अंक चवथा - प्रवेश चवथा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


स्थळ - फाल्गुनरावाचें घर

(आश्विनशेट आणि रोहिणी )

रोहिणी - जो घोंटाळा माजला आहे म्हणतां ! त्यांच्या मनांत यांचा संशय आणि यांच्या मनांत त्यांचा संशय. हे सगळे तुम्ही म्हणता त्या तसबिरीचे प्रताप ! दुसरं कारण कांहीं दिसत नाही.
आश्विन - या गोंधळाचा खुलासा करावा म्हणून तर मुद्दाम मी इथें आलों आहे. या कामी मला फाल्गुनरावांची गांठ घेतलीच पाहिजे. दुसरी तोड नाही ! म्हणून ते येईपर्यंत मी इथे बसतो.
रोहिणी - मला वाटतं तुम्ही इथं बसूं नये, कारण तुमच्या बसण्यानं भडकलेल्या आगींत तेल ओतल्यासारखं होईल.
आश्विन - तें कसं ?
रोहिणी - कसं तें काम सांगूं ? पण बसूं नये हें चांगलं. फिरुन कांही वेळानं या हवे तर, पण आतां चला ! ( चपापून ) अग बाई, आलें हो, आलें, त्यांचाच शब्द हा ! चला, चला. या लवकर या दारानं ! आतां काय सांगावं बाई यांना ? त्यांनी जर तुम्हाला या घरांत पाहिलं, तर बाईसाहेबांचा सर्वस्वी घात झाला म्हणून समजा ! तुम्ही बाईसाहेबांकडे आलांत असं  त्यांनी एकदां डोक्यांत घेतलं म्हणजे देवालासुध्दां निघायचं नाहीं !
आश्विन - पण मी त्यांना असं समजून सांगेन कीं --
रोहिणी - हो, तुम्ही सांगाल हवं तें, पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना ? ( ऐकून ) झालं, इकड़ंच येताहेत वाटतं. मी पाहून तरी येते.
आश्विन - काय मूर्ख आहे ही ! विनाकारण घाबरुन गेली आहे. ही कांहीं म्हणे ना, मी फाल्गुनरावांची गांठ घेणारच !
रोहिणी - ( घाईघाईनें ) तेच हो तेच, आले ! आणि त्यांच्याबरोबर बुरखा घेतलेली एक बायको आहे.
आश्विन - ( मनाशीं ) बुरखा घेतलेली बायको ? रेवती तर नसेल ना ? पुन्हां संशय आला. ( उघड ) तिचा चेहरा पाहिलास कां ?
रोहिणी - अहो, बुरखा घेतलेली म्हणतें ना ? पण तुम्ही कृपा करुन सांगतें तिथें लपून बसा ! एवढा कराच माझ्यावर उपकार !
आश्विन - ठीक आहे, लपून बसतों. ती बुरखा घेतलेली कोण हें मलाहि कळलंच पाहिजे ! पण कुठें लपून बसूं ? एखादी निराळी खोली आहे कां ?
रोहिणी - फाल्गुनराव निघून जाईपर्यंत तुम्ही या खोलींत बसा. फार झालं तर घटका - अर्धी घटका बसावं लागेल. येतां ना ? चला लवकर !
आश्विन - ( हातरुमाल जोडा वगैरे घेत ) चल, खोलीत लपीव, पेटीत लपीव, हवें तर बिछान्यांत लपीव ! कुठंहि लपीव ! चल ! ( मनाशीं ) ती जर रेवती असली तर -
रोहिणी - ( त्याला खोलीत घालून ) हं, बसा इथं ! मी बाहेरुन  कुलूप घालतें बरं कां ? म्हणजे काळजी नाही. घालूं ना ?
आश्विन - हं एक का दोन घाल हवी तर ! ( ती ) कुलूप घालून जाते. ( फाल्गुनराव व बुरखेवाली प्रवेश करतात. )
फाल्गुन - मी सांगितलं त्याला हं म्हण, मागशील तें देईन तुला ! बरं, आतां बुरखा काढीनास तोंडावरचा !
बुरखेवाली - नको नको ! तें ऐकलंत का ? कोणसं बोलत आहे ! कुणी पाहिलं तर काय होईल कोण जाणे !
फाल्गुन - इथं कोण येत आहे पहायला ? घाबरट कुठली ! या प्रसंगीं माझं म्हणणं कबूल कर कीं, मी तुला जन्मभर विसरणार नाही, ही शपथ !
बुरखेवाली - पण तुमचा माझा कांही एकांत झाला आहे हें जर तुमच्या बायकोला कळलं तर मग माझी कांही धडगत नाही !
फाल्गुन - पण कळणार कसं ? हं, बुरखा काढ आतां --
बुरखेवाली - मी नाहीं बाई ! पाहिल कुणी !
फाल्गुन - दाराला कडी लावून येतो, मग तर झालं ?  ( तसें करतो. ) या बायका म्हणजे भारीच भित्र्या !
बुरखेवाली - नाहीतर तुम्ही नवयाबायको भांडाल आणि एक व्हाल, माझं मात्र मधल्यामधें मरण !
फाल्गुन - पुन्हां आणखी आपलं तेंच ! अग, एकदां तुटलेलं फळ फिरुन चिकटेल का ? त्यांतून त्या गचाळ बायकोचा मला इतका वीट, वैताग आला आहे कीं, तिचं तोंड पाहायचा नाही याउप्पर ! मग दुसरं तिसरं दुरच राह्यलं !
बुरखेवाली - पण हें बोलणं खरं कशावरुन ?
फाल्गुन - तुझ्या गळ्याशपथ ! झालं आतां ?
बुरखेवाली - मग हा काढला बुरखा ! ( तसं करुन उभी राहते ) कां ? दचकलांत कां ? माझी काय भीति पडली तुम्हांला ?
फाल्गुन - ( गोंधळून ) अरे, ही तर माझी बायको !
कृत्तिका - अहो, महाराज, महाराज ! आतां कां तोंड मिटलं ? का स्वातीला शपथ दिली म्हणून माझ्याकडे पाहायचं नाही ? सांपडलेत का आतां चांगले ? अजून युक्ति नाही वाटतं एखादी सुचत ?
फाल्गुन - तूं पाहिजे तें म्हण. ह्या गाढव भादव्यानं हा पाजीपणा केलान् , कसा तो सांगतो तुला --
कृत्तिका - सांगा सांगा पाहूं ! गाढव भादव्या ! त्यानं फसवलं का या भोळ्या शंकराला !
फाल्गुन - तसं नाहीं ग लाडके !
कृत्तिका - असं असं ! इतक्यांत मी गचाळाची लाडकीसुध्दां झालं ना ? तिची ओकारी आली आहे, तोंडसुध्दां बघायचं नाही, मग दुसरं तिसरं दूरच ! हेसुध्दां आपण म्हणलांत ना इतक्यांत ?
फाल्गुन - अग, मनांतला माझा तुजविषयीचा संशय घालवायला ही मी युक्ति काढली होती इतकंच !
कृत्तिका - ’ एवढं माझं काम केलंस म्हणजे तुला जन्मभर दिसणार नाही ! ’ हे युक्तीतलंच का सगळं ?
फाल्गुन - मग दुसरं काय ? मला ठाऊक कीं, त्या स्वातीला निरोप पाठविला म्हणजे तुला कळणार, मग तूं बुरखा घेऊन मला भेटणार ! हें सर्व आधींच जुळवून ठेवलं होतं मी. लोक बोलतात ते खोटं, उगीच संशय घेणं वाईट असं तुला कळावं म्हणून हें मीं केलं, समजलीस ?
कृत्तिका - फार खासं केलंत हो ! आतां मी भावाला पत्र लिहून इकडे बोलावतें.
फाल्गुन - बोलविनास ? तुझीच फजिती होईल !
कृत्तिका - पाहीन मग कुणाची होते ती ! ( खोलीच्या दरवाज्याजवळ येऊन ) कुलूप कुणीं घातलं दाराला ! आपण वाटतं ? हं, समजलं. मी बाहेर गेलेली पाहून या खोलींत एखादीं औषध घ्यायला बसली आहे वाटतं ?
फाल्गुन - ( हंसत ) शाबास - शाबास, चांगलं ओळखलंस ! वेडी कुठली !
कृत्तिका - मुकाट्यानं कुलूपाची किल्ली द्या, नाहींतर हें कुलूप तोडून पाहीन आंत कोण आहे तें; सोडायची नाहीं !
फाल्गुन - नाहीच सोडायचीस, मला ठाऊक आहे, तूं कसली हट्टी !
कृत्तिका - कोण आहे ग बाहेर ? रोहिणी ! कोण मेली बसली आहे माझ्या खोलींत ती पाहातें. ( रोहिणी येते. )
कृत्तिका - काय ग, या कुलूपाची किल्ली कुठं आहे ?
रोहिणी - ( घाबरुन ) माझ्याशीं आहे बाईसाहेब.
कृत्तिका - दे तर ती अगोदर !
रोहिणी - ( तिच्या कानांत ) या वेळेला मागूं नका ! ( उघड ) आहे म्हटलं पण माझ्याजवळ नाही बाईसाहेब. ( हळूच ) ते गेल्यावर मग मागा. आतां मागूं नका !
कृत्तिका - मागूं नका म्हणजे ? तूं कोण नको म्हणणार ? आण ती इकडे !
फाल्गुन - ( मनाशीं ) आहे म्हणाली  आणि देत कां बरं नाही ? हें तंत्र कांही निराळंच दिसतं आहे. ( उघड ) तिला नको देऊंस, माझ्या हातांत दे !
कृत्तिका - तें काय म्हणून ? मलाच ती पाहिजे. दे ग !
रोहिणी - कुठें हातांतून पडली. ( हळूच ) मागू नका म्हणतें ना इतक्यांत !
कृत्तिका - मी नाहीं ऐकायची तसलं !
रोहिणी - तर मग घ्या ही ! ( देते ) ( मनाशीं ) आतां इथून धूम ठोकली पाहिजे ! ( जाते )
कृत्तिका - ( किल्ली घेऊन कुलूप काढतांना ) आतां दाखवतें तमाशा आपल्याला !
फाल्गुन - दाखव बरं, मी तयार आहें पहायला.
कृत्तिका - कोण आहेस ग आंत, चल, ये अशी बाहेर !
आश्विन - ( खोलीबाहेर येऊन ) मी आहें तो - आश्विनशेट.
कृत्तिका - ( चपापून ) अगबाई ! तुम्ही कसे माझ्या खोलींत ?
फाल्गुन - कसे आले आणि कां आले, तें तुला ठाऊक आहे नी त्यांना ठाऊक आहे. उगीच कां विचारतेस ? ठरल्याप्रमाणं आले !
आश्विन - माझं येणं तुम्हांला जरा चमत्कारिक वाटेल, पण-
फाल्गुन - तुम्ही हवी ती थाप मारा, आतां हिच्याकडून तुम्हांला होस ’ होच ’ मिळणार !
आश्विन - पण मी इथं कां आलों तें सांगतों; मग हवी तर वाटेल तशी बडबड करा ! तुमच्याजवळ जी माझी तसबीर आहे ती मागायला मी आलों आहें ; कारण तिची मला जरुर आहे.
फाल्गुन - असलीच पाहिजे. मलाहि आतां तिची फार जरुर आहे !  कां म्हणाल तर, तुमच्या दोघांच्या सलगीची ती एक साक्ष आहे.
कृत्तिका - काय म्हटलंत आपण ? दोघांच्या सलगीची ! पुन्हां एकदां बोला पाहूं ! कां हो आश्विनशेट, तुम्ही इथं कां आलांत ? माझ्या खोलींत कसे गेलांत ? सगळं - सगळं सांगा !
फाल्गुन - अहो, ती विचारते आहे, आतां तरी सांगा ! अजून सुचत नाही काय सांगायचें तें ?
आश्विन - कां आलों हें सांगितलंच मघाशीं. आतां शिरकाव कसा झाला विचाराल, तर रोहिणीनं मला इथं लपून बसायला सांगितल.
फाल्गुन - मग यांत काय, बिघडलं; तिनं सांगितलं तें बरोबर सांगितलं. आधींचाच बेत ठरलेला. त्याप्रमाणं --
आश्विन - नाहीं - नाहीं, बेत बिलकुल ठरला नव्हता !
कृत्तिका - हे येणार, यांतलं एक अक्षरसुध्दां मला माहित नव्हतं !
फाल्गुन - बस् जुळलं. दोघांनाहि माहित नव्हतं ना ? झालं तर !
आश्विन - असल्या बोलण्यांत अर्थ नाही.  माझी तसबीर कुठें आहे ती द्या !
फाल्गुन - तसबीर मिळायची नाही !
आश्विन - ती घेतल्याशिवाय मी हलायचा नाही ! मुकाट्यानं दिलीत तर बरं आहे नाही तर --
फाल्गुन - नाहीं तर काय कराल ? अशा धमकावणीला भ्यायचा नाही मी.
आश्विन - आणि मीहि साधी धमकावणी दाखवायचा नाही. आत्तांच्या आत्तां तसबीर द्या, नाहीं तर हा पाहिलात का जंबिया ?
फाल्गुन - ( दचकून मनाशीं ) हं समजलों, कांहीतरी कुरापत काढून मला मारुन टाकण्याचा यांचा बेत दिसतो; आणि माझ्या बायकोनं ही मसलत दिली आहे !
आश्विन - कां, पाहिलंत का ?
फाल्गुन - तुमचा जंबिया पाहिला आणि माझाहि जंबिया दाखविला असता तुम्हांला ; पण असल्या निस्संग बायकोसाठी तुमच्यावर हत्यार उचलण्याची माझी इच्छा नाही ! ( तसबीर काढून ) शिवाय या तसबिरीचीहि मला किंमत नाही. घेऊन चला तुमची तुम्ही ! ( जमिनीवर फेंकतो ) आणि त्या तसबिरीबरोबर हिलाहि घेऊन चला !
पद ( चतुर्भुज )
जा, करा कृष्णसुख सुध्या गुणीं ॥ प्रियपात्रासहि या न्या संगें ॥
नको गृहीं ही डाकिणी ॥ शस्त्रें तव करिं मज मारविते ॥ घालूं न
चुके विष ती पतितें ॥ कालसर्पिणी दंशुं पहाते ॥ नये हिचा
विश्वास मनीं ॥१॥
कृत्तिका - आणि मला तरी काय करायचं तुमच्या घरांत राहून ? आहे माझा भाऊ, सांभाळील मला !
फाल्गुन - ही आजची हकीकत त्याला लिहून कळवितों, पाहिन कसा सांभाळतो तो. ! हा निघालोंच बघ त्या उद्योगाला ! काय समजलीस ? हडळ ! डांकीण !
कृत्तिका - तुम्ही लिहा आणि मीहि लिहितें ; हे नवरे म्हणजे समंध ! ब्रह्मराक्षस ! रोहिणी, अग रोहिणी ( निघून जाते )
आश्विन - हा ब्रह्मराक्षस आणि ही हडळ, जोडा खासा जमला आहे ! पण मी कोण ? रेवतीचा भुत्या ; आतां पश्चातापाची दिवटी पाजळून, तिच्यावर प्रेमाचें तेल ओतून, ही तसबिरीची भेट घेऊन तिच्याकडे जातों आणि तिचा उदे उदे करुन अपराधाची क्षमा मागतो ! पुढे तिची इच्छा आणि आमचं नशीब ! काय होईल तें होईल !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP