अंक तिसरा - प्रवेश पहिला

संशय - कल्लोळ नाटकांचा पहिला प्रयोग, गंधर्व नाटक मंडळींनी सन १९१६ च्या नोव्हेंबर महिन्यांत पुणें मुक्कामीं केला.


( फाल्गुनरावांचे घर - कृत्तिका येते. )

कृत्तिका - काल श्रावणशेटाच्या बायकोला चिठ्ठी लिहिली तिचं उत्तर निदान् आज सकाळीं तरी यायला पाहिजे होतं, तें अजून कसं आलं नाही ? का त्याच्यावर मध्येंच कुणी घाला घातला कोण जाणे ! तो कोण, भादव्या का रे ? भादव्या, कुणीकडे चालला आहेस ?
( भादव्या येतो. )
भादव्या - जी बाईसाहेब, दिवाणखान्यांत बैठक पसरायला जातों.
कृत्तिका - जरा इकडे ये पाहूं. हा एक मेला - मोठा लबाड !
भादव्या - काय बाईसाहेब ?
कृत्तिका - तूं खरं सांगायचा नाहींसच, पण आपली विचारतें. अरें, काल - आज, कुणी माझ्याकडे चिठ्ठी घेऊन आला होता काय रे ? नाहीं म्हणायचासच तूं. अन्न खातोस त्याची शपथ आहे बघ गुलामा !
भादव्या - खरंच मला ठाऊक नाहीं बाईसाहेब ! कोण यायचं होतं ?
कृत्तिका - तुला रे कां चौकशी मेल्या ! विचारलं त्याचं उत्तर द्यावं. ’ कोण चाललें पुढं तर कितक्यांत घोडं ’ हें विचारुन तुला काय करायचं ? मस्ण्या यायचा होता !
भादव्या - तर मग कुणी नव्हतं आलं बाईसाहेब ?
कृत्तिका - बरं, आज सकाळीं तुला यांनी कुठं धाडलं होतं ? खरं सांग !
भादव्या - ( स्वगत ) त्यांचा हुकूम कीं यांना कांही कळवूं नकोस ! आणि यांचा हुकूम खरं सांग ! या जोड हुकूमाच्या कैचींत अडकलों ! आतां - ( उघड ) मला बाईसाहेब कुठं धाडलं होतं? छे: बाईसाहेब.
कृत्तिका - मेली तुझी बाईसाहेब ! कुठं गेला होतास सांग आधीं !
भादव्या - मी कुठं गेलों बाईसाहेब ? कुत्र्याला फिरवून आणला, घोडयाला दाणा- खरारा केला; आणखी कुठं गेलों होतों बाईसाहेब ? आणि तुम्हांला कुणीं सांगितले ?
कृत्तिका - मला कर्णपिशाच्चानं सांगितलं. पण कुठं गेला होतास तें सांगतोस कीं नाही ?
भादव्या - छे: बाईसाहेब ! मी कशाला जाऊं ?
कृत्तिका - समजलं मेल्या ! नको सांगूस हो ! बघतोय पहा आणखी कसा तो ! " मुद्रा बावळ्याची, आणखी नजर कावळ्याची. " थांब मेल्यांनो ! तुम्हां सगळ्यांना घरांतून हांकलून लावीन तेव्हांच सुखानं निजेन ! बाहेर कोण रे बोलत आहे तें ? शब्द ओळखीचा नाही दिसत. कुणी बाहेरख्यालींतला सोबती असेल. या लबाडाच्याच संगतीनं स्वारी बिघडली ! थांब, ऐकतें काय बोलताहेत तें ! ( कान देते )
भादव्या - बाईसाहेब माझ्यावर जर विश्वास असेल --
कृत्तिका - थांब म्हणतें ना ! या बोलण्यांतलं मला कांहीं कळूं नये म्हणून तोंड चालविलं आहेस वाटतं ? ( पुन्हां ऐकूं लागते )
भादव्या - छे: बाईसाहेब. मी कशाला --
कृत्तिका - गप राहतोस कीं नाहीं मेल्या ! जा चालता हो इथून, जा ! ( भादव्या जातो. ) हं आलांत कां ? कुठें गेली होती आपली धिंडका इतका वेळ ? ( रोहिणी येते. ) आणि मला विचारल्याशिवाय कशी गेली होतीस ? सांग अगोदर !
रोहिणी - रागावूं नका बाईसाहेब ! काल त्या बिचारीला आपण नाहीं नाहीं तें बोललांत महाहि भलतंच म्हटलंत - माझे असो मेलं, पण तिची समजूत करायला म्हणून तिच्याकडे गेलें होतें.
कृत्तिका - हं, समजलं समजलं का गेली होतीस तें ! खरं बाहेर पडलं म्हणून सांधासांधी करायला गेली होतीस ! तूं त्या सटवीचं तोंड बंद करशील, पण मी भरणीबाईलाच विचारतें म्हणजे झालं तरी म्हटलं चिठ्ठीचं उत्तर कां नाही ? कुणी बिब्बा घातलां ? अग सटवे, तूं ती ! माझ्या कामांत असा चोंबडेपणा करतेस कां ? थांब !
रोहिणी - पण बाईसाहेब, माझं ऐकून तरी घ्या अगोदर. मी आपलंच काम करायला गेलें म्हणानात.
कृत्तिका - माझं काम ? अगं दांडगे !
रोहिणी - ऐका तरी बाईसाहेब, या यजमानसाहेबांबद्दल आपल्या मनांत संशय आला होता तो अगदीं खरा आहे, अशी माझी खात्री झाली !
कृत्तिका - हं - हं, ती ग कशी ? सांग सांग पाहूं.
रोहिणी - मी स्वातीला भेटायला गेले होते, म्हणून सांगितलंच तुम्हाला - तिनं एक चमत्कारिक गोष्ट सांगितलीन् बाईसाहेब !
कृत्तिका - ती काय ग ? ये, जवळ ये अशी. हं, सांग आतां काय गोष्ट ती.
रोहिणी - हें बघा बाईसाहेब, ( इकडे तिकडे पाहून ) यजमानसाहेबांचा निरोप घेऊन भादव्या आज सकाळी तिकडे गेला होता.
कृत्तिका - त्यांचा निरोप घेऊन भादव्या तिच्याकडे गेला होता ? काय ग बाई हे कारस्थान ! अरे मेल्या भादव्या ! तर मग काय निरोप तो ?
रोहिणी - यजमानसाहेबांनी स्वातीला आज संध्याकाळी अंधार पडला म्हणजे अय आंबराईच्या कोंपर्‍यावर भेटायला बोलावलं आहे !
कृत्तिका - तिला त्यांनी अंधार पडल्यावर बोलावलं आहे ? अग, हेंच तर मी म्हणत होते, पण तूं काय शहाणी !
रोहिणी - ऐका तरी बाईसाहेब पुढे. आणखी तें कसं म्हणून नाही विचारलंत ?
कृत्तिका - हं सांग सांग, कसं बोलावलं आहे ?
रोहिणी - तिला सांगितलं आहे कीं, तूं संध्याकाळी झाली म्हणजे कुणाला न कळत - ( एक नोकर येतो. )
कृत्तिका - कां रे मेल्या ! विचारल्याशिवाय कां आलास ? कुणी बोलावलं होतं तुला ? चल, चालता हो !
नोकर - बाईसाहेब, बाहेर एक गृहस्थ आला आहे, त्याच्या मनांतून धनीसाहेबांजवळ तसबिरीसंबंधानं बोलायचं आहे अस म्हणतोय तो.
कृत्तिका - तसबिरीसंबंधाने बोलायचं आहे ? अगं तेंच ग तेंच ! मी म्हटलं तेंच दिसतं. या गृहस्थाकडून कांहीतरी अधिक सुगावा लागला तर लागेल. ( नोकरास ) जा, त्यांना आंत घेऊन ये ! ( नोकर जातो. ) एकूण मेला भादव्या गेला होता का तिच्याकडे ? आणखी आमच्या नवरोजींनी, स्वातीला संध्याकाळी भेटायला बोलावलं आहे का ? आणखी तिला काय सांगितलं आहे म्हटलंस ?
रोहिणी - स्वाती बिचारी अगदी घाबरुन गेली आहे हो ! पुरुषच ते ! काय नेम आहे त्यांचा ? त्यांतून संध्याकाळी एकटं, आंबराईत, इतकचं नव्हे तर बाईसाहेब, बुरखा घेऊन बोलावलं आहे ! आणखी --
कृत्तिका - बुरखा घेऊन ? म्हणजे कुणाला दिसूं नये. आतां कशाला बोलावलं आहे हें एखादं पोर नाही का सांगणार - पण हां गृहस्थ आलाच. रोहिणी, तूं जरा त्या खोलीत जाऊण बैस. हा गेला म्हणजे येऊन सर्व सांग. ( रोहिणी जाते. ) संध्याकाळी, बुरखा घेऊन - मांजर अगदीं डोळे झांकून दुध पितं, त्याला वाटत आतां कोण बघणार ? ( आश्विनशेट येतो. ) या, बसा असे.
आश्विन - माझ्या मनांतून फाल्गुनरावांची कांही गोष्टीसंबंधानं गांठ घ्यायची होती. केव्हां भेटतील बरं ?
कृत्तिका - तसबिरीसंबंधानं वाटतं ?
आश्विन - होय. मी माझी तसबीर एका म्हणजे - हो समजा ना - समजा कशाला - आला प्रसंग म्हणून उघडच सांगतो. एका नायकिणीच्या मुलीला मी माझी तसबीर दिली होती. त्या तसबिरीची म्हणाजे मला मोठीशी पर्वा आहे असं नाही, पण कांहीं नाजूक गोष्टींचा उलगडा करण्याकरितां तिची मला जरुरी आहे. कारण त्या गोष्टीवर माझं जन्माचं सुखदु:ख अवलंबून आहे.
कृत्तिका - आलं लक्षांत कसं तें. बरं, ती मुलगी शेंपन्नासांत देखणी आहे का ?
आश्विन - शेपन्नासांत कां हजारांत म्हणा ना ? असो म्हणा - तेव्हां अशी मला शंका आली आहे कीं, तिनं ती तसबीर दुसर्‍याला देऊन टाकली.
कृत्तिका - अगदीं बरोबर ! माझाहि तर्क अगदीं बरोबर जुळला ! मलाहि शंका आली होती कीं --
आश्विन - ती काय बरं ? तिनं ती तसबीर फाल्गुनरावांना दिली म्हणून !
कृत्तिका - हो अशीच !
आश्विन - फाल्गुनरावांना दिली म्हणून ! झाला - संशयाचा निकालच झाला ! आणखी काय पाहिजे !
कृत्तिका - ( डोळ्याला पदर लावून ) माझ्या मात्र जन्माचं मातेरं केलं हो !
आश्विन - ( मनाशीं ) बिचारी रडूं लागली. अरेरे, यावरुन तर अगदीं स्पष्ट दिसतं !
कृत्तिका - बरं, त्या मुलीचं नांव काय बरं ?
आश्विन - रेवती.
कृत्तिका - रेवती कां ! ( मनाशीं ) असो, नांव तरी कळलं सटवीचं !
आश्विन - तुमच्या दुष्टीस ती कधीं पडली होती का ?
कृत्तिका - ती ? माझ्या दृष्टीस ! अहो, काय सांगू आतां ? बायकांनी अशा गोष्टी पुरुषांजवळ बोलूं नयेत म्हणून, नाहींतर काय काय दृष्टीस पडलं नी काय काय नाही, सगळं सांगितलं असतं !
आश्विन - म्हणजे, कांही भलतासलता प्रकार पाहिलात कीं काय ?
कृत्तिका - अहो, एखादी सतरा अठरा वर्षांची तरणीताठी पोरगी, परक्या पुरुषाच्या अंगावर खुशाल हवी तशी लोळूं लागली तर तुम्ही याला भलतासलताप्रकार म्हणाल ना ?
आश्विन - फाल्गुनरावाच्या अंगावर लोळूं लागली ?
कृत्तिका - हो, त्यांच्याच अंगावर - मांडीवर, झालंच तर त्यांच्या खांद्यावर हात टाकून - अंगाला - मला सांगायला लाज वाटते. आणखी दिवसाढवळ्या हो ! अगदीं आमच्या घरासमोर - त्या झाडाखाली !
आश्विन - काय बेशरम आहे पहा !
कृत्तिका - झालंच, त्यांनी तिला अशी धरलेली, सांगतें ना --
आश्विन - रेवती, तूं इतकी बेमान निघशील असं मला स्वप्नांतसुध्दां वाटलं नव्हतं ! पण लवकरच खरं स्वरुप प्रगट केलंस म्हणायचं ! असो, कृत्तिकाबाई, तुमच्या साह्यानं उलगडा झाल हें माझ्यावर तुमचे फार उपकार झाले ! पण शेवटीं एकदां विचारतों, हें सर्व खरं ना ?
कृत्तिका - खरं ना ? अहो, प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिलं म्हणतें ना ! आणखीं खरं ना कसलं ? धडधडीत मी पाहिलं ! शिवाय आमच्या यजमानांचा मला चांगला अनुभव आहे; काय हवं तें करायला मागंपुढं पाहायचे नाहीत ! आतां तुमच्या रेवतीबद्दल काय विचार करायचा तो तुम्ही करा !
आश्विन - तो आतां मला केलाच पाहिजे ! बरं, फाल्गुनरावांजवळ ती तसबीर आहे का ?
कृत्तिका - हो त्यांच्याजवळ आहे. मी कुठं क्षणभर हातांत घेतली होती तर राक्षसासारखे चवताळून माझ्या अंगावर आले आणि माझ्या हातांतून ती त्यांनी ओढून घेतली ! मल संशय आलाच होता म्हणून जरा लागून बोललें, पण पुरुषच ते ! माझ्यावर उलटले कीं हो ! ( पदर डोळ्यांस लवून ) मलाच म्हणतात, ही तुझ्या कुणातरी ह्याची तसबीर घेऊन बसली आहेस म्हणून ! किती बरं खोटं बोलणं हें !
आश्विन - नका, रडूं नका ! आतां मी आहें तुमचा साक्षीदार भिऊं नका ! घेऊं निरोप आतां ?
कृत्तिका - बरं, त्यासंबंधानं आणखी कांही पाहण्यासवरण्यांत आलं तर मला कळवा म्हणजे झालं.
आश्विन - त्याबद्दल अगदी काळजी करुं नका ! येतों तर. ( जातो. )
कृत्तिका - संभवित, मोकळ्या मनाचा आहे. बिचारा. नाहींतर आमचे हे ! मी म्हणतें, हे नवरे असा आमचा छळवाद करतात, त्यापेक्षा एकदम जाळून भाजून कां टाकीत नाहींत ? म्हणजे झालें मोकळी ! हो, पण रोहिणीची हकीगत ऐकायची राहिली आहे. तिच्याकडे जाऊं या. ( जाते. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP