अंक तिसरा - प्रवेश दुसरा

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( फाल्गुनरावाचे बंगल्याजवळं )

फाल्गुन - एकंदरीत त्यानं आपलं नांव आश्विनशेट म्हणून सांगितलं तें खरंच. आतां काय तोंडओळख झाली, ठिकाण समजल, नावंही कळलं, मग राहिलं काय ? कांही नाहीं ! फक्त घरांत जायचं आणखी अर्धचंद्राचा प्रयोग करुन तिला बाहेर काढायची. पण हा कोण ? हाच तो आश्विनशेट. माझ्या घरांतून बाहेर पडतो ! आणखी हा भादव्या त्याच्याबरोबर ! ( आश्विनशेट आणि भादव्या येतात. ) ( मनाशीं ) अरे ! भादव्या त्याच्याकडून लांच घेतो आहे ! काय रे भादव्या, काय घेतलंस तें ?
भादव्या - कांहीं नाहीं धनीसाहेब. हे म्हणाले रुपया घे ! पण धनीसाहेब, मीं कशाला घेऊं त्यांचा रुपया ? परत देणार होतों इतक्यांत आपण आलांत.
( रुपया टाकून निघून जातो. )
फाल्गुन - अरे चोरा, ( आश्विनशेटास ) कां हों, कां तुम्ही माझ्या घरी ?
आश्विन - आपल्याकडेच आलों होतो.
फाल्गुन - कां ?
आश्विन - माझी एक तसबीर तुमच्याजवळ आहे ना ?
फाल्गुन - होय आहे. ही बातमी तिनं दिली वाटतं तुम्हाला ?
आश्विन - हो - हो, तिनंच दिली !
फाल्गुन - आणखी काय सांगितलं ?
आश्विन - आणखीन पुष्कळ भानगडीच्या गोष्टी सांगितल्या आहेत !
फाल्गुन - नाहीं, त्याबद्दल मला शंकाच नव्हती ! बरं आतां पुढं बेत काय काय ठरला आहे तुमचा ?
आश्विन - बेत काय ठरायचा ? हें पहा, य:कश्वित् तसबिरीबद्दल मी कांही तुमच्याशीं भांडत बसत नाही; कारण तिनं ज्याअर्थी आपल्या खुषीनं ती तुम्हालां दिली आहे --
फाल्गुन - नाहीं नाहीं. तुम्ही चुकतां इथं. तिनं दिली नाही, मी घेतली.
आश्विन - तिनं दिली असो किंवा तुम्ही घेतली असो, सध्या ती तसबीर तुमच्याजवळ आहे हें खास ना ?
फाल्गुन - होय, आहे !
आश्विन - झालं तर मग ! त्या तसबिरीचं तुम्ही वाटेल तें करा ! मला इतकंच म्हणायचंय् कीं, माझा मात्र तुम्ही सर्वस्वी घात केलात !
फाल्गुन - तो कसा ? मी तुमच्या चैनीत आड आलों म्हणून वाटतं ?
आश्विन - हो, अलबत !
फाल्गुन - तर मग तुमच्या मनांत मी अगदीं दुष्ट, घातकी मनुष्य ठरलों असेन, नाही बरं ? गरीब बापड्यांच्या सुखांत अंतर पाडणारा कोण निष्ठुर राक्षस मी !
आश्विन - तें काय पाहिजे तें म्हणा, पण नुकतीच जी केवळ माझा प्राण झाली होती, तिच्या - माझ्यात तुम्ही बिघाड पाडलांत, अगदीं कायमचाच पाडलांत !
फाल्गुन - जी केवळ माझा प्राण झाली होती ? अगदीं उघड उघड सांगता कीं हो ! अहो पण शहाणें ! तुमची ती प्राण झाली होती त्यावेळी माझे प्राण तडफडत होते, त्याची कांहीं तुम्हाला कीवं येत होती. का ?
आश्विन - झालं तें झालं, पण आतां शपथ घेऊन सांगतों कीं, याउपर तिचा माझा संबंध तुटला ! तुम्ही तिचे आणि ती तुमची खुशाल लागेल तसा गोंधळ घाला !
फाल्गुन - औदार्य तर खूप दाखवलंत; पण त्याचा आतां मला कांही उपयोग नाहीं. तुम्ही जसं मला सांगितलंत तसं मीहि तुम्हांला सांगतो कीं, याउपर तिचा माझा संबंध नाही ! ती तुमची आणि तुम्ही तिचे ! तुम्ही वाटेल तसा गोंधळ घाला !
आश्विन - छे, छे, नको, आतां तिच्याशी व्यवहार म्हणून नको ! झाला तितका बस्स झाला !
फाल्गुन - कां, इतक्यांत तिचा वीट आला वाटतं ?
आश्विन - जितकी ती पूर्वी मला प्यार होती तितकी आतां माझ्या मर्जीतून उतरली ! बेमान !
फाल्गुन - बेभान ! ( स्वत:शीं ) खरंच बेमान ! काय न्याय आहे पहा ! मालकाच्या आधीं चोराची बोंब ! ( उघड ) तुमच्याशीं भांडत बसण्यांत काय अर्थ ? तिच्यासंबंधाने मला जें करायचं तें मी करतो ; तुम्हांला वाटेल तें तुम्ही करा !
आश्विन - मला दुसरं काय करायचंय् ? हें सगळं लबाडीचं माप तिच्या पदरांत घालतो, आणखीं - हो, तिच्या देवाची काय भीति आहे ? प्राण गेले तरी बहेत्तर ! पण पुन्हां म्हणून तिचं नांव काढायचा नाहीं ! ( जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP