अध्याय तिसरा

हा ग्रंथ शामजी गोसावी मरूद्गण यांनी लिहीला.
मूळ ग्रंथात पहिले दोन अध्याय नाहीत.


स्वामीचिये आज्ञे उभयतां शिष्य ॥ वेगी प्रयाणासि करिते जाले. ॥१॥
नित्य मुखीं स्मरती चांगयाचे नाम, । जेणे सकल काम पूर्ण होती. ॥२॥
आसनींम शयनी, सर्वकाळ ध्यानी, । सद बसे मनीं चांगदेव. ॥३॥
चांगदेवे कांही कळा ऐशी केली: । घटिका एक जाली प्रयाणासि,॥४॥
उभयतां ब्राह्मण पाहती कौतुक: । दृष्टीपुढे एक ग्राम दिसे. ॥५॥
ग्रामस्थ लोकांसि पुसती ब्राह्मण. । ग्रामाचें या नाम काय अस? ॥६॥
ग्रामाचें या नाम ह्मणती आळंदी;। वाहतसे नदी, इंद्रायणी. ॥७॥
येथूनियां किती तप्तीचांगदेव ? । उभयतां भूदेव पुसताती ॥८॥
क्रोशशत आणि पन्नास वरुते । ऐशी संख्या असे येथूनियां. ॥९॥
उभयतां शिष्य्म आश्चर्य करिती । म्हणती अदभुत देखियेले ॥१०॥
दीड शत क्रोश घटिकेत कामून । चांगदेवोहून आलो आम्ही. ॥११॥
लोक म्हणती, त्याची सिध्दाई उत्क्रृष्ट । त्यापाशी हे स्पष्ट कळा आहे. ॥१२॥
ग्रामांत प्रवेश उभयता करिती । एक वेदमूर्ति भेटलासे ॥१३॥
तया ब्राह्मणास वृत्तांत पुसती । ज्ञानेश्वर निवॄत्ति राहती कोठे ॥१४॥
सर्व वर्तमान विप्रे सांगितले । दुरुन दाखविले स्थळालागी. ॥१५॥
देखतांचि स्थळ सन्मुख चालिले; । दृष्टीस देखिले ज्ञानेश्वर. ॥१६॥
दुरुनि ज्ञानेश्वर उभयतां देखिले । हांसोनि बोलिले निवृत्तिसि ॥१७॥
अवतार आपण धरिला ज्याकारणे । तयाचे दर्शन होईल आतां ॥१८॥
चांगा वटेश्वर सिध्दि योगाभ्यासी । पव आपणासिं पाठविले. ॥१९॥
सन्मुख येतसे शिष्य चांगयाचा । बंद कागदाचा कोरा असे. ॥२०॥
ऐसे बोलतांचि जवळी ते आले । साष्टांग नमिले ज्ञानेश्वरी. ॥२१॥
म्हणती ज्ञानेश्वर आले तप्तीहूनि । कोरे पत्र घेऊनि चांगयाचे. ॥२२॥
शिष्यी ऐकूनियां आश्चर्याते केले । यथार्थ बोलिले स्वामी तुम्ही ॥२३॥
आम्ही न बोलतां ज्ञानी तुम्हा कळे । परब्रह्म पुतळे दिसतसा ॥२४॥
सर्व वर्तमान सिध्दाचे सागती । कागद ठेविती कोरा पुढे ॥२५॥
व उकलूनि पाहती ज्ञानदेव । मागें पुढे सर्व कोरे असे. ॥२६॥
ज्ञानेश्वर करिती विचार । कागद हा कोरा पाठविला. ॥२७॥
कोरा कागदाचें कवण कारण? । मनी विचारुनि पहा तुम्ही ॥२८॥
बोलती निवृत्ति, ज्ञानेश्वर, ऐक. । सिध्द महाराज चांगदेव. ॥२९॥
ऋध्दि सिध्दि सर्वविधा ते साधिले । ब्रह्मादिकां न कळे पार ज्याचा. ॥३०॥
आत्मा ने ब्रह्मांडी काळाते वंचूनि । वर्तमान ज्ञानी सर्व कळे ॥३१॥
चवदा शत वरुषे नरदेह रक्षिला । बहुत श्रमाला केले असे. ॥३२॥
आंगी थोर असे सिध्दाईचा ताठा । अहंकारी मोठा भूमंडळी ॥३३॥
ब्रह्मज्ञानकळा स्वप्नही न कळे । ये विषयी आंधळे नेत्र त्याचे.॥३४॥
तुमची सिध्दाई ऐकूनि उत्कृष्ट । लागली चटपट थोर जीवा ॥३५॥
श्रेष्ठत्व कनिष्ठत्व उभयतां भाव; । कोण गौरव पत लेखा ? ॥३६॥
ऐसा हा संदेह मनांत धरुनि । पाठवी तेथूनि कोरे पत्र. ॥३७॥
सर्व विद्या जाणे सर्वही कलांसि । ब्रह्मज्ञानाविषयी कोरा असे ॥३८॥
म्हणऊनि कोरे पत्रपाठविले तुम्हा । त्याचा भाव आम्हा हाचि दिसे ॥३९॥
तुम्ही आता ऐसे पत्र करा सिध्द । पाहतांचि बोध होय त्यासि ॥४०॥
ज्ञानेश्वर केले निवृत्ति नमन; । मग पत्रलेखन करिते जाले. ॥४१॥
स्वस्ति श्री वटेश्वर चांगया, अवधारी, । ब्रह्म चराचरीं एक असे. ॥४२॥
द्वैताचे नाम स्वप्नही न दिसे । ऐशा निश्चयसि धरीं आता. ॥४३॥
देह कवणाचा ? कवण नादे देही । आपणाते पाहीं विचारुनि ॥४४॥
योग तो कठिण, साधितां साधन । ते योगाचे धन न पाविजे ॥४५॥
मन जेथे जेथे धांवूनिया जाय । तेथे तेथे पाहे आपण या ॥४६॥
लिखितपासष्ट पत्राशी वाचावे । अर्थासि बरवें  विचारुनि ॥४७॥
सूक्ष्म दृष्टीने याचा करावा विचार; । वेदशास्त्री सार हेंचि असे ॥४८॥
पत्राचे लेखन करुनि ज्ञानेश्वरी । शिष्याचे हे करीं दीधलेसे ॥४९॥
चांगयासि सांगा अमुचे नमन । सूक्ष्म दृष्टीने पत्र वाचा ॥५०॥
चवदाशे वर्षाचे सार्थक करावे; । अनुभवे घ्यावे स्वात्मासुख ॥५१॥
पत्र घेऊनियां ज्ञानदेव नमिले । शिष्य स्वार झाले चांगयाचे ॥५२॥
साष्टांग नमन स्वामीसि करिती । प्रत्रासिही देती त्यांच्या करी. ॥५३॥
नमस्कार ज्ञानेश्वराचा सांगती । म्हणती " विज्ञप्ति बहुत केली. ॥५४॥
बहुत दिवस देह हा दंडिला । चवदाशे वरुषाला क्रमीयेले ॥५५॥
आतां बरव्या रीती सार्थक करावे । पत्रासि पाहावे सूक्ष्म दृष्टी ॥५६॥
योगाभ्यास त्यांचा पाहिली सिध्दाई । दांभिक हे नाही तयांपाशी ॥५७॥
चार्‍हा मुले असती वये करुनियां सानी । अदभूत करणी दिसे त्यांची ॥५८॥
मूर्तिमंत देव तिन्ही दिसताती । चवथी, ते शक्ति अवतरली ॥५९॥
देखियेले थोर आम्ही चमत्कारा । कळेल ते करा याउपरी ॥६०॥
ऐसे वर्तमान मुखें सांगताती, । पत्र हातीं देती चांगयाचे. ॥६१॥
उकलूनि पत्र पाहती योगेश्वर । अक्षर सुंदर बहुत असे ॥६२॥
अक्षरेअक्षर पाहती पृथकाकार । अर्थाचा विचार बहुत केला. ॥६३॥
पाहिलीच वोवी वाचूनि पाहिली । कल्पना योजिली नाना अर्थी ॥६४॥
बहूतां प्रकारें शोधूनियां अर्थं । पाहतां यथार्थ न कळेचि ॥६५॥
चित्तांत बहुत वाटले विषम । म्हणती, हे वर्म नकळेचि ॥६६॥
चवदा विद्या आणि कळा चौसष्टी । परम संकष्टी साधियेल्या ॥६७॥
परंतु हे कळा न कळे कांही केल्या । बहुत पाहिल्या वेदविद्या ॥६८॥
तयाचे भेटीसि जावें येथूनियां । पत्र शोधूनियां विचारावे ॥६९॥
आपुली सिध्दाई दाखवूं तयासि । अघटित करणीसि करुं आता ॥७०॥
ऐसा हा निश्चय केलासे मनाचा । समुदाय शिष्यांचा पाचारिला ॥७१॥
म्हणती चला जाऊ भेटी ज्ञानेश्वरा । कांही चमत्कारा दावूं त्यासि ॥७२॥
मोहन स्तंभन आणि वशीकरण । विद्यांचे संपूर्ण स्मरण केले ॥७३॥
व्याघ्रावरि आरुढ शिष्यसमुदाव । मध्ये चांगदेव शोभताती ॥७४॥
व्याघ्राचे वाहन सर्पाचे चाबुक । थोर कौतुक जगी जाले ॥७५॥
चमत्कार थोर देखिला सिध्दाईचा । लोक काया वाचा शरण येती ॥७६॥
तप्तीचांगदेवीहूनि चालियेले । प्रयाणासि केले दक्षिणेसि ॥७७॥
व्याघ्र वाहना, सर्पांचा चाबुका । कळावया लोकां सकळांसि ॥७८॥
म्हणोनियां मार्गी चालताती स्थिर । आले भीमातीर जेथे असे ॥७९॥
अश्वत्थ नामक ग्राम भीमा नदी । तेथूनि आळंदी कोस चारी ॥८०॥
स्नानसंध्या भीमातीरी करावयासि । राहिले अनायासीं घटी चार ॥८१॥
व्याघ्ररुढ शिष्य पुढे एक जात । वर्तमान श्रुत करावया ॥८२॥
निवृत्ति ज्ञानेश्वर बैसले सोपान । आत्मज्ञानी खूण बोलताती ॥८३॥
तव पुढे एक कौतुक देखती । व्याघ्ररुढ म्हणती, आला विप्र ॥८४॥
तर्के शिष्य चांगयाचा दिसतसे । पत्राच्या अर्थासि कळले नाही ॥८५॥
ऐसे बोलतांचि व्याघ्र सन्निध आला । खाली उतरला ब्राह्मण तो ॥८६॥
साष्टांग नमन केले चांगदेवा । तेही सर्व भावा जाणितले ॥८७॥
म्हणती चांगदेव व्याघ्ररुढ आले । कासया श्रमले येथवरि ॥८८॥
पत्र वाचूनियां काय न पाहती । काय अर्थ चित्ती आला नाही ॥८९॥
पत्राचाही अर्थ विचारुनि घ्यावा । ह्मणऊनि यावा केला तेही ॥९०॥
निवृत्ति म्हणती, चवदाशे वरुषांचे । मरुद्गण स्वर्गीचे आले येथे ॥९१॥
बहुत करावा तयांचा आदर । येथूनि सामोरां पुढे जावे. ॥९२॥
दगडाचेभिंतीवरि ते बैसले । सत्वर चालिले भिंतीसहित ॥९३॥
पाषाणाची भिंती चाले दडदडा । जैसा चाले घोडा, तुरकी तो ॥९४॥
ग्रामापासूनि कोस एक आले । दृष्टीस देखिले चांगदेव ॥९५॥
दगडाची भिंती चालतां देखिली । ग्रंथिही सुटली अभिमानाची ॥९६॥
व्याघ्राखाली उडी सत्वर घातली । दंडवत केला चवघां जणा ॥९७॥
देखूनि निवृत्ति, ज्ञानेश्वर पाही । जाती लवलाही लोटांगणी ॥९८॥
चांगदेवी चौघे लोटांगणा जाती । तेही तयांप्रति आलिंगिले ॥९९॥
परस्परे नमन आलिंगन झाले । कुशल पुशिले परस्परे ॥१००॥
भेट जाली वटवृक्ष असे तेथे । विश्रांति म्हणती, येथे करा ॥१०१॥
ज्ञानदेव ऐसे मुखी बोलियेले । ऐकूनि बसले वटच्छाये ॥१०२॥
येथूनि चरित्र पुढे आईकावे । अवधान द्यावे श्रवणासि ॥१०३॥
संताचे चरित्र करिता श्रवण । पातके दारुण दग्ध होती ॥१०४॥
षदतसे चरित्र श्याम मरुद्गण । कृपा करी पूर्ण चांगदेव ॥१०५॥
इति चांगदेवप्रकरणे चांगदेवज्ञानेश्वरभेटीनिरुपणं नाम तृतीयोsध्याय: ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 06, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP