयासि बारा वर्षे केला । समय तो आला जवळी आता ॥२७॥
श्रावणपंचमी शुक्लपक्षी असे । नागपंचमीसि तेथे जावे ॥२८॥
भिक्षा घेऊनिया वाजवावी पुंगी । नादाचिये संगी प्रकटेन ॥२९॥
ऐकूनि गोरक्ष अवश्य म्हणती । जाईन भिक्षेसि पंचमीसि ॥३०॥
गोरक्ष बोलता नमस्कार केला । निरोप घेतला सिध्दाचाही ॥३१॥
तेथूनिया पुढे अदृश्य ते झाले । षण्मास राहिले गुप्तरुपे ॥३२॥
नारायणडोह पुण्यक्षेत्र ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥३३॥
ग्रामलेखकवृत्ति यजुर्वेदी ब्राह्मण । पंचमाहायज्ञकुलशील ॥३४॥
धर्मपत्नी त्यांची नांव ते रुक्मिणी । एकनिष्ठा मनीं चांगदेवी ॥३५॥
चांगदेव मनी, चांगदेव ध्यानी । नित्य अनुसंधानी चांगदेव ॥३६॥
चांगयाचे वचनी ठेविला विश्वास । पुत्रसंततीची आशा थोर ॥३७॥
द्वादश वर्षाचे अवसान आले । अदभुत वर्तले कवतुक ॥३८॥
सुदिन उगवला नागपंचमीचा । हरुष तयांचे मनी वाटे ॥३९॥
अकस्मात एक आला कानफाडा । तयांचिये वाडां भिक्षेलागी ॥४०॥
आदेश म्हणूनिया भिक्षा द्यावी माई । ऐकूनि रुक्मिणी उठलीसे ॥४१॥
सुपामध्ये धान्य घेऊनियां आली । भिक्षेलागी झोळी पसरली ॥४२॥
पुंगी वाचवीत घेऊनिया भिक्षा । रुखमाईचे लक्ष्य नादापाशी. ॥४३॥
पाहतां पाहतां नाथाचे कौतुक । आंगणी बाळक देखियेला ॥४४॥
नाथ गुप्त झाला न दिसे कोणीकडे । आश्चर्य रोकडे तेथे झाले ॥४५॥
बाळक देखूनि विस्मय पावली । तटस्थ जाहली क्षण एक ॥४६॥
अकस्मात मुधोपंत गृह्य आले । तयां सांगितले वर्तमान ॥४७॥
उभयतां कौतुक पाहती बाळकाचे । स्तनी रुक्माईच्या दुग्ध स्रवे ॥४८॥
म्हणती मुधोपंत उचली बाळक । चांगदेवे भाक सांभाळिली ॥४९॥
उचलिला बाळ लाविलासे स्तनी । स्वरुप लक्षण पाहतसे ॥५०॥
स्वरुप सुंदर, सभाग्य, लक्षणी । डोळियां पारणी होत असे ॥५१॥
पुन्हा अवतार झाला मरुद्गणाचा । जेणे वाटीयाचा शिव केला ॥५२॥
उत्साह बहुत वाजविती वाद्ये । होतसे आनंद नगरांत ॥५३॥
मुधोपंती तेव्हा जातकर्म केले । नामकर्मं झाले दिवसां तेरा ॥५४॥
नाम चांगयाचे तेही ठेवियेले । त्याचे कृपे झाले लेकरुं हे ॥५५॥
निष्क्रमण आणि अन्नप्राशन झाले । तिसरे वर्ष आले समाप्तीसि ॥५६॥
वेदमंत्रविधि केले चौलकर्म । वर्ष पंचम लागलेसे ॥५७॥
व्रतबंध झाला अनुग्रह गायत्री । संध्यासूत्रमंत्री संपादिली ॥५८॥
प्रज्ञाशीळबुध्दी गुरुमुखे ऐकतां । अव्यग्रता संहितापदक्रम ॥५९॥
सांगता नलगे सायास गुरुसि । समग्र वेदांसि संपादिले ॥६०॥
चारी वेद, साही शास्त्रे अभ्यासिली । अर्थी विचारिली स्वानुभवे ॥६१॥
चौदा विद्या आणि चौसष्टिही कळा । अभ्यास पहिला अवगत ॥६२॥
अतीत ब्राह्मण येती दर्शनासि । वंदूनि चांगयासि करिती पूजा ॥६३॥
म्हणती विद्या सिध्दि अवतार झाला । नेणो ब्रह्मा आला मृत्युलोकी ॥६४॥
सकळांसि हा वंद्य, सकळांसि हा पूज्य । सकळांचा हा आद्य गुरु आहे ॥६५॥
ऐसा स्तुतिवाद करिती ब्राह्मण । समर्पिती धन, कनक, वस्त्रे ॥६६॥
अमर्याद धन चांगया बहुमान । म्हणती कन्यादान द्यावे यासि ॥६७॥
वरासि दक्षणा द्यावी शत होन । दुजा म्हणे द्विगुण देईन मी ॥६८॥
एक म्हणती सहस्त्र मुद्रांचा संकल्प । करितों तरी अल्प वाटे मज ॥६९॥
याउपरि करा लग्नाचा विचार । म्हणती लहानथोर आप्तवर्ग ॥७०॥
वेदोक्तविधिने केली लग्नसिध्दि । स्मार्तश्रौतविधि संपादिली ॥७१॥
त्रिकाळ स्नान, संध्या, अतिथिपूजन । अन्नसत्न तेन घातलेसे ॥७२॥
कन्यादान वस्त्रगोदानांची शते । देऊनि याचकां तोषविती ॥७३॥
ऋध्दि सिध्दि द्वारी वोळंगती पाही । नारायणडोही काळक्रमे ॥७४॥
ऐसा क्रमितां काळ वर्षे चोवीस । वयासि जाहली दोन तपे ॥७५॥
मुधोपंत चांगयाचे तीर्थरुप । आलासे समीप काळ त्यांचा ॥७६॥
देहअवसान झालेसे तयांसि । सहगमनासि माता करी ॥७७॥
उभयतां पितरे पावले समाप्तीसि । उत्तरकार्यासि केले त्यांच्या ॥७८॥
वर्षश्राध्द केले गयेसि जाऊनि । पितृऋणापासूनि मुक्त झाले ॥७९॥
गयावर्जन करोनि नारायणडोही । आले लवलाही फिरोनियां ॥८०॥
मुधोपंती बहु द्रव्यार्जन केले । ते सर्व वांटिले ब्राह्मणांसि ॥८१॥
लेखनवृत्ति होती ते दिधली पितृव्यासि । उदार सर्वांसि होता झाला ॥८२॥
पूर्वानुसंवान स्मरुनिया ध्यानी । सावध होऊनि विचारिले ॥८३॥
मुक्ताईची आज्ञा पंढरीसि जावे । दर्शन घ्यावे विठ्ठलाचे ॥८४॥
संताचे माहेर, क्षेत्र हे पंढरी । अवतरले हरि कलियुगी ॥८५॥
प्रत्यक्ष वैकुंठ भूमिवरि असे । दर्शने खळासि चमत्कार ॥८६॥
म्हणवूनि आता जावे पंढरपूरा । दीनांचा सोयरा पांडुरंग ॥८७॥
सदृढ विश्वास बैसलासे मनी । सर्वासि पुसोनि स्वार झाले ॥८८॥
पावले पंढरी देखिले शिखर । सद्य: चमत्कार तेथे झाला ॥८९॥
नेत्री अश्रुधारा रोमांच शरीरा । सद्गदित बरा कंठ दाटे ॥९०॥
साष्टांग नमन करिती चांगदेव । म्हणती धन्य ठाव देखियेला ॥९१॥
जन्मामध्ये धन्य धन्य हा दिवस । आलों या क्षेत्रास म्हणोनिया ॥९२॥
जाऊनि चंद्रभागे स्नान केले । दर्शन घेतले पुंडलीकाचे ॥९३॥
पुंडलीका नमूनि जाती महाद्वारा । भेटला सोयरा पांडुरंग ॥९४॥
चरणांवरि मस्तक कंठ सद्गदित । नेत्री अश्रुपात बहु येती ॥९५॥
बहुत स्तुति केली बहुता परीची । मूर्ति विठ्ठलाची देखूनिया ॥९६॥
राउळांतूनि आले चंद्रभागातीरी । तीर्थरुपे बरी जेथे असे ॥९७॥
चंद्रभागातीर्थी बैसले त्रिरात्री । तीर्थरुपे श्रीहरि जेथे असे ॥९८॥
एकविध भाव देखूनि तयाचा । देव त्या तीर्थाचा प्रगटला ॥९९॥
उभा विटेवर कटेवरि कर । श्रीमुख सुंदर देखियेले ॥१००॥
किरीट कुंडले वैजयंती माळा । कांसेसि कासिला पीतांबर ॥१॥
श्रीवत्सलावन, कौस्तुभ भूषण । मस्तकी दर्शन शंकराचे ॥२॥
म्हणे चांगदेवा हरि सावधान । नेत्र उघडून पुढे पाहे ॥३॥
मध्यानिये रात्री चंद्रभागातीरी । शब्दाची कसूरी कैची तेथे ॥४॥
चांगदेवे नेत्र उघडूनि पाहिले । अदभुत देखियेले कवतुक ॥५॥
कोटिसूर्यप्रभा तेज प्रगटले । कर्णीची कुंडले वोप देती ॥६॥
देखूनिया रुप वेधलेसे मन । साष्टांग नमन करीतसे ॥७॥
त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे । येऊनिया राहे ह्रदयामाजी ॥८॥
चरणी मस्तक ठेविला सद्भावे । दीना उध्दरावे पांडुरंगा ॥९॥
कृपेचे पोषण लडिवाळ बाळ तुमचे । सार्थक देहाचे करणे आता ॥११०॥
अशी स्तुति केली बहुता प्रकारे । तंव दीनोध्दार बोलियेले ॥११॥
काय अपेक्षित तुझे चित्त । सांगणे त्वरित चांगदेवा ॥१२॥
मनीचे मनोरथ पुरवीन तुझे । तुम्ही भक्त माझे लडिवाळ ॥१३॥
अभयवचन ऐकूनि हरीचे । भक्त बोलतसे करुणाशब्द ॥१४॥
अनुग्रह कांही मज करा देवा । जेणे होय जीवा सार्थकता ॥१५॥
पांडुरंगे ऐसे बोल आयकूनि । मग हाती धरुनि चालविले ॥१६॥
चंद्रभागेमध्ये गेले उदकांत । तीर्थमूर्ति जेथे विराजित ॥१७॥
सुवर्णमंडप रत्नखचित शोभा । फांकली प्रभा तीर्थामध्ये ॥१८॥
चांगदेवा गुप्त स्थळ दाखविले । अनुग्रहपदवी देते झाले ॥१९॥
अनुग्रह केला मंत्र षडाक्षर । विद्या मनोहर संजीवनी ॥१२०॥
संजीवनी विद्या सांगितली सर्व । परोपकारकार्य घडे जेणे ॥२१॥
धर्म अर्थ काम मोक्ष ( ? ) घडे चौथा । चहूं पुरुषार्थ साधक जे ॥२२॥
विष्णुषडाक्षर म्हणताति त्यास । अनुग्रह चांगयास तीर्थी केला ॥२३॥
कोणे रीतीने ते श्याम मरुद्गण । पुढे अनुसंधान वदतसे ॥१२४॥
इति श्रीचांगदेवप्रकरणे पंचमोsध्याय: ।

N/A

References : N/A
Last Updated : August 06, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP