अंक चवथा - प्रवेश तिसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( आंबराईचा कोपरा फाल्गुनराव येतो. )

फाल्गुन - संध्याकाळ झाली, अंधार पडत चालला, दिसेनासं झालं, तरी ती स्वाती का येत नाही ! भादव्यानं जागा तर भलतीच सांगितली नाही ना ? नाहींतर मीं सांगितलं होतं आंबराईचा कोपरा आणि त्यानं सांगितलं असेल कोपर्‍यांतली आंबराई ! ( न्याहाळून ) तें काय बरं ? मनुष्य आहे. तसाच बुरखा दिसतो. तेव्हा बायको असावी, आणखी बायको म्हणजे स्वातीच. ( खाकर्‍या आवाजानें ) ए, ए, ए, स्वाती ! ही तीच ! अग, इकडे - इकडे ये ! बस्स, अगदीं म्हणजे अगदीं वेळेवर आलीस ! ( बुरखेवाली प्रवेश करिते. )
बुरखेवाली - ( घाबर्‍या घाबर्‍या ) आलें बाई एकदां सुरक्षित. फाल्गुनराव, मी अगदीं घाबरुन गेलें आहे. अग बाई !
फाल्गुन - आं ! आं ! काय, झालं काय ?
बुरखावाली - हा पहा, सर्वांगाचा थरकांप झाला आहे ! छे - छे, नको ग बाई अशावेळी एकटं हिंडणं !
फाल्गुन - पण काय झालं तें तरी आधीं सांग.
बुरखेवाली - आपल्याला काय सांगूं  फाल्गुनरावाची. येतां येतां वाटेत, त्या तिथं पलीकडे, एक कोण मेला दांडगेश्वर भेटला कुणाला ठाऊक ? पण इथं नाहीं सांगत, मला आपल्या घरांत घेऊन चला लौकर !
फाल्गुन - माझ्या घरांत ! छे - छे, दुसर्‍या एखाद्या घरांत गेलों तर नाही का चालायचं ?
बुरखेवाली - अहं ! प्राण गेला तरी दुसर्‍याच्या घरांत नाहीं यायची !
फाल्गुन - ( मनाशीं ) ही तर असं म्हणते. आणि - आणि काय ? माझी बायको कांहीं या वेळी घरांत नाहीं, हें ध्यानांत नव्हतं. ( उघड ) बरं चल, पण दुसर्‍या एखाद्या घरांत गेलों असतों, म्हणजे बायकोची धास्ती बाळगायला नको होती !
बुरखेवाली - तें कांहीं नाहीं, मला आपण कसंहि करुन आपल्याच घरी घेऊन चला !
फाल्गुन - बरं तर चल; तिला कशाला इतकं भ्यायला पाहिजे ? ( दुर उभा केलेल्या भादव्यास ) अरे ए भादव्या, इकडे ये ! कां रे, आम्ही बाहेर पडलों तेव्हां ती घरांत नव्हती ना ?
भादव्या - ( हळूच पुढें येतो ) नव्हत्या धनीसाहेब !
फाल्गुन - बरं तर, तूं पुढं हो आणि दारबीर उघडून ठेव ; आणखी दरवाज्याच्या आंतल्या बाजूचा मोठा कंदील मालवून टाक. आंत जातांना कुणाला दिसणार नाही अशी तजवीज कर, समजलास ? जा लौकर !
भादव्या - होय धनीसाहेब ! ( जातो. )
फाल्गुन - ( तिच्या पाठीवर हात मारुन ) शाबास - शाबास. आलीस, खूष झालों ! चल आतां हळूचं माझ्या आडून - आडून !
बुरखेवाली - पण हें कळायचं नाही ना तुमच्या घरांत !
फाल्गुन - भलतंच ! फक्त तुला ठाऊक कीं मला ठाऊक ! ( दोघे जातात. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP