अंक पहिला - भाग ९ वा

नाट्याचार्य देवलांच्या ’ संगीत मृच्छकटिक ’ ह्या नाटकाचा पहिला प्रयोग सन १८८७ सालीं ’ ललितकलोत्सव मंडळी ’ नें, पुणें येथें आनंदोद्भव नाट्यगृहांत केला.’


शका० : तूं चेट का ! हें काय रे ,इकडे जावे इकडे विट , तिकडे जावें तिकडे चेट , इकडे विट हें आहे तरीं काय ? तुम्हीं दोघेहि एकीकडे व्हा कसे ; मी आतां तिलाच शोधून काढितो. ( चांचपून रदनिकेची वेणी धरुन ) मित्रा विटा ,आतां मात्र खास खास धरली !
श्लोक
होती काळोखांत दडाली ॥ मालागंधें खूण दाविली ॥
केशीं धरिली या पठ्ठ्यानें ॥ रुक्मिणी जैशी दशकंठ्यांनें ॥१॥
विट : खरोखरीच सांपड्ली काय रे ? पळून जात होती नाहीं ? अगे वसंतसेने -
साकी
यौवनदपैं भाळलीस त्या सार्थवाहपुत्राला ॥
परि मम मित्रे कशी धरिली हरण कराया तुजला ॥ -
शका० : ( मध्येच )
आतां कोठे पळशील पोरी ॥ धरिली वेणी बुचडा दोरी
ओरड , मार हाका देवातें ॥ शंभू शंकर ईशा शिवातें ॥१॥
रद० : ( भय पावून ) तुम्ही थोर मनुष्य , असें काय करितां हें ?
विट : मित्रा , अरे, हा शब्द निराळा दिसतो. वसंतसेनेचा नव्हे.
शका० : अरे , तुला समजत नाही. दहीभात खाऊन सोकलेल्या मांजरीचा जसा स्वर बदलतो, तसा हिनें स्वर बदललेला आहे.
विट : काय ?  स्वर बदलला म्हणतोस ? मोठेंच आश्चर्य हें ! अथवा आश्चर्य कसलें ? एवढे गायला शिकली, एवढें नाचायला शिकली, लोकांना फसविण्याच्या कामी इतकी कुशल , तिनें स्वर बदलला यात काय नवल !
( मैत्रैय हातांत दिवा घेऊन प्रवेश करतो , )
मैत्रे० : ओ हो हो ! प्रदोशकालच्या मंद वायूनें हा दिवा पहा कसा कापतों आहे ! वधस्तंभापाशीं नेलेल्या बोकडाचें काळीज असेच कापत असते . ( पुढे होऊन रदनिकेची स्थिती पाहून ) रदनिकें !
शका० : ( भय पावून ) विटा , कोणी माणूस रे माणूस !
मैत्रे० : रदनिके , चारुदत्त दरिद्री झाला म्हणून त्याचा धाक न बाळगतां परका पुरुष घरात आणतेस, हें चांगले नव्हें .
रद० : अहो मैत्रेय , माझी आधी दुर्दशा तरी पहा . बघा याने मला कसे धरिलें आहे.
मैत्रे० : ( क्रोधानें काठी उगारुन ) काय करितोस रे ? हो एकीकडे . कुत्रादेखील परक्याला आपल्या धन्याच्या घरांत येऊ देत नाही; मग मी तर मनुष्य - यांत ब्राह्मण - मग मी गप्प बसेन काय ? आम्हांसारख्या दुदैव्यांच्या नशिबाप्रमाणे किंवा तुम्हासारख्या दुर्जनांच्या ह्र्दयाप्रमाणॆं हे वाकडे लांकुड आहे. यानें तुझे डोकेंच फोडून टाकितों !
विट : हे महाब्राह्मणा , क्षमा कर.
मैत्रे० : ( विटास पाहून ) ह्याचा अपराध दिसत नाही. ( शकारास उद्देशून ) हाच अपराधी आहे. अरे राजशालका, संस्थानका, दुर्जना , जरी श्रेष्ठ चारुदत्त द्रव्यहीन झाला असला तरी त्याचे गुण काय सर्व उज्जयिनी नगरीला माहीत नाहीत ? तेव्हा त्याला तुच्छ मानून व त्याच्या घरांत शिरुन , त्याच्या परिजनाशीं अशी दांडगाई करतोस ? काय म्हणावें तुला ?
विट : महाब्राह्मणा क्षमा कर म्हटले ना ! दुसर्‍या एका स्त्रीच्या भ्रांतीनें आम्हाकडून ही चूक झाली . केवळ दांडगेपणा किंवा चारुदत्ताचा उपमर्द करावा म्हणून झाली असे नाही. हे पहा, भट्जीमहाराज , जिचा आमच्याकडे डोळा, तिलाच आम्ही शोधितो. भलतीच्याच वाटेला आम्ही कसे जाऊं बरे ?
मैत्रे० : मग ही तशी आहे का ?
विट : छे : छे : , नुकतीच दुसरी एक स्त्री येथून गेली ; तिच्या भ्रांतीनें आम्हांकडून ही चूक झाली . तर सर्व प्रकारे आम्ही तुम्हाला शरण आहो ; ही गोष्ट चारुदत्ताला कळविणार नाही असे वचन द्या . ( त्याचे पाय धरतो. )
मैत्रे० : बरें , हें घे वचन नाही सांगायचा,
विट : ( उठून ) भटजीमहाराज , खर्‍या गुणांपुढे आमच्या गर्वाचें काय चालणार आहे ?
शका० : ( ईर्ष्येनें ) काय रे विटा , कशाकरतां या म्हातारड्या भटुरग्याच्या मोठ्या विनयाने पाया पडलास ?
विट : भ्यालो म्हणून .
शका० : कोणास भ्यालास ?

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP